(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 20.09.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार गै.अ.चे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 व 14 अन्वये अपघातग्रस्त वाहनाचे विमा क्लेमची रक्कम मिळण्याकरीता दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 2. अर्जदार व्यवसायाने वकील असून दि.24.8.09 रोजी गै.अ.क्र.3 कडून टाटा इंडिको सीएस ही नवीन कार क्र.एम.एच.34 एए/0079 रुपये 5,12,000/- मध्ये विकत घेतले आणि त्या गाडीचा विमा गै.अ.क्र.1 कडून काढला. पॉलिसी क्र.1705792311006011 दि.24.8.09 ते 23.8.2010 या कालावधीत वैध होती. गै.अ.क्र.1 ने विमा पॉलिसी गै.अ.क्र.2 मार्फत पाठविली असून, जाहीर केलेली किंमत रुपये 4,33,644/- अशी असून विमा प्रिमीयम रुपये 11815 गै.अ.क्र.2 कडे अर्जदाराने जमा केला. अर्जदाराने, कार खरेदीकरीता टाटा फायनान्स कंपनीकडून 3,65,000/- रुपयाचे कर्ज घेतले. कर्जाचे दरमाह रुपये 11,300/- प्रमाणे भरावे लागते. विलंब झाल्यास विलंब शुल्क व दंडात्मक व्याज भरावे लागते. 3. दि.12.1.10 रोजी कारचा राञी अपघात झाला, अपघाताची माहिती रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे दिली. अर्जदाराने 13.1.10 ला, गै.अ.क्र.2 व 3 ला कळविण्यात आले. गै.अ.क्र.2 व 3 च्या नागपूर रोडवरील कार्यशाळेत अनिल चिल्लुरवार यांच्या मागणीप्रमाणे काग्रदपञे त्याचे सुपूर्द केले. अर्जदाराने, वाहनाच्या दुरुस्तीबाबतचे कोटेशन गै.अ.क्र.3 कडून घेवून सादर केले आणि अपघातग्रस्त वाहन गै.अ.क्र.3 चे कार्यशाळेत ठेवण्यात आले. विमा पॉलिसी कॅशलेस पॉलिसी असल्यामुळे दुरुस्ती करुन घेण्याची चिंता करण्याचे कारण नव्हते. विमा पॉलिसीत जाहीर केलेल्या किंमतीपेक्षा दुरुस्तीचा अनुमानीत खर्च जास्त असल्यामुळे दुरुस्ती करणे परवडणार नाही, त्यामुळे दुरुस्तीच्या ऐवजी कारची जाहीर केलेली किंमत मिळेल, असे गै.अ.क्र.3 ने सांगितले, त्याकरीता गै.अ.क्र.1 कडून मंजूरी येईपर्यंत वाट पाहावी लागेल असे कळविले. 4. अर्जदाराने, सतत पाठपुरावा करुन ई-मेल व्दारे क्लेमची मागणी करुन ही गै.अ.नी विमा क्लेम दिला नाही. गै.अ.यांनी दि.10 मार्च 2010 रोजी अर्जदाराचा भाऊ बलवंत गौरकार याचे ईमेल स्थळावर ई-मेल पाठवून गै.अ.क्र.1 ने सालवेज व्हॅल्यु रुपये 4,10,000/- स्विकारण्यास तयार असल्याबाबत अर्जदाराची संमती मागितली. सदर रकमेपैकी रुपये 2,11,000/- सालवेज बायर कडून आणि उर्वरीत रुपये 1,99,000/- गै.अ.क्र.1 कडून देण्यात येईल असे त्यात नमूद केले. गै.अ.यांनी सालवेज बायरचे नाव कळविले नाही आणि अर्जदाराची क्लेमही मंजूर केला नाही. अर्जदार जानेवारी 2010 पासून कारच्या उपभोगापासून वंचीत झाला. अर्जदाराने टाटा फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या करारानुसार जानेवारी 2010 पासून किस्ती थकीत झाल्यामुळे दि.7.6.2010 रोजी नोटीस पाठवून थकीत किस्ती, विलंब शुल्क व व्याजासह भरण्याची मागणी केली. सदर विलंब शुल्क व व्याज आतापावेतो रुपये 1,90,910.48 एवढे आकारण्यात आले आहे. सदर रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यास गै.अ. जबाबदार आहेत. अर्जदाराने, एकूण रुपये 9,28,620.98 गै.अ.कडून मागणी केली आहे. त्यात कारची किंमत रुपये 4,33,644/-, तसेच, त्यावर व्याज, टाटा फायनान्सचे विलंब शुल्क व व्याजाची रक्कम आणि मानसीक शारीरीक ञासाबद्दल नुकसान भरपाई आणि गैरअर्जदाराशी केलेल्या पञव्यवहार व प्रवास खर्चाबाबत, असे सर्व मिळून मागणी केली आहे. गै.अ.क्र.1 व 3 यांनी अर्जदारास रुपये 9,28,620.98 द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे देण्याचा आदेश पारीत करण्यात यावा. तसेच, कार पार्कींगचे शुल्क व अन्य कोणतेही शुल्क देण्यास अर्जदार पाञ नाही, असे जाहीर करण्यात यावे, आणि तक्रारीचा खर्च गै.अ.वर बसविण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. 5. अर्जदाराने, तक्ररीसोबत नि.4 नुसार एकूण 14 झेरॉक्स व अस्सल दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 हजर होऊन नि.20 प्रमाणे, गै.अ.क्र.2 ने नि.8, आणि गै.अ.क्र.3 ने नि.12 प्रमाणे आपले लेखी उत्तर सादर केले आहेत. 6. गै.अ.क्र.1 ने नि.20 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात अर्जदाराचे तक्रारीतील कथन पूर्णपणे खोटे असल्यामुळे अमान्य करुन तक्रार बेकायदेशीर असल्याने खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात असे कथन केले की, गै.अ.क्र.1 कडे विमा क्लेम सादर केल्यानंतर अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करण्याकरीता, सरबतसिंग यांना नियुक्त केले. सर्व्हेअर यांनी सर्व्हे करुन विमा कंपनीला रिपोर्ट सादर केला. सर्व्हे रिपोर्टनुसार विमा क्लेम रुपये 2,96,764/- इतके निघाले. गै.अ.क्र.1 यांनी दोन प्रकारे वाहनाचा सर्व्हे करुन, अर्जदाराला त्यापैकी एक क्लेम स्विकारण्यास सांगण्यात आले. परंतु, अर्जदाराने सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे वाहनाचा विमा क्लेम स्विकारण्यास नकार दिला व बेकायदेशीररित्या अपघातग्रस्त वाहनाची मुळ किंमत रुपये 5,12,000/- इतकी मागीतली. अर्जदाराला मुळ गाडीची किंमत मागण्याचा कायदेशीर अधिकार नाही. अर्जदार व गै.अ. यांचेमध्ये विमा करारा अंतर्गत सदर वाहनाचा IDV रक्कम रुपये 4,33,764/- इतकी आकारण्यात आली, आणि त्यानुसार विमा प्रिमियम रुपये 11,815/- घेण्यात आली. गै.अ. विमा कंपनी यांनी दि.10.3.10 ला ई-मेल पाठवून नेट सालवेज बद्दल संमती पञ देण्याची विचारणा केली. परंतु, अर्जदाराने दि.12.3.10 ला प्रश्नावली पाठविली. परंतु, नेट सालवेज बद्दल काहीही पाठविले नाही. त्यामुळे, दि.2.4.2010 रोजी दुरुस्ती बील, वाहन पूर्व तपासणीकरीता सादर करावे अशी सुचना केली, परंतु अर्जदार त्यात असमर्थ ठरला. अर्जदाराने विमा कंपनीला संमती बद्दल कळविले नाही व गाडी दुरुस्ती बील सुध्दा कंपनीला पाठविले नाही. त्यामुळे, अर्जदाराच्या चुकीने व असहयोगामुळे क्लेम निकाली लागला नाही, त्याकरीता, अर्जदार हा जबाबदार आहे. गै.अ.क्र.1 यांनी विमा क्लेम नाकारला नाही. या कारणानी तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही. 7. सदर विमा पॉलिसी मोटार वाहन कायदा अंतर्गत काढली असून, वाहनाचे चालकाकडे कायम स्वरुपी वैध परवाना असणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी वाहन चालकाचा परवाना या प्रकरणात दाखल केला नाही. गै.अ.क्र.1 यांनी अर्जदाराला कधीही न्युनता पूर्ण सेवा दिली नाही. तक्रार खोटी, बनावटी, आधारहीन, बेकायदेशीर असल्याने खर्चासह खारीज करण्यांत यावी. 8. गै.अ.क्र.2 ने नि.8 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात अर्जदाराने त्याचेवर लावलेले आरोप पूर्णपणे नाकारुन तक्रार त्याचेविरुध्द खारीज करण्याची प्रार्थना केली आहे. तक्रारकर्ता याच्या गाडी खरेदीबाबतचे कथन गै.अ.क्र.2 यांनी मान्य केले आहे. परंतु, हे म्हणणे खरे नाही की, विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.3 यांची संबंधीत कंपनी आहे. हे म्हणणे खरे आहे की, तक्रारकर्ता यांनी त्याचे गाडीला झालेल्या अपघाताची सुचना विरुध्द पक्ष क्र.2 यांना दिली होती व तक्रारकर्ता याची गाडी विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे दुरुस्तीला आणली होती. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे दिलेले सर्व कागदपञ, विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे सुपूर्द केले होते. विरुध्द पक्ष यांनी सर्व्हेअर नेमून गाडीचा सर्व्हे केला होता. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दुरुस्तीचे कोटेशन दिले होते. हे म्हणणे खरे आहे की, तक्रारकर्त्यानी टाटा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. हे म्हणणे खरे आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 4,10,000/- मंजूर केल्याचे कळविले होते, त्यापैकी, रुपये 2,11,000/- सालवेज खरेदीदाराकडून व रुपये 1,99,000/- विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून मिळणार होते. याचेशी विरुध्द पक्ष क्र.2 चा काही संबंध नव्हता, कारण किती मंजूर करायची हे फक्त विरुध्द पक्ष क्र.1 ठरवू शकणार होते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्याची जबाबदारी चोखपणे पारपाडली आहे. तक्रारकर्त्याला पूर्ण सहकार्य केले आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांचा काहीच दोष नसतांना, या प्रकरणात ओढले आहे, म्हणून विरुध्द पक्ष क्र.2 हे ही तक्रार त्याचे विरुध्द खारीज करावी, अशी प्रार्थना केली आहे. 9. गै.अ.क्र.3 यांनी, नि.12 नुसार लेखी उत्तर दाखल करुन तक्रार खोटी असून विनाकारण जोडले असल्यामुळे खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली आहे. तक्रारीतील सर्व आरोप अमान्य केले आहे. गै.अ.क्र.3 कडून टाटा इंडिको कार क्र.एम.एच. 34 एए/0079 खरेदी केली आहे. ही बाब मॅटर ऑफ रेकॉर्ड असल्याने मान्य की, गै.अ.क्र.2 व 3 या संबंधीत कंपनी आहे. परंतु, दोन्ही गैरअर्जदाराची कार्यप्रणाली ही पूर्णता भिन्न आहे. ही बाब अमान्य की, गै.अ.क्र.2 व 3 यांचे गैरअर्जदार क्र.1 शी टाय अप आहे. ही बाब, सत्य की, सदर वाहन हे अर्जदाराने, गै.अ.क्र.3 यांचे कार्यशाळेत आणून सोडले. ही बाब सत्य की, गै.अ.क्र.3 यांनी सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी येणा-या खर्चाचे अंदाजे कोटेशन अर्जदाराच्या विनंतीनुसार बनवून दिले. सदर वाहन हे दि.13.1.2010 रोजी संध्याकाळी गै.अ.क्र.3 कडे आणल्याने विमा कंपनीने सदर वाहनाच्या क्लेमबाबत गैरअर्जदारास कोणत्याही सुचना न मिळाल्यामुळे क्लेमबाबत किंवा कॅशलेस सुविधाबाबत काहीही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर वाहनाच्या खर्चाचे अंदाजपञक हे अर्जदाराच्या विनंती वरुनच देण्यात आलेले आहे, परंतु गै.अ.क्र.3 हा विम्याची रक्कम भरुन देण्यास कसल्याही प्रकारे जबाबदार नाही. गै.अ.क्र.3 यास विनाकारण जोडल्यामुळे दाव्याची रक्कम देण्यास गै.अ.क्र.3 जबाबदार नाही.
