निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी कि, तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून दोन विद्युत जोडण्या घेतल्या आहेत. एकीचा मीटर क्र.3523949 असून त्याचा खाते क्र.101528044 असा आहे तर दुस-या मीटरचा क्र.5722356 असून त्या बाबत खाते क्र.101528016 असा आहे. तक्रारदाराचे म्हणणे कि, दोन्हीं विद्युत जोडण्या घरगुती वापरासाठी आहेत. 2 तक्रारदाराचे म्हणणे कि, त्याची राहण्याची जागा ज्यात मीटर क्र.3523949 घेतलेले आहे, ती फक्त एक खोली व एक स्वयंपाकगृह एवढीच आहे. परंतु त्याचे बिल दरमहा खूप जास्त म्हणजे रु.8,000/- ते रु.9,000/- यायचे. तसेच मीटर क्र.5722356 हे घरगुती वापरासाठी आहे परंतु सामनेवाले बिलाची आकारणी व्यापारी तत्वावर असलेल्या टॅरीफप्रमाणे करतात, म्हणून त्याचेही बिल खूप जास्त यायचे, म्हणून त्यांनी सामनेवाले यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधला व त्यांना त्याबद्दल सांगितले, त्यानंतर, डिसेंबर, 2005 मध्ये त्यांनी त्याचे क्र.3523949 चे मीटर बदलून तेथे 5905535 या क्रमांकाचे मीटर लावले होते. त्यामुळे, रिडींग थोडे कमी झाले, मात्र ते ही मीटर सदोष निघाले. कारण त्याचे रिडींगही नंतर जास्ती येऊ लागले. 3 तक्रारदाराचे म्हणणे कि, त्याने सामनेवाले यांना ब-याच वेळा विनंती केल्यामुळे त्यांनी त्याचे मीटर तपासले होते व त्यात दोष आहेत असे आढळून आले होते, म्हणून त्याने दि.10.12.2010 रोजी पत्र पाठवून मीटर बदलण्याची विनंती केली होती व त्याने भरलेल्या जास्तीच्या रक्कमेची सुट देण्याची विनंती केली होती. ब-याच वेळा विनंती करुनही सामनेवाले यांनी आवश्यक त्या गोष्टी केल्या नाहीत. 4 तक्रारदाराचे म्हणणे कि, त्याने दि.01.03.2006 रोजी सामनेवाले यांना वकीलामार्फत पत्र पाठविले व कळविलेल कि, त्याचे मीटर क्र.5722356 घरगुती वापरासाठी असूनही बिलाची आकारणी व्यापारी टॅरिफप्रमाणे करण्यात येते, म्हणून तशी दुरुस्ती करण्यात यावी तसेच त्यांनी भरलेल्या जास्त रक्कमेची व्याजासहित मागणी केली होती व तसे न केल्यास त्यांचे विरुध्द कायद्येशीर कार्यवाही करण्यात येईल असे कळविले होते. परंतु सामनेवाले यांनी त्या पत्राची पूर्तता केली नाही. 5 तक्रारदाराचे म्हणणे कि, त्याने त्याच्या खाते क्र.101528044, मीटर क्र.3523949 चे कामी मार्च, 2004 ते जून 2006 या कालावधीसाठी एकूण रु.3,09,625/- बिलापोटी भरलेले आहेत मात्र, त्या खात्यावर त्याच्याकडे देय रकम रु.50,428/- एवढीच होती, म्हणजे त्याने रु.2,59,197/- एवढी रक्कम जास्त दिली आहे. त्याचे असेही म्हणणे कि, खाते क्र.101528016, मीटर क्र.5722356 चे कामी त्यांने एकूण रकम रु.3,02,198/- भरली आहे. मात्र त्या मीटरच्या बाबतीत त्याच्याकडे देय रकम रु.9,556/- होती म्हणजे रु.2,92,642/- एवढी रक्कम जास्तीची भरलेली आहे. तक्रारदाराचे म्हणणे कि, सामनेवाले यांना ब-याच वेळा विनंती करुनही त्यांनी त्याने भरलेली जास्तीची रकम परत केली नाही व व्यापारी तत्वावर, घरगुती तत्वावर असलेल्या मीटरचा विनंती करुनही बदल केला नाही. सदोष मीटरमध्ये दुरुस्ती केली नाही, ही त्यांची सेवेत न्यूनता आहे, सदरची तक्रार केली आहे, म्हणून तक्रारदाराच्या खालील मागण्या आहेत. अ सामनेवाले यांनी त्याचे दोन्हींही मीटर्स बदलून द्यावेत. ब सामनेवाले यांनी त्याने जास्त भरलेल्या ज्यादा रक्कमा रु.2,59,197.14पैसे व रु.2,92,642/- परत कराव्यात. क सामनेवाले यांनी मानसिक त्रास दिल्यामुळे त्याला रु.2,00,000/- नुकसान भरपाई द्यावी. ड सामनेवाले यांनी त्याला या तक्रारीचा खर्च द्यावा. 6 घरगुती वापराचे मीटर क्र.3523949 चे बाबतीत सामनेवाले यांचे म्हणणे कि, दि.13.12.2005 ची तक्रारदाराची तक्रार त्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी दि.16.12.2005 रोजी नविन मीटर बसवून दिले. त्याचा क्र.5905535 असा आहे. तक्रारदाराच्या घरात पाहणी केल्या नंतर असे दिसून आले होते कि, तक्रारदाराने वातानुकुलित यंत्र बसविलेले आहे. नविन मीटर बसविल्यानंतर, हिवाळा ऋतु असल्यामुळे विजेचा वापर कमी झाला, त्यामुळे मीटरचे वाचन कमी आले परंतु मार्च, एप्रिल, मे आणि जून मध्ये विद्युत जास्त वापरली गेल्यामुळे मीटरचे वाचन वाढले, त्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे कि, नंतर जास्त बिल येवू लागले हे चुकीचे आहे. 8 मीटर क्र.7222356 चे बाबतीत सामनेवाले हे कबुल करतात कि, तक्रारदाराने या मीटरचा वापर व्यापारी तत्वावरुन घरगुती तत्वावर बदल करा असे सांगितले होते, म्हणून त्यांनी तक्रारदाराला दि.13.03.2006, दि.07.05.2006 व दि.06.08.2006 रोजी कळविले होते कि, त्याने टॅरिफ बदलण्याच्या बाबतीत फॉरमॅलीटी पूर्ण करावी. ती फॉरमॅलीटी अशी कि, त्याने शपथपत्र द्यावयाचे होते व त्यात उल्लेख करावयाचा होता कि, त्या मीटरचा वापर फक्त घरगुती कामासाठीच केला जातो, त्यानंतरच, तो बदल करण्यात येईल. परंतु तक्रारदाराने तसे शपथपत्रं दिले नाही म्हणून मीटरचा व्यापारी तत्वावरुन घरगुती तत्वावर बदल केला नाही. 9 सामनेवाले यांचे म्हणणे कि, तक्रारदाराची तक्रार आल्यानंतर त्यांच्या अधिका-याने दोन्हीं मीटर तपासून ते चांगल्या स्थितीत आहेत अशी खात्री करुन घेतली होती. तक्रारदाराने जास्तीची रक्कम दिलेली नाही, त्यामुळे रक्कम परत करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, म्हणून तक्रार रद्द करण्यात यावी. 10 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील – श्री. वावीकर, तर सामनेवाले यांचेतर्फे प्रतिनिधी – श्री.धुरी यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 11 मीटर क्र.5722356 हल्लीचा मीटर क्र.5726641, खाते क्र.101528016 यांच्या बिलाची आकारणी LF2 टॅरिफ खाली केलेली आहे, याबद्दल सामनेवाले यांचे दुमत नाही तसेच तक्रारदाराने सदरच्या मीटरचा वापर व्यापारी तत्वावरुन घरगुती तत्वावर करावा यासाठी अर्ज दिला होता, हे पण सामनेवाले यांना मान्य आहे. सामनेवाले यांनी दि.13.03.2006, दि.07.05.2006 व दि.08.06.2006, ची तीन पत्रं तक्रारदाराला पाठवून त्यासाठी घरगुती वापराबद्दलचे शपथपत्रं देण्यास सांगितले होते व नंतरच त्याप्रमाणे, बदल केला जाईल असे कळविले होते. मात्र तक्रारदाराने आजतागायत तशा प्रकारचे शपथपत्रं सामनेवाले यांना दिले नाही. सामनेवाले यांनी सदरच्या तक्रारीत दि.28.11.2006 रोजी कैफियत दाखल करुन त्याच्या परिच्छेद क्र.7 मध्ये म्हटले आहे कि, तक्रारदाराने मीटरच्या घरगुती वापराबाबत शपथपत्रं दिले नाही. असे असूनही तक्रारदाराने आजतागायत शपथपत्रं सामनेवाला यांना दिले नाही. त्यामुळे, त्या मीटरमध्ये व्यापारी तत्वावरुन घरगुती तत्वाचा बदल केला गेला नाही. तक्रारदाराने आजपर्यंत अशा प्रकारचे शपथपत्र सामनेवाले यांना का दिले नाही, याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यामुळे याबाबतीत सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे असे म्हणता येणार नाही. 12 मीटर क्र.3523949 बदलून नविन मीटर क्र.5905535 दि.16.12.2005 रोजी बसविले. तक्रारदाराच्या दि.05.03.2011 च्या शपथपत्रांवरुन असे दिसून येते कि, पूर्वीचे मीटर क्र.5722356, ज्याच्या बिलाची आकारणी LF2 च्या टॅरिफ प्रमाणे होते, ते बदलून आता नविन मीटर 5726641 हे बसविलेले दिसते. तक्रारदाराच्या मीटर क्र.5905535 व मीटर क्र.5726641 ची पाहणी व तपासणी सामनेवाले यांचे Class one supervisors – श्री. किसन जी. थिकेकर, यांनी दि.20.11.2010 रोजी केली होती, त्यांच्या रिपोर्टच्या छायाप्रतीं या तक्रारीत दाखल आहे, तक्रारदाराचे वकील – श्री. वावीकर यांनी युक्तीवाद केला कि, सदरच्या अहवालामध्ये घरगुती मीटरचा आवश्यक विद्युत भार 200w दाखविलेला आहे, त्याप्रमाणे, विजेच्या वापराचे बिल सामनेवाले यांनी तक्रारदाराला खाते क्र.101528044 याबाबतीत द्यावे. परंतु दोन्हीं अहवाल काळजीपूर्वक पाहिले तर असे दिसून येते आवश्यक विद्युत भार 200w हा मीटर क्र.5726641, खाते क्र.101528016 याबाबतीत आहे. घरगुती तत्वाच्या मीटर क्र.5905535, खाते क्र.101528044 याबाबतीतील अहवालामध्ये आवश्यक विद्युत भार 520w दाखविलेला आहे. सामनेवाले यांनी या खात्याच्या विजेच्या वापराचा तक्ता दाखल केला आहे. तो तक्ता खालीलप्रमाणे आहे. Account No. | Bill Date | BILL-MTH | Consu | 101528044 | 05/072005 | JUN-05 | 1,640 | 101528044 | 11/08/2005 | JUL-05 | 1,587 | 101528044 | 06/09/2005 | AUG-05 | 1,183 | 101528044 | 05/10/2005 | SEP-05 | 1,370 | 101528044 | 07/11/2005 | OCT-05 | 1,317 | 101528044 | 05/12/2005 | NOV-05 | 785 | 101528044 | 04/01/2006 | DEC-05 | 365 | 101528044 | 04/02/2006 | JAN-06 | 371 | 101528044 | 06/03/2006 | FEB-06 | 551 | 101528044 | 05/04/2006 | MAR-06 | 734 | 101528044 | 05/05/2006 | APR-06 | 786 | 101528044 | 05/06/2006 | MAY-06 | 843 | 101528044 | 04/07/2006 | JUN-06 | 831 |
सदरच्या तक्यात डिसेंबर, 2005 ते जून, 2006 पर्यंतचे वापराचे नमूद केलेले यूनिट पाहता श्री.थिकेकर यांनी दिलेला अहवाल मान्य करायला काही हरकत नाही. मात्र, डिसेंबर, 2005 पूर्वीचे वापराचे यूनिट, ज्यावेळी मीटर क्र.3523949 बसविलेले होते, खूपच जास्तीचे वाटतात. त्यामुळे ते मीटर सदोष होते यात शंका नाही. सामनेवाले यांनी या मीटरच्या बाबतीत तक्रारदाराने भरलेल्या जास्तीच्या रक्कमेबाबत त्याला क्रेडिट देणे आवश्यक होते, ते त्यांनी दिले नाही, ही त्यांचे सेवेत कमतरता आहे. मात्र तक्रारदार सदरची तक्रार दाखल केल्याच्या पूर्वी फक्त दोन वर्षाच्या कालावधीसाठी भरलेल्या जादा रक्कमेचे क्रेडिट मिळण्यास पात्र आहे. सदरची तक्रार दि.02.09.2006 रोजी दाखल केलेली आहे. त्याचे पूर्वी दोन वर्षापासून म्हणजे सप्टेंबर, 2004 पासून जास्त भरलेल्या रकमेचे क्रेडिट मिळण्यास तक्रारदार पात्र आहे तसेच त्याला मानसिक त्रास झाल्याबद्दल वाजवी नुकसान भरपाई व या तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे. खालील आदेश न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश (1) तक्रार क्र.377/2006अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले यांनी तक्रारदाराचे मीटर क्र.3523949 बदलून द्यावे. (3) सामनेवाले यांनी मीटर क्र.3523949, खाते क्र.101528044 चे बाबतीत दरमहा 520w प्रमाणे सप्टेंबर, 2004 पासून ते जून, 2006 पर्यंत बिलाची आकारणी करुन ती रक्कम तक्रारदाराने या कालावधीसाठी भरलेल्या रक्कमेतून वजा करुन राहिलेल्या रक्कमेचे क्रेडिट तक्रारदाराला द्यावे. (4) सामनेवाले यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रु.2,000/- नुकसान भरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावा. (5) या आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |