(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :10.06.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराने वैयक्तीक कामाकरीता हुन्डई कंपनीची चार चाकी गाडी आहे. अर्जदाराचे झालेल्या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले. गाडी दुरुस्तीकरीता गै.अ.क्र.1 ते 3 यांची संयुक्तीक जबाबदारी आहे. अर्जदाराच्या गाडीचा विमा असल्यामुळे गै.अ.चे अर्जदार ग्राहक आहे. 2. अर्जदाराने हुंन्डई कंपनीची गाडी क्र.एम.एच.34-के-7823 गाडीचा गै.अ.क्र.2 कडून दि.26.6.09 रोजी विमा काढला असून, विम्याचा कालावधी 25.6.10 पर्यंत मुदतीचा आहे. अर्जदाराचा दि.13.6.10 ला मु.पो.इटखेडा शिवार, तह. अर्जुनी मोरगांव, जिल्हा – गोंदिया या ठिकाणी अपघात झाला. अपघातासंबंधी गै.अ.क्र.2 व 3 यास या त्याचवेळी सांगण्यात आले. त्यामुळे, गै.अ.क्र.2 चे निरिक्षक यांनी गाडीची पाहणी केली. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 चे सांगण्यावरुन, गै.अ.क्र.3 यांचेकडे गाडी दि.25.6.10 रोजी दुरुस्तीकरीता दिली. त्यानुसार, गै.अ.क्र.3 यांनी गै.अ.क्र.2 यास व गै.अ.क्र.1 यांना सुध्दा गाडीची दुरुस्तीकरीता लागणारा अपेक्षीत खर्चाचे कोटेशन दिले. गै.अ.क्र.1 ते 3 यांनी वादातील गाडी आतापावेतो अर्जदारास दुरुस्त करुन परत केली नाही. उलट, गै.अ.क्र.3 यांनी वादातील गाडीचा निर्मीतीच्या वेळेचा गाडीचा कलर हा गाडी दुरुस्ती करतांना बदलविला आहे. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 ते 3 यांना दि.1.12.10 व 7.12.10 रोजी तिन्ही गै.अ.ना लेखी पञ पाठविले व गाडी दुरुस्ती करुन तातडीने देण्याची विनंती केली. गै.अ.क्र.2 यांनी गै.अ.क्र.3 यांचे नावे गाडीचे दुरुस्ती संबंधाने रक्कम अदा केल्याचे समजते, यानुसार सुध्दा गै.अ.क्र.3 यांनी गाडीची दुरुस्ती करुन न देणे, ही बाब गै.अ.च्या सेवेतील न्युनता असून अनुचीत व्यापार पध्दती आहे. त्यामुळे, अर्जदारास गाडी क्र.एम.एच.34 के-7823 ही गाडी दुरुस्ती करुन योग्य प्रकारे चाचणी घेवून व पूर्वीचा रंग बदलविल्यामुळे आर.टी.ओ.ची परवानगी घेवून अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे. गै.अ.क्र.1 ते 3 यांनी गाडी वेळेवर न मिळेल अशी कारवाई न केल्यामुळे दि.26.7.10 पासून रुपये 500/- रोज याप्रमाणे अर्जदारास गाडी मिळेपर्यंत नुकसान भरपाई म्हणून गै.अ.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तपणे व वेगवेगळे अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 5000/- गै.अ.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तपणे व वेगवेगळे अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे. 3. अर्जदाराने नि.5 नुसार 15 झेरॉक्स दस्ताऐवज व नि.6 नुसार अंतरीम अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.ना नोटीस काढण्यात आला. गै.अ.क्र.3 यांनी हजर होऊन नि.14 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.क्र.3 ने नि.19 नुसार तक्रार खारीज करण्यासाठी अर्ज दाखल केला. मंचाने नि.19 वर आदेश पारीत करुन अर्ज खारीज केला. गै.अ.क्र.3 ने नि.24 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.40 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 4. गै.अ.क्र.2 ने नि.40 नुसार लेखी उत्तर दाखल करुन नमूद केले की, गै.अ.कडे अजुनही विमा क्लेम सादर केला नसल्यामुळे अर्जदाराची ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराने काढलेला विमा याबाबत वाद नाही. अपघातग्रस्त गाडी दुरुस्तीला नेवून देण्याची जबाबदारी विमा कंपनीची कधीही नसते. तसेच, गाडी उचलण्याची जबाबदारी विमा कंपनीची नाही. हे म्हणणे खोटे असल्यामुळे अमान्य की, गै.अ.क्र.2 चे सांगण्यावरुन अर्जदाराने गाडी गै.अ.क्र.3 कडे दुरुस्तीला दिली. गाडी दुरुस्त करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी असून त्याला गै.अ.क्र.1 व 3 यांनी का वेळ लावला, कसा वेळा लावला, याच्याशी गै.अ.क्र.2 चा संबंध नाही. तसेच, गाडीचा कलर बदलला कि नाही याच्याशी सुध्दा गै.अ.चा संबंध नाही.
5. गाडी दुरुस्त झाली याची सुचना या गै.अ. विमा कंपनीला अर्जदाराकडून प्राप्त झाल्यावरच अर्जदार सक्षम सर्व्हेअरकडून दुरुस्त झालेल्या गाडीची पाहणी करतो. विशेष म्हणजे जो पर्यंत अर्जदार विमा क्लेम सादर करीत नाही. तो पावेतो अर्जदारास या गै.अ.ने सेवा देण्यास न्युनता केली असे म्हणता येणार नाही. 6. अर्जदाराच्या गाडीचा अपघात, तसेच गाडीचा बदललेला रंग यांच्याशी गै.अ.चा कोणताही संबंध नाही. तसेच, या गै.अ.ने कधीही अर्जदाराच्या गाडीचा रंग बदललेला नाही अथवा बदलविण्याची सुचना सुध्दा इतर गै.अ.ना दिली नाही. गाडी दुरुस्त झाल्यानंतर सुचना मिळाल्यावर विमा क्लेम निकाली काढण्याकरीता कोणताही विलंब या गै.अ.कडून झालेला नाही व म्हणूनच अर्जदाराची तक्रार पूर्णपणे मोघम आहे व गै.अ.ची सेवा कशी न्युनतापूर्ण आहे हे कथन अर्जदाराने केलेले नाही. अशापरिस्थितीत, अर्जदाराची मागणीनुसार गै.अ.विरुध्द आदेश पारीत होण्यास कोणतेच कारण नाही. अर्जदाराने विनाकारण गै.अ.विरुध्द खोट्या आशयाची केस दाखल केली म्हणून कलम 26 अन्वये गै.अ.स रुपये 20,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश अर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा, असे म्हटले आहे. 7. गै.अ.क्र.3 ने नि.14 नुसार लेखी उत्तर दाखल करुन नमूद केले की, अर्जदाराने, गै.अ. कडून दि.30.6.08 रोजी लाल रंगाची हयुंडाई सॅट्रो MH-34-K-7823 विकत घेतली. दि.13.6.10 रोजी सदर गाडीचा वडसा (अर्जुनी) येथे अपघात झाला व गाडीचे जबर नुकसान झाले. अर्जदाराने, गै.अ.क्र.3 ला अपघातग्रस्त गाडी स्थळावरुन नेण्याकरीता दुरध्वनी केला. गै.अ.ची टीप अपघातस्थळी पोहचली पण पोलीस पंचनामा, एफ.आय.आर. इत्यादी गोष्टी अपूर्ण असल्यामुळे गाडीचा ताबा गै.अ.च्या टिमला मिळाला नाही. अर्जदाराने, स्वतः साधारण आठ दिवसानंतर सदर अपघातग्रस्त गाडी वाहन गै.अ.क्र.3 च्या आवारात ट्रक मध्ये टाकून आणून ठेवले. परंतु, अर्जदारातर्फे ड्रायव्हींग लायसन्स इ.चे काम न झाल्यामुळे म्हणजेच पेपरवर्क पूर्ण न झाल्यामुळे इन्शोरन्स कंपनीकडून सर्व्हेअर नियुक्त होवू शकला नाही. दि.25.6.10 रोजी गै.अ.क्र.2 चे सर्व्हेअर श्री मनिष तिवारी यांनी गाडीची पाहणी केली. दि.13.7.10 रोजी गै.अ.क्र.2 ला गाडीचे पहिले एस्टिमेट रुपये 1,45,651/- देण्यात आले. मध्यंतरी गाडीची पाहणी करावयास अर्जदार गै.अ.कडे आला असता, त्याने गाडीचा रंग बदलण्याची आग्रही मागणी केली. अर्जदाराच्या हट्टापुढे गै.अ.क्र.3 ने गाडी सर्व्हेअरने होकार दिल्यावरच गाडीचा रंग बदलण्यात आला व त्याचे कुठलेही अनियमित चार्जेस आकारण्यात आले नाही. त्यानंतर, सर्व्हेअरने गाडीची पाहणी केली. रंग बदलविण्याकरीता लागणारी आर.टी.ओ.ची परवानगी अर्जदाराने स्वतः आणावयाचे कबूल केले होते. सर्व्हेअरच्या दुस-या पाहणीच्या वेळी त्याला रुपये 45,562/- चे एस्टीमेट देण्यात आले. अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्ती बद्दल कोणतीही वेळ मर्यादा देणे शक्य नसते. गाडीची दुरुस्ती पार्टस, गाडीचे मॉडेल उपलब्धी, इन्शोरेन्स प्रोसीजर, मेकॅनिकची उपलब्धता इत्यादीवर अवलंबून असते. अर्जदार, गै.अ.क्र.3 कडे दि.3.11.10 रोजी वाहनाचा ताबा घेण्यासाठी आला. तेंव्हा गै.अ.क्र.3 ने अर्जदाराने रुपये 1,64,653/- ची मागणी केली. तेंव्हा अर्जदाराने पैसे भरण्यास नकार दिला. कारण, गै.अ.क्र.2 कडून कुठलीही रककम गै.अ.क्र.3 ला प्राप्त झाली नव्हती व रक्कम कितीक असेल याची सुचना देखील मिळाली नव्हती. दि.9.12.10 रोजी गै.अ.क्र.3 ला गै.अ.क्र.2 कडून रुपये 1,10,800/- गाडीची दुरुस्ती पोटी प्राप्त झाले, त्यामुळे, अर्जदाराकडून रुपये 56,853/- येणे बाकी आहे. गै.अ.क्र.3 ने दि.11.12.10 रोजी अर्जदाराला पञ पाठवून रुपये 50,853/- ची मागणी केली व गाडी घेवून जाण्याची विनंती केली. सदर पञ अर्जदारास दि.13.12.10 रोजी मिळाले. अर्जदाराला गाडी वेळेवर न मिळण्यास अर्जदार स्वतः जबाबदार आहे. केवळ, गै.अ.क्र.3 चे पैसे चुकविण्याकरीता त्याने मंचाचा आधार घेतलेला आहे. अर्जदाराने, दि.30.10.10 पासून गाडीचा ताबा घेतलेला नाही. अर्जदाराने मंचाची दिशाभुल करण्याकरीता खोट्या माहितीच्या आधारे व दुर्हेतूने टाकलेली आहे. अर्जदाराची रुपये 500/- रोज नुकसान भरपाईची मागणी अवास्तव असून फेटाळण्या योग्य आहे. अर्जदारास काही मानसिक आणि शारीरीक ञास झालेला नाही. उलटपक्षी अर्जदार, गै.अ.ना मानसिक ञास देत आहे. 8. अर्जदाराने नि.34 नुसार शपथपञ व नि.45 सोबत अतिरिक्त शपथपञ दाखल केले. गै.अ.क्र.3 ने नि.42 नुसार लेखी उत्तर व दस्ताऐवज हेच युक्तीवादाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस व नि.43 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.46 नुसार लेखी उत्तरलाच शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. गै.अ.क्र.2 ने नि.49 नुसार लेखी उत्तरलाच युक्तीवाद गृहीत धरण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. अर्जदार व गै.अ.नी दाखल केले दस्ताऐवज, शपथपञ, उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर
1) गै.अ.क्र.2 व 3 यांनी सेवा देण्यात न्युनता केले आहे काय ?: होय. 2) तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे काय ? : होय. 3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे @@ कारण मिमांसा @@ मुद्दा क्र. 1 व 2 : 9. अर्जदाराने, गै.अ.क्र.3 कडून हुन्डांई कंपनीची चारचाकी गाडी घेतले होते व त्या गाडीचा विमा गै.अ.क्र.2 कडून काढण्यात आला. सदर गाडीचा अपघात 13.6.10 रोजी इटखेडा शिवार तह.अर्जुनी/मोरगांव, जि. गोंदिया येथे झाला. अपघातानंतर वाहन गै.अ.क्र.3 कडे दुरुस्तीकरीता दिले याबाबत वाद नाही. 10. अर्जदाराचे वाहन अपघातानंतर गै.अ.क्र.3 याने दुरुसत करुन दिले नाही आणि गै.अ.क्र.2 यांनी विम्याची रक्कम दिली नाही, त्यामुळे एम.एच.34 के 7823 ही गाडी दुरुस्त करुन, रंग बदल केल्यामुळे आर.टी.ओ. परवानगी मिळवून, अर्जदारास देण्यांत यावी आणि 27.7.10 पासून प्रतीरोज 500/- रुपये प्रमाणे गै.अ.क्र.1 ते 3 यांनी नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. गै.अ.क्र.2 यांनी आपले लेखी उत्तरात असे म्हणणे सादर केले की, अर्जदाराने या गै.अ.कडे अजुनही विमा क्लेम सादर केला नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार ही खारीज होण्यास पाञ आहे. या गै.अ.क्र.2 च्या कथनात काहीही तथ्य नाही, जेंव्हा की गै.अ.क्र.3 ने आपले लेखी उत्तरात गै.अ.क्र.2 कडून वाहन क्र.एम.एच.34 के 7823 चे अपघाती दुरुस्ती क्लेमची रक्कम रुपये 1,13,800/- दि.9.12.10 रोजी प्राप्त झाली. गै.अ.क्र.2 यास अर्जदाराकडून कोणताही क्लेम सादर न होता, गै.अ.क्र.3 ला गाडी दुरुस्तीच्या बिलाची रक्कम कशी काय अदा केली ? गै.अ.क्र.2 यांनी आपले लेखी उत्तरात गै.अ.क्र.3 ला रक्कम दिल्याबाबत काही कथन केलेले नाही. यावरुन गै.अ.क्र.2 ने महत्वाची बाब लपवून ठेवून, स्वच्छ हाताने मंचापुढे आला नाही, असाच निष्कर्ष निघतो. 11. गै.अ.क्र.2 ने लेखी उत्तरासोबत कोणतेही दस्ताऐवज दाखल केले नाही किंवा कुठल्याही सर्व्हेअरचा रिपोर्ट दाखल केलेला नाही. गै.अ.क्र.2 यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न आपले लेखी उत्तरात केलेला आहे. अर्जदाराने, विमा काढला होता ही बाब मान्य केली. गाडीचा कलर बदलविला की नाही याचेशी गै.अ.चा संबंध नाही व दुरुस्तीचे कामावर नियंञण नाही. गै.अ.क्र.2 यास गै.अ.क्र.3 कडून कुठले ईस्टीमेट मिळाले किंवा नाही याचाही उल्लेख आपले शपथपञातही केलेला नाही, जेंव्हा की, अर्जदाराने गै.अ.क्र.2 चे उत्तर दाखल झाल्यानंतर अतिरिक्त शपथपञ नि.45 अ नुसार दि.18.4.11 ला दाखल करुन गै.अ.क्र.2 चे म्हणणे खोटे असल्याचे नाकारले. गै.अ.क्र.2 यांनी किती रुपये कटोती करुन रुपये 1,13,800/- चा चेक गै.अ.क्र.3 ला दिला व इतर मुद्दे अर्जदाराने शपथपञात कथन करुन सुध्दा गै.अ.क्र.2 ने त्याबाबत आपले म्हणणे सादर केले नाही आणि जो लेखी उत्तर दाखल केला आहे, तोच शपथपञाचा भाग समजावा, अशी पुरसीस वकीलाचे सहीने नि.46 नुसार दाखल केली आहे. यावरुन, गै.अ.क्र.2 यांनी काही महत्वाच्या बाबी व सत्य परिस्थिती लपविली आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. 12. गै.अ.क्र.3 ने आपले लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, अर्जदाराने अपघातानंतर वाहन दुरुस्ती करीता त्यांच्या शोरुममध्ये आणले होते. अर्जदाराने वाहन दि.30.6.08 रोजी लाल रंगाची हुन्डाई सॅन्ट्रो खरेदी केले होते हे मान्य केले. गै.अ.क्र.2 चे सर्व्हेअर श्री मनिष तिवारी यांनी दि.25.6.10 रोजी सर्व्हे करुन गाडीची पाहणी केली. दि.13.7.10 रोजी गै.अ.क्र.2 ने पहिले इस्टीमेट रुपये 1,45,651/- चे देण्यात आले व गाडीचे काम सुरु करण्यांत आले. म्हणजेच, गै.अ.क्र.2 ला सुचना प्राप्त झाल्यानंतरच त्याचे सर्व्हेअरनी येवून गै.अ.क्र.3 कडे गाडीचा सर्व्हे केला, तसेच दि.29.10.10 रोजी गाडी पूर्णतः तयार होती,त्या रोजी गै.अ.क्र.2 चा सर्व्हेअर श्री मनिष तिवारी पुर्नरपरिक्षणाकरीता येवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले. गै.अ.क्र.2 चे सर्व्हेअर दुस-या पाहणीचे वेळी रुपये 45,562/- चे इस्टीमेट देण्यात आले. या गै.अ.क्र.3 च्या कथनावरुन गै.अ.क्र.2 चे सर्व्हेअरनी पाहणी केली परंतु ही बाब गै.अ.क्र.2 ने कुठेही उल्लेख केलेला नाही आणि उलट, रुपये 1,13,800/- गै.अ.क्र.3 ला दिले. यावरुन, गै.अ.क्र.2 व 3 एक दुस-या पासून महत्वाच्या बाबी लपवून ठेवून, आप-आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
13. गै.अ.क्र.3 ने, गै.अ.क्र.2 ला पहिल्यांदा इस्टीमेट दिला, तसेच दुस-यांदा सुध्दा इस्टीमेट दिलेला आहे. गै.अ.क्र.3 ने आपले लेखी उत्तरातील पॅरा 8 मध्ये गै.अ.क्र.2 कडून रुपये 1,10,800/- गाडी दुरुस्तीपोटी प्राप्त झाले. अर्जदाराकडून रुपये 1,64,653/- मधून रुपये 1,13,800/- वजा जाता रुपये 56,853/- घेणे येणे बाकी आहे. हीच बाब गै.अ.क्र.3 ने अर्जदारास दि.19.12.10 ला पञ पाठवून रुपये 50,853/- ची मागणी केली, तरी अर्जदाराने उर्वरीत पैशाचा भरणा गै.अ.क्र.3 कडे केला नाही व गाडीचा ताबा घेतला नाही. गै.अ.क्र.3 यांनी लेखी उत्तरासोबत अर्जदाराला दि. 19.12.10 ला पञ पाठविला, त्याची प्रत दाखल केलेली नाही, तसेच, अर्जदाराकडून नेमके रुपये 56,853/- घेणे आहे की, रुपये 50,853/- घेणे आहे हे स्पष्ट होत नाही. गै.अ.क्र.3 ने, अर्जदाराचे वाहन दुरुस्तीचा क्लेम सादर करुन वाहनाचे सर्व्हेक्षण गै.अ.क्र.2 कडून केल्याचे मान्य केले, परंतु अर्जदारास याबद्दल कुठलीही कल्पना दिली नाही आणि गै.अ.क्र.2 शी मिलीभगत करुन व्यवहार केला असाच निष्कर्ष निघतो. 14. गै.अ.क्र.3 ने आपले लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, रुपये 1,63,653/- गाडी दुरुस्तीचा खर्च आला असून गै.अ.क्र.2 कडून रुपये 1,13,800/- मिळाल्यानंतर उर्वरीत रक्कम घेणे आहे व त्याशिवाय वाहन देता येणार नाही. गै.अ.क्र.2 हा स्वच्छ हाताने आलेला नसून महत्वाची बाब लपविली आहे. गै.अ.क्र.3 ला रुपये 1,13,800/- मिळाले, त्याचा खाता उतारा गै.अ.क्र.3 यांनी दस्तऐवजाचे यादी नि.44 च्या स्टेटमेंट वरुन दिसूने येते. जेंव्हा की, गै.अ.क्र.2 ला रुपये 1,45,651/- आणि दुसरे इस्टीमेट रुपये 45,562/- हे देण्यात आले, त्यापैकी किती कटोती करुन कुठल्या गोष्टी मान्य केल्या त्याचा काहीही उल्लेख केला नाही. त्यामुळे वाहन विमा कालावधीत विमाकृत असल्यामुळे गै.अ.क्र.2 उर्वरीत रुपये 49,853/- (1,63,653/- – 1,13,800/- = 49,853/-) देण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गै.अ.क्र.3 यांनी गाडीचा रंग बदलविल्यामुळे आर.टी.ओ.कडून परवानगी घेवून वाहनाचा ताबा द्यावा. गै.अ.क्र.3 यांनी आपले लेखी उत्तरातील पॅरा 5 मध्ये असा उल्लेख केला आहे की, अर्जदाराने रंग बदलण्याचा हट्ट केला. सर्व्हेअरने होकार दिल्यानंतर गाडीचा रंग बदलविण्यात आला व त्याचे कोणतेही चार्जेस आकारण्यात आले नाही. रंग बदलण्याकरीता लागणारी आर.टी.ओ.ची परवानगी आणण्याचे, अर्जदाराने कबूल केले होते. गै.अ.क्र.3 च्या वरील कथनात विसंगती दिसून येतो. सर्व्हेअरनी होकार दिल्यानंतर कलर बदलविला ही बाब संयुक्तीक वाटत नाही. वास्तविक, गै.अ.क्र.3 हा अधिकृत सर्व्हीसिंग सेंटर असून वाहनाचा कलर बदलविण्याचे काय परिणाम होता हे त्यांना चांगले माहीत असतांनाही गाडीचा रंग बदलविला. गै.अ.क्र.3 ने लाल रंगाची हुंन्डाई सॅट्रो दि.30.6.08 ला त्यांचेकडून विकत घेतल्याची बाब मान्य केली, तरी गाडीचा रंग बेकायदेशिरपणे बदलविला. अर्जदाराने, अ-5 वर एम.एच. 34 के 7823 च्या नोंदणी प्रमाणपञाची प्रत (R.C.) दाखल केली आहे, त्यात आर.टी.ओ. ने रंगाच्या रकान्यात ब्लुस रेड (Blush Red) असे नमूद केले आहे. म्हणजेच, वाहन खरीदते वेळी गै.अ.क्र.3 ने दिलेल्या इनव्हाईस वरुन आर.सी. बुक मध्ये नोंद केले जात असल्याची बाब माहिती असतांनाही सुध्दा गै.अ.क्र.3 ने रंग बदलविला आणि सर्व्हेअरच्या होकारावरुन रंग बदलविला आणि त्याकरीता कोणतीही रक्कम आकारली नाही असे कथन केले, जेंव्हा की नि.24 च्या यादी वरील इस्टीमेट मध्ये फुल पेंटींग, लेबर चार्ज रुपये 30,000/- दाखविला आहे आणि टॅक्स इनव्हाईस दि.20.11.10 च्या मध्ये फुल पेंटींग रुपये 22000/- दाखविली आहे. म्हणजेच गै.अ.क्र.3 असत्य कथन करीत असून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करीत आहे, असेच दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. ही गै.अ.क्र.3 ची सेवेतील न्युनता आहे आणि त्यामुळेच आर.टी.ओ. कडे रंग बदल करण्याचा येणारा खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार आहे, गै.अ.क्र.3 ने कलर बदलाची कारवाई एक महिन्यात आर.टी.ओ. कडून करुन द्यावे आणि जर ते शक्य होत नसेल तर मुळ रंगात बदल करुन, वाहन अर्जदारास उर्वरीत रुपये 49,853/- घेऊन ताबा देण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 16. अर्जदाराच्या प्रतिनिधीने युक्तीवादात सांगीतले की, अर्जदारास कुठल्याही इस्टीमेटची प्रत देण्यात आली नाही, तसेच सर्व्हेअरचे निरिक्षणाचे वेळी बोलविण्यात आले नाही. गै.अ.क्र.2 ने अर्जदारास वाहन दुरुस्तीची रक्कम दिली नाही. जेंव्हा की, नियमाप्रमाणे देणे क्रमप्राप्त आहे, परंतु गै.अ.क्र.2 ने, गै.अ.क्र.3 ला दुरुस्तीच्या बिलाची रक्कम अदा केली व गै.अ.क्र.3 ने उर्वरीत रक्कम दिली नाही म्हणून वाहन आपल्याकडे ठेवले त्यामुळे अर्जदारास 1 वर्षापासून वाहनाच्या उपभोगापासून वंचीत राहावे लागले. गै.अ.क्र.2 व 3 च्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास गैरसोय झाली. त्यामुळे, गै.अ.क्र.2 व 3 नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. 17. गै.अ.क्र.3 यांनी वाहन दुरुस्ती करण्याकरीता अक्षम्य दिरांगाई केली. अर्जदाराने, वाहन त्याचे गॅरेजमध्ये दिल्यानंतर दि.25.6.10 ला गै.अ.क्र.2 च्या सर्व्हेअरनी सर्व्हे केला व 13.7.10 ला ईस्टीमेट दिल्यानंतर लगेच गाडीचे काम सुरु केले तरी गाडी दुरुस्तीला अक्षम्य दिरांगाई केले असेच दिसून येते. गै.अ.क्र.3 चे वकीलांनी युक्तीवादात सांगीतले की, एकच शोरुम आहे, गाडया जास्त असल्यामुळे दुरुस्तीला वेळ लागतो, गाडीचे अतोनात नुकसान झाले होते व गाडी 3 पलटी झाल्या होत्या. गै.अ.क्र.2 विमा कंपनीने दि.9.12.10 ला पैसे दिले. यावर, अर्जदाराने असे सांगीतले की, गै.अ.क्र.3 याने वास्तविक, 1 महिन्याचे कालावधीत म्हणजेच 26.7.10 ला दुरुस्त करुन द्यावयास पाहिजे. अर्जदार व गै.अ.यांनी वाहन दुरुस्ती करीता लागणा-या कालावधीचा मुद्दाकरीता निश्चित कालावधी नसला तरी सर्वसामान्यपणे (Common prudent) वाहन हे लवकरात-लवकर दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी गै.अ.क्र.3 ची होती व आहे. एकंदरीत, गै.अ.क्र.2 व 3 यांनी सेवा देण्यात न्युनता करुन अर्जदारास वाहनाच्या उपभोगापासून वंचीत ठेवले, असे उपलब्ध गै.अ.च्या कथनावरुन व उपलब्ध्श रेकॉर्डवरुन सिध्द होतो, यावरुन तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र.3 : 18. वरील मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचने वरुन, तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.2 ने, वाहन दुरुस्तीचा उर्वरीत खर्च रुपये 49,853/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.3 ने, आर.टी.ओ. कडून रंग बदलल्याची परवानगीस लागणारा खर्च करुन परवानगी मिळवून आर.सी.बुकात नोंद करवून वाहनाचा ताबा अर्जदारास आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. किंवा परवानगी मिळणे शक्य नसल्यास मुळ गाडीचे रंगात वाहनाचा ताबा आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे. (3) अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र.3 ला आर.टी.ओ. कडून रंग बदलण्याची परवानगी मिळण्याकरीता आवश्यक त्या सह्या करुन द्यावे. गै.अ.क्र.3 ने त्याबद्दल अर्जदारास कळवावे. (4) अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.3 ला उर्वरीत दुरुस्ती खर्चाचे बील रुपये 49,853/- वाहनाचा ताबा घेतेवेळी द्यावे. (5) गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने, अर्जदारास झालेल्या गैरसोय, नुकसान व मानसिक, शारीरीक ञास सर्व मिळून प्रत्येकी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये प्रत्येकी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (6) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |