ग्राहक तक्रार अर्ज क्र.232/2011
तक्रार अर्ज दाखल दि.18/10/2011
अंतीम आदेश दि.12/04/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
1. श्री.बर्जिज सॅम दुमासिया, अर्जदार
रा.रोशन व्हिला, जिल्हा परिषदेच्या मागे, (अॅड.श्रीमती एस.ए.पंडीत)
ञ्यंबक रोड, नाशिक.1.
2. श्री.बर्जिन बहाद्दूर दारुवाला,
रा.बी.06, संत अपार्टमेंट,
फायर बीग्रेडच्या समोर,
शिंगाडा तलाव, नाशिक.
विरुध्द
रिलायन्स डिजीटल, सामनेवाला
एल एस एफ-2 लोअर ग्राऊंड फ्लोअर, (अॅड.व्ही.एस.देशमुख)
सिटी सेंटर मॉल,लव्हाटे नगर,
उंटवाडी, नविन नाशिक.
(नोटीस बजावणी मॅनेजर यांचेवर करण्यात यावी)
(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून सामनेवाला यांनी वर्णन केल्याप्रमाणे ख-या सोन्याची चेन व त्यात 6 डायमंड बसविलेले पेंडन्ट असे प्रमाणित करुन द्यावे, सदर बाब अशक्य आहे असे कोर्टाचे मत झाल्यास आजच्या बाजारभावानुसार चेन खरेदीस लागणारी रक्कम मिळावी, सदर रकमेवर दि.30/10/2009 पासून 18% व्याज मिळावे, शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.50,000/-, तक्रारीचा खर्च रु.5000/- मिळावा व टायपिंग झेरॉक्स वकील फी इ. या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
या कामी सामनेवाला यांनी पान क्र.16 लगत लेखी म्हणणे व पान क्र.16 अ लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
तक्रार क्र.232/2011
अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून वादातील सोन्याची चैन व पेंडंट मिळण्यास किंवा त्याची किंमत मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
5)
विवेचन
याकामी अर्जदार यांचेतर्फे अॅड.श्रीमती एस.ए.पंडीत यांनी युक्तीवाद केलेला आहे. तसेच सामनेवाला यांचेतर्फे अॅड.व्ही.एस.देशमुख यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून दि.07/10/2009 रोजी वस्तु खरेदीसाठी रक्कम रु.28,990/- दिले होते त्याबाबतचे सामनेवाला यांनी इनव्हाईस दिले असून त्याची झेरॉक्स प्रत पान क्र.5 लगत हजर केलेली आहे. तसेच उर्वरीत रक्कम रु.39,001/-क्रेडीट कार्डाद्वारे दिली असून क्रेडीट कार्डाचे स्टेटमेंटची झेरॉक्स प्रत पान क्र.6 लगत हजर केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये सदर बाब व पान क्र.5 व 6 ची कागदपत्रे नाकारलेली नाहीत. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 व 6 चे कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांची त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदाराने खरेदी केलेल्या वस्तुवर जाहीर केलेले बक्षीस अर्जदार यांना देण्यात आलेले होते. बक्षीसाचे वस्तुबद्दल वाद असल्यास ग्राहकांनी समक्ष गितांजली जेम्स यांचेशी संपर्क साधून वारंटी कार्डाप्रमाणे व अटी शर्तीप्रमाणे वाद सोडवून घ्यावा अशी मुख्य अट होती. परंतु अर्जदार यांनी सामनेवाला यांचे कर्मचा-याशी वाद
तक्रार क्र.232/2011
घालून बक्षीसाची वस्तु सामनेवाला यांना परत दिलेली आहे व त्याच दिवशी पुन्हा सामनेवाला यांचे कर्मचा-याशी भांडून करुन सदर बक्षीसाची वस्तु अर्जदार हे परत घेवून गेलेले आहेत. सामनेवाला यांचे कर्मचारी यांनी अर्जदार यांना बक्षीसाची वस्तु परत मिळाल्याबाबत सही करण्यास सांगितले असता अर्जदार हे अर्वाच्य शिवीगाळ करुन दमदाटी करुन सही करण्यास नकार देवून बक्षीसाची वस्तु घेवून निघून गेलेले आहेत. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही अर्ज नामंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
अर्जदार यांनी पान क्र.7 लगत सामनेवाला यांची बक्षीस योजना सादर केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनीही पान क्र.19 लगत बक्षीस योजना सादर केलेली आहे. या योजनेनुसार रु.50,001/- ते रु..1,00,000/- इतक्या खरेदीवरती रक्कम रु.20,000/- इतक्या किंमतीचे गोल्ड चेन व सहा खडयांचे डायमंड पेंडन्ट बक्षीस म्हणून मिळणार आहे असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानुसार अर्जदार व सामनेवाला यांचे कथनाप्रमाणे अर्जदार यांना दि.31/10/2009 रोजी गितांजली ज्वेलर्सच्या बॉक्समधील बक्षीस मिळाले होते परंतु त्याची किंमत लेबलप्रमाणे रु.20,000/- असली तरी गितांजली ज्वेलर्स यांचे सांगण्यानुसार रु.1400/- इतकीच होती त्यामुळे हे बक्षीस अर्जदार यांनी सामनेवाला यांना दि.31/10/2009 रोजीच परत केलेले आहे व तशी लेखी पोहोच सामनेवाला यांनी पान क्र.5 चे इन्वहाईस वर “gift return” असे लिहून दि.31/10/2009 रोजीच दिलेली आहे ही बाब पान क्र.5 चे इन्व्हाईस वरुन स्पष्ट झालेली आहे.
सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यातील कथनानुसार त्यांनी अर्जदार यांना बक्षीसाची वस्तु परत दिलेली आहे परंतु अर्जदार यांनी सामनेवाला यांचे कर्मचा-यांना अर्वाच्य शिवीगाळ करुन सही करण्यास दमदाटी करुन नकार दिलेला आहे.
जरी सामनेवाला यांचे वरीलप्रमाणे म्हणणे असले तरी सुध्दा ज्याप्रमाणे पान क्र.5 वरती “gift return” असा मजकूर सामनेवाला यांनी लिहून दिलेला आहे त्याच प्रमाणे बक्षीसाची वस्तु अर्जदार यांना पुन्हा बदलून देतांना सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडून योग्य त्या इन्व्हाईसवरती बक्षीस परत मिळाले असे लिहून घेतल्यानंतरच बक्षीसाची वस्तु परत देणे गरजेचे होते. सामनेवाला यांचे कथनानुसार जरी अर्जदार यांनी दमदाटी किंवा शिवीगाळ केलेली असली तरी सुध्दा बक्षीसाची वस्तु मिळाल्याबाबत लेखी लिहून घेतल्याशिवाय बक्षीसाची
तक्रार क्र.232/2011
वस्तु सामनेवाला यांनी अर्जदार यांना परत करण्याचे कोणतेही कारण नव्हते व नाही. अर्जदार यांचे दमदाटी व शिवागाळबाबत सामनेवाला यांनी पोलिसांचेकडे तक्रार केल्याबाबत कोणताही पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. पान क्र.5 चे इन्व्हाईस व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांचा विचार होता बक्षीसाची वस्तु अर्जदार यांचेकडून सामनेवाला यांना परत मिळाल्यानंतर पुन्हा नवीन बक्षीसाची वस्तु सामनेवाला यांनी अर्जदार यांना परत केलेलीच नाही ही बाब स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.5 चे इन्व्हाईस व पान क्र.7 व पान क्र.19 ची बक्षीस योजना याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून बक्षीसाची वस्तु म्हणजे रक्कम रु.20,000/- किंमतीचे सोन्याची चेन व त्यासोबत सहा डायमण्डचे खडे असलेले पेंडन्ट अशी वस्तु किंवा त्याची किंमत रु.20,000/- वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून वादातील बक्षीसाची वस्तु किंवा त्यांची किंमत मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.3500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद आणि वरील विवेचन सर्व यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
तक्रार क्र.232/2011
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना रक्कम रु.20,000/- इतक्या किंमतीची सोन्याची चेन व सहा डायमण्डचे खडे असलेले पेंडन्ट द्यावे.
3) वर कलम 2 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे बक्षीसाची वस्तु परत देणे शक्य नसल्यास आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना रक्कम रु.20,000/- द्यावेत.
4) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रु.3500/- द्यावेत.
5) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना अर्जाचा खर्च रु.1000/- द्यावेत.
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.