निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश 1. सा.वाली ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी असुन तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदारांच्या ताब्यात मड आयलंड, मालाड पश्चिम येथील बंगला ताब्यात असून निवासी वापरासाठी तक्रारदाराने फारपूर्वी विद्युत मिटर ग्राहक क्रमांक 7532350 खाते क्र.1441 असा काढला होता. या व्यतिरिक्त त्यांचे इमारतीमध्ये वाणीज्य व्यवसाईक वापरासाठी एक अन्य विद्युत मिटर तक्रारदाराने बसविला होता. तक्रारदार त्या बंगल्याचा वापर निवासी कामासाठी करत होते. 2. तक्रारदाराचे तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांचा बंगला सिनेमा किंवा टि.व्ही. मालीका यासाठी शुटींगसाठी भाडयाने दिला गेल्यास वाणीज्य व्यवसायकामीचे मिटर क्रमांक 3965 यामधुन विद्युत पुरवठा वापरला जात होता व निवासी वापराचे विद्युत मिटरमध्ये कधीही शुटींगचे कामात विद्युत वापर केला जात नव्हता. 3. सा.वाले यांचे अधिका-यांनी दिनांक 13.9.2007 रोजी तक्रारदाराचे बंगल्यास भेट दिली व एक असा अहवाल तंयार केला की, तक्रारदाराच्या निवासी वापराचे मिटर 2350 याचा वापर वाणीज्य व्यावसायाकामी होत आहे. त्यावरुन सा.वाले यांनी हंगामी वसुली आदेश पारीत केला व तक्रारदारांना रु.1,17,378/- येवढी रक्कम भरणा करण्यास सांगीतले. तक्रारदाराचे तक्रारीतील कथनाप्रमाणे सा.वाले यांची वरील कार्यवाही ही बेकायदेशीर असून खोटया अहवालाचे आधारीत आहे व तक्रारदाराने कधीही निवासी वापराचे मिटरचा वापर वाणीज्य व्यवसायाकामी केलेला नाही. सा.वाले यांनी हंगामी वसुली आदेश 3.10.2007 वर आधारीत अंतीम वसुली आदेश 12.11.2007 रोजी पारीत केला. तक्रारदारांना अशी भिती आहे की, सा.वाले त्यांच्या निवासी विद्युत मिटरचा पुरवठा खंडीत करतील. तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रारद दाखल करुन सा.वाले यांनी हंगामी वसुली आदेश व अंतीम वसुली आदेश मागे घ्यावेत असे निर्देश मागीतले. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईकामी रु.30 हजार मागीतले. 4. सा.वाले यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यात निवेदन केले की, अंतीम वसुली आदेश विद्युत कायदा 2003 कलम 126 प्रमाणे पारीत केले असून तक्रारदार हे कलम 127 विद्युत कायद्याप्रमाणे अपील दाखल करु शकतात व संबंधित तक्रार प्रस्तुत मंचास चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारदार हे जागेचा व विद्युत मिटरचा वापर वाणीज्य वापरासाठी करत असल्याने प्रस्तुतचे मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असे निवेदन केले आहे. 5. सा.वाले यांनी अंतीम आदेश पारीत केल्यानंतर आपली पुरवणी कैफियत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी त्यांचे निवासी वापराचे विद्युत मिटरचा वापर शुटींगकामी केला असून वाणीज्य व्यवसायाकामी सदरहू विद्युत वापरल्याने त्यांनी विद्युत पुरवठा अनाधिकारणाने वापरला असे होते व त्याच्या वसुलीचा दरही वेगळा असल्याने तक्रारदारांची वरील कृती हेतु पुरस्सर व सा.वाले यांच्या महसुल बुडविण्याचे हुतुने केली. सा.वाले यांनी याप्रमाणे हंगामी वसुली आदेश व अंतीम वसुली आदेश याचे समर्थन केले व असे कथन केले की, निवासी वापराचे विद्युत मिटरमधून इतक्या जादा युनिटचा वापर होणे शक्य नाही जी बाब सदरहू मिटरचा वापर वाणीज्य व्यावसायाकामी होत होत हे सिध्द करते. 6. तक्रारदाराने सा.वाले यांच्या कैफियतीस आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी दि.5.1.2011 रोजी दाखल केलेल्या शपथपत्रास तक्रारदाराने आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही पक्षकारांनी पुरावा शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तसेच दोन्ही पक्षकारांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 7. प्रस्तुतचे मंचाने तक्रारदाराचे वकील व सा.वाले यांचे प्रतिनिधी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकल, तक्रारीमधील कागदपत्र, शपथपत्र, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रार निकालीकामी प्रस्तुतचे मुद्दे कायम करण्यात आले. .क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार हे सा.वाले यांनी तक्रारदारांचे निवासी विद्युत मिटर 7532350 या बद्दल पारीत केलेले हंगामी व अंतीम वसुली हे बेकायदेशीर आहेत हे सिध्द करतात काय व त्या अनुरोधाने सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचे विरुध्द कुठलीही दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. तक्रारदारांच्या तक्रारीतील परिच्छेद क्र.1 मध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदार त्यांच्या मड आयलंडमधील बंगल्याचा वापर निवासकामी करत आहेत. तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ठ क्र.2 वर असे कथन केले आहे की, मड आयलंडमधील बंगला शुटींगकामी वापरल्यास विद्युत पुरवठा हा वाणीज्य वापराकामीचे मिटर 3965 यामधुन वापरला जातो. तक्रारदार जर आपल्या कुटुंबियासमवेत तेथे रहात असतील व बंगल्याचा वापर निवासी कामाकरीता होत असेल तर तो बंगला किंवा निवासस्थान भाडयाने देणे शक्यच नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या बंगल्यात त्यांचे मॅनेजर विजय पाटील हे रहात आहेत असे स्पष्ट कथन सा.वाले यांनी आपल्या शपथपत्रांत तसेच लेखी युक्तीवादात केले आहे. त्यास नकार तक्रारदाराने आपल्या शपथपत्रात केला नाही. एखादे निवासस्थान किंवा बंगला केवळ निवासासाठी वापरणे व तो शुटींगकामी भाडयाने देणे या दोन गोष्टी विरोधी असल्याने व तक्रारदारांचे मॅनेजर विजय पाटील तेथे रहात असल्याने तक्रारदार त्या बंगल्याचा वापर केवळ शुटींगकामी करीत होते ही बाब स्पष्ट होते. त्यावरुन सा.वाले यांचे कथन की, तक्रारदाराने निवासाचे विद्युत वापराचे मिटरमधून शुटींगचे कामी विद्युत पुरवठा वापरला आहे या कथनास बळकटी प्राप्त होते. 9. सा.वाले यांनी आपल्या कैफियतीसोबत पृष्ठ क्र.68 वर तक्रारदारांचा खार,(पश्चिम) मुंबई येथील निवासस्थानाचे विद्युत मिटरच्या वापराचे आकडेवाडीचा तपशिल दाखल केला आहे. त्यासोबतच वादग्रस्थ मिटर 2692 खाते क्र.1441 यांचे विद्युत दरमहा वापराचा तपशिल दाखल केला आहे. कैफियतीच्या पृष्ठ क्र.68 वर विद्युत मिटर क्रमांक 30104 याचा जो तपशिल दिलेला आहे त्यावर तक्रारदाराचे नांव असून पत्ता 712, बजाज निवास, लिंकींग रोड, खार (पश्चिम) मुंबई.असा दिला आहे. सा.वाले यांच्या प्रतिनिधींनी आपल्या तोंडी युक्तीवादाचे वेळी असे सांगीतले की, खार पश्चिम येथील जागा तक्रारदार हे त्यांच्या कौटुंबिक निवासस्थानासाठी वापरतात व मड आयलंड येथील बंगला कधीच वापरत नाहीत त्या आकडेवारीच्या तपशिलावरुन व पंत्यावरुन सा.वाले यांच्या कथनास पुष्टी मिळते. तक्रारदार मुंबई मधील दोन जागाचा वापर निवासस्थानासाठी करणे शक्य नाही व मड आयलंड येथील बंगल्याचा वापर शुटींगकामी होत असल्याने तक्रारदार हे खार येथील निवासस्थान हे त्यांच्या कुटुंबाचे स्थायी निवासस्थान म्हणून वापरत आहेत या तर्कास पुष्टी मिळते. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांचे खार पश्चिम येथे असलेले निवासस्थान विद्युत मिटरचा वापर संबंधित तालीकेतील आकडेवारी तसेच मड आयंलंड येथे बंगल्यात बसविलेल्या विद्युत मिटर क्र.2692 या तालीकेतील आकडेवारी यांची तुलना केली तर असे दिसून येते की, खार पश्चिम येथील असलेल्या विद्युत मिटरचा वापर मड आयलंड येथे बसविलेल्या वादग्रस्त विद्युत मिटरपैकी कमी आहे. या तुलनात्मक अभ्यासावरुन ही बाब सिध्द होते की, खार पश्चिम येथील निवासस्थान निवासाकामी वापरत आहेत तर मड आयलंड येथील बंगला शुटींगकामी म्हणजे वाणीज्य व्यावसायाकामी वापरत आहेत. 10. या संबंधीत तक्रारदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे की, मड आयलंड येथील बंगल्यात त्यांनी निवासी विद्युत वापराकामी मिटर क्रमांक 2350 खाते क्रमांक 1441 बसविला आहे. तर वाणीज्य व्यावसायाकामी 6923 खाते क्र.3965 दिलेला आहे. तक्रारदारांनी मड आयलंड बंगल्यामध्ये वाणीज्य व्यावसायाकामी मिटर क्र.6923 खाते क्र.3965 बसविलेला आहे. तक्रारदाराने मड आयलंडमध्ये वाणीज्य व्यावसाय कामातील मिटर 6923 मध्ये खाते क्र.3965 याचा वापराचा तपशिल दाखविणारी तालीका हजर केली नाही. ज्यावरुन तक्रारदार हे मड आयलंड येथील बंगल्यामध्ये शुटींगच्या वेळेस केवळ वाणीज्य व्यावसायकामाचा मिटर क्रमांक 6923 चा वापर करत होते. ही बाब सिध्द होऊ शकली असती, खरोखरच जर मड आयलंड येथील बंगल्यामध्ये असलेले वाणीज्य व्यावसायाचे मिटर 6923 याचा वापर वाणीज्य व्यावसायाकामी असेल तर त्याच्या विद्युत वापराची आकडेवारी निवासी विद्युत मिटरचे वापराचे पेक्षा जास्तीच राहीली असती किंवा असू शकेल. परंतु तशी परिस्थिती दिसून येत नाही. ही बाब देखील तक्रारदाराच्या तक्रारीतील कथन खोटे आहे हया तर्कास पुष्टी देते. 11. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये अशी मागणी केली होती की, सा.वाले यांनी हंगामी वसुली आदेश व अंतीम वसुली आदेश 12.11.2007 यावर कोणतीही कार्यवाही करु नये, तथापी सा.वाले यांनी तक्रारदाराच्या वादग्रस्त विद्युत मिटरचा पुरवठा खंडीत करु नये अशी दाद तक्रारीमध्ये नाही व अंतरीम स्वरुपातही तशी मागणी केलेली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 28.4.2010 रोजी प्रस्तुत मंचाकडे अर्ज दिला व त्यामध्ये असे कथन केले की, दिनांक 19.4.2010 रोजी तक्रारदारांना कोणतीही सूचना न देता वादगुस्त विद्युत मिटरचा पुरवठा सा.वाले यांनी खंडीत केला. त्या अर्जासोबतच तक्रारदारांनी दिनांक 10 मार्च,2010 रोजीच्या सा.वाले यांनी दिलेल्या नोटीसची प्रत हजर केली. वरील अर्जास सा.वाले यांनी उत्तराचे शपथपत्र दाखल केले व असे कथन केले की, तक्रारदारांनी अंतीम मागणी आदेश कलम 126 प्रमाणे रक्कम भरणा न केल्याने तक्रारदारांचे वादग्रस्त मिटर क्र.2350 खाते क्र.1441 याचा विद्युत पुरवठा दिनांक 17.4.2010 रोजी बंद करण्यात आला होता. त्यापुर्वी 15 दिवसामध्ये रक्कम भरावी अशी मागणी नोटीस पाठवून देण्यात आली होती. त्या शपथपत्रामध्ये सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांनी 19.4.2010 रोजी विज पुरवठा खंडीत झाला असताना पुन्हा सा.वाले यांचे परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे विद्युत जोडणी केली. वरील कथनाचे पृष्ठर्थ सा.वाले यांनी मालवणी पोलीस स्टेशन येथे दि.24.12.2010 रोजी दिलेल्या तक्रारीची प्रत हजर केली. ती तक्रार सा.वाले यांच्या अधिका-यांनी दिनांक 24.12.2010 रोजी केलेल्या तपासणीवर आधारीत होती. तसेच हे कागदपत्र व तपासणी अहवाल सा.वाले यांनी आपल्या शपथपत्र दि.5.1.2011 च्या शपथपत्रात हजर केले आहे. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, दिनांक 24.12.2010 रोजी म्हणजे ज्या दिवशी सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदाराच्या बंगल्यास फेर जोडणी तपासणीकामी भेट दिली त्याच दिवशी प्रस्तुत मंचाकडे तक्रारदारांनी अंतरीम मनाई हुकुमाचा अर्ज दिल. त्या अर्जावर सा.वाले यांनी पुढील तारखेपर्यत विद्युत पुरवठा खंडीत करु नये असा आदेश दिला. दिनांक 24.12.2010 रोजी प्रकरण बोर्डावर होते. त्या दिवशी सा.वाले यांचे प्रतिनिधीनी असे कथन केले की, तक्रारदारांनी पुर्वी खंडीत केलेला विद्युत पुरवठा बेकायदेशीरपणे जोडला आहे व तो अद्याप चालु आहे. त्यावर तक्रारदारांनी असे कथन केले की, सा.वाले यांनी दि.19.4.2010 रोजी खंडीत केलेला विद्युत पुरवठा स्वतः जोडून दिला. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या दि.5.1.2011 चे शपथपत्राचे उत्तर दाखल जबाब शपथपत्र दिनांक 8.2.2011 रोजी दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केले की, सा.वाले यांनी त्या मिटरचा विद्युत पुरवठा स्वतःहून जोडणी करुन दिला होता. त्या शपथपत्रासोबत तक्रारदारांनी नोटीसच्या प्रती, हंगामी अंतीम वसुली आदेश, याच्या प्रती तसेच काही धनादेशाच्या प्रती हजर केल्या. परंतु सा.वाले यांनी 19.4.2010 रोजी खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडला होता या बद्दलचे कुठलेही कागदपत्र हजर केले नाही. सा.वाले यांनी विद्युत पुरवठा 19.4.2010 रोजी खंडीत केला होता ही बाब तक्रारदारांनी आपल्या दि.8.2.2011 चे शपथपत्रात मान्य केली आहे. ही बाब मान्य केल्यानंतर सा.वाले यांनी स्वतःहून विद्युत पुरवठा जोडणी दिली ही बाब अशक्य वाटते. तक्रारदारांनी तसा पाठपुरावा केला असेल तर सा.वाले यांनी तसा आदेश दिला असता व त्या कार्यवाहीचे काही कागदपत्र तंयार झाले असते. तसे घडल्याचे कागदपत्र तक्रारदाराने आपल्या शपथपत्रासोबत दाखल केले नाहीत. यावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी वादग्रस्त विद्युत मिटरचा विद्युत पुरवठा 19.4.2010 रोजी खंडीत केल्यानंतर तक्रारदाराने बेकायदेशीरपणे व स्वतःहून अन्य मार्गाने विद्युत जोडणी करुन घेतली . त्यानंतर प्रस्तुतच्या मंचाकडून दिनांक 24.12.2010 रोजी अंतरीम मनाई हुकुम मिळविला. तक्रारदारांच्या या प्रकरणातील वरील सर्व वर्तणुक ही संशयास्पद तसेच मंचाची दिशाभूल करणारी तसेच बेकायदेशीरपणाची दिसून येते. कुठल्याही विद्युत ग्राहकास विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतःहून जोडणी करण्याचा अधिकार नाही. ती विद्युत जोडणी न्यायालयीन किंवा मंचाचे आदेशान्वये अथवा विद्युत पुरवठा करणारे यांचेकडे अर्ज विनंत्याकरुन कायदेशीरपणे फेर जोडणी होऊ शकते. या प्रकरणात तसे काही झाले नाही असे दिसून येते. या परीस्थितीत तक्रारदार प्रस्तुतचे मंचाकडून कुठलीही दाद मागण्यास पात्र आहे असे म्हणता येत नाही. 12. या व्यतिरिक्त तक्रारदार हे मड आयलंड मधील बंगल्याचा वापर चित्रपटाचे, टि.व्ही. मालीकेचे शुटींगकामी वापरतात ही बाब सिध्द झालेली आहे. त्या बंगल्याचा वापर वाणीज्य व्यावसायाकामी होत असल्याने तेथे तक्रारदार निवास करत असतील ही बाब शक्य दिसत नाही. अभिलेखामध्ये तक्रारदारांच्या निवासाचा पत्ता, विद्युत मिटर व त्याचा तपशिल सा.वाले यांनी दाखल केलेला आहे. यावरुन देखील तक्रारदार हे प्रस्तुत मंचाकडून सदर तक्रारीमध्ये दाद मागण्यास पात्र आहेत असे म्हणता येत नाही. 13. वरील सर्व कारणाकरीता प्रस्तुत तक्रार रद्दे होणेस पात्र आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 636/2007 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबद्दल काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |