निकालपत्र :- (दि.02/11/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार यांनी आपल्या राधेय ऑटो सेंटर या व्यवसायातील ग्राहकांच्या सोयीसाठी दि.25/08/2006 रोजी मे.नष्टे कम्युनिककेशन कोल्हापूर यांच्याकडून सामनेवाला कंपनीचे कॉईन बॉक्स रु.500/- डिपॉझीट भरुन विकत घेतले. सदर काईनबॉक्सचा नंबर 0231-3208893 असा आहे. सामनेवाला कंपनीच्या नियमानुसार कॉईन बॉक्सवर येणारे व जाणारे कॉल कायम चालू राहण्यासाठी आमचेकडेच मिळणारे रिचार्ज कार्ड घेऊन कॉईन बारॅक्स कनेक्शन रिचार्ज करावा लागणार. तसेच प्रत्येक रिचार्ज कार्डला कॉल करणेसाठी अंतिम दिवसाची मुदत असते. अंतिम दिवसाच्या मुदतीपूर्वी नविन रिचार्ज करावा लागतो. अंतिम दिवसापूर्वी नविन रिचार्ज न केलेस रिचार्जवर बॅलन्स शिल्लक असून सुध्दा कॉल करता येणार नाहीत तसेच काही दिवसांनी येणारे कॉल सुध्दा बंद होवून रिचार्ज वर काही बॅलन्स रक्कम शिल्लक असेल तर ती बुडीत होते व कॉईन बॉक्स पूर्ण बंद पडतो. या माहितीप्रमाणे कॉईन बॉक्स वापरण्यास सुरुवात केली. त्यावेळी नष्टे यांचेकडे वेगवेगळया मुल्याची व मुदतीची रिचार्ज सहज लागेल त्यावेळी मिळत होती. काही दिवसांनी श्री नष्टे यांचे दुकान बंद झाले. त्यामुळे रिचार्ज करुन घेण्यासाठी तक्रारदाराला फार यातायात व त्रास सहन करावा लागला. सामनेवालांकडे चौकशी केल्यावर त्यांनी नष्टे कम्युनिकेशन ऐवजी मे.किर्ती कम्युनिकेशन्स यांच्याकडून रिचार्ज करुन घ्या असे तक्रारदारास सांगितले. सुरुवातीला ते किर्ती कम्युनिकेशन यांनी तक्रारदाराचे कनेक्शन त्यांच्या हद्दीत येत नसल्यामुळे रिचार्ज करुन देण्यास नकारच दिला. पण अखेर सामनेवालांच्या सांगण्यावरुन रिचार्ज देण्यास सुरुवात केली. परंतु तिथेही रिचार्ज मिळण्यास फार त्रास सहन करावा लागला. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने आपले कनेक्शन बंद करा व डिपॉझीटची रक्कम रु.500/-परत करावा अशी मागणी घेऊन सामनेवालांकडे गेले. सामनेवाला कंपनीने कॉईन बॉक्स मे.किर्ती असोसिएशन यांच्याकडे जमा करुन 60 दिवसांनी तक्रारदाराच्या पत्त्यावर चेकने पैसे येतील असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.2/0/2008 रोजी मे.किर्ती यांचेकडे आपले कॉर्इन बॉक्स जमा केले.परंतु त्यानंतर 5-6 महिने उलटले तरीही सामनेवाला यांचेकडून कुठलाही चेक आला नाही. म्हणून तक्रारदाराने समक्ष जाऊन तसेच फोन करुनही सामनेवालांकडे चौकशी केली. परंतु सामनेवालांकडून त्यांना अपमानकारक वागणूक व उध्दट उत्तरे मिळत होती. तक्रारदाराने अखेर दि.10/03/2010 रोजी सामनेवाला यांचेकडे लेखी मागणी केली. परंतु त्याचीही दखल सामनेवाला यांनी घेतली नाही. अखेर तक्रारदाराने यासंबंधी दाद मागण्यासाठी व आपली पुढील मागणी मान्य करुन घेण्यासाठी प्रस्तुत मंचाकडे तक्रार दाखल केली व व्यवसायाच्या आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/-, अपमानास्पद वागणूक, उडवाउडवीचे उत्तरे, तक्रारदाराचे विनंतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रक्कम रु.10,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/-, नोटीस खर्चापोटी रक्कम रु.500/-, झेरॉक्स टायपिंग, फाईल पोटी रक्कम रु.250/-,कोर्ट खर्च व कोर्टामध्ये गेलेला वेळापोटी रक्कम रु.2,000/- असे एकूण रक्कम रु.47,750/-द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत कॉईन बॉक्स कनेक्शन घेणेसाठी डिपॉझीट रक्कम भरलेली पावती, कनेक्शन जमा केलेली रिसीट, डिपॉझीट परत मिळणेसाठी केलेला लेखी अर्ज, डिपॉझीट पत्राची दखल घेणेबाबतचा अर्ज, नुकसानभरपाई व डिपॉझीट व्याजासह मिळणेबाबत नोटीस वजा इशारा पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (03) तक्रारदाराची तक्रार दाखल झाल्यानंतर प्रस्तुत मंचातर्फे सामनेवाला यांना नोटीस पाठवण्यात आली. सदर नोटीसीची बजावणी झाल्याची पोचही प्रस्तुत कामात दाखल केली आहे. परंतु सामनेवाला कामात हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. (04) तक्रारदार यांनी सामनेवालांकडून कॉईनबॉक्स कनेक्शन घेतल्याचे त्यांनी दाखल केलेल्या पावतीवरुन स्पष्ट होत आहे. वरील कनेक्शन चालू ठेवण्यासाठी लागणारा रिचार्ज मिळण्यासाठी तयांना अतिशय त्रास व अडचणी येऊ लागल्या. म्हणून अखेर त्यांनी सदर कनेक्शन बंद करण्याविषयी सामनेवाला यांना कळवले व सामनेवालाच्या सांगण्यावरुन सदर कॉईनबॉक्स मे.किर्ती कम्युनिकेशन्स यांच्याकडे जमा केले. हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. असे असताना सामनेवाला कंपनीने तक्रारदाराकडून घेतलेले डिपॉझीटची रक्कम रु.500/- वेळेत परत करणे आवश्यक होते. सामनेवाला ही एक मोठी कंपनी आह. त्यांनी तक्रारदाराचे कॉर्इनबॉक्स कनेक्शन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्यांना साहय तर केलेच नाही. परंतु त्यांनी कनेक्शन बंद केल्यावर त्यांचे अनामत ठेवलेले रु.500/- फक्त ही सुमारे दोन वर्षे झाली तरी त्यांना परत केले नाही ही मोठया कंपनीने केलेली छोटया सर्वसामान्य ग्राहकाची अडवणूक व अक्षम्य सेवात्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने व्यावसायिक नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.20,000/- ची मागणी केली आहे. परंतु त्याबद्दल कुठलाही पुरावा दिला नसल्याने आम्ही ती ग्राहय धरु शकत नाही. सामनेवालाच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदाराचे झालेले नुकसान लक्षात घेऊन हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास त्यांचे डिपॉझीट घेतलेले रक्कम रु.500/- दि.27/08/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह दयावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.1,000/-(रु.सक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबद्दल रक्कम रु.500/-(रु.पाचशे फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |