::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/11/2014 )
आदरणीय सदस्य, श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा एरंडा ता. मालेगाव जि. वाशिम येथील रहिवाशी आहे व तिथे त्यांच्या कुटूंबाची शेती आहे. तक्रारकर्त्याचे वडील श्री. शेषराव मोतीराम घुगे, त्यांचे चुलत भाऊ श्री. लक्ष्मण गणपत घुगे व श्री. अशोक गणपत घुगे हे सगळे एकत्र कुटूंबाचे सदस्य असुन, त्या सगळयांची शेती ही एकमेकांना लागुन आहे. तक्रारकर्ते हे एकत्र कुटूंबाचे वतीने शेतीसाठी लागणारे बियाणे व खते हे त्यांच्या नावाने विकत घेतात व त्यासाठी लागणारा पैसा स्वत: देतात. विरुध्द पक्ष हे प्रमाणीत बियाणे विकणारी कंपनी आहे. विरुध्द पक्षाचे मुख्य कार्यालय बीज भवन, पुसा कॉंम्प्लेक्स, नवी दिल्ली तसेच क्षेत्रीय कार्यालय हे गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे-37 येथे आहे. तसेच विरुध्द पक्षाचे कार्यालय हे अकोला येथे असून ते वाशिम जिल्हयामध्ये शेतक-यांना सोयाबीनचे बियाणे पुरवितात. तक्रारकर्त्याने हंगाम वर्ष 2013 करिता शेतीमध्ये लागणारे सोयाबीनचे बियाणे दिनांक 04/06/2013 रोजी, विरुध्द पक्षाकडे 20 सोयाबीनच्या बॅग ज्याचे वजन प्रत्येकी 30 किलो आहे असे एकूण 600 किलो सोयाबीन जे.एस. 335 बियाण्याचे बुकींग केले व विरुध्द पक्षाला दिनांक 11/06/2013 रोजी रक्कम रुपये 4,000/- अग्रीम म्हणून दिली. त्यानंतर दिनांक 11/06/2013 रोजी व्दारपत्र देण्यात आले व सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 च्या 20 बॅग, प्रत्येकी 30 किलोच्या तक्रारकर्त्याला देण्यात आल्या. तक्रारकर्त्याने त्यांच्या व इतर कुटूंबियांच्या विरुध्द पक्षाने दिलेली माहिती व सांगण्याप्रमाणे मौजे एरंडा येथील गट नं. 62,18,58,53,145,155 मध्ये असलेल्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये पूर्ण मशागत करुन, पेरणीयोग्य झाल्यानंतर दिनांक 12/06/2013 रोजी पेरणी करण्यात आली. तक्रारकर्त्याने राहिलेल्या पूर्ण रक्कमेचा भरणा दिनांक 18/06/2013 रोजी, रक्कम रुपये 36,200/- व रक्कम रुपये 410/- प्रमाणे असे एकूण 40,610/- रुपये विरुध्द पक्षाला दिले. तक्रारकर्त्याच्या वरील शेतीमध्ये दिनांक 12/06/2013 रोजी पेरणी केली असता, दिनांक 18/06/2013 पर्यंत सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 ची ऊगवण झालेली दिसून आली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 18/06/2013 रोजी विरुध्द पक्षाकडे लेखी तक्रार केली. तक्रारकर्त्याने याबाबतची तक्रार दिनांक 20/06/2013 रोजी कृषी अधिकारी, मालेगांव यांच्याकडे लेखी तक्रार दिली व त्यांनी शेताची पाहणी करुन दिनांक 25/06/2013 रोजी अहवाल दिला. त्यामध्ये स्पष्ट नमूद केले की, सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 च्या बियाण्याचा दोष असल्यामुळे ऊगवणशक्ती कमी झाली आहे आणि त्यामुळे तक्रारकर्त्याच्या शेतात बियाण्याची ऊगवण झाली नाही, त्यामुळे विरुध्द पक्ष हा तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीस सर्वस्वी जबाबदार आहे. त्यानंतर जुलै 2013 च्या पहिल्या आठवडयात तक्रारकर्त्याला स्वत:च्या घरचे 600 किलो सोयाबीन बियाणे वापरुन पेरणी करावी लागली व पेरणीसाठी खत विकत घ्यावे लागले. खत घेण्याकरिता व परत पेरणीसाठी तक्रारकर्त्याला अतिरिक्त रक्कम दयावी लागली. तक्रारकर्त्याने बियाणे विकत घेण्याकरिता विरुध्द पक्षाला 40,610/- रुपये दिले, ते 40,610/- रुपये विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला देण्यास जबाबदार आहे. पहिल्या पेरणीच्या वेळेस तक्रारकर्त्याला रक्कम रुपये 25,000/- चे खत वापरावे लागले व रक्कम रुपये 10,000/- पेरणीचा खर्च दयावा लागला. असे एकूण पहिल्या पेरणीच्या वेळेस रक्कम रुपये 75,610/- विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला देण्यास जबाबदार आहे. तक्रारकर्त्याने बाजारामधून परत पेरणीकरिता खत विकत घेतले तसेच घरचे बियाणे वापरले, असे एकूण 55,000/- रुपये दयावे लागले व शेतीची परत मशागत व पेरणी खर्च 10,000/- रुपये असे एकूण 65,000/- रुपये देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार आहे. तसेच दुसरी पेरणी विलंबाने झाल्यामुळे पिकाची ऊत्पादन क्षमता ही कमी झाली, त्यामुळे झालेले नुकसान रुपये 2,00,000/- हे विरुध्द पक्ष देण्यास जबाबदार आहे. तक्रारकर्त्याचे वरीलप्रमाणे झालेले नुकसान तसेच मानसिक व शारीरिक छळाची रक्कम रुपये 3,90,610/- तसेच नोटीसचा खर्च रुपये 5,000/- तसेच खर्च रुपये 1,00,000/- हे द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार आहे. तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास कारण दिनांक 12/06/2013, 18/06/2013 व 20/06/2013 रोजी कृषी अधिकारी यांनी दिलेले पत्रानुसार घडले व विरुध्द पक्षाच्या गैरकायदेशीर कृत्यामुळे तक्रार दाखल करण्यास भाग पाडले.
म्हणून, प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, तक्रारकर्त्याने विनंती केली की, विरुध्द पक्षाकडून नुकसान भरपाई रुपये 3,40,610/- तसेच मानसिक व
शारीरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्च रुपये 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे तक्रार दाखल करण्यापासून,रक्कम वसुल होईपर्यंत मिळण्याचा आदेश व्हावा.
तक्रारीचे पृष्ठयर्थ पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र केले व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 11 कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जवाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली व पुढे अधिकच्या कथनात नमूद केले त्याचा थोडक्यात आशय असा, . . . .
विरुध्द पक्ष – राष्ट्रीय बियाणे महामंडळ हे भारत सरकार व्दारा देशातील शेतक-यांना चांगल्या प्रतीचे बियाणे मिळण्याच्या हेतूने स्थापन झालेले आहे. बियाणे कायदा 1988 तसेच बियाणे नियंत्रण आदेश यामधील तरतुदी व नियमावली प्रमाणे,महामंडळाकडून निर्माण केल्या जाणा-या प्रत्येक बियाण्यावर तसेच गुणवत्तेवर, केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या अधिका-यांचे पूर्णपणे नियंत्रण आहे. बियाण्याची योग्यता तपासून विशिष्ट लॉटचे बियाणे विक्रीकरिता शासन प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत महामंडळाला बियाणे बाजारामध्ये आणुन कायदयाप्रमाणे विकता येत नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेले नमुद सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 या बियाण्याच्या 20 बॅग एकूण 600 किलो या महाराष्ट्र शासनाच्या बिज प्रमाणीकरण यंत्रणा जळगांव/अकोला यांच्याकडून कायदयाप्रमाणे आवश्यक पात्रता पूर्ण करुन प्रमाणीत झालेल्या आहेत. तसे प्रमाणपत्र विरुध्द पक्षाकडे 08691 क्रमांकाचे आहे व ते प्रकरणामध्ये जोडले आहे. तसेच नॅशनल सिडस कार्पोरेशन, भोपाळ या केंद्र शासनाच्या गुण नियंत्रण प्रयोगशाळे कडून सुध्दा वरील लॉटचे बियाणे प्रमाणीत झालेले आहे व त्याचे प्रमाणपत्र सुध्दा विरुध्द पक्ष दाखल करीत आहे. त्यामुळे वरील सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यामुळे तक्रारकर्त्याच्या किंवा त्याच्या नातेवाईकांच्या शेतामध्ये वरील सोयाबीन निघाले नाही, हे म्हणने साफ खोटे व चुकीचे आहे. बियाण्याचे उगवणशक्तीवर परिणाम करणा-या अनेक गोष्टी असतात, जसे ऊन्हाळी मशागत, खते,हवामान, पाऊस, किती खोलीवर पेरणी केली इ. सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजुक असून बियाणे वाहतुकीदरम्यान आदळआपट केल्याने किंवा ओल्या ठिकाणी ठेवल्याने, बियाण्याची उगवणशक्ती कमी होऊ शकते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेल्या सोयाबीन बियाण्याचा कोणताही नमुना ( सँम्पल ) कृषी अधिकारी, मालेगांव यांना सादर केलेले नाही. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी, मालेगांव यांनी दिलेला अहवाल हा बरोबर आहे, असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्ते यांच्या व्यतिरिक्त हे बियाणे विरुध्द पक्षाने अनेक शेतक-यांना विकले परंतु कोणाचीही तक्रार आली नाही. यावरुन हे स्पष्ट होते की, सोयाबीन उगवणशक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या व इतर कुटूंबियांच्या शेतामध्ये दिनांक 12/06/2013 रोजी पेरणी केली आहे. त्याबाबत विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, दिनांक 13/06/2013 रात्री पासुन ते 15/06/2013 पर्यंत सतत जोरदार पाऊस होता, त्या कारणामुळे सुध्दा तक्रारकर्त्याचे बियाणे निघालेले नसावे. वरील परिस्थितीमुळे विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहू शकत नाही व तसे पत्र विरुध्द पक्षाने दिनांक 06/08/2013 रोजी तक्रारकर्त्याला दिलेले आहे. तक्रारकर्त्याचे नावावर नमुद केलेली शेतजमीन असल्याबाबत कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने वरील बियाणे नमुद केलेल्या शेतजमिनीमध्ये पेरले हे सिध्द होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याने बियाणे हे अकोला येथुन विकत घेतलेले आहे व तसे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याला ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 13 प्रमाणे वि. न्यायमंचात तक्रार दाखल करण्याचा किंवा वि. न्यायमंचास तक्रार निकाली काढण्याचे कोणतेही अधिकार क्षेत्र नाही. त्या कारणास्तव हा मुद्दा प्रथम विचारात घेऊन तक्रार खारिज करावी. तसेच केंद्र शासनाने केलेले नियम व नियमावली प्रमाणे व नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कारणामुळे जर बियाण्याची उगवनशक्ती कमी होऊन बियाणे शेतामध्ये उगवले नाही तर महामंडळ कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार रुपये 25,000/- खर्चासह खारिज करावी.
सदर लेखी जबाबासोबत प्रतिज्ञालेख व एकंदर 3 दस्तऐवज पुरावे म्हणून दाखल केले आहेत.
3) का र णे व नि ष्क र्ष :::
सदर प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्ता यांचे प्रतिऊत्तर, विरुध्द पक्षाची युक्तिवादाबद्दलची पुरसिस तसेच उभय पक्षांनी प्रकरणात दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले, तालुका तक्रार निवारण समिती यांच्यातर्फे तालुका कृषी अधिकारी, पं.स.मालेगांव जि. वाशिम यांचे प्रतिज्ञापत्र, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी की, तक्रारकर्ता यांनी हंगाम वर्ष 2013 करिता शेतीमध्ये पेरणीकरिता लागणारे सोयाबीनचे बियाणे विरुध्द पक्षाकडून दिनांक 04/06/2013 रोजी 20 सोयाबीनच्या बॅग ज्यांचे वजन प्रत्येकी 30 किलो याप्रमाणे एकूण 600 किलो सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 एकूण रक्कम रुपये 40,610/- रुपये देवून विकत घेतल्या.
तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षाकडून बियाणे स्वत:चे शेतामध्ये पेरण्याकरिता विकत घेतल्यामुळे तक्रारकर्ता हे कलम-2 (डी) (1) च्या तरतुदीप्रमाणे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत. तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, सदरहू विकत घेतलेले बियाणे त्यांनी त्यांच्या, वडिलांच्या व चुलत भावाच्या शेतामध्ये दिनांक 12/06/2013 रोजी पेरणी केली. सदरहू पेरणी केल्यानंतर दिनांक 18/06/2013 पर्यंत सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 ची उगवण झालेली दिसून आली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 18/06/2013 रोजी विरुध्द पक्षाकडे लेखी तक्रार केली. सदरहू तक्रारीची प्रत वि. मंचासमोर प्रकरणात दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्याने दिनांक 20/06/2013 रोजी तालुका तक्रार निवारण समितीचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्याबाबत तालुका तक्रार निवारण समिती यांनी दिनांक 25/06/2013 रोजी अहवाल दिला व सदरहू अहवालामध्ये असे नमुद केले की, दिनांक 21/06/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी केली असता, सोयाबीनजे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 ची फक्त 15 टक्के उगवणशक्ती असल्याचे आढळून आले. तसेच असे नमुद केले की, बियाण्यामध्ये दोष असल्यामुळे उगवण कमी झाली, असा निष्कर्ष दिला. तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानाबाबत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 25/09/2013 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून झालेल्या नुकसानाबाबतची मागणी केली. परंतु विरुध्द पक्षाने त्याबाबत कुठलिही पुर्तता न केल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन, नुकसान भरपाईची मागणी केली.
विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, विरुध्द पक्षाकडून दिनांक 11/06/2013 रोजी विकत घेतलेले सोयाबीन जे.एस. 335,लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 च्या 20 बॅग ज्याचे वजन प्रत्येकी 30 किलो एकूण 600 किलो हे महाराष्ट्र शासनाच्या,बीज प्रमाणीकरण यंत्रणा जळगांव/अकोला यांच्याकडून कायदयाप्रमाणे आवश्यक पात्रता पुर्ण करुन प्रमाणीत झालेले आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सुध्दा विरुध्द पक्षाकडे आहे. तसेच विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याचे व त्यांच्या नातेवाईकांच्या शेतामध्ये सदरहू बियाणे उगवलेले नाही याबाबत बरीचशी नैसर्गिक कारणे असू शकतात व तसेच विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक 12/06/2013 रोजी पेरणी केल्यानंतर दिनांक 13/06/2013 रात्रीपासुन ते 15/06/2013 पर्यंत सतत जोरदार पाऊस असल्याच्या कारणामुळे सुध्दा तक्रारकर्त्याचे बियाणे निघालेले नसावे. विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेल्या सोयाबीन बियाण्याचा कोणताही नमुना कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला नाही व तसेच प्रमाणीत बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे उगवणशक्तीबाबतच्या दोष निष्कर्षाकरिता सादर केला नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यांत यावी.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तालुका तक्रार निवारण समिती यांनी दिनांक 25/06/2013 रोजी दिलेल्या अहवालावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याच्या शेतामध्ये पेरलेल्या लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 बियाण्यामध्ये उगवणशक्तीबाबत दोष असल्याच्या कारणामुळे सदरहू बियाणे हे तक्रारकर्त्याच्या शेतामध्ये उगवले नाही. तसेच श्री. आर.एच.तामिले, तालुका तक्रार निवारण समितीचे तालुका कृषी अधिकारी असुन त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यानेसोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 ची पेरणी दिनांक 12/06/2013 रोजी मौजे एरंडा येथील गट नं. 62, 18, 58, 145, 155 व 53 मध्ये केली होती व त्यादरम्यान अतीवृष्टी झाली नव्हती तरीही दिनांक 21/06/2013 पर्यंत बियाण्याचे अंकुरण झाले नव्हते व उगवण सुध्दा झालेली नव्हती. सदरहू बाब तक्रारकर्त्याने वि. मंचासमोर सिध्द केलेली आहे.
विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने सदरहू बियाणे कलम-13 (1) (सी) प्रमाणे बीज परीक्षणाकरिता प्रयोगशाळेकडे पाठविले नाही. तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता हा शेतकरी असुन याबाबत कायदेशीर तरतुदींची माहिती नसल्या कारणाने त्याने विकत घेतलेले बियाणे हे संपूर्णपणे शेतामध्ये पेरले. सामान्य व्यक्तीच्या विचारसरणीनुसार तक्रारकर्त्याने केलेला युक्तिवाद हा न्याय मंचाला यथोचित वाटत आहे. त्याही पलीकडे विरुध्द पक्षाने त्यांच्या लेखी जबाबात ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्त्याने व त्यांच्या इतर कुटूंबियांनी दिनांक 12/06/2013 रोजी पेरणी केलेली आहे. आणि विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा अकोला यांनी दिनांक 10/05/2013 रोजी सदरहू बियाण्याचा मुक्तता अहवाल दाखल केलेला आहे. परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे विरुध्द पक्षाने दाखल केलेला गुण नियंत्रण प्रयोगशाळा,पुणे यांचे अहवालानुसार सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 ची गुण तपासणी ही दिनांक 04/07/2013 रोजी म्हणजेच तक्रारकर्त्याने त्याच्या शेतामध्ये पेरणी केल्यानंतर केलेली असल्यामुळे ग्राहय धरता येऊ शकत नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यायोग्य आहे, असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या मालकी हक्काबाबतच्या कागदपत्रांवरुन, तक्रारकर्ता हा गट क्र. 62 मधील एकूण क्षेत्र 2 हेक्टर 53 आर चा मालक असुन, तक्रारीमध्ये नमुद केलेले इतर क्षेत्र हे त्याच्या कुटूंबियाच्या, नातेवाईकाच्या मालकीचे असुन त्यांचे अधिकारपत्र, त्यांचे प्रतिज्ञापत्र हे तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेले नाही किंवा त्यांना प्रकरणात समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा फक्त त्यांनी विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेल्या बियाण्याची रक्कम परत मिळण्यास व त्यांच्या मालकीच्या क्षेत्रापुरतीच नुकसान भरपाई मागणीस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे.
वरील सर्व कारणमिमांसा विचारात घेता, विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला असल्यामुळे तक्रारकर्ता हा त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
- आदेश –
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 चे बियाण्याची एकूण रक्कम रुपये 40,610/- ( रुपये चाळीस हजार सहाशे दहा फक्त) ही द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने तक्रार दाखल दिनांक 25/10/2013 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत दयावी.
3) विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास सोयाबीन जे.एस. 335, लॉट क्र. ऑक्टोंबर 12/13-1909-2263 चे बियाणे योग्यरित्या उगवले नसल्यामुळे प्रती एकर 15,000/- प्रमाणे त्याचे क्षेत्र 2 हेक्टर 53 आर ( 6 एकर 13 आर ) 15,000/- x 6 एकर 13 आर = रुपये 91,950/- ( अक्षरी रुपये एक्क्यान्नव हजार नऊशे पन्नास फक्त) नुकसान भरपाई दयावी.
4) विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) व प्रकरणाचा खर्च रुपये 2,000/- ( रुपये दोन हजार फक्त ) दयावा.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाची पुर्तता, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावी.
6) तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या फेटाळण्यांत येतात.
7) आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षास विनामुल्य दयाव्यात.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).