अर्जदार गैरहजर. गैर अर्जदारासाठी प्रतिनिधी श्रीमती पेडणेकर. मा.सदस्यानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराचे म्हणणे की, ते सदनिका क्रमांक 102 बी चे मालक आहेत. ही सदनिका दिनांक 07/03/2005 ते दिनांक 06/02/2006 या कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर श्रीमती शबाना शेख यांना दिली. तक्रारदार यांनी फझल ए. शेख यांना मुखत्यारपत्र दिले. तक्रार अर्जात नमुद केलेली निवासी सदनिका ही तक्रारदाराच्या मालकीची असून त्यांच्या वापरात आहे. त्या जागेतील विज मिटर हा त्यांच्याच नांवे आहे तक्रारदार यांनी त्यांच्या दिनांक 08/05/2005 च्या पत्राने सा.वाला यांनी चुकीने रक्कम रु.24,850/- तक्रारदाराच्या नांवे खर्ची टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. असे करताना सा.वाला यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा शहानिशा करण्यात आली नाही. व वरील रक्कमेची मागणी तक्रारदार यांच्याकडून केली. तक्रारदाराचे म्हणणे की, दिनांक 12/01/2006 च्या सा.वाला यांनी केलेल्या निर्धारणानुसार चुकीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी सा.वाला यांनी चुकीची दुरुस्ती करावी अशी त्यांची विनंती आहे. दिनांक 12/01/2006 च्या अंतीम निर्धारणानुसार सा.वाला यांनी एप्रिल 2004 ते जून 2005 या कालावधीकरीता रक्कम रु.24,854/- ची मागणी केली. ही केलेली मागणी तक्रारदारचे मते चुकीची असून या प्रकरणी तात्पुरत्या स्वरुपात जे निर्धारण केले होते ते त्यांच्या निदर्शनास आणलेले नाही. त्यामुळे त्यांनी ही बाब त्यांच्या दिनांक 08/05/2005 च्या पत्राने सा.वाला यांच्या दिनर्शनास आणली होती. तक्रारदराचे म्हणणे की, संबंधित जागेचा वापर हा व्यवसाईक बाबीसाठी वापरण्यात आलेला नाही किंवा त्यांनी अनधिकृत विजेचा वापर केलेला नाही. याकरीता सा.वाला यांनी जे आरोप केलेले आहेत त्याकरीता त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जात नमुद केलेल्या निवासी जागेच्या विजेच्या मिटरचे बिल नियमितपणे प्रदान केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे निवासी जागेतील संबंधित विज मिटर कशासाठी वापरण्यात येत आहे याची शाहनिशा न करता व योग्य ती चौकशी न करता व त्याबाबत पूर्ण कल्पना न देता त्यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम रु.24,850/- ची जी मागणी केली आहे ती चुकीची आहे. या मागणी बाबत योग्य तो खुलासा तक्रारदार यांनी सा.वाला यांना दिनांक 08/05/2005 च्या पत्राने सा.वाला यांना पाठविला आहे. तक्रारदाराने पुन्हा त्यांच्या दिनांक 20/05/2006 च्या पत्राने सा.वाला यांच्या कार्यवाहीबाबत कागदोपत्री पुरावा दाखल करण्यासाठी विनंती केली. सा.वाला यांच्या संबंधित अधिका-यांची भेट घेतली. परंतु सा.वाला यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सा.वाला यांच्याकडून तक्रारदाराच्या विज मिटरची योग्य ती पहाणी व तपासणी न करता केवळ त्यांना त्रास देण्यासाठी पहाणी करण्याचे नाटक करुन सदर मिटरमध्ये हस्तक्षेप केला असल्याचा आरोप करुन इंटीमेशन पत्र व त्यासोबत बेकायदेशीररित्या केलेल्या निर्धारणाची रक्कम तक्रारदाराने अदा करावी अशी मागणी केलेली आहे. तक्रारदाराने ही मागणी नाकारलेली आहे. सा.वाला यांच्या या चुकीच्या कृतीबाबत त्यांचेशी बराच पत्र व्यवहार करुन देखील त्यांच्याकडून त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांनी अनधिकृत विजेचा वापर केलेला नाही किंवा विज मिटरमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या रक्कमेची पुर्तता करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तक्रारदाराच्या निवासस्थानी ते व्यवसाय करतात या कारणावरुन त्यांचे एल.एफ.1 या बिलाच्या प्रकारावरुन त्यांनी एल.एफ.2 मध्ये रुपांतरीत करुन वाणिज्य व्यवसाईक म्हणून विज बिलाच्या रक्कमेची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. ही कृती चुकीची असल्यामुळे तक्रारदाराचा विज मिटर पूर्वस्थितीत आणावा अशी विनंती, त्यांनी दिनांक 01/08/2006 च्या पत्राने सा.वाला यांना केली व त्यानुसार निवासी वापराविषयीचे बिल तक्रारदाराला द्यावे असीही त्यांनी विनंती केली. कारण सबंधित जागेचा वापर हा निवासी कारणासाठीच करण्यात येत असल्यामुळे सा.वाला यांनी अनिवासी वापराविषयी केलेली मागणी चुकीची आहे. त्यासाठी त्यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. केवळ तक्रारदाराला त्रास देण्यासाठी वरील प्रमाणे अनिवासी विज बिलाची मागणी सा.वाला यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांचा विज मिटर कमी गतीने चालतो तसेच त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्यात आलेला आहे. या विषयी संबंधित विज मिटरची प्रयोगशाळेकडून खातर जमा सा.वाला यांनी करुन घेतलेली नाही. सा.वाला यांनी संबंधित प्रकरणी नियम व नियमावलीनुसार कार्यवाही केलेली नसून त्यासाठी त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी तक्रारदाराला केवळ त्रास देण्यासाठी केवळ आंधळेपणाने कृती केलेली आहे. सा.वाला यांनी तक्रारदाराच्या विज मिटरची नियमानुसार पहाणी व तपासणी केलली नाही. त्यांनी बेकायदेशीररित्या तक्रारदाराकडून पैसे वसुल करण्यासाठी विज मिटर पहाणीचे नाटक करुन जे निर्धारण केले आहे, त्याची पुर्तता करण्याचे तक्रारदार यांनी नाकारलेले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने सा.वाला यांचेशी पत्र व्यवहार केला, अर्ज विनंत्या केल्या परंतू दिनांक 12/01/2006 च्या सा.वाला यांच्या अंतीम विज मिटरच्या निर्धारणाच्या संदर्भात त्यांच्याकडून तकारदाराला प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून त्यांनी या मंचासमोर तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे विनंत्या केल्या आहेत. 1) सा.वाला यांच्या सेवेत कमतरता असल्याचे घोषित करण्यात यावे. 2) निवासी जागा क्रमांक 102 पहिला मजला, नजराणा अपार्टमेंट, शांतावाडी, येथील विज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये. 3) सन 2005 पासून सदनिका क्र.102 ही तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर निवासी वापरासाठी देण्यात आली होती. म्हणून त्याप्रमाणे विजेच्या वापराची तपासणी करुन निवासी वापरा विषयीचे बिल द्यावे. 4) सा.वाला यांच्याकडून नोटीस पाठवून विज खपाच्या बिलाची मागणी केलेली आहे. ते आदेश रद्द करण्यात यावेत. आणि रक्कम रु.24,854/- व रु.29,403/- चे सा.वाला यांचे रक्कम भरणा करण्याचे आदेश रद्द करण्यात यावेत. 5) या प्रकरणी मानसिक त्रास,शारिरीक त्रास,छळ, यापोटी नुकसान भरपाईची रक्कम मिळावी. या अर्जाचा खर्च मिळावा. व अन्य दाद मिळावी. 2. सा.वाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. सदरहू तक्रार खोटी, बिन बुडाची, गैर समजुतीवर आधारलेली, बेकायदेशीर व या मंचासमोर चालणारी नसल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सा.वाला यांची विनंती आहे. 3. विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 126 नुसार तक्रारदाराच्या विज वापराविषयी जे निर्धारण केलेले आहे, त्याप्रकरणी कलम 127 नुसार अपील प्राधिकारी ठरविण्यात आलेला आहे. त्याच्याकडे तक्रारदाराने या प्रकरणी अपील करणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हा मंच हे प्राधिकारी नाहीत. त्यामुळे तक्रारदाराची ही तक्रार या मंचासमोर चालणारी नाही. सदरहू तक्रार ही गैर समजुतीवर आधारलेली असून ती बिनबुडाची असल्यामुळे वरील परिस्थितीत ती रद्द करण्यात यावी. ही तक्रार सा.वाला यांना केवळ त्रास देण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रारीत तक्रारदाराने जे अरोप केले आहेत त्याच्या पृष्ठयर्थ त्यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे ती तक्रार ग्राहय नाही. तक्रारदाराने अनधिकृत विजेचा वापर केलला असून सदर विज मिटरमध्ये हस्तक्षेप करुन मिटरचे सील तोडलेले आहे. याची पहाणी व तपासणी करुन त्यानुसार तात्पुरत्या स्वरुपाचे निर्धारण, निर्धारण अधिका-यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार दिले. यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता नाही. अपील प्राधिका-याकडे तक्रारदाराने वर नमुद केलेल्या परिस्थितीत अपील करण्यासाठी प्रथमतः निर्धारीत केलेल्या रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून अदा करावी लागते, अशी तरतुद आहे. तशी कृती तक्रारदाराने केलेली नाही. तक्रारदार हे पारदर्शकपणे मंचासमोर आलेले नाहीत. तक्रारदार हे दोषी असून त्यानी विजेचा वापर बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे केलेला आहे. ही बाब सा.वाला यांच्या संबंधित अधिका-यांच्या पहाणी तपासणी वेळी निदर्शनास आल्यानंतर अनधिकृतपणे वापर केलेल्या विजेच्या रक्कमेचे निर्धारण करुन त्याची मागणी तक्रारदार यांचेकडे करण्यात आली. ही सा.वाला यांची कृती चुकीची नाही. सा.वाला यांनी संबंधित अधिनियमातील कार्य प्रणालीनुसार व कलम 126 व 135 नुसार संबंधित कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता नाही. म्हणून वरील परिस्थितीत तक्रार अर्ज मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे तो खर्चासह रद्द करण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे. 4. तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे, प्रतिनिवेदन, सा.वाला यांची कैफीयत व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रं यांची पहाणी व अवलोकन करुन वाचन केले. तक्रारदार मागील कित्येक तारखांना गैर हजर असल्यामुळे सा.वाला यांच्या प्रतिनिधींचा युक्तीवाद ऐकला. त्यानुसार निकालासाठी खालील प्रमाणे मुद्द उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | तक्रार अर्ज या मंचाला चालविता येईल काय ? | नाही. | 2. | तक्रार अर्जात नमुद केलेल्या मागण्या विचारात घेता येतील काय ? | नाही. | 3. | आदेश | आदेशा प्रमाणे |
कारण मिमांसा 5. तक्रारदार यांना सामनेवाला यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या विज मिटर क्रमांक 4223769 याची सा.वाला यांच्या संबंधित अधिका-याकडून अचानकपणे पहाणी व तपासणी दिनांक 28/06/2005 रोजी केली. अशीच पहाणी व तपासणी त्यानंतर दिनांक 23/05/2006 रोजी केली. त्याबाबतचे पहाणी अहवाल सा.वाला यांच्याकडून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या पहाणी अहवालाच्या प्रती इंटीमेशन पत्र क्रमांक 4851 व 3136 अन्वये सा.वाला यांना दिलेले असून त्यावर तक्रारदाराच्या प्रतिनिधीने सहया केलेल्या आहेत पैकी पहिला तपासणी अहवाल तक्रारदाराला मिळालेला नाही असे त्याचे म्हणणे आहे. परंतु त्या अहवालावर तक्रारदाराच्या संबंधित व्यक्तीने सही केलेली असल्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे ग्राहय असल्याचे दिसून येत नाही. सा.वाला यांच्या सबंधित अधिका-यांनी पहाणी व तपासणी केल्यानंतर ज्या बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या त्याची नोंद अहवालामध्ये केलेली आहे. त्यात संबंधित मिटरमध्ये हस्तक्षेप केल्याचे म्हटले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार व सा.वाला यांच्या कार्यपध्दतीअन्वये अनधिकृतरीत्या वापर केलेल्या विज वापराविषयीची मागणी तक्रारदार यांचेकडे कलम 126 (3) अन्वये करण्यात आली. या संबंधिचा अहवाल सा.वाला यांनी कलम 135 खाली तंयार केलेला असून त्याबाबतचे त्यांचे शेरे संबंधित अहवालामध्ये नमुद केलेले आहेत. तक्रारदाराने विजेचा जो गैर वापर केलेला होता, त्याबाबतच्या बिलाची रक्कम त्यांनी सा.वाला यांना देणे अपेक्षित होते. या प्रकरणी तक्रारदाराचे काही म्हणणे असल्यास ते मांडण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली होती. तसेच निर्धारित केलेली रक्कम ही चुकीची होती किंवा कसे या विषयी विद्युत अधिनियम 2003 च्या तरतुदीनुसार त्यातील कलम 127 अन्वये तक्रारदाराने या प्रकरणी अपील प्राधिका-याकडे न्यायासाठी अर्ज करणे आवश्यक होते. तशी कृती तक्रारदाराने केलेली नाही. सा.वाला यांनी या प्रकरणी राष्ट्रीय आयोगाच्या निवाडयाचा दाखला दिला आहे. तो खालील प्रमाणे आहे. 1986-2006 Consumer 10785 (NS) [ Revision Petition No.1283 of 2003 ] Dated 9th February,2004 Consumer Protection Act 1986—Section 2(1)(e) consumer dispute electricity –surprise inspection of complainant’s premises carried out—meter half seal found unnumbered and meter found tampered—inspection report signed by complainant –case of theft of electricity and FAE not a consumer dispute –revision petition dismissed. राष्ट्रीय आयोगाचा या निवाडयातील निरीक्षण लक्षात घेता सदरहू तक्रार अर्ज या मंचाला चालविता येणार नाही. 6. सदरहू तक्रार अर्ज या मंचाला चालविता येणार नसल्यामुळे तक्रार अर्जातील सर्व संबंधित मागण्यांबाबत तक्रारदाराला या मंचासमोर सा.वाला यांच्याकडून दाद मागणता येणार नाही. म्हणून सदरहू तक्रार अर्ज रद्द बातल करण्यास पात्र असल्याने मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 262/2007 रद्द बातल करण्यात येत आहे. तक्रारदारास योग्य त्या न्यायपिठासमोर दाद मागण्यास मुभा आहे. 2. उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |