निकाल
(घोषित दि. 14.03.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये दाखल केली.
तक्रारदार हा जामखेड ता.अंबड जि. जालना येथिल रहिवासी असुन व्यवसायाने शेतकरी आहे.गैरअर्जदार क्रं.1 व 2 हे भारत गॅस कंपनीचे प्रादेशीक व उपप्रादेशिक वितरक आहेत. गैरअर्जदार क्रं.3 हे भारत गॅस कंपनीचे गॅस वितरक आहेत,गैरअर्जदार क्रं.4 विमा कंपनी आहे.तक्रारदार याने गैरअर्जदार क्रं.3 कडुन घरगुती वापरासाठी गॅस जोडणी घेतली असुन नियमीत गॅसचा वापर करत आहे.तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
दि.10/12/2015 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तक्रारदार याच्या पत्नीने भात शिजवण्यास टाकले असता,घरात गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट झाला,त्यावेळी तक्रारदार याची पत्नी घराच्या दारात उभी होती.सदर स्फोटामध्ये तक्रारदार याचे माळवदचे घर जळुन खाक झाले.त्यामध्ये संसारोपयोगी वस्तु, इतर वस्तु व हजार,पाचशे व शंभरच्या चलनी नोटा जळाल्या ,त्यामुळे तक्रारदार याचे एकुण रु.7,62,000/- चे नुकसान झाले.सदर घटनेमुळे तक्रारदारास मानसीक त्रास झाला. तक्रारदार याने पोलीस स्टेशन,अंबड येथे यबाबत फिर्याद दिली. दि.12/01/2016 रोजी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.गैरअर्जदार क्रं.3 याने घटनास्थळी येवुन पाहणी केली. सदर घटनेची गैरअर्जदार क्रं.3 याने कोणतेही दखल घेतली नाही,त्यामुळे तक्रारदार याने दि.02/03/2016 रोजी विधिज्ञामार्फत गैरअर्जदारास नोटिस पाठविली.सदर नोटिस चे उत्तर गैरअर्जदार क्रं 03 याने दिले.गैरअर्जदार याने पुरविलेले गॅस सिलेंडर हे नादुरुस्त असल्यामुळे स्फोट झाला आहे.त्यामुळे तक्रारदार याने गैरअर्जदाराकडुन नुकसान भरपाई व मानसीक त्रासापोटी एकुण रक्कम रु.10 लाख 77 हजार ची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी आपले लेखी निवेदन नि.10 अन्वये दाखल केले व लेखी निवेदनासोबत अमित नरोले याचे शपथपत्र दाखल केले. गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांच्या कथनानुसार तक्रारदार हा ग्राहक आहे.त्याने दि.18/11/2015 रोजी गैरअर्जदार क्रं.3 कडुन गॅस सिलेंडर घेतले होते.सदर गॅस सिलेंडरचे गैरअर्जदार क्रं. 3 याने PDI करुन तक्रारदारास गॅस सिलेंडर पुरविले,तेव्हापासुन तक्रारदार हा गॅस सिलेंडर वापरत होता.तक्रारदार याने सदर घटनेचे खरे कारण दिले नसुन पोलीस पंचनामा सुध्दा एक महिण्यानंतर केला आहे.सदर पंचनामा चुकीचा व बोगस आहे.तक्रारदार यांने सदर सिलेंडरचर 24 दिवस वापर केला.जर सिलेंडर खराब व दोषयुक्त असता तर घटना तात्काळ घडली असती.तक्रारदार याची नोटिस प्राप्त झाल्यानंतर सदर घटना गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना ज्ञात झाली.
गैरअर्जदाराचे म्हणणे नुसार तक्रारदार याचा नुकसान भरपाईचा दावा हा युनायटेड इंडिया इंन्सुरंस या विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे.त्याचा पॉलिसी क्रं.1604004814300000009 असा आहे,सदर घटनेची चौकशी विमा कंपनीचे सव्हैयर श्री.एच.एम.जाजु यांनी केली,परंतु तक्रारदार याने सदर प्रकरणात त्या विमा कंपनीस गैरअर्जदार म्हणुन समाविष्ट केले नाही. कायदयानुसार आवश्यक असलेली पार्टी न केल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी युनायटेड इंडिया इंन्सुरंस कंपनीकडे विमा घेतला आहे.सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.02/05/2015 ते 01/05/2016 पर्यंत आहे.तक्रारदाराचा दावा या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहे.गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांची सेवेत त्रृटी नाही.त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रं.3 यांनी आपले लेखी निवेदन नि.क्रं.8 अन्वये दाखल केले.लेखी निवेदनासोबत संजय अजितसिंग सेठी यांचे शपथपत्र दाखल केले आहे.गैरअर्जदार क्रं.3 यांचे कथन की,ते गॅस सिलेंडर वितरणाचे काम करतात,तक्रारदाराने घरगुती वापरासाठी गॅस जोडणी घेतली आहे.तक्रारदार याने तक्रारीत ऑर्डर नं.व कॅश मेमो चुकीचा दर्शविला आहे.दि.18/11/2015 रोजी तक्रारदारास पुरविलेल्या सिलेंडरची पुर्णतः तपासणी करुन सिलेंडर तक्रारदारास दिले होते.तक्रादाराच्या निष्काळजीपणामुळे त्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे.त्याकरिता गैरअर्जदार क्रं.3 हे जबाबदार नाहीत,त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रं.4 यांनी आपले लेखी निवेदन नि.क्रं.19 अन्वये दाखल केले.लेखी निवेदनासोबत चांगदेव अंबाजी शेळके यांचे शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं.4 यांच्या म्हणण्याप्रमाणे,तक्रारदार याने या प्रकरणातील संबधित विमा पॉलिसी जोडली नाही.तसेच घटनेच्या वेळी तक्रारदार हा विमाधारक होता याबाबत स्पष्ट खुलासा केला नाही.त्यामुळे गैरअर्जदार क्रं. 4 याची सदर नुकसान भरपाई देण्याची कोणतेही जबाबदारी नाही.
