द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचा मुलगा नवनाथ गंडे हा शेतकरी आणि शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता. दिनांक 12/4/2008 रोजी त्यांचे वाहन अपघातात निधन झाले. एफआयआर , घटनास्थळपंचनामा आणि पीएम करण्यात आले. तक्रारदाराने सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म तहसिलदार फुलंब्री यांना दिनांक 17/6/2008 रोजी दिला तरी सुध्दा गैरअर्जदारांनी त्यांना क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदारांकडून रु 1 लाख 18 टक्के व्याजदराने, रु 10,000/- नुकसान भरपाईपोटी व तक्रारीचा खर्च रु 10,000/- ची मागणी करतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिसी घेतेवेळेस मयत नवनाथ गंडे यांच्या नावावर शेती नव्हती दिनांक 10/4/2008 नंतर त्यांच्या नावाने शेती असल्याचे दिसून आले, पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार पॉलिसी घेतेवेळेस ते शेतकरी नव्हते . म्हणून तक्रारदाराच्या क्लेमची रक्कम देता येणार नाही असे कळविले आहे. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती ते करतात. गैरअर्जदार क्रमांक 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार लक्ष्मीबाई खंडेराव गंडे यांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल झाला आहे, त्या वेळचे तहसिलदार यांच्या मार्फत कंपनीस सादर केला आहे. सदर प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांनी सादर केलेले नाही त्यामुळे या कार्यालयाचा प्रस्तावाशी संबंध येत नाही. तरी वरील गोष्टीची नोंद घेऊन तालुका कृषी अधिकारी फुलंब्री यांना प्रतिवादी म्हणून वगळण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली आहे. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. गैरअर्जदार रिलायन्स विमा कंपनीच्या पॉलिसीच्या कालावधीमध्ये मयत नवनाथ गंडे यांच्या नावावर शेती नव्हती ती दिनांक 10/4/2008 पासून त्यांच्या नावावर शेती झाली या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. शासनाने आणि रिलायन्स इंन्शुरन्स कंपनीमध्ये जो MOU झाला आहे त्यातील अटी व शर्थीची पाहणी केल्यानंतर पात्रतामध्ये असे नमूद केले आहे की, शेतक-याच्या नावावर लॅण्ड रेकॉर्ड रजिष्टर म्हणजेच 7/12 किंवा 8 (अ) चा उतारा यामध्ये अपघाताच्या वेळेस संबंधीताचे नांव असणे गरजेचे आहे. तकारदारानी मंचामध्ये सातबारा उतारा व फेरफारची नक्कल दाखल केली. सातबारा उता-यामध्ये नवनाथ गंडे यांच्या नावावर 40 आर जमिन दाखविण्यात आली आहे. म्हणजेच मयत नवनाथ हे शेतकरी होते हे स्पष्ट होते. त्यानंतर तक्रारदारानी दिनांक 18/2/2008 च्या म्युटेशन एंट्रीने ते शेतकरी असल्याचा फेरफाराचा कागद दाखल केला आहे. गैरअर्जदार रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने केवळ याच कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व हे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच गैरअर्जदार रिलायन्स इन्शुरन्स कंपनीस असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदाराच्या क्लेमची रक्कम रु 1 लाख त्यांना दिनांक 27 जुलै 2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदाराने तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- 6 आठवडयाच्या आत द्यावी. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 1,00,000/- दिनांक 27/07/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने द्यावेत व तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष युएनके
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |