जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –61/2011 तक्रार दाखल तारीख –06/04/2011
कावेरीबाई भ्र.बाळकृष्ण जंगले
वय 50 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.भेंड (बु.)ता.गेवराई जि.बीड
विरुध्द
1. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस लि.
भास्कर नारायण प्लॉट नं.7 सेक्टर
द्वारा एच.डी.एफ.सी.लाईफ इं.कं.लि.जवळ
कॅनॉट गार्डन,टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद .सामनेवाला
2. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
अदालत रोड, बाबा पेट्रोल पंपाच्या बाजुस औरंगाबाद.
3. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
श्री.साई एन्टरप्रायजेस, आर.बी.मेहता मार्ग,
पटेल चौक,घाटकोपर (पुर्व)मुंबई 400 077
4. कृषी अधिक्षक,
कृषी अधिक्षक कार्यालय, धानोरा रोड,बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.सी.एन.वीर
सामनेवाले क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.2 व 3 तर्फे ः- अँड ए.पी.कूलकर्णी
सामनेवाले क्र.4 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती नामे बाळकृष्ण आश्रुबा जंगले हे शेतकरी होते. त्यांचें नांवे भेंड ता.गेवराई जि. बीड येथे गट नंबर 10 मध्ये 42 आर,गट क्र.104 मध्ये 1 हेक्टर 27 आर अशी एकूण 1 हे.69 आर जमिन होती.
तक्रारदाराचे पती हे गळीत हंगाम 2007-08 साठी जगदंबा सहकारी साखर कारखाना लि. कर्जत ता.कर्जत जि.अहमदनगर येथे उपजिविका भागविण्यासाठी गेले असता तेथे दि.02.04.2008रोजी कृष्ण्राव मूरकूटे यांचे ट्रक्टर नंबरएम.एच.-16-6402 मध्ये बसून सायंकाळी 5 वाजता वाळू आणण्यासाठी गेले असता मूरकूटे वस्ती जवळील नदीत वाहू भरताना वाळूचा मोठा ढिगारा तक्रारदाराचे पतीचे अंगावर पडला व अपघात झाला व त्यामध्ये तो दबून जागेवर मयत झाला.
अपघाताच्या घटनेमुळे जंगले यांचे खबरीवरुन दि.3.4.2008 रोजी अ.मृ.नोंद क्र.12/2007 कलम 174, सी.आर.पी.नुसार कर्जत पोलिस स्टेशन येथे घेण्यात आली.
तिचे मृत्यूनंतर नूकसान भरपाई मिळण्यासाठी दि.30.04.2008 रोजी तालूका कृषी अधिकारी गेवराई यांचेकडे दावा अर्ज तक्रारीत नमूद केलेल्या कागदपत्रासह दाखल करुन नूकसान भरपाईची मागणी केली. त्यानंतर दि.23.08.2010 रोजी सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास आणखी कागदपत्राची मागणी केली. त्यात मृत्यूचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, इन्क्वेस्ट पंचनामा, हे कागदपत्र सामनेवाला क्र. 3 व 4 यांना मागितले. तक्रारदार यांनी दि.22.11.2010 रोजी कागदपत्र सामनेवाला क्र.4 कडे दाखल केली. त्यांची पोहच मागितली आहे. सर्व कागदपत्र दाखल करुनही सामनेवाला यांनी नूकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे दि.21.02.2011 रोजी सामनेवाला क्र.1 ते 3 यांना नोटीस देऊन नूकसान भरपाईची मागणी केली परंतु नूकसान भरपाई मिळाली नाही.
विनंती की, सामनेवाला क्र. 1 ते 4 कडून संयूक्तीक अथवा एकत्रितरित्या नूकसान भरपाई रु.1,00,000/- प्रस्ताव दाखल दि.30.04.2008 पासून 12 टक्के व्याजासह मंजूर करण्यात यावेत, मानसिक त्रासापोटी रु.10,000/-व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मंजूर करण्यात यावा.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दाखल केला. बाळकृष्ण आश्रोबा जंगले रा.भेंड ता.गेवराई जि.बीड यांचा अपघात दि.02.04.2008 रोजी झाला.त्यांचा प्रस्ताव अर्ज दि.15.02.2009 रोजी अपूर्ण कागदपत्र त्यात मृत्यू प्रमाणपत्र, इन्क्वेस्ट पंचनामा, वयाचे प्रमाणपत्र, इत्यादी अपूर्ण कागदपत्र मिळाले.त्या बाबत तक्रारदारांना दि.30.09.2008 रोजी कळविले, स्मरणपत्रदि.6.11.2008 रोजी दिले. सदरचा दावा विमा कंपनीकडे दि.21.06.2009 रोजी अपूर्ण प्रस्ताव या शे-याने पाठविला. विमा कंपनीने दि.24.11.2010 रोजी दावा बंद केल्याचे तक्रारदारांना कळविले.
सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचा खुलासा दि.08.07.2011 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत.तक्रार मूदतबाहय आहे. तक्रारदारांनी अपघाताची सूचना कृषी अधिकारी यांना दि.22.11.2010 रोजी दोन वर्षाचे कालावधीनंतर दिल्याचे दिसते त्यामुळे सदरची तक्रार चालू शकत नाही. सामनेवाला कंपनीने अनेकदा मृत्यूचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा आणि इतर सात कागदपत्राची मागणी केली त्यानंतर सूध्दा तक्रारदारानी सदरची कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे शेवटी दि.23.06.2010रोजी विमा कंपनीने तक्रारदारांना आरपीएडी ने पत्र दिले. तकारदारांना सदरचे पत्र मिळाले परंतु त्यांनी पूर्तता केली नाही. तक्रारदाराचा दावा अपरिपक्व आहे तो नाकारला नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दाखल केला की, तक्रारदाराचा अर्ज कबाल इन्शुरन्स कंपनी कडे त्रूटीच्या पूर्ततेसह दाखल केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.4 चे विरुध्दची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची दाखल तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 चा खुलासा, सामनेवाला क्र.2,3 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.4 चा खुलासा, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.विर, सामनेवाला क्र.2 व 3 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी, यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 व 4 यूक्तीवादाचे वेळी गैरहजर.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता बाळकृष्ण आश्रोबा जंगले यांचा अपघात तक्रारदाराचे पती हे गळीत हंगाम 2007-08 साठी जगदंबा सहकारी साखर कारखाना लि. कर्जत ता.कर्जत जि.अहमदनगर येथे उपजिविका भागविण्यासाठी गेले असता तेथे दि.02.04.2008रोजी कृष्ण्राव मूरकूटे यांचे ट्रक्टर नंबरएम.एच.-16-6402 मध्ये बसून सायंकाळी 5 वाजता वाळू आणण्यासाठी गेले असता मूरकूटे वस्ती जवळील नदीत वाहू भरताना वाळूचा मोठा ढिगारा तक्रारदाराचे पतीचे अंगावर पडला व अपघात झाला व त्यामध्ये तो दबून जागेवर मयत झाला. त्या बाबतची फिर्याद देऊन नोंदणी क्र.12/2007 नुसार अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आलेली आहे.
त्यांचे मृत्यूनंतर तक्रारदारांनी सामनेवाला क्र.4यांचेकडे दि.30.04.2008 रोजी प्रस्ताव अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर केलेला आहे. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी पून्हा मागणी केल्यावरुन त्यांचे कागदपत्रे तक्रारदारांनी सामनेवालाकडे दिलेली आहेत. तथापि सामनेवाला क्र.3 चे दि.23.06.2010 रोजीचे पत्र त्यात मृत्यू प्रमाणपत्र, वयाचा दाखला (निवडणूक कार्ड) एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी एम रिपोर्ट, पोलिस अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या कागदपत्राची मागणी केलेली आहे. सदरचे पत्र तक्रारदारांना दि.20.08.2010 रोजी प्राप्त झाल्याचे तक्रारदारांनी दि.22.11.2010 रोजी सामनेवाला क्र.4 यांना दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. सदर पत्रानुसार त्यांनी तिन्ही कागदपत्रे दि 22.11.2010 रोजी सामनेवाला क्र.4 कडे सादर केलेले आहेत. या संदर्भात सामनेवाला क्र.3 ने दि.24.11.2010 रोजी तक्रारदाराचा दावा अपूर्ण कागदपत्र या सदरा खाली नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदर कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तक्रारदारांना पत्र व स्मरणपत्र दिलेले आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.4 यांचा खुलासा स्पष्ट आहे. त्यांनी तक्रारदारांनी प्रस्ताव अर्जासह दिलेले कागदपत्रे सामनेवाला क्र.1 कडे त्रूटीच्या पूर्ततेसह दाखल केलेले आहेत. यावरुन तक्रारदारांनी सामनेवाला क्र.3 च्या मागणीप्रमाणे पूर्तता केली.परंतु सदरची पूर्तता ही विलंबाने केलेली आहे. दरम्यानच्या कालावधीत विमा कंपनीने दावा नाकारल्याचे दिसते.
या संदर्भात विमा कंपनीचे दावा मुदतीत नसल्या बदलची जोरदार हरकत आहे. विमा लाभार्थी बाळकृष्ण जंगले यांचा मृत्यू दि.2.4.2008 रोजी झालेला आहे. तक्रार दि.6.4.2011 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. विलंबा माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. या संदर्भात सामनेवाला क्र.3यांनी तक्रारदाराचा दावा दि.24.11.2010 रोजी नाकारला आहे. सदर दावा नाकारल्याच्या दिनांकापासून विचार करता तक्रार दि.6.4.2011 रोजी दाखल झालेली आहे. यांचाच अर्थ दोन वर्षाचे आंत तक्रार दाखल झाली असल्याने सामनेवाला यांची विलंबाची हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी कागदपत्रे सामनेवाला क्र.4 कडे दाखल केलेले आहेत. सदरची कागदपत्राची त्रूटीची पूर्तता तक्रारदारानी केल्यानंतर सामनेवाला क्र.4 यांनी सामनेवाला क्र.3 कडे कागदपत्रे पाठविली आहेत परंतु दरम्यानच्या काळात कागदपत्र दाखल करण्यास तक्रारदारास तिन महिन्याचा विलंब झाला असल्याने सामनेवाला यांनी दावा नाकारलेला आहे.यात सामनेवाला यांनी तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नसली तरी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने कागदपत्राची पूर्तता तक्रारदारानी पूर्ण केली असल्याने सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारांना मयत बाळकृष्ण आश्रोबा जंगले यांचे मृत्यूची नूकसानीची रक्कम रु.1,00,000/- दयावी असे या न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी कागदपत्राची पूर्तता उशिरा केल्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम व खर्चाची रक्कम देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत बाळकृष्ण आश्रोबा जंगले यांचे मृत्यूची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास सामनेवाला क्र.3 हे तक्रारदारांना तक्रार दाखल दि.06.04.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास जबाबदार राहतील.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड