(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 20 जुन, 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्र.1 बँक ऑफ इंडिया, शाखा कामठी या बँकेत बचत खाते असून त्याचा खाते क्रमांक 871810100019355 असा आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्यास ए.टी.एम. मशीन मधून रक्कम काढण्याकरीता ए.टी.एम. कार्ड प्रदान केले होते. दिनांक 2.2.2016 रोजी तक्रारकर्त्याचे मोबाईल क्र.9595454745 वर मॅसेज आले की, त्यांचे उपरोक्त खात्यातून कोणीतरी रुपये 2,500/- काढले आहे. तक्रारकर्त्याने दुस-या दिवशी कामठी शाखेत सदर बाबत कार्यवाही करण्यासाठी सांगितले व त्यानंतर याबाबत दिनांक 4.2.2016 रोजी पोलीस स्टेशन कामठी येथे सुचना दिली. विरुध्दपक्ष क्र.1 बँकेचे प्रबंधकाने तक्रारकर्त्यास सांगितले की, ए.टी.एम. फुटेज मागून आम्हीं चौकशी करु असे आश्वासन दिले. तक्रारकर्ता पुढे सादर करतो की, दिनांक 2.2.2016 रोजी जेंव्हा त्याला रक्कम काढल्याबाबत मॅसेज आला, तेंव्हा तो आपल्या नागपूर ऑफीसमध्ये काम करीत होता व त्याचा ए.टी.एम. कार्ड त्याचेजवळ असतांना रक्कम कोण काढू शकतो असा प्रश्न उद्भवतो. तक्रारकर्ता हा दिनांक 4.2.2016 पासून वारंवार विरुध्दपक्ष क्र.1 च्या प्रबंधकाकडे जाऊन सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे फुटेज उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ करीत आहे. उलटपक्षी, तक्रारकर्ता वारंवार विरुध्दपक्ष क्र.1 च्या प्रबंधकाकडे सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे फुटेज मागण्याकरीता गेले असता, दोन महिन्यानंतर बॅंक मॅनेजरने तक्रारकर्त्यास सांगितले की, त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये बिघाड होता आणि त्यामुळे फुटेज मिळू शकत नाही.
2. तक्रारकर्ता पुढे सादर करतो की, तो एक गरीब व्यक्ती असून एका खाजगी कंपनीमध्ये संगणक चालविण्याचे काम करतो, त्याचेकरीता रक्कम रुपये 2,500/- ही खुप मोठी रक्कम आहे. तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.1 बँकेचा ग्राहक आहे आणि त्याची रक्कम सुरक्षित ठेवणे हे विरुध्दपक्ष क्र.1 चे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. विरुध्दपक्षाने आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पारपाडली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यास आपल्या नुकसान भरपाईकरीता सदर तक्रार करणे भाग पडले. यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्षाने आपली दोषपूर्ण सेवा दिली आहे. परिणाम स्वरुप तक्रारकर्त्यास रुपये 2,500/- च्या आर्थिक नुकसानीसह शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. त्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्ष यांनी 2,500/- रुपये द.सा.द.शे. 18 % व्याजासह परत करण्याचा आदेश देण्यात यावा.
2) तसेच, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रास, सेवेतील दोषासाठी व विरुध्दपक्षाव्दारे झालेल्या नुकसानीकरीता रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याचे तक्रारीनुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजाविण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी बँकेकडून ए.टी.एम. कार्डची मागणी केली असता त्यांना बँकेकडून एटीएम कार्ड दिनांक 15.11.2009 रोजी दिले, त्याचा कार्ड क्रमांक 405238xxxxxx4926 असून ते व्हिसा कार्ड कंपनीचे आहे. तक्रारकर्ता यांनी बँकेला विनंती केल्यानुसार बँकेकडून त्या बचत खात्यामध्ये मास्टर कार्ड कंपनीचे आणखी एक एटीएम कार्ड प्रदान केले व हे दुसरे कार्ड दिनांक 31.12.2013 रोजी दिले असून त्याचा कार्ड क्रमांक 526495xxxxxx1049 असा आहे. तक्रारकर्त्यास हा एटीएम कार्ड त्याच्या विनंतीनुसार देण्यात आला होता. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे खरे आहे की, दिनांक 2.2.2016 रोजी तक्रारकर्ता यांचे खात्यातून रुपये 2,500/- एटीएम कार्ड क्रमांक कार्ड क्रमांक 405238xxxxxx4926 व्दारे एटीएम मशीन मधून काढण्यात आले होते. तक्रारकर्ता यांनी त्यानंतर दिनांक 4.2.2016 रोजी तक्रार नोंदविली आणि बँकेकडून चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, रुपये 2,500/- त्याचे बचत खात्यातून काढण्यात आले होते.
4. हे म्हणणे खरे नाही की, दिनांक 2.2.2016 रोजी जेंव्हा तक्रारकर्त्याचे खात्यातून रक्कम काढण्यात आली, तेंव्हा ते आपल्या नागपूर ऑफीस मध्ये काम करीत होते व त्याचा एटीएम त्याचे जवळ होता. तक्रारकर्त्याने एटीएम मशीनवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची मागणी केली होती. परंतु, बँकेच्या एजंसीने बॅकेला कळविले की, एटीएम च्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिघाड असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पुरविता येणार नाही. बँकेकडून पुढे तक्रारकर्त्यास कळविले की होते. तक्रारकर्ता हा बँकेचा ग्राहक आहे व बँकेकडून तक्रारकर्त्याचे तक्रारीनुसार त्यांना संपूर्ण माहिती पुरविली होती. तक्रारकर्त्याचे विनंतीनुसार एटीएम कार्ड क्रामंक कार्ड क्रमांक 405238xxxxxx4926 हा ब्लॉक करण्यात आला आहे. यापूर्वी तक्रारकर्त्याने दुसरा एटीएम कार्ड घेतांना आपला एटीएम कार्ड ब्लॉक करण्याचा अर्ज कधीही दिला नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता यांनी दिलेल्या सेवेत कोणताही कसूर केला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यास तक्रारकर्त्याला कोणतीही नुकसान भरपाई करुन देण्याची जबाबदारी नाही. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारकर्ता स्वतःची चुक बँकेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. एटीएम कार्ड हे तक्रारकर्त्याच्या जवळ असते त्याच्या वापरावर नियंत्रण एटीएम धारकाजवळ असते व कोणत्याही एटीएम मशीन मधून कार्डाव्दारे पैसे काढण्यापूर्वी पिन कोड (पासवर्ड) टाकल्याशिवाय पैसे मशीनमधून निघत नाही. प्रस्तुत प्रकरणात एटीएम कार्ड तक्रारकर्त्याजवळ होते व त्याच्या पासवर्डची माहिती फक्त तक्रारकर्त्याला होती, म्हणून हे म्हणणे खरे नाही की बँकेच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यास नुकसान झाले आहे.
5. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची मागणी करणे व बँकेकडून ते पुरविणे हे बँकेकडून देणा-या कोणत्याही सेवेत मोडत नाही. कॅमेराचे फुटेज पुरविण्यात आले नाही त्यामुळे बँकेकडून दिलेल्या सेवेत कसूर केला, असे म्हणता येणार नाही. जी सेवा बँक पुरवीत नाही त्या सेवेवच्या त्रुटीबाबत बँकेला ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे, प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात यावी, तसेच तक्रारकर्त्यास खोटी व बनावटी तक्रार दाखल केल्याबद्दल दंड करण्यात यावा.
6. तक्रारकर्त्याचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षाचा मौखीक युक्तीवादाकरीता पुकारा करण्यात आला, परंतु ते मंचात हजर झाले नाही व संधी मिळूनही मौखीक युक्तीवाद केला नाही. सदर प्रकरणात दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष क्र.1 बँक ऑफ इंडिया, शाखा कामठी या बँकेत बचत खाते असून त्याचा खाते क्रमांक 871810100019355 असा आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्यास ए.टी.एम. मशीनमधून रक्कम काढण्याकरीता ए.टी.एम. कार्ड प्रदान केले होते. दिनांक 2.2.2016 रोजी तक्रारकर्त्याचे मोबाईल क्र.9595454745 वर मॅसेज आले की, त्यांचे उपरोक्त खात्यातून कोणीतरी रुपये 2,5000/- काढले. तक्रारकर्त्याने दुस-या दिवशी कामठी शाखेत सदर बाबत कार्यवाही करण्यासाठी सांगितले व त्यानंतर याबाबत दिनांक 4.2.2016 रोजी पोलीस स्टेशन कामठी येथे सुचना दिली. विरुध्दपक्ष क्र.1 बँकेने तक्रारकर्त्यास ए.टी.एम. फुटेज मागून आम्हीं चौकशी करु असे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याचे म्हणणेनुसार दिनांक 2.2.2016 रोजी जेंव्हा त्याला रक्कम काढल्याबाबत मॅसेज आला, तेंव्हा तो आपल्या नागपूर ऑफीसमध्ये काम करीत होता व त्याचा ए.टी.एम. कार्ड त्याचे जवळ होता. तक्रारकर्ता हा दिनांक 4.2.2016 पासून वारंवार विरुध्दपक्ष क्र.1 च्या प्रबंधकाकडे जाऊन सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे फुटेज उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली. विरुध्दपक्षाने दोन महिन्यानंतर बॅंक मॅनेजरने तक्रारकर्त्यास सांगितले की, त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये बिघाड होता आणि त्यामुळे फुटेज मिळू शकत नाही.
8. तक्रारकर्त्याच्या म्हणणेनुसार विरुध्दपक्ष क्र.1 ही राष्ट्रीयकृत बँक आहे व ते लोकांच्या जमा राशीचा व्यवहार करतो. तक्रारकर्त्यास 2009 मध्ये एटीएम कार्ड दिला होता. त्या कार्डावरील नंबर मिटला होता व त्या कार्डावरुन मशीनमधून पैसे निघत नव्हते, त्यामुळे 2013 मध्ये तक्रारकर्त्याने ही माहिती बँकेत जावून दिले. त्यावर बँक अधिका-यांनी तक्रारकर्त्यास सांगितले की, हे कार्ड खराब झाले आहे व हे आता चालु शकणार नाही असे म्हणून त्यांनी एका फॉर्मवर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी घेतली. त्यावेळेस तक्रारकर्त्याने त्या बँक अधिका-यास सांगितले की, आता जुने कार्ड ब्लॉक करावे त्यावर बँक अधिका-यांनी उत्तर दिले की, प्रचलित नियमानुसार जर कोणते कार्ड खराब झाले असेलतर ते बँकेतर्फे आपो-आप ब्लॉक करण्यात येते. त्यानंतर तक्रारकर्त्यास नवीन एटीएम कार्ड उपलब्ध करुन दिले, त्याचा कार्ड क्रमांक 526495xxxxxx1049 असा आहे. साधरणतः एटीएम कार्डावर वैध तारीख लिहिलेली असते ती अधिकतम् पाच वर्षाची असते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्यांना बँकेकडून 2009 मध्ये जे एटीएम कार्ड मिळाले त्याच्या वैध तारखेनंतर तक्रारकर्त्याच्या बचत खात्यामधून रुपये 2,500/- काढण्यात आले होते.
9. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्यास जेंव्हा नवीन कार्ड देण्यात आले होते, त्यांनी जुने कार्ड जाळून टाकण्यात आले होते. त्यानंतरही बँकेतून पैसे निघाले ही आश्चर्याची गोष्ट आहे. ग्राहकाचे पैस हे बँकेत जमा असते त्या पैशाची संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी बँकेची असते. जरी, बँकेव्दारे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज उपलब्ध करुन दिले असते तर पैसे कोणी काढले हे कढू शकले असते. बँकेकडून जेंव्हा दुसरा एटीएम कार्ड तक्रारकर्त्यास दिला, तेंव्हा पहिला एटीएम कार्ड ब्लॉक केल्या जातो, तसे बँकेकडून केले नाही. यावरुन बँकेने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे बँकेने तक्रारकर्त्यास एटीएम चार्ज दिनांक 11.4.2015 रोजी रुपये 50/- लावला आहे. जर, बँक तक्रारकर्त्याकडून सर्व दिल्या जाणा-या सेवेचे पैसे वसूल करीत आहे तर तक्रारकर्त्यास व्यवस्थित सेवा पुरविणे ही बँकेची जबाबदारी होती. त्याचप्रमाणे बँकेने सीसीटीव्ही कॅमेरे पैशासंबंधी गुन्हे थांबविण्यासाठी लावलेले आहे. परंतु, ते सीसीटीव्ही कॅमेरे काम करीत नसतील किंवा त्यात बिघाड निर्माण झाला असेलतर त्याची जबाबदारी बँकेची आहे. त्यामुळे बँकेने आपल्या सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे मंचाला वाटते. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 2,500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्त) यावर बँकेतून पैसे काढल्याचा दिनांक 2.2.2016 पासून द.सा.द.शे. 18 % टक्के व्याजासह येणारी रक्कम प्रत्यक्ष तक्रारकर्त्याचे हातात पडेपर्यंत परत करावे.
(3) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 3,000/- (रुपये तिन हजार फक्त), तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 20/06/2017