ग्राहक तक्रार क्र. : 188/2014
दाखल तारीख : 30/09/2014
निकाल तारीख : 04/11/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. विजया भ्र. राजेंद्र अत्रे,
वय - 56 वर्ष, धंदा – घरकाम,
रा.सुर्यनगरी, हॉटेल सिटी पॉंईंट सिटी पॉईंट समोर,
सांजा. रोड, उस्मानाबाद, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा. प्रबंधक, भारत संचार निगम लिमिटेड, सांजा रोड,
उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.पी.आर.अत्रे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधिज्ञ : श्री.एस.एस.तानवडे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
1) तक्रारदार(तक) हा उस्मानाबाद येथील रहिवाशी असुन विरुध्द पक्षकार (विप) यांचा ग्राहक आहे. तक ने घरगुती वापराकरीता फोन जोडणी घेतली. 2011 मध्ये कॉलर आयडी असलेला टेलीफोन शुल्क भरुन घेतला. मात्र तो बिघाड झाल्याने विप कडे दुरुस्तीसाठी दिला त्यावर विप ने साधा फोन दिला व नंतर कॉलर आयडी असलेला टेलीफोन देऊ असे सांगितले. त्या नंतर अनेकदा मागणी करुनही विप ने त्याकडे दुर्लक्ष केले.
2) तक यांनी 2013 मध्ये उस्मानाबाद येथे नवीन बंगल्यात सदरचा टेलीफोन हा स्थलांतरिीत करण्यासाठी विप ने स्थलांतर फिस आकारली. सदरचा स्थलांतरीत केलेल्या फोन ची जोडणी पुर्णत: खराब व विस्कळीत केल्यामुळे रिसिव्हरमधून मोठा सतत आवाज येत होता. सदर फोन गेली एक महिना पुर्णत: बंद अवस्थेत असून तक यांचा संपर्क तुटलेला आहे म्हणून सदरची तक्रार करणे भाग पडले. म्हणून तक यांचा टेलिफोन दुरस्त करुन मिळावा तसेच कॉलर आयडी असलेला नवा टेलीफोन देवविण्याचा आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- विप यांचेकडून देवविण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
3) सदर तक्रारीबाबत विप यांना मा. मंचाने नोटीस पाठवली असता त्यांनी आपले म्हणणे दि.09/03/2015 रोजी मंचात दाखल केले ते खालीलप्रमाणे.
4) तक याने आपण ग्राहक असल्याबाबत पुरावा देऊन सिध्द करावे. साल सन 2011 मध्ये विप ने केलेल्या त्रुटीबाबतचे म्हणणे मुदतीत नसल्याने विचारात घेता येणार नाही. तक ने दि.09/01/2014 च्या पूर्वी कोणतीही लेखी किंवा तोंडी तक्रार किंवा 198 वर तक्रार नोंदविलेली नाही यावरुन तक चा टेलीफोन चांगला व व्यवस्थित चालू आहे. नगर परिषद व खाजगी कंपन्याचे काम करीत असतांना विप यांना पुर्व कल्पना न देता जमीनतील वायरपर्यंत खोदकाम करतात त्यामुळे केबलचे नुकसान होते. तशी तक्रार विप ने नगर परिषद व खाजगी कंपन्यांना केलेल्या आहेत. दि.09/10/2014 रोज विप यांना तक यांनी असे लिहून दिले आहे की कॉलर आयडी असलेला नवा लॅंन्ड लाईन फोन आणून बसविला आहे व आवश्यक ती दुरुस्ती केलेली आहे त्यामुळे डेड असलेला फोन चालू झाला असून बोलतांना सध्यातरी खरखर किंवा इतर आवाज येत नाहीत व फोन बंद असलेची तक्रार नाही तो चालू झाला, असे लिहून देवून तक्रारदार यांनी त्यावर सही केलेली आहे त्यामुळे तक्रारदाराच्या अर्जातील विनंतीप्रमाणे विप ने फोन दुरुस्त करुन दिलेला आहे. म्हणून तक ची तक्रार मान्य व कबुल नाही.
5) तक ची तक्रार त्यांनी दिलेले कागदपत्रे विप चे म्हणणे व विप ची कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
6) तक्रारदाराच्या तक्रारीचा मुख्य मुद्दा विप यांनी योग्य सेवा न दिल्यामुळे झालेल्या त्रासाबाबत आहे. तक्रारदाराने आपल्या अर्जासोबत विप यांना दिलेला दि.30/04/2015, दि.30/05/2014, दि.09/01/2014, दि.20/06/2014 दि.23/09/2014 चा अर्ज दिसुन येतो सदर अर्जावर विप यांनी अर्ज मिळाल्याबाबत पोच दिलेली आहे. सदर तक्रारी अर्जावरील तक्रार व तक यांनी विप यांना दिलेल्या तक्रारी अर्जातील तक्रारीत साम्य असून तक यांनी विप यांना दि.09/01/2014 पासून पाच अर्ज दिले असल्याचे दिसते तर विप यांनी आपल्या बचावाच्या प्रित्यर्थ दाखल केलेला पुरावा दि.09/10/2014 चा असून त्यात तक यांनी आपल्या तक्रारीचे निवारण झाल्याचे मान्य केले असून लँड लाईन फोन सध्या परिस्थितीत दुरुस्त झाल्याचे दिसते असे लिखीत स्वरुपातील मजकूर असून सर्व तक्रारी दुर झाल्याचे नमूद केले आहे. मात्र तक्रारदाराची पहीला तक्रार अर्ज 09/01/2014 ते दि.09/10/2014 पर्यंत चा कालावधी साधारणत: 9 महिन्याचा असून एवढा मोठा कालावधी सदर दुरस्तीस का लागला याबाबत मात्र विप यांनी कोणताही खुलासा दिलेला नाही. म्हणून जरी असे मानले की तक्रारदाराची तक्रार विप यांनी दुर केलेली आहे व तक यांचा फोन सध्य स्थितीत चालू असून कोणतीही तक्रार राहिलेली नाही तरी तक याला 9 महिने विप यांनी सेवेत केलेली त्रुटीतील सातत्याला सहन करावे लागले म्हणून विप यांनी तक यांच्या सेवेत त्रुटी केली असल्याचे स्पष्ट होते या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून खालीलप्रमाणे आम्ही आदेश पारीत करातो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) विप यांनी तक यांना सेवेतील त्रुटीपोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे. खर्चाबद्दल कोणताही हुकुम नाही.
विप यांनी तक यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
वरील रक्कम विप यांनी तक यांना आदेश प्राप्त झाल्या पासून 30 दिवसात द्यावा व सदर तक्रारीस जबाबदार असलेल्या व्यक्ति कडून सदर रक्कम वसूल करावी.
3. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..