::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार क्र. १ व २ यांनी सामनेवाले यांच्याकडे दिनांक २३.०४.२०१५ रोजी तक्रारदार क्र. १ व २ यांचे नावे संयुक्त बचत खाते सुरू केले. सदर बचत खाते क्र. ३४८८६६०७६९४ अन्वये तक्रारदार क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे वापरण्याबाबत सामनेवाले यांची सेवा घेतली. तक्रारदार क्र. १ यांचे पती यांचे निधन झाल्याने त्यांचे नावाने असलेली शेतजमीन म्हाडाने निवासी प्रयोजनार्थ अधिग्रहित केल्याने त्यापासून मिळणारा मोबदला व नुकसान भरपाई रक्कम रु.११,६०,८०२/- मा. दिवाणी न्यायालय, व. स्तर, चंद्रपूर यांचे आदेशाप्रमाणे धनादेशाद्वारे दिनांक ११.०५.२०१५ रोजी तक्रारदार क्र. २ यांचे नावे अदा करण्यात आली. सदर रक्कम सामनेवाले यांच्याकडे बचत खाते सुरू केल्यानंतर तक्रारदार क्र. २ यांनी, तक्रारदार क्र. १ व २ यांचे नावे असलेल्या संयुक्त बचत खात्यामध्ये जमा केली. सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांचे नावे संयुक्त बचत खातेमधील रक्कम रु. ८,००,०००/-, दोन वर्षासाठी मुदतठेव केल्यास प्रतिमाह रक्कम रु. ५४६३/- मिळतील असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार क्र. १ व २ यांनी मुदतठेव केली. सदर कराराप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक १६.११.२०१५ पर्यंत रक्कम रु. ५४६३/- सदर बचत खात्यामधे जमा केली. परंतु त्यानंतर सदर रक्कम जमा न केल्याने व्याजाचा लाभ तक्रारदारास न मिळाल्याने, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिनांक ०२.०२.२०१६ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून, सदर नोटीस सामनेवाले यांना दिनांक ०४.०२.२०१६ रोजी प्राप्त होवूनदेखील सामनेवाले यांनी व्याजाची रक्कम तक्रारदारास अदा न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून सामनेवाले यांनी व्याजाची रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारदार क्र. १ व २ यांच्या बचत खातेमध्ये दिनांक १६.११.२०१५ पर्यंत व्याजाची रक्कम जमा केली असून दिनांक ०५.१२ .२०१५ रोजी तक्रारदार क्र. २ यांची मुले व मुली यांनी सामनेवाले यांच्याकडे आक्षेप अर्ज देवून व्याजाची रक्कम तक्रारदार क्र. १ व २ यांना अदा करू नये, असे कळविल्याने सामनेवाले यांनी व्याजाची रक्कम जमा केली नाही. तसेच तक्रारदार क्र. १ व २ यांना आक्षेपाबाबत सक्षम न्यायालयाचे आदेश प्राप्त केल्यास रक्कम अदा करण्यात येईल असे कळविले. परंतु तक्रारदार क्र. १ व २ यांनी अद्याप आक्षेपाबाबत सक्षम न्यायालयाचे आदेश प्राप्त न केल्याने तक्रारदार क्र. १ व २ यांच्या बचत खातेमध्ये दिनांक १६.११.२०१५ पासून पुढील व्याजाची रक्कम जमा केली नसून प्राप्त आक्षेपामुळे व्याजाची रक्कम अदा न करणे न्यायोचित असल्याने, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, लेखी युक्तिवादाबाबत पुरसिस व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर व अनुचीत व्यापारी
पद्धतीचा अवलंब केल्याची बाब तक्रारदार सिद्ध
करतात काय ? होय
२. सामनेवाले तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
५. सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांचे नावे संयुक्त बचत खातेमधील रक्कम रु. ८,००,०००/- २ वर्षासाठी मुदतठेव केल्यास प्रतिमाह रक्कम रु. ५४६३/- मिळतील असे सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार क्र. १ व २ यांनी मुदतठेव केली. सदर कराराप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक १६.११.२०१५ पर्यंत रक्कम रु. ५४६३/- बचत खात्यामधे जमा केली. त्यानंतर दिनांक ०५.१२.२०१५ रोजी तक्रारदार क्र. २ यांची मुले व मुली यांनी सामनेवाले यांच्याकडे आक्षेप अर्ज देवून व्याजाची रक्कम तक्रारदार क्र. १ व २ यांना अदा करू नये, असे कळविल्याने, तक्रारदार क्र. १ व २ यांच्या बचत खातेमध्ये दिनांक १६.११.२०१५ पासून सामनेवाले यांनी, मुदत ठेव कराराप्रमाणे दरमहा रक्कम रु. ५४६३/- बचत खातेमध्ये जमा केलेली नाही. सामनेवाले यांनी सदर आक्षेपाबाबत दिनांक ०२.०२.२०१६ रोजी तक्रारदार क्र. १ व २ यांना लेखी कळविले. सदर आक्षेप न्यायोचित नसल्याने तक्रारदार क्र. १ व २ यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. दिनांक १६.११.२०१५ पासून दिनांक १०.०२.२०१६ पर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना मुदत ठेव कराराप्रमाणे दरमहा रक्कम रु. ५४६३/- बचत खातेमध्ये जमा केलेली नाही, हि बाब लेखी कळविलेली नाही. तसेच दिनांक ०५.१२.२०१५ रोजी तक्रारदार क्र. २ यांची मुले व मुली यांनी सामनेवाले यांच्याकडे दिलेल्या आक्षेप अर्जाची प्रतही सामनेवाले यांनी तक्रारदार क.१ व २ यांना पाठविली नाही तसेच तक्रारीमध्ये दाखल केलेली नाही. तक्रारदार क्र. २ यांची मुले व मुली यांनी सामनेवाले यांच्याकडे आक्षेप अर्ज देवून मुदत ठेव रक्क्मेवरील व्याज बचत खात्यावर जमा न करण्याबाबत केलेली विनंती सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना कोणतीही पुर्वसुचना न देता मान्य केल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारास, न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याची बाब तक्रारदार यांनी सिद्ध केली आहे. तक्रारदार क्र. १ व २ आणि सामनेवाले यांच्यामध्ये झालेला मुदत ठेव करार वैध असल्याने, अटी व शर्ती प्रमाणे दिनांक १६.११.२०१५ पासून प्रतिमाह व्याज रक्कम जमा करणेची जबाबदारी सामनेवाले यांची होती. सदर रक्कम दिनांक १६.११.२०१५ पासून जमा न केल्याने तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे बचत खाते न्यायोचित कारणाशिवाय विनावापर प्रकारामध्ये ठेवल्याने सामनेवाले यांनी सेवेबाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन, अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्ध होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यावर तांत्रिक स्वरूपाचा बचाव घेऊन आक्षेप अर्जाचा संदर्भ देऊन व्याज रक्कम जमा न केल्याने, व्याज रक्कम न्यायोचित कारणाशिवाय नाकारल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. सदर तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत तक्रारीतील वाद्कथनास लागू होत नसल्याने अमान्य करण्यात येतो. तक्रारदारानी लेखी आक्षेप सादर करूनही सामनेवाले यांनी व्याज रक्कम जमा करण्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता वैध मुदत ठेव करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्यायतत्व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदारांनी सदर तक्रार मुदत ठेव करार सेवेबाबत दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास मुदत ठेव कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची व अनुचीत व्यापारी पद्धतीचा अवलंब केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३ :
६. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ३०/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले यांनी, तक्रारदार क्र. १ व २ यांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार मुदत ठेव कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले यांनी दिनांक १६.११.२०१५ पासून दिनांक १६.०५.२०१७ पर्यंतची थकीत दरमहा व्याज रक्कम रु. ५४६३/- प्रमाणे संपूर्ण थकबाकी रक्कम तक्रारदार क्र. १ व २ यांचे बचत खाते क्र. ३४८८६६०७६९४ मध्ये या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात जमा करावी.
४. सामनेवाले यांनी, तक्रारदार क्र. १ व २ यांना मुदत ठेव कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १,००,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे.
५. सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांचे संयुक्त बचत खाते क्र. ३४८८६६०७६९४ विनावापर प्रकारामधून वापर प्रकारामध्ये या आदेशप्राप्ती दिनांकापासून तात्काळ सुरु करुन देण्यात यावे.
६. सामनेवाले यांनी, मुदत ठेवीवरील व्याज रक्कम प्रतिमाह बचत खात्यामध्ये जमा न करुन अनुचीत व्यापारी पद्धतीचा अवलंब केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
७. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम १४ (फ) अन्वये, मुदत ठेवीवरील व्याज रक्कम प्रतिमाह बचत खात्यामध्ये विहित मुदतीत जमा करण्यात यावी, असे आदेशित करण्यात येते.
८. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमत श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)