मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/09/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याने त्याचा ट्रक क्र. MP 22 H 1191 या वाहनाच्या विम्यापोटी रु.20,413/- प्रीमीयम गैरअर्जदार क्र. 2 यांना अदा करुन विमा पॉलिसी क्र.23087923341719 अन्वये दि.08.07.2009 ते 07.07.2010 या कालावधीकरीता विमा काढला होता. गैरअर्जदाराने विमा पॉलिसी निर्गमित केली, परंतू त्यासोबत अटी व शर्ती दिल्या नाहीत.
सदर वाहन हे 13-14.07.2010 चे मध्यरात्री, गोयल स्टील ट्रेडर्स, वैष्णोदेवी चौकसमोर, हिवरी नगर, नागपूर येथे उभे असतांना चोरीस गेले. सदर घटनेची सुचना पोलिस स्टेशनला दिली असता, त्यांनी एफ.आय.आर.नोंदविला नाही व वाहनाचा शोध घेण्यास सुचविले. 7-8 दिवस शोध घेऊनही वाहन सापडून न आल्याने पोलिसांनी भा.दं.वि.चे कलम 379 अन्वये एफ.आय.आर. दाखल करुन गुन्हा नोंदविला. तक्रारकर्त्याने सदर घटनेची माहिती तात्काळ गैरअर्जदारांना यांना दिली व दि.10.12.2009 रोजी गैरअर्जदाराने दावा प्रपत्र दिले. तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तऐवजासह विमा दावा गैरअर्जदारांकडे दाखल केला. यानंतर विमा दाव्या संदर्भात तक्रारकर्त्याने वारंार विचारण करुनदेखील गैरअर्जदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दि.27.05.2010 रोजी दूरध्वनीद्वारे गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या काही बाबींची पूर्तता करण्यास बोलाविले. दि.28.05.2010 रोजी तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 2 यांना भेटावयास गेला असता तेथे गैरअर्जदारांचे काही अधिकारी उपस्थित होते. त्यांनी तक्रारकर्त्यास रु.6,25,000/- इतकी रक्कम मंजूर झाली असून, नोटरी केलेल्या स्टँप पेपरवर तक्रारकर्त्याची मंजूर हवी असल्याचे सांगितले. तेव्हा तक्रारकर्त्याने वाहनाची आय डी व्ही (विमा घोषित मुल्य) रु.8,00,000/- असतांना इतकी कमी रक्कम कशी मंजूर केली, यासंदर्भात विचारणा केली व सदर रक्कम उजर ठेवीत स्विकारीत असल्याचे सांगितले असता, गैरअर्जदार यांनी सदरचा उजर ठेवत असल्यास तक्रारकर्ते न्यायालयापुढे दाद मागू शकतो असे सांगितले. दाव्याची रक्कम मोठी असल्याने व तक्रारकर्ता आर्थिक अडचणीत असल्याने होकार पत्र जबरदस्तीने स्विकारण्यास भाग पाडले. वास्तविक वाहनाची चोरी झाल्यामुळे वाहनाची संपूर्ण आय डी व्ही (विमा घोषित मुल्य) देण्यास गैरअर्जदार बाध्य होते. गैरअर्जदार यांनी धाकटदपशा दाखवून गैरप्रमाणित दावा स्विकारण्यास तक्रारकर्त्यास भाग पाडले, ही गैरअर्जदारांची कृती सेवेतील कमतरता दर्शविते, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन आय डी व्ही (विमा घोषित मुल्य) ची उर्वरित रक्कम रु.1,75,000/- ही वाहन चोरी झाल्याचे दिनांकपासून 12 टक्के व्याजासह मिळावी, गैरअर्जदाराने जबरदस्तीने होकारपत्र लिहून घेतल्याने झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रु.50,000/- भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाल्यावर त्यांनी लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्ता हा ग्राहक संज्ञेत मोडत नसल्यामुळे सदर तक्रार चालविणे मंचाचे अधीकार क्षेत्रात नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याने सदर विमा पॉलिसीची बाब मान्य केली असून इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदाराचे कथनानुसार तक्रारकर्त्याने विमा दावा संदर्भात दस्तऐवजांची पूर्तता दि.28.05.2010 रोजी केल्यानंतर त्याचा दावा योग्य ती छाननी व पडताळणी करुन दि.29.06.2010 रोजी निकाली काढला व विमापत्रा अंतर्गत पात्र झालेली रक्कम रु.6,25,000/- पूर्ण व अंतिम म्हणून तक्रारकर्त्याला अदा करण्यात आली व तक्रारकर्त्याने सदर रक्कम कुठलाही आक्षेप व उजर न करता स्विकारली. मा. सर्वोच्च न्यायालय, तसेच मा. राष्ट्रीय आयोगा यांनी दिलेल्या निवाडयांचा विचार करता अशा परिस्थितीत सदर तक्रार ग्राह्य नाही व विचाराअंती असल्यामुळे खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे.
3. सदर तक्रारीमध्ये दोन्ही पक्षांचा युक्तीवाद त्यांचे वकिलांमार्फत ऐकण्यात आला. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. दोन्ही बाजूचे म्हणणे, दाखल पुरावे पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्याचे आपल्या मालकीचा ट्रक क्र. MP 22 H 1191 याचा विमा गैरअर्जदार क्र. 2 यांचेमार्फत काढलेला होता. पॉलिसीचा वैध कालावधीमध्ये सदर वाहनाची चोरी झाली होती. म्हणून तक्रारकर्त्याने आवश्यक त्या दस्तऐवजासह गैरअर्जदार क्र. 2 कडे विमा रकमेकरीता दावा सादर केलेला होता. गैरअर्जदार क्र. 2 कडे पृष्ठ क्र. 30 व 31 वरुन असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार यांनी वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे शेवटचे दस्तऐवज (Final Report Form) दि.17.03.2010 रोजी तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडे सादर केले होते. पृष्ठ क्र. 34 व 35 वरुन, तसेच गैरअर्जदारांनी नमूद केल्याप्रमाणे सदर दाव्याचा पूर्ण आणि अंतिम निकालापोटी रु.6,25,000/- तक्रारकर्त्यास अदा केले व दि.29.06.2010 रोजी तक्रारकर्त्याचा दावा निकाली काढला. तक्रारकर्त्याचे मते त्याच्या वाहनाची आय डी व्ही (विमा घोषित मुल्य) रु.8,00,000/- होती, त्यामुळे सदर रकमेइतकी रक्कम घेण्यास तक्रारकर्ता तयार नव्हता. तक्रारकर्ता हा आर्थिक अडचणीत होता व गैरअर्जदार यांनी जबरदस्तीने तक्रारकर्त्यास संबंधित रकमे संदर्भात कुठलाही उजर नोंदवू न देता सदर मंजूरीपत्र नोटराईज्ड स्टँप पेपरवर देण्यास भाग पाडले.
5. परंतू या म्हणण्याचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने कुठलाही सुस्पष्ट पुरावा सादर केलेला नाही. वास्तविक द.28.052010 रोजी सदर सेटलमेंट झाल्यानंतर तक्रारकर्त्याने दि.03.09.2010 रोजी सदर तक्रार या मंचात दाखल करुन सदर सेटलमेंटबाबत आपला आक्षेप नोंदविला. म्हणजेच जवळपास 3 महिन्यानंतर सदर आक्षेप नोंदविलेला आहे. वास्तविक दावा सेटलमेंट झाल्यानंतर पूर्ण व अंतिम निकाल (Full & final settlement) व डिस्चार्ज व्हाऊचरवर सही केल्यानंतर दाव्याची रक्कम स्विकारल्यानंतर गैरअर्जदार यांनी उर्वरित रकमेसाठी दावा दाखल करण्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनीने सदर मान्यता बळजबरीने मिळविली हे सिध्द करण्यास तक्रारकर्ता अयशस्वी ठरलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
सदर बाबी लक्षात घेता, मंच खालील निर्णयाप्रत येते.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.