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामीचे शपथपत्र यांचे वाचन केले,तसेच गैरअर्जदार याचे लेखी जबाबाचे वाचन केले.तक्रारदार व गैरअर्जदार क्रं.4 यांचा युक्तीवाद ऐकला.त्यावुरन न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? नाही.
2) काय आदेश? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामीचे शपथपत्र,गैरअर्जदार यांचा लेखी जबाब,तसेच तक्रारदार व गैरअर्जदार क्रं.4 यांचे युक्तीवाद याचे आम्ही बारकाईने परीक्षण केले. तक्रारदार यांने दाखल केलेल्या पावतीवरुन असे दिसुन येते की,तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.3 यांचे कडुन घरगुती वापरासाठी गॅसची जोडणी घेतेली आहे.तक्रारदार हा नियमीतपणे गॅस चा वापर करतो.दि.18/11/2015 रोजी तक्रारदारास PDI करुन चांगल्या परीस्थितीत सिलेंडर पुरवले होते.त्याबाबतची पावती या प्रकरणात दाखल केलेली नाही,परंतु गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांना दि.18/11/2015 रोजी तक्रारदारास गॅस सिलेंडर पुराविल्याची बाब मान्य आहे,त्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे.
तक्रारदार याने सदर सिलेंडर घेतल्यानंतर त्याचा वापर घरगुती वापरासाठी केला.घटना घडण्या अगोदर तक्रारदार याने जवळपास 20 ते 22 दिवस सदर सिलेंडरचा वापर केला .तेव्हा तक्रारदारास सदर सिलेंडर मध्ये कोणताही दोष आढळुन आला नव्हता.दि.10/12/2015 रोजी सदर सिलेंडरचा स्फोट होवुन तक्रारदार याचे घरातील संसारोपयोगी वस्तुचे नुकसान झाले.सुदैवाने त्यावेळी तक्रारदार याची पत्नी घराच्या बाहेर उभी होती,तक्रारदाराने सदर घटनेची नोंद पो.स्टे.अंबड येथे केली आहे,तक्रारदार याने दाखल केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता,असे निर्देशनास येते की, दि.10/12/2015 रोजी तक्रारदाराच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होवुन आग लागली व त्यामध्ये संसारोपयोगी वस्तु,धान्य व तक्रारदार याचे घर जळुन नुकसान झाले.सदर पंचनामा हा घटनेनंतर एक महिन्याने केला असल्याचे निर्देशनास येते. घटनेचा प्रत्यक्षदर्शी असा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.
तक्रारदार याने सदर तक्रारअर्जात दुरुस्ती करुन विमा कंपनी, न्यु इंडिया इन्शुरन्स यास गैरअर्जदार क्रं.4 म्हणुन समाविष्ट केले आहे.परंतु गैरअर्जदार क्रं.4 यांने सदर घटनेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीकडे सामुहिक विमा उतरविलेला आहे,त्याचा पॉलिसी नं. 0217002715P101332273 असा असुन सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.02/05/2015 ते 01/05/2016 पर्यंत आहे.तक्रारदार यांचा नुकसान भरपाईचा दावा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे प्रलंबित आहे. सदर घटनेची चौकिशी विमा कंपनीचे सर्व्हेवर श्री.एच.एम.जाजु यांनी केली असल्याचे कथन गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी केले आहे.यावरुन तक्रारदार याने सदर प्रकरणात युनायटेड इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीस गैरअर्जदार म्हणुन समाविष्ट करणे आवश्यक होते असे या मंचाचे मत आहे.तक्रारदार याने संबधित विमा कंपनी म्हणजेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला या प्रकरणात गैरअर्जदार म्हणुन समाविष्ट न केल्यामुळे तक्रारदार हा मिळणा-या लाभापासुन वंचित आहे.तक्रारदार झालेल्या नुकसानीस स्वतः जबाबदार आहे.त्यामुळे गैरअर्जदार याने तक्रारदारास सेवा देण्यात त्रृटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही.
वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत कसूर केला नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. वरील कारणास्तव मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना