सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 13 जुलै, 2015))
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिने वि.प.कडे मॉडेल क्र. आयएफबी सेरेना एसएक्स एक्यू 5.5 की.ग्रा., किंमत रु.21,466/- ही खरेदी करण्यासाठी रु.7010/- रोख स्वरुपात देऊन बुक केली व उर्वरित रक्कम रु.13,608/- कर्जाद्वारे देण्यात आले. सदर मशिन खरेदी करतांना रु.1049.90 डिस्कऊंट देण्यात आल्याने रु.20,616.10 मध्ये सदर मशिनची किंमत तक्रारकर्तीला पडली. वि.प.ने तक्रारकर्तीला सदर मशिनची डिलीवरी दोन दिवसात मिळेल असे आश्वासन दिले. परंतू प्रत्यक्षात दोन दिवसात मशिनची डिलीवरी करण्यात आली नाही, त्यामुळे विचारणा केली असता, सदर मॉडेल उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले व पुढे तक्रारकर्तीस वाशिंग मशिन दिली नाही, म्हणून तक्रारकर्तीने वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस नोटीस वि.प.ला पाठविला. परंतू त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. तक्रारकर्तीला शेवटी दुसरे वाशिंग मशिन 20.01.2012 मे. वेडम्स गोकुलपेठ येथून रु.21,200/- मध्ये विकत घ्यावे लागले. अशाप्रकारे तक्रारकर्तीला रु.41,816.10 खर्च करावे लागले. अशाप्रकारे तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. वि.प.च्या या सेवेतील त्रुटीकरीता व अवलंबिलेल्या अनुचित व्यापाराकरीता सदर तक्रार दाखल करावी लागली. आपल्या तक्रारीचे पुष्ट्यर्थ तक्रारकर्तीने एकूण 6 दस्तऐवज दस्तऐवजांच्या यादीप्रमाणे दाखल केलेले आहेत.
2. तक्रारीची नोटीस वि.प.ला पाठविण्यात आली असता वि.प.ने तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचात हजरही झाले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.11.09.2012 रोजी पारित केला.
3. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तऐवज, युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढीलप्रमाणे प्रश्न उपस्थित होतात.
‘तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ?’
4. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीने दि.25.12.2011 रोजी रु.20,616.10 जमा केले आणि त्याबाबतचे बिल दाखल केले आहे. तसेच वि.प.ने मशिन तक्रारकर्तीचे घरी पोचती न केल्यामुळे तक्रारकर्तीने वकिलांमार्फत नोटीस दिला. नोटीसची प्रत मिळूनही लेखी उत्तर दाखल केले नाही. तसेच मंचाच्या नोटीसला लेखी उत्तर दिले नाही अथवा मंचासमोर उपस्थित झाले नाही व तक्रारकर्तीची तक्रार दस्तऐवजासह खोडून काढली नाही. त्यामुळे वि.प.ला तक्रारकर्तीची तक्रार मान्य आहे असे मंचाचे मत आहे.
5. वि.प.ने तक्रारकर्तीस वाशिंग मशिन पैसे घेऊनही न देणे ही वि.प.ची कृती त्याच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दर्शविते, त्यामुळे तक्रारकर्तीस निश्चितच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच दुसरे नविन वाशिंग मशिन विकत घ्यावे लागले, त्यामुळे तक्रारकर्तीला आर्थिक त्रासही सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र असून, मानसिक व शारिरीक त्रासाची नुकसान भरपाई मिळण्याकरीता तक्रारकर्ती पात्र आहे, म्हणून खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत असून, वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.20,616.10 ही रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने दि.25.12.2011 पासून तर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीकरीता द्यावी.
2) वि.प.ने तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- द्यावे.
3) सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.