निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाली कंपनी ही विज पुरवठा करणारी कंपनी आहे. तर तक्रारदार हे सा.वाले कंपनीचे ग्राहक आहेत. सा.वाले यांनी विद्युत मिटर क्रमांक 6877845 हे तक्रारदारांचे जागेत बसविले आहे व त्या मिटर प्रमाणे विद्युत पुरवठा केला जातो. प्रस्तुतची तक्रार ही तक्रारदाराचा मुलगा व मुखत्यार श्री.अशोक मौर्य यांनी तक्रारदारांचे वतीने दाखल केलेली आहे. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे श्री.अशोक मौर्य यांनी माहितीच्या अधिकाराखाली सा.वाले यांचेकडे दिनांक 30.10.2008 रोजी अर्ज दिला व मुळचे तक्रारदारांनी मिटर जोडणी करुन घेताना सा.वाले कंपनीकडे कुठले कागदपत्र दाखल केले होते त्याच्या प्रती मागीतल्या. सा.वाले यांनी त्यांना माहितीचा अधिकार लागू होत नाही. या कारणास्तव तो अर्ज नाकारला त्यानंतर तक्रारदारांनी कागदपत्रांच्या नक्कला मिळणेकामी अर्ज दिला परंतु त्यास सा.वाले यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर तकारदारांनी वकीलामार्फत नोटीस दिली व मिटर जोडणी करतांना दाखल केलेल्या मुळचे कागदपत्रांच्या नक्कला मागीतल्या. त्यासही सा.वाले यांनी उत्तर दिले नाही. या उलट सा.वाले यांनी तक्रारदारांचे विद्युत मिटरचा पुरवठा खंडीत केला. अंतिमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व मिटर जोडणी करताना दाखल केलेल्या कागदपत्रांच्या नक्कला तक्रारदारांना पुरविण्यात याव्यात व नुकसान भरपाईदाखल 10,000/- रुपये तक्रारदारांना मिळावेत अशी दाद मागीतली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व माहितीच्या अधिकारातील अर्ज हा सा.वाले यांचे ग्राहक श्री.केशव मौर्य यांनी नव्हेतर त्यांचा मुलगा अशोक मौर्य यांनी दाखल केला होता व त्यासोबत मुखत्यारपत्रही नव्हते. अधिकार नसलेल्या व्यक्तींनी तो अर्ज दिल्याने अर्ज नाकारण्यात आला. त्याचप्रमाणे सा.वाले कंपनी ही शासन पुरस्कृत कंपनी नसल्याने त्यांना माहितीचा अधिकार लागू होत नाही असे कथन केले. त्याचप्रमाणे तक्रारदारांना मिटर जोडणी करताना दाखल केलेल्या कागदपत्रांच्या नक्कला पुरविले नसल्यास तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपांस नकार दिला. 4. दोन्ही बाजुंनी आपले पुराव्याचे शपथपत्र,कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना मुळ कागदपत्रांच्या नक्कला पुरविल्या नाहीत यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 5. तक्रारदारांनी तक्रारी सोबत मुखत्यार पत्र हजर केलेले आहे. त्यावरुन मुळचे ग्राहक श्री.केशव मौर्य यांनी श्री.अशोक मौर्य यांना मुखत्यारपत्र करुन दिले असे दिसून येते. तक्रारदारांनी निशाणी ब वर माहितीच्या अर्जाची प्रत हजर केलेली आहे. त्यास सा.वाले यांनी प्रतिसाद दिला नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतमध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, माहितीच्या अधिकाराचे कलम 2 एच प्रमाणे सा.वाले हे पब्लीक अथोरीटी नसल्याने त्यांना माहितीचा अधिकार लागू होत नाही. सा.वाले यांचे कथनाचा उहापोह करण्याचे प्रस्तुत मंचाने टाळले आहे कारण तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ही सा.वाले यांचे ग्राहक म्हणून सेवा सुविधेचा भाग या अर्थाने मुळ कागदपत्रांच्या नक्कला सा.वाले यांचेकडून प्राप्त व्हाव्यात या कामी दाखल केलेली आहे. 6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी क सोबत दिनांक 21.11.2008 रोजीचे नोटीस व दिनांक 3.12.2008 रोजीचे नोटीसीची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी ते सा.वाले यांचे ग्राहक असल्याचा व मुळचे कागदपत्रांच्या नक्कला त्यांना आवश्यक असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांची नोटीस दिनांक 3.12.2008 हयास त्यांचे पत्र दिनांक 16.12.2008 ला उत्तर दिले. त्याची प्रत सा.वाले यांनी आपले लेखी युक्तीवादासोबत निशाणी ब वर दाखल केली आहे. त्यातील मजकुरावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना चर्चेकामी कार्यालयीन वेळेत दुपारी 3 ते 5 दरम्यान बोलाविले होते. या पत्रातील मजकुरावरुन असे दिसते की, सा.वाले यांना तक्रारदाराचे मागणीचा उद्देश कळाला होता परंतु त्यांना चर्चेअंती त्यावर तोडगा काढावयाचा होता. तथापी सा.वाले यांनी मुळचे कागदपत्र उपलब्ध नाहीत किंवा नक्कला दिल्या जावू शकत नाहीत असे उत्तर तक्रारदारांना दिले नाही. त्याप्रकारची विधाने सा.वाले यांच्या कैफीयतीमध्येसुध्दा दिसून येत नाहीत. तक्रारदारांनी देखील त्यांना मुळचे कागदपत्र कुठले उद्देशाचे पुर्ततेसाठी पाहीजे आहेत याचा खुलासा केलेला नाही. तरीदेखील तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक असल्याने कागदपत्र उपलब्ध असल्यास त्याच्या नक्कला पुरविणे ही सा.वाले यांची सेवा सुविधा पुरविणारे म्हणून जबाबदारी ठरते. 7. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी त्यांचेकडे तक्रारदारांनी मागणी केलेली कागदपत्र उपलब्ध असतील तर त्याच्या प्रती तक्रारदारांना देण्यात याव्यात असा आदेश देणे उचित राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. 8. वरील निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 650/2009 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांचे दिनांक 21.11.2008 चे अर्जा प्रमाणे मुळचे कागदपत्र उपलब्ध असल्यास त्याच्या नक्कला पुरविण्यात याव्यात. 3. नुकसान भरपाई किंवा खर्चाबद्दल आदेश नाही. 4. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता सदरील न्यायनिर्णयाची प्रत प्राप्त झालेपासून तक्रारदारांना नोटीस देवून 4 आठवडयाचे आत करावी. <!--[if !supportLists]-->5 <!--[endif]-->आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य ठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |