( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 03 नोव्हेबर, 2010 ) यातील तक्रारदार श्रीमती बेबीताई ओंकार हेलोंडे यांची थोडक्यात तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द अशी आहे की, महाराष्ट्र सरकारने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविली व विमा कंपनीशी करार करुन त्यांना विमा हप्त्याचा भरणा केला आहे. त्यामध्ये शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यास अपघाती विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्याची व्यवस्था आहे. सदर विमा गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे नोंदविण्यात आलेला आहे. तक्रारकर्ती ही मृतक नरेश ओंकार हेलोंडेची आई आहे. मृतकाच्या वडीलांची प्रकृती खराब होती त्यामुळे त्यांनी अज्ञान पालनकर्ती म्हणुन आईचे नाव दाखल केले होते. नरेंद्र ओंकार हेलोंडे यांचा अपघाती मृत्यु झाला. त्याचे नावे मौजा मेढेपठार, तालुका-काटोल, जिल्हा नागपूर, शेत क्रं.66 व 320, प.ह.न. 57, खाते क्रं.90 व 320 अनुक्रमे एकुण आराजी 0.82 व 1.81 हे.आर.अनुक्रमे शेती होती. मृतक दोन चाकी वाहनावर डबलसिट बसुन कळमेश्वर ते मेढेपठार येत असतांना उलट दिशेने येणा-या मेटॉडोरनी वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवुन मृतकाच्या वाहनाला ठोस मारली. त्याचा दिनांक 02.05.2007 रोजी मृत्यु झाला. त्यासंबंधी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. पुढे तक्रारकर्तीने पटवारी मार्फत विमा कंपनी कडे विमा दावा रक्कम मिळण्याकरिता दस्तऐवजासोबत विमा दाव्याची मागणी केली. मात्र विमा कंपनीने दखल घेतली नाही. पुढे विमा कंपनीने दिनांक 30.6.2008 रोजी पत्र पाठवुन कागदपत्रांची पुर्तता केली नाही म्हणुन तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केला. थोडक्यात गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारकर्तीचा दावा नाकारला ही सेवेतील त्रुटी ठरते म्हणुन तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/-, 15 टक्के व्याजासह मिळावे व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/-, व दाव्याचा खर्च रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली. यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं. 1 ने तक्रारकर्तीची सर्व विपरित विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, तक्रारकर्तीने महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे प्रपत्र ड प्रमाणे मागणी करुनही कागदपत्रांची पुर्तता केली नाही म्हणुन तक्रारकर्तीचा दावा फेटाळण्यात आला. तसेच मृतकाचे अपघाताबाबत आपणास कोणतीही सुचना देण्यात आली नाही. तसेच पोलीस स्टेशनमधील तक्रारीबाबत देखील कुठलीही माहीती नसल्याचे नमुद केले. गैरअर्जदार क्रं.2 ने आपल्या कथनात तक्रारकर्तीचे सर्व विधाने अमान्य केले व गैरअर्जदार क्रं.2 हे केवळ विना मोबदला सहाय्य करणारी संस्था आहे. गैरअर्जदार क्रं.2 हे केवळ अर्जदाराचे अर्जाची छाननी करुन, दाव्याच्या कागदपत्रांची योग्य प्रकारे पुर्तता केली अथवा नाही हे बघण्याचे कार्य करते. तसेच दाव्याच्या कागदपत्रांची अर्जदारांकडुन योग्य प्रकारे पुर्तता करुन दावा विमा कंपनीकडे पाठविणे व दाव्यासंबंधी आलेला धनादेश सदरचे अर्जदारास देणे एवढेच कार्य करते. त्यामुळे तक्रारीची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली. तक्रारकर्तीने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार तहसिलदार काटोलचे पत्र, 7/12 ची प्रत, गाव नमुना आठ-अ, वारसदारांचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मृतकाचे बॅक पास बुक, राशन कार्डची प्रत, दावा नाकारल्याचे पत्र, घटनास्थळ पंचानामा, इन्केवेस्ट पंचनामाची प्रत, वाहन चालविण्याचा परवान्याची प्रत, कायदेशिर नोटीसची, डाक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत. तर गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला. परंतु सोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. तक्रारकर्तीचे प्रतिउत्तर दाखल. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री. प्रकाश नौकरकर व गैरअर्जदारातर्फे वकील ए. के.सोमाणी यांनी युक्तिवाद केला. -: कारणमिमांसा :- प्रकरणातील वस्तुस्थितीवरुन असे निर्देशनास येते की, निर्वीवादपणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात वास्तव्य करणा-यांना शेतक-यांकरिता व त्यांचे कुटुंबाचा विचार करुन गैरअर्जदार यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम अदा करुन शेतकरी अपघात विमा काढला होता. निर्वीवादपणे, तक्रारकर्तीच्या मुलाचे सामाईक खात्यात शेत दर्शविलेले आहे. दाखल दस्तऐवजावरुन तो शेती करीत होते असे निर्दशनास येते. गैरअर्जदाराचे म्हणणे की, त्यांनी तक्रारकर्तीचे कधीही दाव्या संबंधीचे दस्तऐवज गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे पाठविलेले नाही. त्यामुळे दावा रक्कम 1 महीन्यात तक्रारदाराला देण्यात आली नाही. परंतु गैरअर्जदार क्रं.2 यांनी आपल्या कथनात प्रस्ताव गैरअर्जदार क्रं. 1 कंपनीला पाठविल्याचे तसेच दिनांक 26.5.2008 रोजी सदरचा दावा नाकारल्याचे नमुद केले आहे. विमा दावा नाकारल्याचे पत्र पाठविल्याचा उल्लेख गैरअर्जदार क्रं.1 इन्श्युरन्स कंपनीच्या प्रतिज्ञापत्रावरील जबाबात केलेला दिसुन येत नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेले दिनांक 26.5.2008 रोजीच्या पत्त्यावरुन गैरअर्जदार क्रं. 1 कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा मयत श्री नरेश हेलोंडे हा केवळ वारसदार (Nominee) आहे. जमीन प्रत्यक्षात त्याच्या वडीलांच्या नावावर आहे या कारणास्तव नाकारला असे दिसुन येते. परंतु कागदपत्र क्रं 12 व कागदपत्र क्रं 13 वरील अनुक्रमे सात बारा व धारण जमीनीची नोंदणी पाहता मयत श्री नरेश ओंकार हेलोंडे यांच्या नावे शेती असल्याचे दिसुन येते. सदर शेती वाटणीच्यावेळेस तो अज्ञान असल्यामुळे मयताचे आईचे नाव पालकर्ता म्हणुन नमुद केल्याचे दिसुन येते. त्यामुळे मयत वारसदार (Nominee) असल्यामुळे तो दावा मिळण्यास पात्र नाही हे गैरअर्जदार यांचे म्हणणे या मंचाला मान्य नाही. वरील वस्तु आणि परिस्थिती पाहता असे लक्षात येते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विमा दावा कोणत्याही आधाराशिवाय अयोग्यरित्या नाकारलेला आहे. ही गैरअर्जदार क्रं. 1 च्या सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दिलेल्या सेवेत कमतरता दिसुन येते नाही म्हणुन त्यांना तक्रारदाराच्या नुकसान भरपाईस जबाबदार धरता येणार नाही. म्हणुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. 2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 1,00,000/- अदा करावे. सदर रक्कमेवर दिनांक 25.6.2008 पासुन प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यत 9 टक्के दराने द.सा.द.शे व्याज द्यावे. 3. मानसिक व शरिरिक त्रासापोटी रुपये 5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- गैरअर्जदार क्रं.1 ने तक्रारकर्तीस द्यावा. 4. गैरअर्जदार क्रं.2 विरुध्द कुठलाही आदेश नाही. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |