जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 351/2010. तक्रार दाखल दिनांक: 14/06/2010. तक्रार आदेश दिनांक : 19/10/2010. श्री. संजय शिवलिंग क्षीरसागर, वय 38 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, पुष्पम प्लाझा, ग्राऊंड फ्लोअर, 135 ब, ताडीवाला रोड, पुणे - 411 001. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) 2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., एच.डी.एफ.सी. बँकेच्या वर, लकी चौक, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष गैरहजर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांच्या घरगुती होस्टर्न जातीच्या म्हशीचा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.18,000/- रकमेचा विमा उतरविलेला आहे. विमा पॉलिसी क्रमांक 1702-06-3012-000001/2764 व टॅग क्रमांक 54125 असा आहे. तक्रारदार यांची म्हैस आजारी पडली आणि उपचारादरम्यान दि.13/2/2010 रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर म्हशीचे पोस्टमार्टेम करण्यात येऊन विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. परंतु विमा कंपनीने त्यांना क्लेमचा निर्णय कळविला नाही किंवा विमा रक्कम दिलेली नाही आणि विमा कंपनीने क्लेम प्रलंबीत ठेवला आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.18,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.50,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या म्हशीचा विमा कंपनीकडे रु.18,000/- रकमेचा पॉलिसी क्रमांक 1702-06-3012-000001/2764 अन्वये विमा उतरवल्याचे रेकॉर्डवर दाखल पॉलिसी प्रमाणपत्रावरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांची म्हैस मृत्यू पावल्यानंतर विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला असता, क्लेमबाबत निर्णय न घेता तो प्रलंबीत ठेवला असून विमा रक्कम दिली नसल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. 5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या पॉलिसी छायाप्रत, विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, वेटर्नरी सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा, ग्रामपंचायत व दुग्ध संस्थेचे दाखले इ. कागदपत्रांचे सुक्ष्मपणे अवलोकन करता, तक्रारदार यांची विमा संरक्षीत म्हैस मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. उपरोक्त कागदपत्रानुसार विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत म्हैस मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम सेटल करण्याबाबत अनुचित दृष्टीकोन ठेवला असून सबळ कारणाशिवाय क्लेम प्रलंबीत ठेवल्याचे निदर्शनास येते. त्यांनी मंचासमोर येऊन क्लेम प्रलंबीत ठेवण्याची कारणेही स्पष्ट केलेली नाहीत. 6. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम प्रलंबीत ठेवून सेवेत त्रुटी केली आहे आणि तक्रारदार हे म्हशीच्या विम्याची रक्कम तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.18,000/- दि.14/6/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/161010)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |