तक्रारदार : गैर हजर. सामनेवाले : प्रतिनिधी श्री.धुरु मार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी त्यांची सदनिका क्रमांक 2971, गांधी नगर, रत्नदिप को.ऑ.हौ.सोसायटी, बांद्रा (पूर्व) ही सदनिका श्रीमती मंगल भालचंद्र गुप्ते यांचेकडून दिनांक 24.9.2004 रोजी खरेदी खताने खरेदी केली. त्यानंतर म्हाडाने ती सदनिका तक्रारदारांचे नांवे केली. त्या सदनिकेमध्ये सा.वाले यांनी बसविलेले विद्युत मिटर ज्याव्दारे पुर्वीचे मालक विद्युत पुरवठा घेत असत. तक्रारदारांच्या वैयक्तिक अडचणीमुळे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे अर्ज देवून सदनिकेमधील मिटर स्वतःचे नांवे बदली करुन घेवू शकले नाहीत परंतु मिटर क्र. 5726672 याचा वापर तक्रारदार करीत होते. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे त्याचा सरासरी विद्युत वापर 100 युनिट प्रतिमास असा होता. जुलै, 2005 मध्ये मुंबई येथे अतिवृष्टी झाली व इमारतीचे तळ मजल्यावर असलेले विद्युत मिटर खराब झाले. व सा.वाले यांनी ऑगस्ट, 2005 मध्ये नविन विद्युत मिटर इमारतीच्या तळ मजल्यावर बसविले. त्यामधुन तक्रारदारांच्या सदनिकेस विद्युत पुरवठा करण्यात येत होता. 3. तक्रारदारांची पुढे तक्रार अशी की, नविन विद्युत मिटर बसविल्यानंतर विद्युत वापराचे युनिटमध्ये अचानक वाढ झाली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे संपर्क साधला व तक्रार केली. सा.वाले यांचे प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, तक्रारदारांची सदनिका क्रमांक 2971 व शेजारील सदनिका क्रमांक 2972 यांना विद्युत पुरवठा करणा-या तारामध्ये दोष असून त्यामुळे युनिटचे वापरामध्ये वाढ झाली. सा.वाले यांनी त्या बद्दल दुरुस्ती केली. व त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे कमी झाला. दरम्यान वाढलेल्या विद्युत वापराबद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांकडे देयक पाठविले व तक्रारदारांनी रु.4,720/- सा.वाले यांचेकडे दिनांक 19.1.2008 चे पत्रासोबत जमा केले. तरी देखील सा.वाले यांनी दिनांक 14.3.2008 रोजी तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन की, तक्रारदारांची कुठलीही चुक नसताना सा.वाले यांनी तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. व त्यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली. तक्रारदारांनी प्रस्तुतचे तक्रारीमध्ये सा.वाले यांनी विद्युत पुरवठा सुरु करावा अशी दाद मागीतली. तसेच ज्यादा वसुल केलेली रक्कम व्याजासह परत करावी व नुकसान भरपाई बद्दल रुपये 75,000/- अदा करावेत अशी दाद मागीतली. 4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांच्या सदनिकेमधील विद्युत मिटर तक्रारदारांचे नांवे नसल्याने तक्रारदार सा.वाले यांचे ग्राहक नाहीत. सा.वाले यांनी असेही कथन केले की, सदनिका क्रमांक 2971 व 2972 यांना विद्युत पुरवठा करणारी तार ही एक मेकात मिसळल्याने सदनिका क्रमांक 2972 चे विद्युत वापराचे युनिट तक्रारदारांच्या मिटरमध्ये नोंदविण्यात आले आहे. तथापी सा.वाले यांचे असे म्हणणे की, दोषा बद्दल तक्रारदार हे जबाबदार असून सा.वाले यांची ती जबाबदारी नव्हती. सा.वाले यांनी असेही कथन केले की, ज्यादा विद्युत आकारणीची रक्कम तक्रारदारांनी सदनिका क्रमांक 2972 चे मालकाकडून वसुल करावयास पाहिजे होती. 5. तकारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. 6. प्रस्तुतचे मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले व त्यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे सा.वाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. | 2. | सा.वाले यांनी तक्रारदारांना ज्यादा विद्यूत वापराबद्दल देयक देवून सक्तीची वसुली केली व तक्रारदारांच्या सदनिकेचा विद्युत पुरवठा खंडीत केला व तक्रारदारांना विद्युत पुरवठयाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 3 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून विद्युत पुरवठयाचे संदर्भात निर्देश मागण्यास पात्र आहेत काय ? | होय. | 4 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा मुद्दा क्र.1 7. तक्रारदारांनी त्यांची सदनिका श्रीमती गुप्ते यांच्याकडून 2004 मध्ये खरेदी केली. व तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे खरेदी नंतर म्हाडाने ती सदनिका तक्रारदारांचे नांवे नोंदविली. परंतु तक्रारदारांचे वैयक्तिक अडचणीमुळे तक्रारदार सा.वाले यांचेकडे संपर्क प्रस्तापित करु शकले नाहीत व त्यामुळे सदनिकातील मिटर तक्रारदारांचे नांवे नोंदविण्याचे राहून गेले. तक्रारदारांनी वैयक्तिक अडचणी आपल्या तक्रारीमध्ये नमुद केलेल्या आहेत. ज्याचा संदर्भ देणे आवश्यक नाही. तथापी तक्रारदारांना त्या सदनिकेत असणा-या मिटरव्दारे विद्युत पुरवठा केला जात होता ही बाब सा.वाले यांना मान्य केलेली आहे. येवढेच नव्हेतर तक्रारदारांनी विद्युत वापराबद्दलच्या देयकाप्रमाणे जमा केलेली रक्कम सा.वाले यांनी स्विकारलेली आहेत. केवळ सदनिकेमधील विद्युत मिटर तक्रारदारांचे नांवे नोंदविण्यात आलेला नाही यावरुन तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे विक्रेत्याकडून एखादी वस्तु विकत घेणे अथवा सेवा सुविधा स्विकारणारी व्यक्ती ती सेवा सुविधा पुरविणारे व्यक्तीची ग्राहक असते. या कसोटी प्रमाणे तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. सबब या मुद्यावरील सा.वाले यांचा आक्षेप फेटाळण्यात येत आहे. मुद्दा क्र.2 8. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, जुलै, 2005 मध्ये मुंबर्इ येथे अतिवृष्टी झाली. परीणामतः इमारतीच्या तळ मजल्यावर पाणी जमा झाले व तक्रारदारांच्या सदनिकेतील तसेच इतर सदनिकेतील विद्युत मिटर तळ मजल्यावर असल्याने मिटरमध्ये पाणी शिरले व मिटर नादुरुस्त झाले. त्यानंतर सा.वाले यांनी नविन इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसविले. परंतु ऑगस्ट, 2005 नंतर वापरावयाचे युनिट मध्ये खुपच वाढ झाली व ती सरासरी वापराचे विरुध्द होती. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत निशाणी फ, पृष्ट क्र.30 वर जून, 2005 ते फेब्रुवारी, 2008 चे कालावधीच्या विद्युत वापराचा तक्ता दाखल केलेला आहे. त्याचे निरीक्षण केले असतांना असे दिसून येते की, जून, जुलै व ऑगस्ट 2005 मध्ये तक्रारदारांच्या मिटरमधून वापरण्यात येणारे युनिट हे 100 पेक्षा कमी होते. परंतु सप्टेंबर, 2005 पासून वापरण्यात येणारे युनिट हे 200 चे वर होते. जुलै, ऑगस्ट, 2006 मध्ये ते 300 पेक्षा जास्त होते. तकारदारांचा विद्युत वापर अचानक वाढला होता किंवा तक्रारदार हे अन्य सदनिकेस किंवा वाणीज्य व्यवसायाकामी विद्युत पुरवठयाचा वापर करीत होतेअसे सा.वाले यांचे कथन नाही. तक्रारदारांच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर, 2006 मध्ये विद्युत मिटरमध्ये झालेला दोष दूर करण्यात आला. व त्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत कमी झाला. तक्रारदार यांचे कथनास निशाणी फ चे तक्त्यामधील नोंदी वरुन पुष्टी मिळते, व त्यातील नोंदी असे दाखवितात की, डिसेंबर, 2006 पासून विद्युत वापराचे युनिट 100 पेक्षा कमी झाले. विद्युत वापराचे मिटरमधील फरक तक्रारदारांचे कथनास पुष्टी देतात. 9. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांची सदनिका क्रमांक 2971 व शेजारील सदनिका क्रमांक 2972 यांना विद्युत पुरवठा करणा-या तारा हया एकत्र जोडल्या जावून दोन्ही सदनिकेच्या विद्युत वापराच्या नोंदी तक्रारदारांचे मिटरमधून झाल्या. त्यावरुन विद्युत पुरवठा वापराच्या नोंदी ज्यादा प्रमाणात आल्या. इथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, जुलै, 2005 मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर सा.वाले यांनी इमारतीच्या तळ मजल्यावरील असलेले विद्युत मिटर बदलले होते. ज्या मिटर मधून तक्रारदारांच्या सदनिकेस विद्युत पुरवठा केला जात होता. त्या बदलानंतर विद्युत पुरवठयाचे युनिटमध्ये अचानक वाढ झाली व एकत्र तारा जाडण्याचा दोष सा.वाले यांनी 2006 नोव्हेंबर मध्ये दूर केल्यानंतर विद्युत वापराचे युनिट पुर्ववत झाले. ही बाब एकत्रितपणे असे दर्शविते की, सा.वाले यांचे कर्मचा-यांनी ऑगस्ट, 2005 मध्ये मिटर बदलण्याचे काम करीत असतांना दोन्ही सदनिकांना विद्युत पुरवठा करणा-या तारा एकमेकांना जोडल्या गेल्या ज्यामधून तक्रारदारांच्या सदनिकेस विद्युत मिटरमध्ये दोन्ही सदनिकेच्या विद्युत वापराचे नोंदी सुरु झाल्या. त्यावरुन त्यातील वापराचे युनिटमध्ये वाढ झाली. हा दोष तक्रारदारांनी केलेल्या कार्यवाहीमुळे निर्माण झाला नाही तर तो सा.वाले यांचे कर्मचा-यांच्या तांत्रिक बदलामुळे निर्माण झालेला होता. वास्तविक सा.वाले यांनी स्वतःहून या बदलाची नोंद घ्यावयास पाहिजे होती व तक्रारदारांकडून जादा युनिटची वसुली करावयास नको होती. परंतु सा.वाले यांनी ती वसुली केली येवढेच नव्हेतर तक्रारदारांना देयक भरण्यास उशिर झाल्याने विज पुरवठा खंडीत केला. या सर्व बाबी सा.वाले यांनी तक्रारदारांना विज वापराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यसात कसुर केली असे दर्शवितात. मुद्दा क्र.3 10. तक्रारदारांनी तक्रारी सोबत दाखल केलेल्या अंतरीम अर्जावर प्रस्तुत मंचाने पारीत केलेल्या अंतरीम आदेशाप्रमाणे तक्रारदारांचा सदरहू विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. 11. तक्रारदारांनी तक्रारीसोबत देयकाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्या वरुन असे दिसते की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून ज्यादा विद्युत वापराबद्दल रु.5,997/- ची मागणी केली होती. त्यापूर्वी रु.4,200/- ची मागणी केली होती. ती रक्कम तक्रारदारांनी जमा केली आहे. 12. सा.वाले यांनी आपल्या कृतीचे समर्थनार्थ लेखी युक्तीवादासोबत काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. परंतु ती कागदपत्रे ही तक्रारदारांचे संबंधात नाहीत किंवा तक्रारदारांचे सदनिकेच्या संबंधात नाहीत. सा.वाले यांनी कलम 126,127 प्रमाणे पारीत केलेल्या आदेशाची प्रत दाखल केलेली आहे. परंतु ही सर्व कागदपत्रे श्री.किरण शेट्टी या ग्राहकाचे संदर्भातील आहेत. व त्या ग्राहकाचा प्रस्तुत प्रकरणाशी काही संबंध नाही. त्याच प्रमाणे लेखी युक्तीवादात सा.वाले यांनी श्री.अजीज अहंमद भाब यांच्या जागेला सा.वाले यांचे कर्मचा-यांनी तपासणी दाखल दिलेल्या भेटीचा उल्लेख केलेला आहे. परंतु त्या व्यक्तीचा प्रस्तुत प्रकरणाशी काही संबंध नाही. या प्रकारे सा.वाले यांनी लेखी युक्तीवादात केलेली कथने व त्या सोबत दाखल केलेली कागदपत्रे असंबंधीत असून त्यातुन तक्रारदारांविरुध्द दोष होता ही बाब दिसून येत नाही. 13. या प्रकारे सा.वाले यांनी त्यांच्या कर्मचा-याचे वरील चुकीचे केवळ समर्थन केले नाहीतर तक्रारदारांकडून रु.4,720/- वसुल केलेले आहेत. त्यानंतर रु.5,997/- चे देयक पाठविले व ती रक्कम तक्रारदारांनी जमा केली असुनसुध्दा तक्रारदारांच्या सदनिकेचा विद्युत पुरवठा बंद केला. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांकडून वसुल केलेली जादा रक्कम तक्रारदारांना परत करण्याचे आदेश देणे योग्य व न्याय राहील. त्याच प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व त्यांच्या सदनिकेचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने तक्रारदारांची प्रचंड कुचंबणा झाली. तसेच तक्रारदार हे व्यवसायाने वकील असल्याने विद्युत पुरवठा नसल्याने त्याच्या व्यवसायाचे संदर्भात निश्चितच कुचंबणा झाली असेल व अवहेलना झाली असेल या बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना ज्यादा वसुल रक्कम व नुकसान भरपाई या बद्दल एकत्रितपणे रु.30,000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. 14. वरील चर्चा व निष्कर्षानुरुप पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 212/2008अंशतः मंजूर करण्यात येते. 2. तक्रारदारांनी चालु देयके भरली असतील तर सामनेवाले यांनी त्यांचा विद्युत पुरवठा चालु ठेवावा व तो खंडीत करु नये. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना या व्यतिरिक्त ज्यादा वसुल केलेली रक्कम, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च याबद्दल एकत्रितपणे रुपये 30,000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येत आहे. 4. सामनेवाले यांनी सदरहू आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत अदा करावी. अन्यथा त्यावर त्यावर 12 टक्के दराने रक्कम अदा करेपर्यत व्याज द्यावे लागेल. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |