नि.30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2276/2009
तक्रार नोंद तारीख : 30/11/2009
तक्रार दाखल तारीख : 16/01/2010
निकाल तारीख : 25/04/2013
----------------------------------------------------
1. श्री विश्वास बंडू चौगुले-जाधव
वय 45 वर्षे, धंदा – नोकरी
2. कु.विजय विश्वास चौगुले-जाधव
वय 15 वर्षे, धंदा – शिक्षण
3. कु.अजय विश्वास चौगुले-जाधव
वय 11 वर्षे, धंदा – शिक्षण
अर्जदार नं.2 व 3 धंदा – शिक्षण
अर्जदार नं.2 व 3 अज्ञान तर्फे पालन
करणार जनक बाप अर्जदार क्र.1
श्री विश्वास बंडू चौगुले-जाधव
सर्व रा.साईनगर, गोटखिंडे प्लॉट,
जोतिबा देवळासमोर, सांगलीवाडी
स.नं.43, ता.मिरज जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. प्रादेशिक व्यवस्थापक
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.
सी-12, एम.आय.डी.सी. औद्योगिक वसाहत
साई जि. सातारा
2. सांगली गॅस सर्व्हिस तर्फे पार्टनर डी.जे.कुत्ते,
व.व.सज्ञान, धंदा-व्यापार
वखारभाग, रॉकेल डेपोजवळ, महावीरनगर,
सांगली
3. शाखाधिकारी
नॅशनल इन्शुरन्स कं.लि.
सांगली हायस्कूलसमोर, महावीरनगर,
सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एच.जी.निकम
जाबदारक्र.1, 2 व 3 तर्फे : अॅड ए.बी.खेमलापुरे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार वर नमूद तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये जाबदार क्र.1 ते 3 यांनी दिलेल्या सदोष ग्राहक सेवेमुळे त्यांचे झालेले नुकसान तसेच तक्रारदार क्र.1 यांची पत्नी व तक्रारदार क्र.2 यांची आई नामे शकुंतला हीचे अपघाती मृत्यूबद्दल, गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटाने तक्रारदारांना झालेल्या औषधोपचाराचा खर्च व त्यांच्या घराचे झालेले नुकसान इ.करिता एकूण रक्कम रु. 13,77,515/- ची नुकसान भरपाई जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून मिळावी या मागणीसाठी दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार जाबदार क्र.1 व 2 यांचे गॅस ग्राहक असून त्यांच्या ग्राहक क्र. 23934 असा आहे. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 यांचे अधिकृत एजंट आहेत. एल.पी.जी. ट्रेडर्स कम्बाईन्ड पॉलीसी ही जाबदार क्र.3 या इन्शुरन्स कंपनीकडे उतरविलेली आहे. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 चे अधिकृत एजंट असल्याने त्यांच्या प्रत्येक कृत्यास जाबदार क्र.1 हे जबाबदार आहेत. त्यामुळे जाबदार क्र.1 ते 3 यांना प्रस्तुत प्रकरणी आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले आहे.
3. तक्रारदार व तक्रारदार क्र.1 ची पत्नी व तक्रारदार क्र.2 व 3 यांची आई शकुंतला हे सर्व साईनगर, गोटखिंडे प्लॉट, जोतिबा मंदीरासमोर, सांगलीवाडी, सर्व्हे नं.43, तालुका मिरज, जि. सांगली येथे आर.सी.सी.बांधकाम असलेल्या घरात रहात होते. सदरचे घराची लांबी रुंदी 60 x 30 फूट आहे. दि.24/2/08 रोजी जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास पुरविलेल्या गॅस सिलेंडर क्र.एसआर 44261 व रेग्युलेटर क्र.ए 458407 या मधून गॅस गळती तक्रारदाराचे घरात झाली. ही गॅस गळती सदरचे गॅस सिलेंडर गंजलेले असल्यामुळे झाली. दि.24/2/208 रोजी सकाळी 6.30 वाजणेचे सुमारास शकुंतला विश्वास चौगुले-जाधव या स्वयंपाकघरात पाणी तापविणेकरिता स्टोव्ह पेटवित असताना पेटत्या काडीमुळे स्फोट झाला व त्या स्फोटात तक्रारदार क्र.1 ते 3 यांना 5 ते 10 टक्के व तक्रारदार क्र.1 यांच्या पत्नी शकुंतला हीस 67 टक्के भाजल्याच्या जखमा झाल्या. स्फोटामुळे तक्रारदाराचे घराचे भिंतीची मोडतोड झाली व स्लॅबला तडे गेले. 40 ते 50 फूट लांब असलेल्या संडास व बाथरुमची दारे मोडली व छप्पर उडून गेले. घरातील सर्व सामानाचे नुकसान झाले. घरातील कपडे, अन्नधान्य, भांडीकुंडी व संसारोपयोगी सर्वसाहित्य अर्धवट स्थितीत जळून नुकसान झाले. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे सदर अपघातास जाबदार क्र. 1 ते 3 हे वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या जबाबदार आहेत, कारण त्यांनी पुरविलेला गॅस सिलेंडर सुस्थितीत नव्हता, गंजलेल्या अवस्थेत होता. जर तो गंजलेल्या अवस्थेत नसता तर सदर गॅस गळती झाली नसती व अपघात झाला नसता. केवळ जाबदार क्र.1 व 2 यांच्या दूषित सेवेमुळे सदरचा अपघात घडलेला आहे. जाबदार क्र.1 व 2 यांनी सदर गॅस गळती किंवा त्यामुळे होणा-या अपघाताबद्दलचा विमा जाबदार क्र.3 यांचेकडे उतरविलेला असल्यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 हे वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या सदर अपघातास जबाबदार आहेत. तक्रारदार क्र.1 ची पत्नी शकुंतला ही 66 टक्के भाजली असल्यामुळे उपचाराचे दरम्यान दि.29/3/2008 रोजी मरण पावली. तिचे उपचाराचा खर्च रक्कम रु.2,83,937/- इतका तक्रारदारास आलेला आहे. तक्रारदार क्र.1 याच्या उपचाराचा खर्च रु.20,235/- इतका आला असून तक्रारदार क्र.2 विजय याच्या औषधोपचाराकरिता रक्कम रु.30,504/- तर तक्रारदार क्र.3 कु.अजय याच्या उपचाराकरिता रक्कम रु.13,200/- इतका खर्च आलेला आहे. एकूण खर्च रक्कम रु.3,46,276/- इतका उपचारावर झालेला आहे. स्फोटामुळे तक्रारदारांना विद्रुपता आलेली आहे, त्याच्या अर्थाजर्नाची क्षमता कमी झाली आहे, आयुष्यभर त्यांना दुःखात काढावे लागणार आहे. तसेच त्यांना भविष्यातदेखील अनेक अडचणी येणार आहेत. त्याबद्दलची नुकसान भरपाई प्रत्येकी रक्कम रु.25,000/- म्हणजे एकूण मिळून रु.75,000/- जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून मिळावा, तक्रारदार क्र.1 यांना पत्नीसुखापासून व तक्रारदार क्र.2 व 3 यांना मातृसुखापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी रु.1 लाख प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम रु.3 लाख इतकी मिळणे आवश्यक आहे. मयत शकुंतला विश्वास चौगुले हीचे अपघातसमयी वय 38 वर्षे होते, ती बी.कॉम. झालेली आहे व घरी शिवणकाम करीत होती तसेच खाजगी क्लासेस घेत होती व तिचे दरमहा उत्पन्न रु.4,000/- ते 5,000/- इतकी इतकी होते. तक्रारदार क्र.1 यांना सन 2003 सालापासून वेळेवर पगार मिळत नव्हता तसेच फेब्रुवारी 2009 पासून तक्रारदार क्र.1 यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे मयत शकुंतला ही तक्रारदारास प्रापंचिक खर्चाकरिता मदत करीत होती. शकुंतलाचे मृत्युमुळे तिच्या सहाय्यतेस तक्रारदार क्र.1 यास वंचित रहावे लागणार असल्यामुळे त्याची नुकसान भरपाई रु.5 लाख मिळण्यास तक्रारदार पात्र आहे.
4. तक्रारदाराचे पुढे म्हणणे असे की, सदर गॅस अपघातामुळे त्याच्या घराचे एकूण नुकसान रक्कम रु.1,11,239/- इतके झाले आहे. त्याबद्दलचा अहवाल तक्रारदारांनी आर्किटेक्ट इंजिनिअर व सरकारमान्य व्हॅल्युअर श्री तायवाडे पाटील यांच्याकडून करुन घेतलेला आहे. दि.25/8/2008 रोजी तक्रारदार जाबदार क्र.2 यांच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जावून नुकसान भरपाईची लेखी व तोंडी मागणी केली व त्याची प्रत जाबदार क्र.1 यांना पोस्टाने पाठविली. तथापि जाबदार क्र.1 व 2 यांनी सदर अर्जास उत्तर देण्याचे सौजन्य दाखविलेले नाही किंवा नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यानंतर दि.10/11/08 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांचेकडे रितसर लेखी अर्ज देवून नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावर नुकसान भरपाई आज देतो, उद्या देतो असे म्हणून जाबदारांनी टाळाटाळ केली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदाराने जाबदार क्र.2 कडे सर्व कागदपत्रे वेळोवेळी हजर केली आहेत, तथापि अद्यापही नुकसानीची रक्कम जाबदारांनी दिलेली नाही. अशा प्रकारे जाबदारांनी तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रास दिलेला आहे, त्याकरिता प्रत्येकी रु.10,000/- प्रमाणे तक्रारदार क्र.1 ते 3 यांना एकूण रु.30,000/- शारिरिक मानसिक त्रासाकरिता मिळणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र.3 यांचेकडे दि.26/8/2009 रोजी अर्ज करुन नुकसान भरपाईची मागणी केली परंतु जाबदार क्र.3 यांनी देखील तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही. म्हणून शेवटचा उपाय म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करण्यास कारण दि.24/2/2008 रोजी प्रथम घडले तसेच दि.29/3/2008 रोजी जाबदार क्र.1 ची पत्नी शकुंतला ही मयत झाली त्यादिवशी घडले. त्यानंतर वेळोवेळी जाबदारांकडे नुकसान भरपाईची लेखी व तोंडी मागणी केली, ती मागणी जाबदारांनी मान्य केली नाही, त्या त्या दिवशी घडले. अशा कथनांवरुन तक्रारदारांनी वर नमूद केलेल्या रकमेची मागणी केलेली आहे.
सदरच्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदार क्र.1 यांनी आपले शपथपत्र नि.3 ला दाखल करुन नि.5 च्या फेरिस्तसोबत एकूण 21 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. जाबदार क्र.1, जाबदार क्र.2, व जाबदार क्र.3 यांनी त्यांच्या लेखी कैफियती अनुक्रमे नि.24, 19 व 20 ला दाखल केलेल्या आहेत. जरी त्या लेखी कैफियती वेगवेगळया असल्या तरी त्यातील संबंधीत जाबदारची केस ही एकसारखीच आहे. त्यामुळे प्रत्येक जाबदारांचे बचावाचे मुद्दे वेगवेगळे मांडणे विस्तारव्ययापोटी टाळलेले आहे. तिनही लेखी कैफियतींचा सार असा आहे की, जाबदार क्र.1 ते 3 हे मान्य करतात की, जाबदार क्र.2 या गॅस एजन्सीकडून तक्रारदारांनी गॅस कनेक्शन घेतलेले होते. दि.24/2/2008 रोजी तक्रारदारांच्या घरात घडलेल्या गॅस स्फोटाची घटना तीनही जाबदारांनी मान्य केली आहे. त्या गॅस स्फोटामध्ये तक्रारदाराची पत्नी मयत झाली ही गोष्ट जाबदारांनी अमान्य केलेली नाही. तथापि तक्रारदार त्या स्फोटात जखमी झाले, ते विद्रुप झाले, त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आपल्या उपचारावर खर्च करावा लागला तसेच तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मयत शकुंतला हीचे औषधोपचारावर खर्च करावा लागला या बाबी जाबदारांनी स्पष्टपणे अमान्य केलेल्या आहेत. जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.3 विमा कंपनीकडे एल.पी.जी. ट्रेडर्स कम्बाईन्ड विमा उतरविलेला होता ही बाब जाबदारांनी मान्य केली आहे. तथापि, तिनही जाबदारांनी ही गोष्ट स्पष्टपणे अमान्य केली आहे की, तक्रारदाराच्या घरात बसविण्यात आलेला गॅस सिलेंडर हा गंजका होता व त्यामुळे तक्रारदाराच्या घरात गॅस गळती झाली व त्यायोगे जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली. जाबदारांनी असेही स्पष्टपणे म्हटले आहे की, तक्रारदारांनी मागणी केलेल्या रकमा या सर्व अवाजवी व अवास्तव आहेत. तक्रारदारांचे घरास देखील सदर स्फोटामुळे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नुकसान झाले व ते नुकसान रक्कम रु.1,11,239/- इतक्या रकमेचे होते ही बाब देखील तिनही जाबदारांनी स्पष्टपणे नाकारलेली आहे. जाबदारांचे म्हणणयाप्रमाणे तक्रारदार हे त्यांना पुरवठा करण्यात आलेल्या गॅस सिलेंडर सुरक्षेचे नियम न पाळता व त्याबाबतच्या सुचनांचे न पालन करता वापरत होता. जाबदारचे कथनाप्रमाणे तक्रारदार हे या मंचासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही. प्रत्येक गॅस ग्राहकाची ही जबाबदारी असते की, त्यांना पुरवठा करण्यात आलेला प्रत्येक गॅस सिलेंडर हा त्याबाबतीतील सुरक्षा नियमांचे आणि सुचनांचे पालन करुन वापरावा, त्याबाबत जाबदार क्र.1 आणि त्यांचे वितरक, यांमध्ये जाबदार क्र.2 यांचा समावेश होतो, हे वेळोवेळी सार्वत्रिकरित्या जाहीराती, सावधगिरी, पाळावयाच्या सूचना या वेगवेगळया वृत्तपत्रामध्ये, टी.व्ही. चॅनेलवर प्रसारित करीत असतात. तसेच त्यांच्या कार्यालयात देखील ग्राहकांच्या माहितीकरिता या सावधगिरीच्या सूचना लावलेल्या असतात. सदर सावधगिरीच्या सूचना प्रत्येक ग्राहकाला व्यक्तीशः त्याच्या ओळखपत्रासोबत दिलेल्या असतात. प्रत्येक गॅसवितरक, त्यात जाबदार क्र.2 यांचा समावेश होतो, हा सर्व ग्राहकांना मान्यताप्राप्त गॅस शेगडी गॅस पाईप इ. विकत घेण्याचे आव्हान करीत असतो. मान्यताप्राप्त पाईप, शेगडी इत्यांदीपासून गॅस गळती होण्याचे प्रमाण अत्यल्प असते व त्यामुळे गॅस अपघात टाळता येतो. प्रस्तुत प्रकरणातील स्फोटानंतर जाबदार क्र.1 कंपनीने नेमलेल्या घटनेचा तपास करणा-या पथकाचे अहवालावरुन व घटनास्थळाच्या घेतलेल्या फोटोंवरुन असे दिसते की, तक्रारदाराचे घरी देण्यात आलेला गॅस सिलेंडर हा अनाधिकृतरित्या स्टीलच्या टी पाईपने 2 गॅस शेगडयांना जोडलेला होता. ही अनाधिकृत जोडणी करताना तक्रारदाराने सुरक्षा रेग्युलेटर यांना बायपास केले होते. अशा प्रकारच्या अनाधिकृत एल.पी.जी. गॅस कनेक्शन आणि साध्या रबरी नळीचा वापर हा तक्रारदारांना त्यांना दिलेल्या कनेक्शनमध्ये अनाधिकृतरित्या हस्तक्षेप करणारा होता. जाबदार क्र.1 व 2 यांनी मान्य केलेली गॅस रबरी पाईप ही तक्रारदाराने वापरलेली नव्हती. तक्रारदाराने केवळ सर्वसाधारण रबरी पाईप त्याच्या गॅस कनेक्शनला जोडलेले होती. एका गॅस सिलेंडरला टी पाईपच्या सहाय्याने दोन गॅस स्टोव्ह, यात अनुक्रमे एक बर्नर व दोन बर्नर, असे जोडलेले होते. अशा प्रकारची जोडणी ही सुरक्षेबद्दलच्या नियमांचे ढळढळीत उल्लंघन होते. अनाधिकृत सर्वसाधारण रबरी पाईप व अनाधिकृत व बेकायदेशीर स्टीलच्या टी पाईप यांना रेग्युलेटर बायपास केले गेले होते. त्यामुळे सदर ठिकाण गॅस सिलेंडर मधून गॅस गळती होण्यास कारणीभूत झालेले होते. या सर्व बाबी पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यामध्ये आढळून येतात. तक्रारदारांनी या सर्व बाबी जाणुनबूजून सदर मंचापासून लपवून ठेवल्या आहेत. तपासानंतर पोलिसांनी काढलेला निष्कर्ष आणि स्फोटाचे कारणांचा निष्कर्ष हे देखील तक्रारदाराने जाणुनबुजून मंचापसून दडवून ठेवलेला आहे. तक्रारदाराचे गैरकृत्य, गॅसचा अनाधिकृत वापर आणि त्यामुळे झालेला अपघात याच्या बातम्या वेगवेगळया दैनिकामध्ये प्रसिध्द झाल्या आणि त्यावरुन जाबदार क्र.1 ने सदर घटनेची चौकशी व तपास आपल्या स्तरावर केला आणि त्यावरुन तक्रारदारांनी जे सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे ते दिसून आले. सदरचा अपघात हा तक्रारदाराच्या स्वतःच्या बेकायदेशीर व त्यांच्या चुकीमुळे झाला असून त्याकरिता जाबदार क्र.1 व 2 यांना जबाबदार धरण्यात येऊ शकत नाही. सदरचा अपघात हा एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा गैरवापर तक्रारदार यांनी केल्यामुळे झाला आहे. जो गॅसग्राहक सुरक्षा नियमांचे पालन करीत नाही आणि मान्यताप्राप्त साधने वापरीत नाही, तो व्यक्ती आणि संपत्ती यांना होणा-या नुकसानीची जोखीम घेत असतो. अशा अनाधिकृत साधनांचा वापर व गॅस कनेक्शनमध्ये अनाधिकृत फेरबदल यामुळे गॅस ग्राहक याचे कुटुंब आणि त्याची संपदा यांना धोका निर्माण होतो आणि त्याकरिता जाबदारांना जबाबदार धरता येत नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.1 व 2 हे तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. प्रस्तुत प्रकरणामध्ये संपूर्ण घटनेची जबाबदारी ही तक्रारदारावरच येते. सदरची घटना संपूर्णतया तक्रारदाराच्या चुकीमुळे घडलेली आहे. त्यामुळे तक्रादारांना जाबदारांकडून कोणतीही भरपाई मागता येत नाही. जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार त्यांचेविरुध्द खारीज करणे योग्य ठरेल.
6. जाबदार क्र. 3 विमा कंपनी यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराने अनाधिकृत साधनांचा वापर करुन त्यास देण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचा गैरवापर केला व त्यामुळे सदरचा अपघात झाल्यामुळे विमा पॉलिसीच्या अटींचा भंग तक्रारदाराने केला, त्यामुळे जाबदार क्र.3 विमा कंपनी देखील तक्रारदारास कोणतीही भरपाई देणे लागत नाहीत. अशा कथनांवरुन तिनही जाबदारांनी प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केली आहे.
7. जाबदार क्र.2 यांनी आपल्या लेखी कैफियतीसोबत नि.23 च्या यादीने एकूण 2 कागदपत्रे, ज्यात एल.पी.जी. ट्रेडर्स इन्शुरन्स पॉलिसीची प्रत आणि गैस वापरासंबंधीचे सुरक्षा नियमांची पुस्तिका यांचा समावेश आहे, अशी दाखल केलेली आहेत. त्यासोबत जाबदार क्र.1 कंपनीने नि.27 सोबत घटनेनंतर त्यांनी केलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे व प्रगतीचा अहवाल दाखल केलेला आहे. त्यासोबत नि.28 ला सहाय्यक विक्री व्यवस्थापक (एल.पी.जी.) श्रीमती माया संतोष गुरसाळे यांचे नि.28 ला शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराने नि.3 सोबत एकूण 11 कागदपत्रे, ज्यामध्ये त्याने वेळोवेळी घेतलेल्या उपचाराचे प्रिस्क्रीप्शन्स, औषधे विकत घेतल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत.
8. प्रस्तुत प्रकरणात कोणाही पक्षकाराने तोंडी पुरावा दिलेला नाही. तक्रारदारतर्फे त्यांच्या विद्वान वकीलांनी नि.32 ला आपला लेखी युक्तिवाद सादर केलेला असून नि.29 ला पुरसिस दाखल करुन नि.32 ला याशिवाय तोंडी युक्तिवाद करावयाचा नाही असे लिहून दिलेले आहे. जाबदार क्र. 1 ते 3 यांच्या वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद नि.31 ला हजर केलेला असून त्यांनी आमचे समोर तोंडी युक्तिवाद देखील सादर केलेला आहे.
9. दोन्ही बाजूंचे पक्षकथन, त्यांनी हजर केलेली कागदपत्रे व सादर केलेला युक्तिवाद यांवरुन खालील मुद्दे आपल्या निष्कर्षाकरीता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. दि.24/2/08 ची घटना ही जाबदारांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे
घडली आहे ही बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेले त्याचे नुकसान शाबीत केले
आहे काय ? नाही.
3. सदर नुकसानीस जाबदार क्र. 1 ते 3 जबाबदार असून त्यांची
भरपाई करण्यास जाबदार क्र.1 ते 3 जबाबदार आहेत काय ? नाही.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
मुद्दा क्र.1 ते 4
10. सदर घटनेमध्ये तक्रारदार हे जाबदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत ही बाब कोणीही अमान्य केलेली नाही. तक्रारदार जाबदार क्र.1 कंपनीचे गॅस ग्राहक आहेत ही बाब सर्व जाबदारांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक होतो काय हा सर्वसाधारणपणे निर्माण होणारा मुद्दा प्रस्तुत प्रकरणात उपस्थित होत नाही. त्यामुळे हा मुद्दा वेगळा काढण्यात आला नाही. तसा मुद्दा काढणे आवश्यक जरी असले तरी त्याचे उत्तर प्रस्तुत प्रकरणात होकारार्थी द्यावे लागेल.
11. आम्ही हे वर नमूद केले आहे की, दि.24/2/08 रोजी तक्रारदाराच्या घरामध्ये गॅसगळती होवून स्फोट झाला व त्यात तक्रारदार क्र.1 ची पत्नी जखमी होवून ती पुढे मरण पावली ही बाब जाबदारांनी मान्य केली आहे. तथापि सदर घटनेबद्दल तक्रारदार जाबदार क्र.1 व 2 यांना जबाबदार धरतात तर जाबदारांचे म्हणण्याप्रमाणे सदरची घटना सुरक्षा नियमांचे पालन न करता व अनाधिकृतरित्या मान्यताप्राप्त साधनांचा वापर तक्रारदारांनी केल्यामुळे सदर गॅस गळतीची घटना घडली, त्यामुळे त्या घटनेस तक्रारदार सर्वसाधारण जबाबदार आहेत आणि जाबदारांनी कोणतीही सदोष सेवा तक्रारदारांना दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदारकडून कोणतीही भरपाई मिळण्याचा हक्क नाही.
12. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे झालेली गॅस गळती ही त्यांना पुरविण्यात आलेल्या गॅस सिलेंडर हा गंजका असल्यामुळे झालेली होती. गॅस सिलेंडर गंजका असल्याने याशिवाय गॅस गळतीकरिता दुसरे कुठलेही कारण तक्रारदाराने दिलेले नाही. प्रस्तुत संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रारदाराने असा कोणताही पुरावा दिलेला नाही की, त्यांना पुरविण्यात आलेला गॅस सिलेंडर किंवा रेग्युलेटर हा गंजका होता आणि त्यातून गॅस गळती होणे स्वाभाविक आहे. प्रस्तुत कथनाचे शाबितीकरणाची जबाबदारी ही संपूर्णतया तक्रारदाराची होती. तशी ती तक्रारदाराने या प्रकरणामध्ये पुरावा दाखल करुन पार पाडलेली नाही.
13. हे वर नमूद केलेले आहे की, जाबदार क्र.1 तर्फे नि.27 सोबत सदर घटनेचा जाबदार क्र.1 ने केलेला तपास व त्याचा अहवाल जाबदार क्र.1 ने दाखल केला असून त्या अहवालाचे पुष्ठयर्थ नि.28 ला श्रीमती माया गुरसाळे, सहायक व्यवस्थापक (सेल्स) यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सदर श्रीमती गुरसाळे यांनी आपले शपथपत्रात शपथेवर असे सांगितलेले आहे की, तक्रारदार हा जाबदार क्र.1 या गॅस कंपनीचा स्थानिक वितरक सांगली गॅस सर्व्हिसेस (जाबदार क्र.2) मार्फत ग्राहक होतात. सदर स्थानिक वितरक मे.सांगली गॅस सर्व्हिसेस (जाबदार क्र.2) यांना दि.24/2/08 रोजी तक्रारदाराचे घरी झालेल्या घटनेसंबंधी अहवाल सादर केल्यानंतर सदर साक्षीदार स्वतः घटनास्थळी दि.26/2/2008 रोजी गेले व त्यांनी सदर घटनास्थळी ठेवलेले गॅस सिलेंडर गॅस शेगडी दाबनियंत्रक (Special Regulator ),त्यांना लावलेले अनाधिकृत रबरी पाईप्स, अनाधिकृत टी जॉइंट इत्यादींचे निरिक्षण केले आणि फॉर्म नं.ए आणि फॉर्म नं.बी या विहीत नमुन्यात दि.26/2/08 रोजी सदर घटनेबद्दल वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. सदरचा अहवाल याकामी नि.27 ला दाखल केला असून त्यावरील आपली सही श्रीमती गुरुसाळे यांनी ओळखली असून त्यातील मजकूर खरा असल्याबद्दल शपथेवर सांगितले आहे. श्रीमती गुरसळे यांनी आपल्या शपथपत्रात असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर घटनास्थळी गॅस गळती ही अनाधिकृत निकृष्ट दर्जाच्या हिरव्या रबरीपाईपमुळे व अनाधिकृतरित्या जोडलेल्या टी जॉइंट यामध्ये भरपूर भेगा असल्यामुळे झाली. त्यांनी पुढे असेही शपथेवर नमूद केले आहे की, गॅस सिलेंडर आणि प्रेशर रेग्युलेटर हे व्यवस्थित व सुस्थितीत होते व काम करु शकत होते व त्यामध्ये कोणताही दोष नव्हता. या संपूर्ण शपथपत्राला तक्रारदाराने कसलेही आव्हान दिलेले नाही. तक्रारदाराने श्रीमती गुरुसाळे यांना उलटतपासणीकरीता देखील बोलाविलेले नाही. किंवा त्यांच्या पुराव्यास शह देणारा सक्षम असा पुरावा देखील या मंचासमोर आणलेला नाही. श्रीमती गुरुसाळे यांनी नि.27 सोबत दाखल केलेला फॉर्म ए व फॉर्म बी मधील तपासाचा अहवाल यातील मजकूराबरहुकूम आपला पुरावा दिलेला आहे. त्या पुराव्यास तक्रारदाराने कोणतेही आव्हान दिलेले नाही. त्यामुळे त्या अहवालातील एकूण मजकूर हा शाबीत झालेला आहे असे म्हणावे लागेल. येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की. तक्रारदाराचे विद्वान वकीलांनी आपल्या युक्तिवादामध्ये असे प्रतिपादन केले आहे की, पोलिसांनी किंवा गॅस कंपनीच्या अधिका-यांनी घटनास्थळाचे निरिक्षण करीत असताना तक्रारदार दवाखान्यात होता व त्याच्या माघारी पंचनामा आणि सदर अहवाल तयार करण्यात आला असून त्यात काय मजकूर लिहिला होता हे तक्रारदारांना माहिती नव्हते. त्यामुळे सदरचा अहवाल आणि पोलिसांनी तयार केलेला पंचनामा हा ग्राहय धरण्यात येवू नये. तक्रारदाराच्या विद्वान वकीलांनी वरील युक्तिवादामध्ये सदरच्या तपास अहवालातील मजकुरातून निसटण्याचा एक केविलवाणा प्रयत्न दिसतो. जाबदारांनी खोटा अहवाल तयार करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. याउलट तक्रारदारांच्या तक्रारीतील म्हणणे की, गॅस सिलेंडर गंजका होता म्हणून गॅस गळती झाली, हे कथन सर्वथा अयोग्य वाटते कारण जर गॅस सिलेंडर गळका असता तर ज्यादिवशी गॅससिलेंडर तक्रारदाराच्या घरी बसविण्यात आला, त्या दिवसापासून तक्रारदाराच्या घरी गॅस गळती झाली असती. लोखंडी वस्तूच्या गंजण्याची प्रक्रिया ही फार धीमी प्रक्रिया असते. ती एकाएकी होत नाही. त्यामुळे नेमके दि.24/2/08 रोजी झालेली गॅस गळती ही सिलेंडर गंजल्यामुळे झाली हे म्हणणे मान्य करता येत नाही. ज्याअर्थी तक्रारदाराचे मान्यवर विद्वान वकील असे विधान करतात की, तपासणी अहवालामध्ये श्री गुरसाळे यांनी आणि घटनास्थळाचे पंचनाम्यामध्ये पोलिसांनी काय नमूद केले आहे हे तक्रारदारोन माहिती नाही, त्याअर्थी असे म्हटले जाऊ शकते की, तक्रारदारांना सदर पंचनाम्यामध्ये व तपास अहवालामध्ये काय लिहिले होते याची स्पष्ट कल्पना होती आणि त्या घटनेची जबाबदारी नाकारण्याकरिता म्हणून त्याने एक केविलवाणा प्रयत्न आमच्या समोर केला आहे. तपास अहवालाच्या फॉर्म ए मधून हे स्पष्ट दिसते की, घटनेच्यावेळी एका गॅस सिलेंडरमधून दोन गॅस शेगडयांना टी जॉइंट मार्फत आणि हिरव्या रंगाच्या स्थानिकरित्या उत्पादित केलेल्या रबराच्या पाईपने दोन शेगडयांना गॅस पुरवठा केला जात होता आणि त्यातील एक गॅस शेगडी ही किचन कट्टयावर होती आणि एक गॅस शेगडी खाली जमीनीवर ठेवलेली होती आणि ही रबराची पाईप ही सुस्थितीत नव्हती. सदर अहवालातून पुढे असेही दिसते की, सदरच्या हिरव्या रंगाच्या पाईप्स या 4/5 वर्षे जुन्या होत्या, त्यावर आय.एस.आय.मार्क नव्हता आणि त्या पाईपमधून दोन ठिकाणांवरुन गॅस गळती होताना तपासावेळी दिसून आले. सदर अहवालातून असे दिसते की, त्या रबरी पाईपचा जो भाग गॅस सिलेंडर आणि टी जॉइंट यांना जोडलेला होता, त्यात पुष्कळ भेगा होत्या. याचा अर्थ असा होतो की, जी काही गॅसगळती झाली, ती गॅस गळती 4/5 वर्षे जुनी असलेल्या स्थानिकरित्या उत्पादित केलेल्या अनाधिकृत दुय्यम दर्जाच्या रबरी पाईपला पडलेल्या भेगांमुळे झाली. या पुराव्याला शह देण्याकरिता इतर कोणताही विश्वासार्ह पुरावा तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे श्रीमती गुरसाळे यांचे शपथपत्र, नि.27 सोबत दाखल केलेला त्यांचा तपास अहवाल हा ग्राहय पुरवा म्हणून मान्य करावा लागेल आणि त्यातून हे सुस्पष्टपणे सिध्द होते की, प्रस्तुत प्रकरणातील अपघात हा दुययम दर्जाच्या रबरी पाईप, व अनाधिकृतरित्या उत्पादित केलेल्या दुय्यम दर्जाच्या रबरी पाईप आणि टी जॉइंट च्या सहाय्याने केलेली अनाधिकृत जोडणी यामुळे झाला. सबब सदर अपघातास/गॅस गळतीस कोणत्याही प्रकारे जाबदार क्र.1 व 2 यांना जबाबदार धरता येत नाही. त्या गॅसगळतीस व अपघातास सर्वस्वी तक्रारदाराचा निष्काळजीपणा व अयोग्य व अवैधरित्या केलेली जोडणी व दुय्यम दर्जाच्या उपकरणांचा वापर हेच जबाबदार आहेत. त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 किंवा जाबदार क्र.3 यांनी कोणतीही सदोष सेवा तक्रारदारांना दिली नाही असे म्हणावे लागेल. सबब वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.1 याचे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
14. ज्याअर्थी सदर अपघातास तक्रारदार हे स्वतः जबाबदार आहेत, त्याअर्थी त्यांना जाबदार कंपनीकडून कोणतीही भरपाई मिळू शकत नाही. जाबदारांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा पुरविलेली दिसत नाही. सबब जाबदार क्र.1 ते 3 तक्रारदारांना काहीही देणे लागत नाहीत. तक्रारदारांनी जाबदारकडून कोणतीही नुकसान भरपाई मागण्याचा हक्क नाही किंबहुना त्यांना झालेल्या नुकसानीस तक्रारदार स्वतःच जबाबदार आहेत. केवळ या कारणास्तव सदर घटनेमध्ये तक्रारदारांचे काय नुकसान झाले व किती नुकसान झाले हा प्रश्न याठिकाणी शिल्लक रहात नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेली त्या संबंधीची नि.30 सोबतची सर्व कागदपत्रे ही अर्थहीन ठरतात व त्या कागदपत्रांचा विचार करण्याची आवश्यकता भासत नाही. त्याकरिता वर नमूद केलेल्या मुद्दा क्र. 2 व 3 यांचे उत्तर आम्ही नकारार्थी दिलेले आहे.
15. वरील सर्व कारणांकरिता आणि नुकसानीमुळे तक्रारदारांची तक्रार खारिज करणे क्रमप्राप्त आहे असे आम्ही घोषीत करतो व खालील आदेश पारीत करतो.
- आ दे श -
1. सदरची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2. प्रस्तुत प्रकरणातील स्थितीमुळे दोन्ही पक्षकारांनी आपापला खर्च सोसावयाचा आहे.
सांगली
दि. 25/04/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष