तक्रारदार : स्वतः त्यांचे वकील श्री.अहमद शेख सोबत हजर.
सामनेवाले : --
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-
तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश
1. तक्रारदार हे झैतुल अपार्टमेंट, अंधेरी (पश्चिम) मुंबई या इमारतीचे मालक आहेत. त्या इमारतीमधील असलेले गाळे तक्रारदारांनी लिव्ह अॅन्ड लायसेन्स पध्दतीने भाडयाने दिलेले आहेत. तक्रारदारांनी त्या गाळयाकरीता सा.वाले यांचेकडून विद्युत पुरवठा प्राप्त केलेला आहे. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले यांनी जागेची पहाणी न करता खोटा अहवाल तंयार करुन तक्रारदारांना नोटीस दिली व मिटरमध्ये फेरफार करण्यात आलेला आहे असा आरोप करुन हंगामी आकारणी आदेश पारीत केला. त्या आदेशानंतर सा.वाले यांनी अंतीम आकारणी आदेश पारीत केला. व सा.वाले तक्रारदार यांचेकडून भरमसाठ दराने विद्युत देयकाबद्दल वसुली करु पहात आहेत. दाखल सुनावणीकामी तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदारांचे वकीलांनी अर्जासोबत देयकांच्या प्रती हजर केलेल्या आहेत. दाखल सुनावणी दरम्यान तक्रारदारांचे वकीलांना प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये सा.वाले यांचेकडून वाणिज्य व्यवसायाकामी विद्युत पुरवठा स्विकारल्याने तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्या प्रमाणे ग्राहक होऊ शकतात काय अशी शंका विचारण्यात आली व त्या संबंधात तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
2. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद 3 अ मध्ये असे स्पष्टपणे कबुल केलेले आहे की, झैतुल अपार्टमेंट या मधील गाळयांचा वापर वाणिज्य व्यवसायाकामी होतो. त्याचप्रमाणे तक्रारीच्या परिच्छेद 3 ब मध्ये ही बाब मान्य केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत ज्या देयकाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये विद्युत वापर वाणिज्य व्यवसायाकामी (Commercial ) अशी नोंद आहे. या वरुन तक्रारदार त्या गाळयांचे मालक आहेत व ते गाळे तक्रारदारांनी भाडयाने दिलेले असून त्यामध्ये तक्रारदारांचे भाडोत्री/लायसन्सी वाणिज्य व्यवसायाकामी विजेचा वापर करीत आहेत ही बाब दिसून येते. दुकानातील गाळयामध्ये असलेले विजेचे मिटर तक्रारदारांचे नांवे आहेत. याप्रमाणे तक्रारदारांनी वाणीज्य व्यवसायाकामी केल्या जाणा-या विजेचा वापर करणेकामी सा.वाले यांचेकडून विद्युत पुरवठा दुकान गाळयांकरीता करुन घेतला असे दिसून येते. या प्रकारे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून वाणिज्य व्यवसायाकामी सेवा स्विकारली असा निष्कर्ष काढावा लागतो.
3. तक्रारदारांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, जर सेवा सुविधा तक्रारदारांनी स्वतःच्या उपजिविकेसाठी व स्वयंमरोजगारासाठी प्राप्त केल्या असतील तर वाणिज्य व्यवसायाकामी असलेली बाधा लागू होणार नाही. प्रस्तुत मंचाने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) चे परंतुक याचे वाचन केले आहे. त्यामध्ये नमुद दिलेल्या बाबी म्हणजे स्वतःच्या उपजिविकेसाठी व स्वयंमरोजगारासाठी हया बाबी तक्रारदारांनी आपल्या तक्रारीतध्ये कुठेही नमुद केलेल्या नाहीत. या प्रमाणे केवळ युक्तीवादावरुन व कलम 2(1)(डी) चे परंतुकाचा संदर्भ देणे पुरेसे नसते. तर त्याकामी तक्रारदारांचे तसे कथन असणे आवश्यक असते. व त्यानंतर तसा पुरावा द्यावयाचा असतो.
4. वरील सर्व बाबीवरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे वाणिज्य व्यवसायाकामी वापर केल्या जाणा-या गाळयाकरीता विद्युत पुरवठा स्विकारला असल्याने सा.वाले यांचेकडून ती सेवा वाणिज्य व्यवसायाकामी स्विकारली असे दिसून येते. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहक होत नसल्याने ग्राहक संरक्षण मंचास प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेऊन त्यावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही.
5. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेण्यात येत नाही, व ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.