निकालपत्र :- (दि.20.12.2010)(द्वारा - सौ.प्रतिभा जे.करमरकर, सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदार यांनी आपल्या मालकीच्या म्हैशीचा रुपये 16,000/- चा विमा सामनेवाला विमा कंपनीमार्फत दि.24.11.2006 रोजी उतरविला होता. सदर पॉलीसीची मुदत दि.24.11.2006 ते दि.23.11.2009 पर्यन्त होती व पॉलीसीचा नं. 1706/06/3012/00001870 असा होता. (2) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, दरम्यानचे वेळी पहिले काही दिवस म्हैशीचे जीवनमान छान चालू होते. परंतु, सन 2008 साली म्हैस गरोदर राहिली व दि.22.09.2008 रोजी पिलाला जन्म देताना त्यांची गर्भाशय बाहेर आले. त्याचेवर उपचार केले, पंरतु दि.30.09.2008 रोजी तिचा मृत्यू झाला. तिचा अकस्मात मृत्यु झालेनंतर लगेच तक्रारदार यांनी विमा कंपनीस दि.01.10.2008 रोजी विमा कंपनीस कळवले, परंतु त्यांचे कोणीही निरिक्षक मेलेल्या म्हैशीचा पंचनामा किंवा पाहणी करणेसाठी आले नाहीत. तेंव्हा तक्रारदार यांनी तिचे मयताचा पंचनामा दि.01.10.2008 रोजी 10 वाजता केला. तसेच, तिचे पोस्ट मॉर्टेम दि.01.10.2008 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदतर्फे सरकारी डॉक्टर, ए.एस्.नाईक यांचेकडून केला. तेंव्हा त्यांनी म्हैशीचे गर्भाशय बाहेर आलेमुळे तिचा मृत्यू झालेचे पोस्ट मॉर्टेम मध्ये नमूद केले आहे. पोस्ट मॉर्टेम नंतर तिची विल्हेवाट लावणेत आली. तसा दाखला सरपंच कासारवाडा यांनी दिलेला आहे. सामनेवाला कंपनीमार्फत कोणीही निरीक्षण म्हैशीची पहाणी करणेसाठी त्यांना कळवनूही आले नाहीत, त्यांना म्हैस मेलेचे दि.01.10.2008 रोजी कळवले होते. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला विमा कंपनीने दि.01.12.2008 रोजी पोस्अ मॉर्टेम रिपोर्ट, पंचनामा इत्यादी सर्व कागदपत्रांसह क्लेम पेपर्स दाखल केले व नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु, सामनेवाला विमा कंपनीने दि.24.01.2009 रोजी तक्रारदाराचा क्लेम मुदतीत नाही असे चुकीचे व बेकायदेशीर कारणदेवून तसेच म्हैस मेल्याचे तुम्ही कंपनीला कळवले नाही असे सांगून तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नामंजूर केल्याचे कळवले. वास्तविक, म्हैस मेल्याचे तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीला 24 तासाचे आंत कळविले होते व त्याप्रमाणे सामनेवाला कंपनीची पोचही आहे. म्हैशीच्या कानातील बिल्ला जनावराचे लाथेने अर्धा तुटला असल्याचे तक्रारदारांने तसेच श्री शाहू दूध व्यावसायिक संस्था, ज्यांच्यामार्फत सामनेवाला कंपनीकडून विता पॉलीसी उतरवली होती, त्यांनीही दि.01.10.2008 रोजी विमा कंपनीला कळवले होते. असे असतानाही, सामनेवाला विमा कंपनीने कुठलेही सबळ कारण नसताना बेजबाबदारपणे तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. ही सामनेवाला विमा कंपनीच्या सेवेतील निश्चितच गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती केली आहे. (अ) म्हैशीच्या विम्याची रक्कम -- रुपये 16,000/- (ब) तक्रार खर्च -- रुपये 1,000/- (क) तक्रारदार यांना मानसिक त्रास -- रुपये 25,000/- एकूण -- रुपये 42,000/- (4) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडली आहेत :- प्राणी मेल्याबद्दल सामनेवाला यांना कळविलेबाबत दि.01.10.2008 रोजीचे पत्र, प्राण्याच्या कानात बिल्ले मारणेबाबत कळविलेले दि.01.10.2008 रोजीचे पत्र, प्राणी मेल्यावर त्याचा विमा मिळावा म्हणून सामनेवाला कंपनी यांना पाठविलेली पॉलीसी, पंचनामा, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, पोस्टाची रिसीट, पोहोचपावती, सामनेवाला कंपनीने क्लेम नाकारलेबाबतचे दि.24.01.2009 रोजीचे पत्र, क्लेम नाकारलेनंतर पुन्हा सामनेवाला विमा कंपनीला पाठविलेले दि.12.02.2009 रोजीचे पत्र, त्याची पोस्टाची पावती व पोहोच. (5) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु, इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या म्हणण्यात पुढे असे म्हणतात, वस्तुस्थितीप्रमाणे तक्रारदाराने आपले तथाकथित मयत म्हैशीच्या विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळणेकरिता सामनेवाला कंपनीकडे 14 दिवसांचे आंत आवश्यक त्या कागदपत्रांसहीत मागणी (क्लेम) करायची असते, पण तक्रारदारांनी सदर तक्रारदारांची म्हैस दि.30.09.2008 रोजी मयत झाली व त्यांनी क्लेम 2 महिन्यांनी म्हणजे दि.11.12.2008 रोजी केला आहे. त्यामुळे तक्रारदारांनी पॉलीसीतील अट क्र.6 चा भंग केलेला आहे हे स्पष्ट होत आहे. तसेच, क्लेम फॉर्म दाखल करताना तथाकथित पॉलीसी उतरविलेल्या म्हैशीच्या कानातील टॅगसुध्दा तक्रारदारांनी जमा केलेला नाही. त्यामुळे पॉलीसीतील अट क्र.3 चाही तक्रारदारांनी भंग केला आहे. तसेच, सामनेवाला यांनी तक्रारदारांने दाखल केलेला म्हैशीच्या कानातील टॅग अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होता. टॅग हे विमाधारीत जनावर व मयत जनावर हे एकच आहे याबद्दलचा निर्णय घेण्याचा महत्त्वाचा पुरावा असतो. टॅग अर्धवट स्थितीत दिल्यामुळे मयत म्हैस हीच विमाधारीत होती हे शाबीत होवू शकत नाही. अशा त-हेने तक्रारदारांने विमा पॉलीसीच्या अट क्र. 3 व 6 चा भंग केला आहे. त्यामुळे योग्य विचारानेच सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवाला विमा कंपनीच्या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला कंपनीने केली आहे. (6) आम्ही दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. तसेच, दोन्ही बाजूंनी दाखल केलेले कागदपत्रे तपासले. तक्रारदारांची विमा पॉलीसी सामनेवाला यांनी मान्य केली आहे. तक्रादारांची म्हैस दि.30.09.2008 रोजी पिलाला जन्म देताना मरण पावती असे पोस्ट मॉर्टेम करणा-या सरकारी डॉ.अशोक नाईक यांनी प्रतिज्ञापत्रावर म्हटले आहे. सदर म्हैशीचा पंचनामा करणा-या रंगराव विठ्ठल पाडळकर व शरद दिनकर पाडळकर या दोघा पंचानीही अशाच त-हेची प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांची म्हैस दि.30.09.2008 रोजी मेल्यावर तक्रारदारोन लगेच दि.01.10.2008 रोजी सामनेवाला विमा कंपनीला त्याप्रमाणे पत्राने कळवले आहे व सदर पत्रावर सामनेवाला विमा कंपनीची पोचही आहे. विमा क्लेमची मागणी तक्रारदाराने विलंबाने केली आहे. तसेच, म्हैशीच्या कानातील टॅग अर्धवट तुटलेल्या स्थितीत आहे या दोन कारणांनी सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला आहे. म्हैशीच्या मृत्यूची माहिती तक्रारदाराने अटीप्रमाणे सामनेवाला कंपनीला 24 तासाच्या आंत कळवून त्याची पोच घेतल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते. सामनेवाला विमा कंपनी विमाधारकाच्या जनावराच्या कानात मारण्यासाठी जे टॅग देतात ते प्लास्टीकचे असतात. त्यामुळे जनावराच्या हिसका-हिसकीने ते पुष्कळदा तुटतात. त्याप्रमाणे दूध संघानेही सामनेवाला विमा कंपनीला म्हैशी व गायींचे टॅग परत मारण्यासाठी कळवल्याचे पत्र (दि.01.10.2008) कामात दाखल आहे. त्यामुळे टॅग नाही तर क्लेम नाही हा सामनेवाला विमा कंपनीचा दावा आम्ही ग्राहय धरु शकत नाही. कारण म्हैशीच्या वर्णनाबाबत तिच्या मृत्युबाबत कुठेही दुमत नाही. (7) क्लेम दाखल करण्यास सुमारे दोन महिन्याचा विलंब केल्यामुळे क्लेम नामंजूर केल्याचे जे कारण सामनेवाला विमा कंपनीने दिले आहे तेही केवळ तांत्रिक स्वरुपाचे आहे. याबाबतीतही पॉलीसीतील (अट क्र.6) अट ही मार्गदर्शक स्वरुपाची आहे, अनिवार्य नाही (directory and not mandatory). त्यामुळे केवळ तांत्रिक कारणांचा आधार घेवून तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नामंजूर करणे म्हणजे विम्याच्या मूळ उद्देश नाकारणे आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. अशा त-हेने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करणे ही सामनेवालाच्या सेवेतील निश्चितच त्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमचे रुपये 16,000/- (रुपये सोळा हजार फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर दि.24.01.2009 रोजीपासून तक्रारदारास संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदास मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |