निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने त्याची मोटार कार क्र.एमएच-02-एव्ही-246, टोयॅटो मॉडेल-इनोव्हाची कार पॅकेज पॉलीसी घेतली होती. पॉलीसी क्र.1104372311100030 असा होता. पॉलीसीचा कालावधी दि.30.12.2006 ते दि.29.12.2007 असा होता व त्यावेळी गाडीची घोषित किंमत रु.8,66,675/- अशी होती. दि.17.12.2007 रोजी ती गाडी चोरीला गेली. तिचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता तक्रारदाराने पोलीसांना त्याबाबत कळविले. पोलीसांनी त्याची पोलीस डायरीत नोंद घेतली. नंतरही गाडी मिळून न आल्याने दि.18.12.2007 रोजी तक्रारदाराने पोलीस स्टेशनला फिर्याद केली. तिची प्रत तक्रारीच्या निशाणी-ए ला आहे. तक्रारदाराने दि.18.12.2007 रोजी पत्र पाठवून सामनेवाले, सिडींकेट बँक, जोगेश्वरी(पश्चिम) शाखा व टोयॅटो लॅकोझी अटो प्रा.लि. यांनाही कळविले. या पत्राची प्रत तक्रारीच्या निशाणी-बी ला आहे. 2 दि.29.12.2007 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल केला, त्याची प्रत तक्रारीच्या निशाणी-सी ला आहे. त्यानंतर, सामनेवाले यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी श्री.संजय सिंग, श्री.अविनाश जाधव आणि श्री.दिलीप हुगले यांची नेमणूक केली. श्री.दिलीप हुगले यांनी तक्रारदाराकडे येऊन घटनेबाबत चौकशी केली. त्यांनी घटना स्थळाचे फोटोही घेतले. त्यांनी मागितलेले सर्व कागदपत्रं दि.08.02.2008 रोजी तक्रारदाराने पत्राबरोबर त्यांना सादर केले. त्या पत्राची प्रत तक्रारीच्या निशाणी-डी ला आहे. 3 तक्रारदाराची तक्रार की, त्यानंतर त्याने वेळोवेळी त्याच्या क्लेमबद्दल सामनेवाले यांचेकडे चौकशी केली. त्यांनी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्याबद्दलचा पत्र व्यवहार तक्रारीच्या निशाणी-ई-1- ते ई-4 ला आहे. परंतु सामनेवाले यांनी त्याच्या क्लेमबद्दल काहीही उत्तर दिले नाही. सामनेवाले यांच्या अशा वागण्याने त्याला मानसिक त्रास झाला. म्हणून तक्रारदाराने त्यांना नोटीस पाठविली व रु.8,66,875/- व व्याजाची मागणी केली, त्यालाही सामनवाले यांनी उत्तर दिले नाही किंवा मागणीची पूर्तता केली नाही म्हणून सदरची तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदारच्या सामनेवाले यांच्याकडून खालील मागण्या आहेत. अ क्लेम रु.8,66,675/- व त्यावर द.सा.द.शे.12 दराने व्याज द्यावे ब तक्रारदाराला झालेल्या मानसिक व इतर त्रासांबद्दल रु.10,00,000/- नुकसान भरपाई द्यावी. क त्याला नोटीसचा वगैरे जो खर्च आला त्यासाठी रु.900/- मिळावेत. 4 सामनेवाले यांनी कैफियत देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदाराने सदरच्या गाडीवर एक ड्रायव्हर ठेवला होता परंतु त्या अगोदर त्यांने त्या व्यक्तीचे नांव, पत्ता व ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी केली नाही व गाडी त्याच्या ताब्यात दिली. त्या ड्रायव्हरने तक्रारदार व त्याच्या पत्नीला त्यांच्या गोरेगांव येथील घरुन त्यांच्या जोगेश्वरी येथील ऑफीसमध्ये नेऊन सोडले. नंतर तक्रारदारांनी ड्रायव्हरला दुपारचे जेवण घेण्यासाठी पाठविले. तक्रारदार संध्याकाळी जेव्हा ऑफीसमधून खाली आला त्यावेळी त्याला ड्रायव्हर व गाडी दोन्हींही दिसले नाही. त्याने आजूबाजूला ड्रायव्हर व गाडीची चौकशी केली. परंतु ड्रायव्हर किंवा गाडी मिळून आली नाही. म्हणून त्याने पोलीस स्टेशनला फिर्याद केली. याप्रमाणे तक्रारदाराने त्या अनोखळी माणसाची चौकशी न करता, त्याने दिलेल्या माहितीची पडताळणी न करता गाडी त्याच्या ताब्यात दिली हा तक्रारदाराचा निष्काळजीपणा आहे, तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याला गाडीला मुकावे लागले. त्यांनी सदरच्या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमला होता, त्याच्या अहवालावरून व तक्रारदाराने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन तक्रारदाराचा निष्काळजीपणा दिसून येतो. तक्रारदाराने कार पॅकेज पॉलीसी घेतली असली तरी त्याने गाडी हाताळण्यामध्ये निष्काळजीपणा केला व याप्रमाणे पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग केल्यामुळे त्यांनी त्याचा क्लेम नाकारला यात त्यांची सेवेत न्युनता नाही, म्हणून तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. 5 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील-श्रीमती क्लेरा पाटील व सामनेवाले तर्फे वकील –श्री.राहुल मेहता यांचेतर्फे वकील-श्री.नवघरे यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 6 टोयॅटो इनोव्हा क्र.एमएच-02-एव्ही-246 हि दि.30.12.2006 ते दि.29.12.2007 या कालावधीसाठी सामनेवाले यांचेकडे इन्शुअर्ड होती व त्यावेळी गाडीची घोषित किंमत रु.8,66,675/- एवढी होती, हे सामनेवाले यांनी नाकारलेले नाही. 7 या तक्रारीत पहिला महत्वाचा मुद्दा की, सामनेवाले यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला, याबद्दल त्याला कळविले नाही. तक्रारदाराने दि.18.12.2007 रोजी सामनेवाले यांना घटनेबाबत कळविले. दि.29.12.2007 रोजी क्लेम फॉर्म दिला. त्यानंतर, सामनेवाले यांनी चौकशी अधिकारी नेमून घटनेबाबत चौकशी केली. परंतु सामनेवाले यांनी क्लेम नाकारला किंवा मंजूर केला याबद्दल तक्रारदाराला काहीच कळविले नाही. म्हणून तक्रारदाराने दि.08.02.2008, दि.27.08.2008, दि.17.09.2008 रोजी सामनेवाले यांना पत्रं पाठविली व त्याच्या क्लेमबाबत चौकशी केली. परंतु सामनेवाले यांनी त्यालाही उत्तर पाठविले नाही. सामनेवाले यांनी पहिल्यांदा दि.10.03.2009 रोजी म्हणजे क्लेम केल्यानंतर एक वर्ष दोन महिन्यानंतर त्यांच्या कैफियतमध्ये तक्रारदाराचा क्लेम नाकारल्याचा उल्लेख केला. तक्रारदाराकडून पॉलीसीचा हप्ता घेऊन त्याला पॉलीसी मंजूर करुन सामनेवाले यांनी त्याच्या क्लेमबद्दल त्याला कळवायची तसदीही घेतली नाही. ही सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे. 8 तक्रारीत दुसरा मुद्दा असा की, तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याला गाडी गमवावी लागली हे सामनेवाले यांनी सिध्द केले आहे काय ? तक्रारदाराने पोलीसांकडे या घटनेबाबत एफ.आय.आर. दिली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्याच्या गाडीवर जो पूर्वी चालक होता, त्याचा अपघात झाल्यामुळे त्याने नोकरी सोडून दिली. त्यामुळे ते नविन चालकाच्या शोधात होते. ते रहात असलेल्या कॉम्प्लेक्सचे वॉचमन –श्री.गिरी हे त्यांच्या ओळखीचे होते. त्यांनी हा चालक –श्री. सुनीलकुमार शुक्ला याचेशी त्यांची ओळख करुन दिली व त्याला नोकरीवर ठेवण्याचा सल्ला दिला. म्हणून तक्रारदाराने त्याला दि.17.12.2007 रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान त्याला बोलावून त्याची मुलाखत घेतली व त्याचा चालक परवाना आणि रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून आणण्यांस सांगितले व त्याला नोकरीवर ठेवले. त्याने कागदपत्रं आणण्याचे आश्वासन दिले व गाडीची चावी घेऊन गाडीत बसला. त्यानंतर, तो तक्रारदाराला विचारुन ती गाडी घेऊन जेवण करण्यास गेला. त्यावेळी तक्रारदार त्याच्या जोगेश्वरी ऑफीसमध्ये होता. तो परत येईल याची ते वाट पाहत होते परंतु तो आला नाही व गाडीही आणली नाही. 9 सामनेवाले यांनी या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमला होता. त्याने चौकशीच्या दरम्यान, तक्रारदाराचा जबाब घेतला. त्या जबाबाचा मजकुर त्याने त्याच्या रिपोर्टमध्ये (reproduced ) नमूद केला आहे. त्यात तक्रारदाराने असे म्हटले आहे की, त्याच्या इमारतीचा वॉचमन –श्री.गिरी यांनी दि.17.12.2007 रोजी त्याची श्री.सुनीलकुमार शुक्ला यांचेशी ओळख करुन दिली. त्यावेळी श्री.गिरी यांनी सांगितले की, तो श्री.सुनीलकुमार शुक्लाला ओळखतो. त्याची गाडी चालविण्याची चाचणी घेऊन तक्रारदाराची इच्छा असल्यास त्याला चालक म्हणून ठेवावे, म्हणून तो व त्याची पत्नी त्याच गाडीने त्यांच्या गोरेगांव येथील घरुन त्याच्या जोगेश्वरी येथील ऑफीसला गेले. त्या इमारतीच्या ई विंगमधून गाडी बाहेर आल्यावर एका माणसाने हात देऊन त्याची गाडी थांबविली व ड्रायव्हरची व त्याची बोलणी झाली. त्या माणसाबद्दल ड्रायव्हरला विचारले असता, त्याने त्याचे नांव –प्रदीपसिंग असे सांगितले व तक्रारदार रहात होता त्या इमारतीमधील सी विंगच्या सदनिकाधारकाकडे तो ड्रायव्हर आहे असे सांगितले. जोगेश्वरीला ऑफीसला गेल्यानंतर, त्याने ड्रायव्हरला ऑफीस लॉबीमध्ये थांबण्यास सांगितले. थोडया वेळात त्याला आत बोलावून त्यांनी त्याचा चालक परवाना व राहण्याचा पत्त्याचा पुरावा मागितला, त्याने त्याचे ड्रायव्हिंग लायसन दाखविले ते कल्याण आर.टी.ओ.कडून देण्यात आले होते. त्याबद्दलची तक्रारदाराने त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यावेळी तो त्याचे कल्याण येथील काकाबरोबर रहात होता असे सांगितले. इतर त्याच्या मुंबईतील नातेवाईकांची नांवे सांगितली व ते कुठे रहातात तेही सांगितले. तो गाडी व्यवस्थित चालवत होता, म्हणून तक्रारदाराने त्याला नोकरीला ठेवले. दुपारी तक्रारदार व त्याची पत्नी ऑफीसला कुलुप लावून वरच्या मजल्यावर जेवणासाठी गेले व त्याला पण जेवण घेण्यासाठी पाठविले. मात्र तो परत आला नाही व गाडीही आणली नाही, संध्याकाळी 5 वाजता तक्रारदार त्याच्या ऑफीसमध्ये आले असता त्यांच्या लक्षात आले. 10 तक्रारदाराच्या जबाबावरुन असे दिसून येते की, त्याने श्री.सुनीलकुमार शुक्ला हा त्याच्या वॉचमनच्या ओळखीचा होता व वॉचमनने तसे सांगून त्याला नोकरी ठेवण्याचा सल्ला दिला होता म्हणून त्याला नोकरीवर ठेवण्यात आले. नोकरीवर ठेवण्यापूर्वी तक्रारदाराने त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिले होते. त्यावेळी झेरॉक्सचे दुकान बंद असल्याने त्याची झेरॉक्स ते घेऊ शकले नाही, असे तक्रारदाराने सर्व्हेअरसमोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यावरुन असे म्हणता येणार नाही की, तक्रारदाराने अगदीच अनोळखी माणसाच्या हातात गाडीच्या चाव्या दिल्या. कारण त्यांचे वॉचमन –श्री.गिरी यांनी त्याची ओळख दाखविली होती. त्याच्या राहण्याच्या पत्त्याबाबत तक्रारदाराने पडताळणी करुन पाहिले नाही हे जरी खरे असले तरी, या कारणामुळे तक्रारदाराचा संपूर्ण क्लेम नाकारता येत नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने, National Insurance Company Ltd., Versus Nitin Khandelwal Reported in (IV (2008) CPJ 1 (SC) या केसमध्ये खालीलप्रमाणे निरीक्षण केले आहे. “the law seems to be well settled that in case of theft of vehicle, nature of use of the vehicle cannot be looked into and the Insurance Company cannot repudiate the claim on that basis”. Paragraph no.12:- “In the case in hand, the vehicle has been snatched or stolen. In the case of theft of vehicle breach of condition is not germane. The appellant Insurance Company is liable to indemnify the owner of the vehicle when the insurer has obtained comprehensive policy for the loss caused to the insurer. The respondent submitted that even assuming that there was a breach of condition of the insurance policy, the appellant Insurance Company ought to have settled the claim on non-standard basis. The Insurance Company cannot repudiate the claim in toto in case of loss of vehicle due to theft”. मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरील निरीक्षण व या मंचामसोर असलेल्या तक्रारीतील परिस्थितीचा विचार करता, या मंचाचे असे मत आहे की, सामनेवाले यांनी non-standard basis वर तक्रारदाराच्या क्लेम पैकी 75% रक्कम त्याला मंजूर करायला पाहिजे होती, ती त्यांनी केली नाही ही त्यांची सेवेत न्यूनता आहे. मंचाच्या मते, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने खालील आदेश योग्य आहे. आदेश (1) तक्रार क्र.45/2010अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले यांनी तक्रारदाराला क्लेमपोटी रक्कम रु.6,50,006/- (रु.8,66,675/- च्या 75%) द्यावी व त्यावर द.सा.द.शे.9 दराने दि.18.11.2008 (तक्रार दाखल तारीख) पासून रक्कम फिटेपर्यंत व्याज द्यावे. (3) सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु.900/- खर्चापोटी द्यावेत. (4) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |