तक्रार क्र. 106/2012 दाखल दि. 30.11.2012
आदेश दि. 09.09.2014
तक्रारकर्ता :- माधव निवृत्ती ब-हाटे
वय 58 वर्षे, व्यवसाय—काही नाही
रा. द्वारा आर.बी.पटेल,
इंदिरा नगर, खापा टोली,तुमसर
ता.तुमसर, जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. कमिशनर
कर्मचारीभविष्य निधी,
रिजनल ऑफीस,नागपुर, ता.जि.नागपुर
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर.
विरुध्द पक्ष प्रॉव्हिफंड फंड तर्फे प्रतिनीधी ए.बी.शरण
( आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा.बडवाईक )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 09 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे
तक्रारकर्ता हा वैनगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित देव्हाळा, ता.मोहाडी जि.भंडारा या कारखान्यात लिपीक म्हणुन कार्यरत होते. तक्रारकर्ता भविष्य निधी योजनेचा सभासद असून त्याचा खाते क्रमांक NA/NAG/0060269/000/0000027 असा आहे. तक्रारकर्त्याची भविष्य निधी योजना दिनांक 15/11/1995 पासून सुरु झाली. तक्रारकर्त्याचे भविष्य निधीचे सभासदत्व दिनांक 1/1/2007 ला संपुष्टात आले. त्या अन्वये त्याचा नोकरीचा कालावधी 11 वर्ष 1 महिने 17 दिवस इतका होता. दिनांक 1/1/2007 ला तक्रारकर्त्याच्या वयाची 50 वर्षे पुर्ण झाल्यामुळे तसेच त्याच्या नोकरीला 10 वर्ष पुर्ण झाल्यामुळे तो दिनांक 1/1/2007 पासून कर्मचारी पेन्शन योजना 1995 चा लाभ घेण्यास पात्र असल्यामुळे, तक्रारकर्त्याने सदर पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळावा म्हणून विरुध्द पक्षाकडे फॉर्म D भरुन पाठविला. त्या अनव्ये विरुध्द पक्षाने त्यांचे कार्यालयीन पत्र क्र.NG/NGP/PENSION/2012 PP0 दिनांक 5/7/2012 पाठविला. त्यानुसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दरमहा रुपये 984/- एवढी पेन्शन दिनांक 21/2/2012 पासून मंजुर झाल्याचे कळविले. तक्रारकर्त्याच्या मते तो दिनांक 1/1/2007 पासून पेन्शन मिळण्यास पात्र आहे व त्यास दिनांक 1/1/2007 पासून पेन्शन मिळावयास पाहिजे होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिनांक 1/7/2007 पासुन पेंशन दिली नाही म्हणून तक्रारकर्त्याने त्याचे वकिला मार्फत दिनांक 27/9/2012 रोजी विरुध्द पक्षाला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून दिनांक 1/1/2007 ते जाने 2012 पर्यंत रुपये 59040/- पेन्शन फरकाची रक्कम मिळावी म्हणुन मागणी केली. सदरहू नोटीस विरुध्द पक्षाला प्राप्त होवूनही त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही किंवा फरकाची रक्कम तक्रारकर्त्यास दिलेली नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास पेन्शनच्या फरकाची रक्कम दिली नाही. या विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये दिनांक 1/1/2007 ते जाने 2012 पर्यंतचे 60 महिन्याच्या पेन्शनच्या फरकाची रक्कम रुपये 59040/- तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्च तसेच इतर मागण्यांसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 10 ते 17 वर एकुण 6 दस्त दाखल केले आहेत.
4. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन मंचाद्वारे विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या. विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी उत्तर दस्ताऐवजासह दाखल केले आहे. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की तक्रारकर्ता हा ईपीएफ स्कीम व पीपीएफ स्कीमचा दिनांक 01/03/1991 ते 01/01/2007 पर्यंत सदस्य होता. तक्रारकर्त्याची जन्मतारीख 21/2/1954 ही असून तक्रारकर्त्याने 16 वर्ष नोकरीचे पुर्ण केले. तक्रारकर्त्याने नोकरी सोडली त्यावेळी त्याचे वय 53 वर्ष होते. तक्रारकर्त्याने पेंन्शन फॉर्म 10 D भरुन पाठविला, ज्यामध्ये कॉलम 8 A मध्ये 1/3/2007 ही पेन्शन सुरु होण्याच्या तारखेबाबत पर्याय दिला होता. सदर पेन्शन फॉर्म विरुध्द पक्षाला दिनांक 11/10/2011 ला प्राप्त झाला. सदर फॉर्म प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये काही त्रृटया असल्यामुळे विरुध्द पक्षाने ते तक्रारकर्त्याच्या नियोक्त्याकडे पाठविले. दुस-यांदा सदर फॉर्म दिनांक 30/5/2012 ला प्राप्त झाला. दुस-यांदा फॉर्म पाठविण्याच्या वेळी तक्राकर्त्याने वयाची 58 वर्षे दिनांक 21/2/2012 ला पुर्ण केली होती. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची पुर्ण पेन्शन दिनांक 21/2/2012 पासून मंजुर केली आहे. सदर पेन्शन दिनांक 21/2/2012 पासून दिनांक 1/3/2007 च्या Reduce Pension च्या ऐवजी मंजुर केली, जे नियमानुसार बरोबर आहे. तक्रारकर्त्याला तो आधी घेत असलेल्या Reduce Pension पेक्षा पुर्ण पेन्शन त्याच्या साठी लाभदायक होती.
विरुध्द पक्षाने दिनांक 5/3/2014 ला पुरसीस दाखल केली. ज्यामध्ये मान्य केले आहे की तक्रारकर्त्यास दिनांक 1/1/2007 पासून रुपये 984/- रुपये पुर्ण पेन्शन मिळत आहे आणि दिनांक 1/1/2007 ते 1/1/2012 या काळातील पेन्शनचे अरियर्स तक्रारकर्त्यास देण्यात आले आहे.
5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्त, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर व दस्त यांचे अवलोकन करता मंचासमोर खालील प्रश्न उपस्थित होतो.
- तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का?– नाही
कारण मिमांसा
6. दिनांक 6/8/2013 ते 4/4/2014 पर्यंत तक्रारकर्ता व त्याचे वकील सतत गैरहजर असल्यामुळे मंचाने तक्रारकर्त्याला दिनांक 13/5/2014 ला उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठविली. सदर नोटीस तक्रारकर्त्यास प्राप्त होवून देखील तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर राहिले. त्यामुळे मंचाने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज न करता तक्रारकर्त्याच्या तक्रारीमध्ये गुणवत्तेनुसार आदेश पारित करण्याचा निर्णय घेतला.
तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये त्याला दिनांक 1/1/2007 पासून ते जानेवारी 2012 पर्यंतच्या पेन्शनच्या फरकाची रक्कम रुपये 59,040/- ही 18 टक्के व्याजासह मिळण्याची विनंती केली आहे. विरुध्द पक्षाने दिनांक 5/3/2014 ला पुरसीस दाखल करुन तक्रारकर्त्याला मासिक पेन्शन 984/- दिनांक 1/1/2007 पासून मिळत आहे तसेच दिनांक 1/1/2007 ते 1/1/2012 पर्यंतचे पेन्शनची थकबाकी त्याला दिलेली आहे, असे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने सदर बाबीला आपला आक्षेप नोंदविला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यास सदरची थकबाकी मिळाली असावी असे मंचाचे मत आहे.
करीता आदेश
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.