सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.52/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि.30/06/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.31/08/2010
कु.हिना आजीम मुजावर,
वय 22, धंदा – शिक्षण,
रा.गुलमोहोर हाऊसिंग सोसायटी, माठेवाडा,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
रजिस्टार,
एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटी,
सर विठ्ठलदास विद्याविहार,
जुहू रोड, सांताक्रूझ (पश्चिम)
मुंबई – 400 049 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एम.आय. सय्यद.
विरुद्धपक्षातर्फे- कोणी नाही.
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.31/8/2010)
1) विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीकडे बी.ए. भाग 1 या वर्गात सन 2009-2010 या वर्षासाठी प्रवेश घेऊन देखील आपणांस अभ्यासक्रमाची पुस्तके न मिळाल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल व एक वर्ष वाया गेल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटी मार्फत सन 2008-2009 मध्ये घेण्यात आलेल्या U.E.T. Arts परीक्षेत सन 2009 मध्ये तक्रारदार ही प्रथम श्रेणीत पास झाली असून तिने या विद्यापिठाकडे सन 2009-2010 या वर्षासाठी बी.ए. भाग 1 या वर्गात प्रवेश घेतला. त्यासाठी तिने दि.07/10/2009 रोजी रक्कम रु.1510/- चा धनाकर्ष व इतर कागदपत्रे रजिस्टर्ड डाकेने विद्यापिठाकडे पाठविली व सदरची कागदपत्रे विद्यापिठाला दि.23/10/2009 रोजी पोच झाली; परंतु तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन देखील विद्यापिठाकडून बी.ए. भाग 1 च्या अभ्यासक्रमाची पुस्तके पाठविण्यात आली नाहीत. त्यामुळे तीने मार्च 2010 महिन्यात दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता, 2/3 दिवसांत पुस्तके मिळतील असे सांगण्यात आले; परंतू तिला पुस्तके अद्यापदेखील प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे अभ्यास करुन परीक्षा देणे तक्रारदारास शक्य झाले नाही व विद्यापिठाच्या निष्काळजीपणामुळे तिचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे आपणास शैक्षणिक वर्षाच्या नुकसानीपोटी रु.50,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.30,000/- व प्रकरण खर्चाबद्दल रु.5,000/- आपणांस मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने तक्रारीत केली आहे.
3) तक्रारदाराने तिचे तक्रारीसोबत नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार विद्यापिठास पाठविलेल्या धनाकर्षाची प्रत, विद्यापिठाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत, बी.ए. भाग 1 चा लेसन फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रत, धनाकर्ष व फॉर्म पोच झाल्याची पोच पावती, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीशीची पोचपावती, सन 2009 ची गुणपत्रिका इ. कागदपत्रे दाखल केली. सकृतदर्शनी तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार दाखल होण्यास पात्र असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेऊन दि.30/06/2010 ला विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाचे विरुध्द नोटीस पाठविण्याचे आदेश मंचाने पारीत केले. त्यानुसार विरुध्द पक्षाच्या रजिस्ट्रार एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटी यांना नोटीस बजावणी करण्यात आली. त्याची पोच पावती नि.5 वर आहे; परंतु दि.14/07/2010 ला नोटीस बजावणी होऊन देखील विरुध्द पक्षाच्या विद्यापिठातर्फे कुणीही मंचासमोर हजर झाले नाही, त्यामुळे मंचाने 30 दिवसाची मुदत संपल्यावर दि.18/8/2010 ला आदेश पारीत करुन विरुध्द पक्षाच्या लेखी म्हणण्याविना प्रकरण एकतर्फी चालवणेचे आदेश पारीत केले. त्यानुसार प्रकरण तक्रारदाराच्या पुराव्यासाठी ठेवण्यात आले.
4) तक्रारदाराने नि.8 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार तिच्या U.E.T. च्या प्रवेशाचे ओळखपत्र व पैसे भरल्याची पावती मुळ स्वरुपात प्रकरणात दाखल केली. तसेच नि.9 वर आपले शपथपत्र दाखल केले व नि.10 वर लेखी युक्तीवाद दि.25/8/2010 ला दाखल केला. तसेच दि.27/8/2010 ला तोंडी युक्तीवाद करुन नि.11 वरील यादीनुसार मा.राज्य आयोगाने पारीत केलेल्या निवाडयांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या व तक्रार मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हया विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीच्या ‘ग्राहक’ आहेत काय ? | होय |
2 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीने त्रुटी केल्याचे तक्रारदाराने सिध्द केले काय ? | नाही |
3 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | नाही |
-कारणमिमांसा-
5) मुद्दा क्रमांक 1–i) तक्रारदारानेएस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीमध्ये सन 2008-2009 मध्ये U.E.T. Arts ची परीक्षा देऊन ती परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाल्यावर सन 2009-2010 या वर्षासाठी बी.ए. भाग 1 वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि.7/10/2009 रोजी रक्कम रु.1510/- चा धनाकर्ष नोंदणी फॉर्मसह पाठविला असल्यामुळे तक्रारदार हया विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीच्या “ग्राहक” ठरतात. तक्रारदारास विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रमाची पुस्तके न पाठविल्यामुळे तक्रारदाराचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. त्यामुळे सेवेतील त्रुटीचे प्रकरण चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत.
ii) या संबंधाने मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी Controller of Exam , Himachal Pradesh University and Another V/s Sanjay Kumar I (2003) CPJ 273 (NC) या प्रकरणात निर्वाळा देतांना सदरचा मुद्दा स्पष्ट केला आहे. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
“Education – Deficiency in service – Non – supply of Roll number – Complainant could not appear in exams resulting loss of an year – Administrative aspects relating to education not excluded from definition of service”
त्याचप्रमाणे मा.राज्य आयोग, तामिळनाडू खंडपिठ चेन्नई यांनी K. Gnana Sambandan V/s Madurai Kamarajar University and others III (2006) CPJ 170 ) या प्रकरणात निर्वाळा देतांना खालील मुद्दा मांडला आहे.
“Educational Services – Mark sheet not given – Educational institutions imparting education for consideration falls within definition of service under Act.”
तसेच मा.राज्य आयोग, राजस्थान, खंडपिठ जयपूर यांनी Board of Secondary Education V/s Sunil Kumar Sharma IV (2004) CPJ 663 या प्रकरणात निर्वाळा देतांना खालीलप्रमाणे मुद्दा स्पष्ट केला आहे.
“Educational Services– Name of examination centre not intimated – Complainant could not appear in examination - Administrative aspects relating to education not excluded from definition of service”
त्याचप्रमाणे मा.राष्ट्रीय आयोगाने Deputy Registrar (Colleges) and Anr V/s Ruchika Jain and Ors III (2006) CPJ 343 (NC) या गाजलेल्या प्रकरणात खालील निर्वाळा दिला आहे.
“Rendering of Education - Giving of admissions to the students in a school/colleges /institutions /University by recovering fees and in such cases if there is any disputes with regard to the validity of such admission or illegality , irregularity committed by such institution in giving admissions, such dispute would be covered under the Consumer Protection Act, 1986. This is on the basis of contract between the parties, i.e. students and the institution, and is based on the consideration (fees) for rendering education. Such students on the basis of section 2 (1)(d) (ii) read with section 2(1)(o) would be hirer of service for consideration and hence would be consumer”
तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने Buddhist Mission Dental College and Hospital V/s Bhupesh Khurana and Others (1986- 2009 CONSUMER 14818 (NS) या गाजलेल्या प्रकरणात निर्वाळा देतांना मा.राष्ट्रीय आयोगाने पारीत केलेल्या निर्वाळयाला उचलून धरत खालील निर्वाळा दिलेला आहे.
“Imparting of education by an educational institution for consideration falls within the ambit of “service” as defined in the Consumer Protection Act. Fees are paid for services to be rendered by way of imparting education by the educational institutions. If there is no rendering of service, question of payment of fee would not arise. The complainants had hired the services of the respondent for consideration so they are consumers as defined in the Consumer Protection Act.
iii) उपनिर्देशित मा.राज्य आयोग, मा.राष्ट्रीय आयोग व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयानुसार तक्रारदार हे विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीचे ‘ग्राहक’ ठरतात व सेवेतील त्रुटींचे प्रकरण चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत हे स्पष्ट होते.
6) मुद्दा क्रमांक 2 – i) तक्रारदाराने बी.ए. भाग 1 या वर्गात प्रवेश घेण्यासाठी रु.1510/- च्या डिमांड ड्राफ्टसह रजिस्ट्रेशन फॉर्म भरुन विरुध्द पक्षाच्या एस.एन.डी.टी. वुमनस् युनिव्हर्सिटीकडे पाठविले व ही कागदपत्रे युनिव्हर्सिटीला दि.23/10/2009 ला प्राप्त झाले; परंतु आपणांस अभ्यासक्रमाची पुस्तके पुरविण्यात न आल्यामुळे आपले शैक्षणिक वर्ष वाया गेले व आपण परीक्षा देऊ शकलो नाही, त्यामुळे आपणांस नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदाराने तिच्या तक्रारीत केली आहे; परंतु तक्रारदाराने तिच्या तक्रारीसोबत सादर केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करता तिने दाखल केलेल्या ओळखपत्रावर (नि.3 वरील कागदपत्रे) युनिव्हर्सिटीचा स्टँप मारल्याचे दिसून येत नाही. तसेच बी.ए. भाग 1 च्या प्रवेशाच्या फी ची रसिद पावती तिने प्रकरणात सादर केली नाही. त्यामुळे तिने पाठविलेले रजिस्ट्रेशन फॉर्म युनिव्हर्सिटीने स्वीकारले किंवा नाही व त्यांनी तिला बी.ए. भाग 1 च्या वर्गात प्रवेश दिला किंवा नाही हे तक्रारदाराने सिध्द केले नाही. तक्रारदाराने तिच्या सन 2008-2009 या वर्षातील U.E.T. Arts चे ओळखपत्र (नि.8/1) व पैसे भरल्याची पावती(नि.8/2) दाखल केली आहे. ही पावती व ओळखपत्र बी.ए. भाग 1 ची नसून U.E.T. ची आहेत व या ओळखपत्रावर युनिव्हर्सिटीचा शिक्का आहे. त्यामुळे सन 2008-2009 या वर्षात ती युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी होती हे स्पष्ट होत असून तिने प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नि.3 वरील गुणपत्रकावरुन दिसून येते. मात्र बी.ए. भाग 1 या वर्गासाठी सन 2009-2010 या शैक्षणिक वर्षाचे ओळखपत्र व पैसे भरल्याची पावती तक्रारदाराने सादर न केल्यामुळे तक्रारदाराला बी.ए. भाग 1 या वर्गात प्रवेश मिळाला होता किंवा नाही हे स्पष्ट झाले नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराने तिचे तक्रारीत कुठेही तिला विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाने धनाकर्ष व फॉर्म पाठवूनदेखील बी.ए. भाग 1 ला प्रवेशच दिला नाही असे नमूद केले नाही किंवा तिची तशी तक्रार देखील नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाच्या विरुध्द विद्यार्थ्यास सेवा देणेस त्रुटी केल्याची जबाबदारी लादता येत नाही.
ii) तक्रारदाराने विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाकडे रु.1510/- धनाकर्ष पाठविला व त्यासोबत बी.ए.भाग 1 च्या Admission साठीचा फॉर्म भरुन पाठविल्याचे दिसून येते. मात्र तक्रारदारास विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाने बी.ए. भाग 1 साठीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके पुरवावीत हे स्पष्ट करणारा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारदाराने विद्यापिठाची कर्तव्ये व जबाबदारी काय आहे ? हे सिध्द करण्यासाठी त्यांचे विद्यापिठाचे बी.ए. भाग 1 चे माहितीपत्रक (Prospectus) प्रकरणात दाखल करावयास पाहिजे होते. ज्याद्वारे विद्यापिठाने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके पाठविण्याचे लेखी वचन दिले होते किंवा नाही हे स्पष्ट झाले असते. परंतु तसे माहितीपत्रक किंवा नियमावली किंवा शर्ती अटींचे पत्रक किंवा करारनामा तक्रारदाराने दाखल न केल्यामुळे, अभ्यासक्रमाची पुस्तके तक्रारदारास न पाठविल्यामुळे ती परीक्षा देऊ शकली नाही व त्यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान झाले व त्यासाठी विरुध्द पक्षाचे विद्यापिठ जबाबदार आहे असे गृहित धरता येत नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्मवर किंवा लेसन फॉर्मवर अभ्यासक्रमाची पुस्तके पाठविली जातील असे लेखी वचन विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाने दिल्याचे कुठेही दिसून येत नाही. एवढेच नव्हेतर तक्रारदाराने ऑक्टोबर 2009 मध्ये विरुध्द पक्षाकडे धनाकर्षासह नोंदणी अर्ज पाठविल्यानंतर तिला मार्च 2010 पर्यंत अभ्यासक्रमाची पुस्तके प्राप्त न झाल्याबद्दल कोणतेही लेखी अर्ज वजा पत्र विद्यापिठाकडे पाठविल्याचे दिसून येत नाही. मार्च 2010 मध्ये दूरध्वनीवर संपर्क साधला असे तक्रारदाराचे म्हणणे असून या संबंधाचा कुठलाही पुरावा तिने दिला नाही. ऑक्टोबर 2009 पासून ते मार्च 2010 पर्यंत तक्रारदाराने पाठयपुस्तके मिळण्यासाठी कोणतीच हालचाल केली नाही व दि.3 एप्रिल 2010 ला आपले वकीलामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली व मे 2010 मध्ये सदरची तक्रार दाखल केली मात्र सदर प्रकरणात तक्रारदाराने स्वतः निष्काळजीपणा दाखविल्याचे स्पष्ट होत असून सबळ कागदोपत्री पुराव्याअभावी विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाने “ग्राहक विद्यार्थ्यास” अर्थात तक्रारदारास सेवा देण्यास त्रुटी केली असे म्हणता येत नाही.
7) मुद्दा क्रमांक 3 -तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवादाचे दरम्यान विरुध्द पक्षाच्या विद्यापिठातर्फे कुणीही मंचासमोर हजर न झाल्यामुळे व त्यांचे लेखी म्हणण्याविना एकतर्फी प्रकरण चालविण्याचे आदेश मंचाने पारीत केले असल्यामुळे व आपली तक्रार विनाआव्हान राहिली असल्यामुळे तक्रार मंजूर करावी अशी विनंती केली; परंतु सदर प्रकरणातील विरुध्द पक्षकार ही एक स्वायत्त संस्था असून एक मान्यताप्राप्त विद्यापिठ आहे. त्यामुळे त्यांचेविरुध्द सेवेतील त्रुटींचे प्रकरण सिध्द करण्याची पूर्ण जबाबदारी तक्रारदाराची असल्यामुळे व तक्रारदाराने पुराव्यानिशी विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाचा निष्काळजीपणा व सेवेतील त्रुटी सिध्द न केल्यामुळे निव्वळ तक्रारदाराची तक्रार विना आव्हान राहिली आहे व विरुध्द पक्षाने मंचासमोर हजर होऊन आपले लेखी म्हणणे सादर केले नाही या कारणासाठी सरसकट तक्रारदाराची तक्रार मंजूर करता येत नाही. निकालपत्राच्या परिच्छेद क्र.6 मधील मुद्दा क्रमांक 2 मध्ये विवेचन केल्यानुसार ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्षाच्या विद्यापिठाने त्रुटी केल्याचे तक्रारदाराने सिध्द न केल्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत असून खालील अंतीमआदेश पारीत करीत आहोत.
अं ति म आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 31/08/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-