निकालपत्र :- (दि.09/12/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराचा न्यायिक पशुविमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारलेमुळे दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार पोळगांव पो.कासार कांडगाव ता. आजरा जि.कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीबरोबर उपजिवीकेसाठी पुरक व्यवसाय म्हणून दुभती जनावरे पाळून त्यातून येणारे उत्पन्नावर उपजिवीका करतात. सामनेवाला ही विमा कंपनी असून त्यांचे शाखा कोल्हापूर जिल्हयात असून मॅनेजर हे त्यांचे अधिकारी आहेत. ब) तक्रारदार दि.31/03/2007 रोजी सामनेवालांकडे त्यांचे म्हैशीचा विमा प्रत्यक्ष पाहणी करुन व खात्री केलेनंतरच उतरविला होता. त्याचा पॉलीसी नं.cattle insurance policy No.1706-06-3012-000001 असून सर्टीफिकेट नं.1706-06-3012-000001-7081 सदर पॉलीसीचा विमा कालावधी दि.27/03/2007 ते 26/03/2010 असा आहे. नमुद विमा उतरविलेली म्हैस काळया रंगाची देशी जातीची, शिंगे एकसारखी नसणारी मागे, वर आत वळलेली, शेपूट गोंडा पांढरा, वय अंदाजे 7 वर्षे, किंमत रक्कम रु.15,000/- टॅग नं.RGICL06099NLDB असा आहे. तक्रारदार खळनाथ सह.दुध व्यवसाय मर्या.पोळगांव आजरा यांना नियमित दुध पुरवठा करीत असतात. नमुद विमा उतरविलेली म्हैस दि.14/11/2008 रोजी सर्पदंशाने मयत झाली. तसे अधिकृत पशु वैद्यकीय प्रतिनिधीनी प्रत्यक्ष पाहणी नंतर अहवालात सर्पदंशाने म्हैस मयत झालेचे नमुद केलेले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालातही स्पष्टपणे नमुद आहे. क) नमुद म्हैस मयत झालेच्या घटनेदिवशीच फोनव्दारे कळविले. तक्रारदार यांनी म्हैस मयत झालेचे दुस-या दिवशी दि.15/11/2008 रोजी प्रत्यक्ष जाऊन तक्रारदाराने सामनेवालांचे कोल्हापूर शाखेत कळवले. त्याचदिवशी क्लेमफॉर्म दिला व क्लेम फॉर्म देऊन विमा रक्कमेची मागणी करणेस सांगितलेवरुन क्लेम फॉर्म स्विकारला. सदर क्लेमफॉर्मसोबत योग्य ती आवश्यक कागदपत्रे जोडून विमा रक्कमेची मागणी केली असता दि.20/01/2009 चे पत्राने मोडलेला टॅग दिल्याने अट नं.3 चा भंग होत असलेने प्रस्तुतचा क्लेम देता येत नाही म्हणून नाकारला आहे. दि.05/08/2008 रोजी पशुधन विकास अधिकारी(विस्तार) पंचायत समिती यांनी सामनेवालांना रिटॅगींग करणेसाठी पत्र दिले होते. सदर पत्रामध्ये तक्रारदाराचे नांव अ.क्र.9 ला आहे. तसेच दि.06/08/2008 रोजी जा.क्र.243/08 ने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर यांना लेखी पत्राने कळवले होते अशी परिस्थिती असतानाही तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सामनेवालांनी सेवात्रुटी केलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करुन विमा रक्कम रु.15,000/-, दि.14/11/2008 पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले सर्टीफिकेट, क्लेम फॉर्म, विमा रिसीट, क्लेम व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट, दुध संस्थेचा दाखला, मयत म्हैशीचे पोस्ट मार्टेम रिपोर्ट, म्हैशीचा पंचनामा, ग्रामपंचायत पोळगांवचा दाखला, पशुधन विकास अधिकारी यांनी जिल्हा पशुधन उपायुक्तांना दिलेले पत्र, पशुधन विकास अधिकारी यांना दिलेली रिटॅगींग ची यादी, तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेले पत्र, सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचे अर्जातील कथने चुकीची खोटी व दिशाभूल करणारी आहेत. सबब सामनेवाला यांना ती मान्य व कबूल नाहीत. तक्रार अर्जातील कलम 1 मधील मजकूर तक्रारदाराने शाबीत करावा. तो मान्य नाही. तक्रार अर्जातील कलम 2 व 3 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर आहे. कलम 4 मधील मजकूर मान्य नाही. कलम 5 मधील विमा पॉलीसी संदर्भातील मजकूर वगळता इतर मजकूर तक्रारदाराने शाबीत करावा. कलम 6 ते 8 मधील मजकूर अमान्य आहे. कलम 9 मधील क्लेम नामंजूरीचे पत्रातील मजकूर वगळता इतर मजकूर चुकीचा आहे. कलम 10 व 11 मधील मजकूर मान्य नाही. कलम 11 व 14 मधील मजकूर मान्य नाही. तक्रारीस कारण घडलेले नाही. वस्तुत: विमा उतरवत असताना विमा उतरवलेले जनावराचे योग्य आयडेंटीफिकेशन होणेकरिता त्या जनावराचे कानात टॅग मारलेला असतो; सदर टॅग जनावर मयत झालेस क्लेम करणेकरिता जनावराचे आयडेंटीफिकेशन बरोबर होणेकरिता कंपनीकडे सादर करणे महत्वाची अट आहे. तक्रारदार टॅग विमा कंपनीकडे हजर केला नाही. त्यामुळे पॉलीसीच्या अट क्र.3 चा भंग झालेने कायदेशिररित्या नाकारला आहे. तसेच तक्रारदारास कळवले यात सेवात्रुटी केलेली नाही. मयत म्हैशीचे कानातील बिल्ला पशुधन अधिका-यांच्याकडे दिला होता तो हरवला. रिटॅगींग करणेची जबाबदारी सामनेवाला कंपनीची होती हे तक्रारदाराचे म्हणणे चुकीचे आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने नमुद म्हैशीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला होता याबाबत वाद नाही. त्याचा पॉलीसी नं.cattle insurance policy No.1706-06-3012-000001 असून सर्टीफिकेट नं.1706-06-3012-000001-7081 सदर पॉलीसीचा विमा कालावधी दि.27/03/2007 ते 26/03/2010 असा आहे व टॅग नं.RGICL06099NLDB असा आहे. सदर विमा कालावधीत दि.14/11/2008 रोजी नमुद विमा उतरविलेली म्हैस सर्पदंशाने मयत झाली. त्याबाबत क्लेम फॉर्मवरही नोंद आहे तसेच पशुवैद्यकांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालातही नोंद आहे. सबब मयत म्हैस सर्पदंशाने मृत्यू पावली याबाबत वाद नाही. म्हैशीच्या वर्णनाबाबतही वाद नाही. विमा उतरविलेली म्हैस मयत झालेली नाही असा वाद नाही. वादाचा मुद्दा आहे तो सदरचा क्लेम दि.20/01/2009 चे पत्राने सामनेवाला कंपनीने पॉलीसीची अट क्र.3 नुसार NO Tag No Claim या कारणास्तव क्लेम नाकारला आहे. या बाबींचा विचार करता पशुधन विकास अधिकारी(विस्तार) पंचायत समिती आजरा यांना रिटॅगींग बाबत पत्र दिले होते. त्यामध्ये अ.क्र.9 ला तक्रारदाराचे नांव आहे. गांव पोळगांव जनावर प्रकार म्हैस बिल्ला क्र.6099 विमा कालावधी 3 वर्षे पॉलीसी दि.31/3/2007 इत्यादी नोंद आहे. त्यास अनुसरुन दि.06/08/2008 रोजी नमुद अधिका-यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जि.कोल्हापूर यांचेकडे केंद्र पुरस्कृत पशुधन विमा योजना 2006-07 मध्ये रिटॅगींग करणेबाबत कळवलेचे दिसून येते. यामध्ये आजरा येथील 6 पैकी दोन जनावरांचे रिटॅगींग केले आहे. अनु क्र.7 वरील पोळगांव येथे 39 जनावरांच रिटॅगींग करणे असलेची नोंद आहे. मात्र शे-यामध्ये रिटॅगींग केलेचे नमुद नाही. त्याची प्रत दि.18/।2/2008 रोजी सामनेवालांचे शाखा कार्यालयातून पाठवलेचे दिसून येते. याची कल्पना सामनेवालांना दि.18/12/2008 रोजी होती. दुर्देवाने तक्रारदाराची म्हैस दि.14/11/2008 रोजी मयत झाली आहे. मात्र रिटॅगींग करणेची कार्यवाही सदर म्हैस मयत होणेपूर्वी दि.06/08/2008 रोजी सुरु केलेली होती ही वस्तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. सदरची बाब तक्रारदाराने मंचापासून दडवून ठेवलेली नाही. तसेच सदर वस्तुस्थितीची माहिती देणेचे पत्र तक्रारदाराने दि.28/10/2009 रोजी पाठवलेले आहे. याची संपूर्ण माहिती सामनेवालांना होती. रिटॅगींगची जबाबदारी कोणाची होती ? याचा विचार करता संबंधीत अधिका-यांनी सामनेवालांना कळवलेनंतर टॅग देण्याची जबाबदारी सामनेवाला कंपनीची आहे. ती त्यांना टाळता येणार नाही. दप्तर दिरंगाईचा फटका तक्रारदारास का ? तक्रारदाराने टॅग हरवलेनंतर रिटॅगींग करणेबाबत प्रक्रिया राबविलेली आहे. त्या संदर्भात संबंधी अधिका-यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. सदर रिटॅगींग पुढील प्रक्रियेस विलंब झाला आहे व सदर रिटॅगींग करणेपूर्वीच तक्रारदाराची विमा उतरविलेली म्हैस मयत झालेली आहे. त्याचा दोष तक्रारदारास देता येणार नाही. सदर पॉलीसीचा मूळ हेतू लक्षात घेऊन एकंदरीत घडलेल्या परिस्थितीचा विचार करता विमा उतरविलेलीच म्हैस मयत झालेली आहे ही वस्तुसिथती निर्विवाद आहे. तसेच सदर म्हैशीचा टॅग हरवलेला होता व रिटॅगींगची प्रक्रिया सुरु होती ही वस्तुस्थितीही निर्विवाद आहे. मात्र प्रत्यक्षात रिटॅगींग करणेपूर्वी सदर नमुद म्हैस मयत झालेली आहे व सदर रिटॅगींगमध्ये झालेला विलंब हा दप्तर दिरंगाईमुळे झालेला आहे. नमुद विमा योजनेचा मूळ हेतू लक्षात घेता वरील परिस्थितीचा विचार करता सदर क्लेम मंजूर होणेस पात्र असतानाही तांत्रिक कारणास्तव सामनेवालांनी तो नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. मुद्दा क्र.2:- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार पॉलीसीच्या क्लेमप्रमाणे रक्कम रु.15,000/- मिळणेस पात्र आहे तसेच सामनेवालांनी क्लेम नाकारलेमुळे तक्रारदारास झालेल्या मानिकस त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (02) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रु.15,000/-(रु.पंधरा हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.20/01/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. (03) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |