निकालपत्र :- (दि.06/11/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – यातील तक्रारदार हे शेतकरी असून जोडधंदा म्हणून जनावरेही सांभाळत होते. त्यांनी आपल्या गाभण गायीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडून दि.29/03/2007 रोजी उतरविला होता. सदर पॉलीसीचा नं.9464 असून टॅग नं.RGICL/MLDB 45298 असा होता. तक्रारदाराची सदर विमा उतरविलेली गाय दि.04/01/2009 रोजी मयत झाली. सदर गाय अचानक मयत झालेने पॉलीसीतील शर्ती व अटींनुसार पॉलिसीची रक्कम मिळावी म्हणून यातील तक्रारदाराने सामनेवालांकडे मागणी केली होती. त्याबाबतची करावी लागणारी कागदपत्रांची सर्व पुर्तता यातील तक्रारदाराने केली होती. तथापि,तक्रारदाराची विमा पॉलिसीची रक्कम मिळण्याची मागणी सामनेवालांनी कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय फेटाळली व तसे दि.17/03/2009 चे पत्राने सामनेवालांनी तक्रारदारास कळवले. सदर गाय मयत झालेनंतर तिचे पोस्ट मार्टेम केले असून पंचनामाही करणेत आला आहे. सदर गाय मयत झाली त्यावेळी ती दोन्ही वेळेला 5/5 लिटर दुध देत होती. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्याय क्लेम केवळ तक्रारदाराच्या गायीचा टॅग तुटलेल्या अवस्थेत आहे असे जुजबी कारण देऊन नामंजूर केला आहे ही सामनेवालांच्या सेवेतील अत्यंत गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती केली आहे. तक्रारदाराने मयत गाईच्या विम्याच्या पॉलीसीची रक्कम रु.14,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, सर्टीफिकेट ऑफ इन्शुरन्स, गाईचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मयत गाईचा पंचनामा, ग्रामपंचायत बोरवडे यांनी दिलेला दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (03) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सदर गाय दररोज 5 लिटर दुध देत होती इत्यादी तक्रारदाराच्या कथनाला कु ठलाही पुरावा नाही. जनावरास मारलेला टॅग हा सामनेवाला विमा कंपनीने जनावराच्या ओळखीसाठी मारलेला असतो त्यामुळे सदर टॅग तुटला किंवा हरवला तर विमाधारकाने ताबडतोब विमा कंपनीला कळवून रिटॅगींग करुन घेणे आवश्यक असते. आपल्या गायीचा टॅग तुटलेल्या अवस्थेत होता हे तक्रारदाराने मान्य केले आहे असे असताना रिटॅगींग करुन घेणे ही तक्रारदाराची जबाबदारी हेाती. तक्रारदाराने रिटॅगींग का करुन घेतले नाही याबद्दल कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने गायीचा तुटलेला टॅग बदलून घेतला नाही त्यामुळे तक्रारदाराने विमा कराराच्या महत्वाच्या अटींचा भंग केला आहे व त्यामुळेच योग्य विचार करुनच सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालाच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. सबब सदर तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती सामनेवाला यांनी तक्रारदारास केली आहे. (04) या मंचाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकले. तसेच तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रेही तपासली. तक्रारदाराच्या गायीचा टॅग तुटलेल्या अवस्थेत होता ही बाब तक्रारदारानेही मान्य केली आहे. टॅग ही विमाधारीत जनावर ओळखण्याची खूण आहे हे सामनेवालांचे कथन आम्ही ग्राहय धरतो. परंतु जनावर ओळखण्याची टॅग ही एकमेव खूण नाही. जनावराच्या वर्णनाबद्दल पॉलीसीतील वर्ण व प्रत्यक्ष मयत जनावर यात काही मतभेद नाही. टॅग क्लेमफॉर्मसोबत दाखल करणे ही सामनेवाला विमा कंपनीची अट असली तरी ती मार्गदर्शक स्वरुपाची आहे अत्यावश्यक नाही. (directory and not mandatory) त्यामुळे टॅग नाही तर क्लेम नाही हे सामनेवालाचे कथन हे मंच ग्राहय धरत नाही. सदर गाय रोज 5/5 लिटर दुध देत होती याबद्दल तक्रारदाराने कुठलाही पुरावा दाखल केला नाही हे सामनेवालांचे कथन हे मंच ग्राहय धरत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा क्लेमची नुकसानभरपाई रक्कम रु.14,000/- दि.17/03/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह दयावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.500/-(रु.पाचशे फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |