(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
आदेश
तक्रारकर्त्याने ग्राहक या नात्याने त्याच्या महिन्द्रा बोलेरो मॅक्स पिक-अप या वाहनाच्या अपघाताबद्दलचा विरूध्द पक्ष यांच्याकडे दाखल केलेला विमा दावा विरूध्द पक्ष यांनी नामंजूर केल्यामुळे विमा दाव्याचे पैसे नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू प्रकरण न्याय मंचात दाखल केले आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा विद्यमान न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात राहात असून तक्रार दाखल करण्याची Cause of action सुध्दा न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात व मुदतीत असल्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच्या MH-35/K-2138 हा रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या महिन्द्रा बोलेरो मॅक्स पिक-अप या अपघातग्रस्त वाहनाची विमा रक्कम विरूध्द पक्ष यांनी न दिल्यामुळे सदरहू प्रकरण न्याय मंचात दाखल केले आहे.
3. तक्रारकर्त्याने त्याच्या उपरोक्त वाहनाची विमा पॉलीसी विरूध्द पक्ष यांच्याकडून घेतली होती व त्याचा कालावधी दिनांक 20/05/2012 ते 19/05/2013 असा होता. दिनांक 14/02/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाला. तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन, गोंदीया येथे अपघाताबाबतची रितसर तक्रार दाखल केली. पोलीसांनी अपघाताची चौकशी करून संबंधित कागदपत्र तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्याने अपघाताची माहिती विरूध्द पक्ष यांना दिली होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह अर्ज केला. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा कुठलेही संयुक्तिक कारण न देता फेटाळून लावला. तक्रारकर्त्याने विमा दावा limitation नुसार दाखल केलेला होता. तक्रारकर्त्याने सर्व्हेअरच्या रिपोर्टनुसार रू. 4,47,426/- नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू विमा दावा विरूध्द पक्ष यांच्याकडे केलेला होता व तो मंजूर करण्यात यावा याकरिता सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 30/01/2014 रोजी मंचात दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली.
विरूध्द पक्ष यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दिनांक 19/06/2014 रोजी आपला जबाब मंचात दाखल केला.
विरूध्द पक्ष यांनी आपल्या जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याला वेळोवेळी संबंधित कागदपत्रांची मागणी करून सुध्दा तक्रारकर्त्याने त्याची पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा बंद करण्यात आला. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नसून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पृष्ठ क्र. 12 वर दाखल केले असून वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट पृष्ठ क्र. 13 वर दाखल केले आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकाचा परवाना पृष्ठ क्र. 14 वर, पॉलीसीची प्रत पृष्ठ क्र. 15 वर, एफ.आय.आर. पृष्ठ क्र. 16 वर, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट पृष्ठ क्र. 19 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 22 वर, असेसमेंट रिपोर्ट पृष्ठ क्र. 23 व 25 वर, विरूध्द पक्ष यांनी कागदपत्रांसंबंधी मागणी केलेले पत्र पृष्ठ क्र.29 वर तसेच वकिलांमार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 31 वर, त्याची पोच पृष्ठ क्र. 33 याप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
6. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. एम. के. गुप्ता यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अपघात दिनांक 14/02/2013 रोजी झाला व अपघाताची माहिती विरूध्द पक्ष यांना देण्यात आली आणि त्याबद्दल विरूध्द पक्ष यांना कुठलाही आक्षेप नाही. तक्रारकर्त्याने अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर. दाखल करून पोलीस स्टेशनचे एफ.आय.आर., इन्क्वेस्ट पंचनामा, फायनल रिपोर्ट तक्रारीमध्ये दाखल केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात झाला हे कागदपत्रावरून निष्पन्न होते. तसेच तक्रारकर्त्याने संपूर्ण कागदपत्रांसह विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. परंतु Identity Proof व Address Proof तक्रारकर्त्याने दाखल केले नाही या किरकोळ कारणावरून विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज केला. सदरहू कृती म्हणजे विरूध्द पक्ष यांची सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्त्याने संपूर्ण कागदपत्र देऊन सुध्दा त्याचा दावा तांत्रिक मुद्दयावरून व कुठलेही संयुक्तिक कारण न देता खारीज करणे म्हणजे सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्याचे प्रकरण मंजूर करण्यात यावे.
7. विरूध्द पक्ष यांच्या वकील ऍड. सुचिता देहाडराय यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने दिनांक 14/2/2013 रोजी अपघात झाल्यानंतर विमा दावा विरूध्द पक्ष यांच्याकडे दाखल केला. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडे दिनांक 6 मार्च, 2013 व 24 जून 2013 रोजी कागदपत्रांची मागणी करून सुध्दा तक्रारकर्त्याने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा Identity Proof व Address Proof या कागदपत्रांअभावी खारीज करण्यात आला असे Repudiation Letter विरूध्द पक्ष यांनी दिनांक 08/10/2013 रोजी तक्रारकर्त्यास दिले. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी कुठलीही त्रुटी केलेली नसल्यामुळे सदरहू प्रकरण खर्चासह खारीज करण्यात यावे.
8. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. तक्रारकर्त्याने त्याच्या वाहनाचा दिनांक 14/02/2013 रोजी अपघात झाल्यानंतर सदरहू अपघातासंबंधीची माहिती विरूध्द पक्ष यांना दिलेली होती. तक्रारकर्त्याने त्याच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशन, गोंदीया येथे दिनांक 14/02/2013 रोजी F.I.R. No. 10/2013, भा.दं.वि. कलम 279, 304-ए नुसार दिलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदविल्या गेला व गुन्ह्याचे Investigation केल्यावर संबंधित कागदपत्र पोलीस स्टेशन अधिकारी यांनी तक्रारकर्त्याला दिले. सदरहू प्रकरणात दाखल केलेल्या F.I.R. नुसार वाहनचालक नेमीचंद गंगभोज वळण रस्त्यावर समोरून येणा-या वाहनाला अपघात होण्यापासून वाचविण्याकरिता रस्त्याच्या बाजूला वाहन लावले असता वाहन पलटी होऊन अपघात झाला असे नमूद केले आहे. पोलीस स्टेशन मधील F.I.R., घटनास्थळ पंचनामा व इतर संबंधित कागदपत्रे यावरून तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात झाल्यामुळे नुकसान झाले ही बाब सिध्द होते.
10. तक्रारकर्त्याने अपघात झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांच्याकडे अपघाताबद्दलची माहिती देऊन संबंधित कागदपत्रांसह विमा दावा नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केला होता. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा दावा प्रलंबित ठेवून कागदपत्रांअभावी तो नामंजूर करण्यात आला असे तक्रारकर्त्यास कळविले. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा दावा कागदपत्रांअभावी प्रलंबित ठेवण्यात आला यासंबंधी विरूध्द पक्ष यांचे संबंधित शाखा व्यवस्थापक यांचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सदरहू प्रकरणात दाखल केलेले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या Burden of Proof चे कायद्यानुसार पूर्तता न केल्यामुळे व तक्रारकर्त्याने संबंधित कागदपत्र देऊन सुध्दा तक्रारकर्त्याचा विमा दावा तांत्रिक मुद्दयावर तसेच कुठलेही संयुक्तिक कारण न देता खारीज करणे म्हणजेच सेवेतील त्रुटी होय असे मंचाचे मत आहे.
11. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत वाहन दुरूस्तीकरिता येणा-या खर्चाबद्दलचा श्री. मनीष शुक्ला, सर्व्हेअर यांनी तयार केलेला असेसमेंट रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदरहू असेसमेंट रिपोर्टनुसार वाहन दुरूस्तीकरिता येणारा खर्च रू. 4,47,416/- इतका नमूद करण्यात आलेला आहे. तसेच Expert Evidence ला विरूध्द पक्षाने Rebuttal किंवा challenge केलेले नाही किंवा Disprove करण्यासाठी सदरहू प्रकरणात कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरहू अहवाल हा सदरहू प्रकरणात Expert Evidence म्हणून ग्राह्य धरण्यायोग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास त्याच्या अपघातग्रस्त वाहनाच्या विम्याची रक्कम रू. 4,47,416/- द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 30/01/2014 पासून संपूर्ण पैसे मिळेपर्यंत द्यावे.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.