निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदाराचे पती भाऊसाहेब डंगरे हे शेतकरी होते. त्यांचे दिनांक 28/11/2007 रोजी विहीरीत बुडून निधन झाले. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (यापुढे विमा कंपनी असा उल्लेख करण्यात येईल) कडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता. म्हणून तिने सदर विमा योजने मधील तरतुदीनुसार तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबद्दल विमा रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स प्रा.लि., मार्फत विमा दावा दाखल केला परंतु गैरअर्जदारानी त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही व तिला विमा रक्कम दिली नाही. अशा प्रकारे गैरअर्जदारानी त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदाराकडून रु 1,00,000/- व्याजासह देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र 1 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर विमा रक्कम मिळावी म्हणून त्यांच्याकडे कोणताही विमा दावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने जो विमा दावा दाखल केला होता त्यासोबत तिने गैरअर्जदार क्र 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली नव्हती. म्हणून गैरअर्जदार क्र 2 यांनी तक्रारदाराला कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत वेळोवेळी पत्र दिल्याचा उल्लेख त्यांच्या लेखी निवदेनामध्ये केलेला आहे परंतु तक्रारदाराने त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही असे कबाल इन्शुरन्स यांचे म्हणणे आहे. यावरुन तक्रारदाराने पॉलिसीमधील अटी व शर्तीनुसार कागदपत्रांची पूर्तता केल्याचे दिसत नाही. तक्रारदाराचा कोणताही विमा दावा प्राप्त झालेला नसुन तिचे पती शेतकरी असल्याबाबत तक्रारदाराने फेरफार दाखल केलेला नव्हता. तक्रारदाराच्या पतीचे निधन दिनांक 29/11/2007 रोजी झाले. परंतु तिने ही तक्रार अत्यंत विलंबाने दाखल केलेली असून तिची तक्रार मुदतबाहय आहे म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार विमा कंपनीने केली आहे. गैरअर्जदार क्र 2 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, भाऊसाहेब डांगरे यांचे दिनांक 29/11/2007 रोजी अपघाती निधन झाले. त्या संदर्भातील विमा दावा दिनांक 28/5/2008 रोजी दाखल झाला परंतु विमा दाव्यासोबत तलाठी प्रमाणपत्र, तहसिलदाराचे प्रमाणपत्र, फेरफार, वयाचा दाखला, इन्क्वेस्ट पंचनामा, एफआयआर, आणि शवविच्छेदन अहवाल, इ. कागदपत्रे नव्हती. या कागदपत्रांची पूर्तता करावी म्हणून तक्रारदाराला दिनांक 5/6/2008, 25/7/2008 आणि 15/11/2008 रोजी स्मरणपत्रे देण्यात आली. परंतु तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यामुळे तक्रारदाराचा अपूर्ण विमा दावा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्यात आला. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे - तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही.
- गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय? मुद्दा उरत नाही.
- आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे मुद्दा क्र 1 व 2 :- तक्रारदार आणि गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. गैरअर्जदार विमा कंपनीने असा प्राथमिक मुद्दा उपस्थित केला की, तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराच्या पतीचे निधन दिनांक 29/11/2007 रोजी झाले. त्यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 29/11/2007 रोजी घडले. परंतु तक्रारदाराने ही तक्रार दिनांक 11/2/2010 रोजी दाखल केली आहे म्हणून ही तक्रार मुदतबाहय आहे. या संदर्भात तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिचा विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे. म्हणून ही तक्रार मुदतीत आहे. तक्रारदाराच्या पतीचे निधन दिनांक 29/11/2007 रोजी झाले आहे त्यामुळे तिला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 29/11/2007 रोजी घडले आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 24(अ) प्रमाणे तक्रारदाराने ही तक्रार 2 वर्षाच्या आत म्हणजे दिनांक 29/11/2009 पूर्वी दाखल करणे आवश्यक होते. प्रस्तूत तक्रारीसोबत तक्रारदाराने विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. विलंबा बाबत तक्रारदाराने कोणताही खुलासा केलेला नाही. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी Kandimalla raghavaiah & Co. v.s National Insurance Co. & Anr. --- 2009 (4) CPR 17 (SC) या प्रकरणामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, ज्या दिवशी घटना घडली आहे त्याच दिवशी तक्रारीचे कारण घडलेले असते आणि विमा कंपनीकडे दाखल केलेला विमा दावा केवळ प्रलंबीत आहे म्हणून तक्रार दाखल करण्याची मुदत पुढे आपोआप वाढत नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपरोक्त निवाडयातील तत्वाचा विचार करता तक्रारदाराची प्रस्तूत तक्रार निश्चितपणे मुदतबाहय असल्याचे दिसते. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे किंवा नाही याबाबत कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- संबंधितांनी आपापला खर्च सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष युएनके
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |