श्री.नरेश बनसोड, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 18/10/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी जाहिरातीद्वारे सर्वश्रेष्ठ प्रदाता कंपनी असल्याचे गैरअर्जदाराकडून जाहिरात दिल्याने, “F.W.700” या त्यांच्या प्लॅन अंतर्गत रीलेशपशिप क्र. 2267164067 घेतला असून त्यांचा फोन क्र. 0712-3246972 होता. तक्रारकर्त्याचा फोनचा वापर बघून त्यांनी सदर प्लॅन घेण्यास उद्युक्त केले. तसेच रीलायंस नेटवर्कवर जाणारे कॉल्स हे मोफत राहतील व इतर नेटवर्कवरील कॉलकरीता रु.300/- चे कॉल दर महिन्याला मोफत मिळतील अशी सुट देण्यात येईल असे सांगितले. गैरअर्जदाराच्या प्रतिनिधींनी तक्रारकर्त्यांच्या अनेक न भरलेल्या फॉर्मवर व विविध कागदांवर ब-याच ठिकाणी स्वाक्ष-या घेतल्या. दि.05.01.2010 ते 04.02.2010 च्या देयकाबाबत तक्रारकर्त्याला कोणताच आक्षेप नाही. तसेच 05.02.2010 ते 04.03.2010 च्या देयकाचा भरणा तक्रारकर्त्याने केला. परंतू 05.03.2010 नंतरचे मासिक देयकात मात्र मोफत कॉल देण्यात आला नव्हता. याबाबत कॉल सेंटरला फोन करुन विचारणा केली असता त्यांनी सदर प्लॅन बदलवून “WPUNLTD775” हा प्लॅन देण्यात आल्याचे सांगितले. तक्रारकर्त्यांनी त्याला न विचारता कसे काय बदल केल्याचे विचारले असता त्यांनी त्याबाबत काहीही उत्तर दिले नाही व देयकाचा भरणा करण्यास सांगितले. फ्रेंचायजीनेसुध्दा याबाबत काहीही माहिती दिली नाही. या देयकानंतरचे 05.04.2010 ते 04.05.2010 च्या देयकातही नविन प्लॅननुसार आकारणी करण्यात आली होती व पूर्वीची रक्कम जोडण्यात आली होती. परत तक्रारकर्त्यांनी कॉल सेंटर व फ्रेंचायजी यांना विचारणा केली असता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याच्या लेखी विनंतीवरुन प्लॅन बदलविल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याचे मते त्याने कधीही लेखी किंवा तोंडी प्लॅन बदलविण्याकरीता गैरअर्जदारांना सांगितले नव्हते.
गैरअर्जदाराचे दोन प्रतिनीधींनी तक्रारकर्त्याचे प्लॅन चुकीने बदलविण्यात आल्याचे मान्य करुन शेवटी वास्तविक वापराची रक्कम भरण्यास सांगितले व रक्कम भरण्यास उशिर झाल्याची रक्कम न भरण्यास सांगून, नंतर फोन सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. म्हणून तक्रारकर्त्याने रु.2350/- चा धनादेश दि.06.07.2010 रोजी सदर बिलाबाबत दिला. परंतू पुढील देयकात परत गैरअर्जदाराने उशिरा देयक भरल्याचे शुल्क व फोनचे भाडे आणि प्लॅन बदलविण्यात आल्याचे नमूद केले होते. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदार सारख्या ख्यातनाम कंपनीला हे कृत्य न शोभणारे आहे. तक्रारकर्ते हे एक धान्याचे ठोक व्यापारी असल्याने, त्यांचा कारभार हा फोनद्वारे होत असतो, त्यामुळे फोनसेवा बंद करण्यात आल्याने इतर लोकांसमोर त्यांचे इभ्रतीला धक्का पोहोचला. तसेच तक्रारकर्त्यांनी एक नोटीस पाठवून सदर चूक दुरुस्त करण्यास सांगितले. परंतू त्यांनी दि.09.10.2011 रोजी रु.543.36 चा धनादेश पाठवुन त्यांची फोनसेवा बंद करण्यात येत असल्याचे सांगितले व फोन सेवा बंद केली. अशा त-हेने गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याची फसवणूक करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन “F.W.700” प्लॅन सुरु करावा, उशिरा रक्कम दिल्याचे शुल्क वजा करुन योग्य सुधारित देयक पाठवावे, फोन सेवा पूर्ववत करण्यात यावी, मानसिक, आर्थिक त्रासाकरीता भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त होऊनही त्यांनी मंचासमोर येऊन लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेवर एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश 22.07.2011 रोजी पारित केला.
3. सदर प्रकरणी तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद त्यांचे वकिलांमार्फत ऐकला. तसेच तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. तक्रारीचे परिच्छेद क्र. 11 मध्ये खालीलप्रमाणे नमूद आहे.
‘आजच्या काळात फोन ही व्यापाराची गरज आहे. तक्रारकर्ता उत्कृष्ट दर्जाचे धान्याचे ठोक व्यापार प्रामुख्याने करतो व त्याचे जास्तीत जास्त कारभार फोनद्वारे होतात. तक्रारकर्त्याशी फोनद्वारे संपर्क करणारे विक्रेते, ग्राहक, मित्र व नातेवाईकांना वि.प.द्वारे कळविण्यात आले की, तक्रारकर्त्याची फोन सेवा बंद करण्यात आली आहे............ ..............ह्या व्यतिरिक्त तक्राकर्त्याशी त्याचे ग्राहक संपर्क साधू शकले नाही व तक्रारकर्त्याचा व्यापारात मोठे नुकसान झाले. हे सर्व ते लोक आहे, ज्यांना तक्रारकर्त्याचा फक्त वि.पक्षाद्वारे देण्यात येणारा फोन नंबर माहीत होता व त्याचे तक्रारकर्त्याबरोबर व्यापारीक संबंध होते. हयाप्रकारे तक्रारकर्त्याचे व्यापाराचे व मान (Goodwill) चे मोठ नुकसान झाले.’
या परिच्छेदावरुन हे स्पष्ट होते की, सदर फोनचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी तक्रारकर्ता करीत होता. म्हणून ग्रा.सं.का.चे कलम 2 (i)(d)(ii) नुसार व्यापारीक कारणासाठी गैरअर्जदाराच्या फोनचा वापर हा ‘वाणिज्यिक उपयोग’ मध्ये अंतर्भूत असल्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक ठरत नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.