10. गै.अ.क्र.3 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराच्या वाहनाला अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त वाहन गै.अ.क्र.3 यांच्या कार्यशाळेत आणून सोडले व त्यानंतर, अर्जदाराच्या विनंती नुसार प्रत्यक्ष पाहणीवरुन लक्षात येणारा अंदाजे खर्च रुपये 5,73,938.16 चे कोटेशन दि.13.1.10 रोजी देण्यात आले. अर्जदाराचे वाहन हे केवळ चार महिण्यातच अपघातग्रस्त झाल्याने, सदर वाहन दुरुस्त न करता, अर्जदारास वाहनाचा विमांकित रककम विमा कंपनी तर्फे परत पाहिजे होती, करीता अर्जदाराने सदर वाहनाची दुरुस्ती ही विमा कंपनी तर्फे क्लेम मान्यता येईपर्यंत थांबण्यास सांगितले होते. अर्जदाराची मागणी ही विमा कंपनीने मान्य केल्याबाबत, अर्जदारास दि.10.3.2010 रोजी त्यांच्या व विमा कंपनीच्या परस्पर व्यवहाराबाबत माहिती गै.अ.क्र.3 यास देण्यात आली. त्यानुसार, विमा कंपनी सदर वाहन हे नेट लॉस म्हणून जाहीर सुध्दा केलेले आहे, त्यामुळे वाहनाची दुरुस्ती करण्यामागे काहीही कारण उरलेले नव्हते. अर्जदाराचे वाहन, गै.अ.क्र.3 च्या कार्यशाळेत आणून सोडले, तेंव्हापासून अर्जदारास गैरअर्जदाराने शक्य ती मदत केलेले आहे. त्याबाबतचे सर्व कागदपञ लेखी जवाबासोबत जोडलेले आहे, शिवाय विमा कंपनीस आवश्यक ते सर्व कागदपञाचा पाठपुरावा सुध्दा गै.अ.क्र.3 ने केलेला आहे. सदर प्रकरणात, गै.अ.क्र.3 ला अर्जदाराने फक्त मानसिक व आर्थिक ञास देण्याकरीता जाणून-बुजून सहभागी केले आहे. गै.अ.क्र.3 चा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याने त्याचे विरुध्द तक्रार खर्चासहीत खारीज करण्यांत यावी, अशी विनंती केली आहे. 11. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.24 नुसार शपथपञ व नि.25 व नि.34 नुसार दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तरालाच शपथपञाचा भाग समजण्यात यावा, अशी पुरसीस नि.22 नुसार दाखल केली. गै.अ.क्र.2 व 3 ला शपथपञ दाखल करण्यास संधी देवूनही दाखल केले नाही, त्यामुळे गै.अ.क्र.2 व 3 चे शपथपञाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात यावे, असे नि.1 वर दि.21.7.11 ला आदेश पारीत करण्यात आला. गै.अ.क्र.3 ने नि.26 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. गै.अ.क्र.1 ने नि.31 नुसार लेखी युक्तीवाद, गै.अ.क्र.2 ने दाखल केलेले लेखी उत्तरालाच शपथपञ व लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, अशी पुरसीस नि.33 नुसार दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवाद व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 12. अर्जदार यांनी, गै.अ.क्र.1 कडून टाटा इंडिका कार एम.एच.34 एए/0079 चा विमा काढला होता. विमा कालावधी 24.8.09 ते 23.8.10 असा असून, याच कालावधीत म्हणजेच दि.12.1.10 ला कारचा अपघात झाला. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 व 3 मार्फत सर्व दस्ताऐवज विमा क्लेम मिळण्याकरीता गै.अ.क्र.1 कडे पाठवीले. परंतु, अजुनपर्यंत विमा दावा निकाली निघालेला नाही, याबद्दल कोणताही वाद नाही. अर्जदार व गै.अ.यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन आणि लेखी उत्तरावरुन हे स्पष्टपणे सिध्द होतो की, इंडिका कारचा विमा दावा जानेवारी 2010 पासून निकाली निघालेला नाही. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 व 2 यांचेशी ई-मेल व्दारे पञ व्यवहार केला. गै.अ.क्र.1 यांनी, नि.20 नुसार दाखल केलेला लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, अर्जदारास IDV नुसार 5 % कपात करुन रुपये 4,10,000/- चा क्लेम देण्याचे बाबत अर्जदारास संमती मागितली. परंतु, अर्जदार यांनी संमती दिली नाही. गै.अ.क्र.1 चा दुसरा असा ही मुद्दा आहे की, अर्जदाराने सहयोग दिला नाही, तसेच विमा दावा दुरुस्ती खर्चाच्या आधारावर किंवा पूर्ण नुकसान तत्वाचे आधारावर मंजूर करावे, असे दोन प्रकारा पैकी कोणत्या पध्दतीने वाहनाचा क्लेम देण्याबाबत, संमती मागितली. परंतु, अर्जदाराने संमती दिली नाही. गै.अ.क्र.1 यांचे कथनानुसार सालवेज बायर कडून रुपये 2,11,000/- आणि विमा कंपनीकडून रुपये 1,99,000/- देण्याची संमती दर्शविली, त्यावर, अर्जदाराने आपली संमती दिली नाही. गै.अ.क्र.1 चे म्हणणे उचीत नाही, गै.अ.क्र.1 ने आपली बाजू स्पष्टपणे अर्जदारास सांगीतली नाही, त्यामुळे अर्जदाराने प्रश्नावली नुसार पञ दिला. गै.अ.क्र.3 यांनी लेखी युक्तीवादात हे मान्य केले आहे की, विमा कंपनीने वाहन नेट लॉस म्हणून घोषीत केले. त्यामुळे, अर्जदार वाहनाची नुकसान भरपाई ही इंशुअर्ड मुल्य (IDV) रुपये प्रमाणे गै.अ.क्र.1 ने दिलेले ई-मेल दि.10.3.2010 पासून मिळण्यास पाञ आहे. 13. अर्जदाराने, तक्रारीत वाहनाची किंमत रुपये 4,33,644/- ची मागणी केली आहे. गै.अ.क्र.1 यांनी नेट लॉस बेसीसच्या आधारावर विमा क्लेम देण्याबाबत मान्य केले असून, IDV मधून 5 % घसाई कमी करुन, रुपये 4,10,000/- देण्याचे मान्य केले आहे. गै.अ.क्र.1 यांनी रुपये 4,10,000/- देण्याचे मान्य केले, ही बाबच मुळात बेकायदेशीर असल्याची दिसून येते. वास्तविक, वाहनाचे IDV रुपये 4,33,644/- एवढा असल्याचे दस्त अ-1 वरुन दिसून येते. वाहन गै.अ.क्र.3 कडून खरेदी केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तसेच, वाहन खरेदी केल्यापासून 4 महिन्याचे आंत अपघात झालेला आहे. अर्जदाराने, अ-1 वर दाखल केलेल्या विमा पॉलिसीचे शर्ती व अटीचे अवलोकन केले असता, शेडयुल ऑफ डिफरेशनमध्ये 6 महिन्यापर्यंत शुन्य टक्के असून, 6 महिन्याच्या नंतर 5 % डिफरेशन गृहीत धरलेला आहे. प्रस्तुत प्रकरणातही विमा मुल्य रुपये 4,33,644/- गृहीत धरल्यानंतर, परत त्यातून 5 % घसाई मुल्य 4 महिन्यात कमी करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. गै.अ.यांनी अर्जदारास रुपये 4,10,000/- घसाई मुल्य कमी करुन स्विकारण्याबाबत संमती मागीतली, ही मुळातच बेकायदेशीर असून, अनुचीत व्यापार पध्दती या सदरात मोडतो. दुसरी महत्वाची बाजू अशी की, गै.अ.क्र.1 ने सालवेज बायरकडून रुपये 2,11,000/- आणि स्वतः कडनू रुपये 1,99,000/- देण्याचे मान्य करण्याचे कबूल करुन संमती मागितली. परंतु, अर्जदाराने त्याचे उत्तर पाठवून सालवेज बायरचा पत्ता आणि नांव द्यावे, अश्या मागणीचे पञ पाठविले. अर्जदाराची ही मागणी संयुक्तीक आहे. वास्तविक, गै.अ.क्र.1 यांनी सालवेज आपलेकडे घेवून पूर्ण (IDV) अर्जदारास देण्याची जबाबदारी होती, जेंव्हा की, नेट लॉस बेसीसवर क्लेम निकाली काढला तर पूर्ण IDV ची रक्कम देणे जरुरी होते. परंतु, गै.अ.क्र.1 यांनी चुकीच्या पध्दती विमा क्लेम सेटल करण्यासाठी वापरुन अनुचीत पध्दती अवलंबली, आणि त्यात संमती दिली नाही, म्हणून क्लेम पाडून ठेवला, ही गै.अ.क्र.1 च्या सेवेतील न्युनता असून ञुटीयुक्त सेवा आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 14. गै.अ.क्र.1 ने, दाखल केलेल्या लेखी युक्तीवादात हे मान्य केले आहे की, विमा मुल्य प्रमाणे घसाई काढून क्लेम देण्यास तयार आहे. प्रस्तूत प्रकरणात विमा मुल्य (IDV) 4,33,644/- रुपये एवढा आहे, आणि अपघात हा नवीन वाहनाचा 4 महिन्याचे आंत अपघात झाला असल्यामुळे पूर्ण इंशुअर्ड व्हॅल्यु देण्यास पाञ आहे. विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीमध्ये 5 % घसारा हा विमा पॉलिसी काढतेवेळी IDV निश्चित करण्याकरीता गृहीत धरलेला आहे, तो क्लेम देण्याकरीता धरलेला नाही. अशास्थितीत, गै.अ.क्र.1 अर्जदारास पूर्ण IDV ची रक्कम देण्यास पाञ आहे, गै.अ.चे वकीलांनी मा. दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी मयुर बञा-वि.- आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जन. इंशु.कं.लि. व इतर, III (2010) CPJ 32 या प्रकरणाचा हवाला दिला. सदर प्रकरणात दिलेली बाब या प्रकरणातील बाबीशी भिन्न आहे. उलट, अर्जदाराचे वकीलांनी वेगवेगळ्या न्यायनिवाड्याचा हवाला दिला, त्यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडतात. एकंदरीत, उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.क्र.1 यांनी सेवा देण्यात न्युनता करुन विमा क्लेम पाडून ठेवला, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15. गै.अ.क्र.1 यांनी लेखी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अपघाताचे वेळी वाहन चालकाकडे वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे. परंतु, अर्जदार यांनी गाडी चालकाचा परवाना दाखल केला नाही. गै.अ.क्र.1 यांनी वाहन चालविण्याचा परवानाबाबत आक्षेप घेतल्यानंतर अर्जदाराने नि.34 नुसार वाहन चालकाचा परवानाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. परंतु, एक बाब स्पष्ट करतो की, गै.अ.क्र.1 यांनी वाहन चालकाच्या परवानाबाबत पूर्वी काहीच आक्षेप घेतला नाही, आणि उलट, नि.23 अ च्या यादीनुसार दाखल केलेल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये सर्व्हेअर यांनी ड्रायव्हर डिटेल या सदरात पान दोनवर एम.एच.34/सी 8028/06 ता.11.9.06 वैधता ता.14.5.2018 दिलेली आहे. गै.अ.क्र.1 यांनी सर्व्हेअर सरबतसिंग यांचेकडून सर्व्हे करुन घेतला हे मान्य केले आहे आणि सर्व्हे रिपोर्टची प्रत सादर केली. सदर सर्व्हे रिपोर्टमध्ये ड्रायव्हर लायसन्स क्रमांक नमूद केलेला असतांनाही वैध वाहन परवाना अर्जदाराने दाखल केलेला नाही, या कथनात तथ्य नाही. 16. अर्जदाराने, वाहन खरेदी करण्याकरीता, टाटा फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले. जानेवारी 2010 ला वाहनाचा अपघात झाल्यामुळे विमा किस्त थकीत राहिल्याने व्याज व विलंब शुल्क आकारण्यात आले, त्याबाबत रुपये 1,90,910.48 एवढया रकमेची मागणी केली. अर्जदाराची ही मागणी मंजूर करण्यास पाञ नाही. सदर वाहन हे स्वतःचे वापराकरीता होते, त्यामुळे वाहनाच्या उत्पन्नातून येणा-या रकमेमधून कर्जाची किस्त भरावयाची नव्हती. वाहनाचा अपघात झाल्याने त्यापासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे किस्त थकीत राहिल्याने विलंब शुल्क भरावा लागला आणि गै.अ.क्र.1 यांनी विमा क्लेम निकाली काढण्यास विलंब केल्यामुळे उत्पन्नापासून अर्जदार वंचीत राहिला, त्यामुळे किस्तीवरील विलंब शुल्क व व्याजाची रक्कम देण्यास गै.अ.क्र.1 व 3 जबाबदार नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 17. अर्जदारांनी, गै.अ.कडून मानसीक, शारीरीक ञासा बद्दल रुपये 2,00,000/- ची मागणी केली. गै.अ.क्र.1 यांनी विमा दावा निकाली काढण्यास विलंब केला, त्यामुळे अर्जदारास शारीरीक, मानसीक ञास सहन करावा लागला. तसेच, अर्जदारास त्याचे शेतावर जाण्यास गैरसोय झाली आणि उच्च शिक्षीत असलेल्या भावाला ञास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे, माता-या आईला दवाखाना, देऊळ इत्यादी नेण्या-आणण्यास कार नसल्यामुळे गैरसोय झाली, या सर्व कारणांमुळे मानसीक, शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- मिळण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 18. अर्जदार यांनी तक्रारीत केलेली मागणी ही फक्त गै.अ.क्र.1 व 3 याचेविरुध्द केलेली आहे. गै.अ.क्र.2 चे विरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही. उलट, गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास सहकार्य केले असल्याचे दिसून येते, त्यामुळे, त्यांनी सेवेत न्युनता केली नाही असे दाखल दस्ताऐवरुन सिध्द होत असल्यामुळे त्याचे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
19. अर्जदारांने, गै.अ.क्र.3 कडे अपघातानंतर वाहन त्याचे कार्यशाळेत ठेवले. गै.अ.क्र.3 यांनी कोणत्या प्रकारची सेवा देण्यात न्युनता केली हे तक्रारीत दाखविलेले नाही. उलट, गै.अ.क्र.2 व 3 यांनी, अर्जदारांने सादर केलेले सर्व दस्ताऐवज गै.अ.क्र.1 कडे पाठविले. तसेच, गै.अ.क्र.1 यांनी नेट लॉस बेसीसच्या आधारावर विमा क्लेम मंजूर केल्याने दुरुस्ती करण्याचा मुद्दा राहिलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी वाहन लवकर दुरुस्त केली नाही, म्हणून सेवा देण्यात न्युनता केली ही बाब सिध्द होत नाही. गै.अ.क्र.3 यांनी वाहन त्यांचे कार्यशाळेत आणून ठेवल्यानंतर अर्जदाराचे विनंती नुसार प्रत्यक्ष पाहणी करुन अंदाजे खर्च रुपये 5,73,938.16 चे कोटेशन 13.1.10 ला दिले. गै.अ.क्र.3 यांनी आपली जबाबदारी वाहन विक्रीचे वेळी जी घेतली ती पूर्णपणे पारपाडली आहे. त्यामुळे, त्याचेविरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
20. गै.अ.क्र.3 ने, लेखी युक्तीवादात वाहन कार्यशाळेत आणले तेंव्हापासून पार्कींग चार्जेस अर्जदाराकडून घेण्यास पाञ आहे, असे कथन केले आहे. तसेच, वाहन हे सांभाळून सुरक्षीत ठेवले आहे, त्यामुळे पार्कींग चार्जेस देण्यात यावे. अर्जदार यांनी, तक्रारीत कोणतेही पार्कींग चार्जेस अर्जदाराकडून घेण्यात येऊ नये, असे जाहीर करावे अशी मागणी प्रार्थना क्र.2 मध्ये केली आहे. अर्जदाराची प्रार्थना क्र.2 ही दिवाणी स्वरुपाची असून मंचाचे अधिकार क्षेञातील नाही. परंतु, दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन आणि उपलब्ध रेकार्डवरुन गै.अ.क्र.1 च्या कृत्यामुळेच वाहन हे गै.अ.क्र.3 कडे पडून आहे, त्यामुळे पार्कींग चार्जेस देण्याची जबाबदारी ही गै.अ.क्र.1 ची आहे. परंतु, गै.अ.क्र.3 यांनी लेखी उत्तरात किंवा लेखी युक्तीवादात किती रुपये प्रती दिवस किंवा महिना प्रमाणे पार्कींग चार्जेस आकारण्यात येतात व त्याची आजपर्यंतची पार्कींग किराया एवढा होतो, असे काहीही दाखविले नाही, त्यामुळे पार्कींग चार्जेसची केलेली मागणी मंजूर करण्यास पाञ नाही, तसेच पार्कींग चार्जेस देण्यास अर्जदार पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 21. एकंदरीत, वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ.क्र.1 यांनी सेवा देण्यात न्युनता करुन अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याने, अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 ने, इंडिका कार क्र. एम.एच.34-एए-0079 चा अपघात दि.12.1.2010 च्या मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रुपये 4,33,644/- दि.10.3.2010 पासून द.सा.द.शे.9 % व्याज दराने, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास मानसीक, शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज. (4) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |