नि.२२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ९४७/२००८
---------------------------------------
तक्रार अर्ज नोंद तारीख – २६/०८/२००८
तक्रार दाखल तारीखः – ०८/०९/२००८
निकाल तारीखः - ०३/०२/२०१२
----------------------------------------
सौ मालन भिम सातपुते
वय वर्षे – ५०, व्यवसाय– मजूरी
रा.बेळंकी, ता.मिरज जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
रिजनल क्लेम मॅनेजर
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
पुष्प प्लाझा, ग्राऊंड फलोअर, १३५ बी,
ताडीवाला रोड, पुणे – ४११ ००१ ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : +ìb÷. श्री ए.एस.चंद
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री ए.बी.खेमलापुरे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या पशु विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार ही शेतकरी असून तिने देना बॅंक शाखा बेळंकी यांचेकडून कर्ज काढून दि.१/२/२००७ रोजी गाय खरेदी केली होती. सदर गायीचा जाबदारांच्याकडे विमा उतरविला होता. तक्रारदार यांची गाय दि.२५/८/२००७ रोजी मयत झाली. गाय मयत झाल्याचे तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.२७/८/२००७ रोजी तार करुन कळविले. तत्पूर्वी तक्रारदार यांनी सलगर येथील सरकारी दवाखान्यातील डॉ सावंत यांचेकडून सदर गायीचे पोस्ट मॉर्टेम करुन फोटो काढून पंचनामा केला व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु जाबदार यांनी क्लेम फॉर्मच पाठविला नाही या कारणास्तव नुकसान भरपाई दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी क्लेम फॉर्मची झेरॉक्स उपलब्ध करुन घेवून दि.३/११/२००७ रोजी सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म जाबदार कंपनीकडे पाठविला. जाबदार यांनी दि.२०/११/२००७ रोजी आणखी कागदपत्रांची पूर्तता करण्याविषयी कळविले. त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली. तसेच दि.२६/६/२००८ रोजी पत्र व्यवहार केला. परंतु जाबदार यांनी गायीच्या विमा रकमेबाबत काही कळविले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज विमा दाव्याची रक्कम मिळणेसाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने ८ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.१५ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूरही अमान्य केला आहे. तक्रारदार यांची गाय दि.२५/८/२००७ रोजी मयत झाल्याचा मजकूरही जाबदार यांनी अमान्य केला आहे. तक्रारदार यांनी दि.३/११/२००७ रोजी क्लेम फॉर्मची झेरॉक्सप्रत पाठविली व जाबदार यांनी जादा कागदपत्रांची मागणी केली हा मजकूरही जाबदार यांनी अमान्य केला आहे. तक्रारदार यांनी गाय मयत झालेनंतर गायीच्या मृत्यूबाबत विलंबाने कळविले असल्यामुळे त्याबाबत साशंकता निर्माण होते. तक्रारदार यांनी विलंबाने कळविल्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला. तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे ही बनावट आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
४. जाबदार यांनी नि.१६ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच जाबदार यांनी नि.२१ चे यादीने पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांनी कोणताही लेखी युक्तिवाद दाखल केला नाही.
५. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले. जाबदार यांनी याकामी नि.२१/१ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीच्या प्रतीवरुन तक्रारदार यांनी त्यांच्या गायीचा रक्कम रु.१५,०००/- चा विमा उतरविला होता व सदर विम्याचा कालावधी हा ३१ जानेवारी २००७ ते ३० जानेवारी २०१० असा आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी त्यांच्या गायीचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला असताना व त्याबाबतची पॉलिसीची प्रत जाबदार यांनी दाखल केली आहे असे असताना जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्याच्या परिच्छेद २ मध्ये It is also denied that the cow was allegedly insured with this respondent. असा मजकूर नमूद करणे अनाकलनीय आहे. पॉलिसी उतरविलेपासून एक वर्षाचे आत दि.२५/८/२००७ रोजी तक्रारदार यांचे गायीचा मृत्यू झालेला आहे यावरुन तक्रारदार यांचे गायीचा विमा कालावधीत मृत्यू झाला आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी विमा दावा नाकारल्याचे पञ तक्रारदार यांनी नि.५ चे यादीने दाखल केले आहे. त्यामध्ये विमा दावा नाकारताना पॉलिसीमधील अट क्र.६ चा भंग झाला या कारणास्तव विमादावा नाकारल्याचे कळविले आहे. पॉलिसीतील अट क्र.६ नमूद करताना जाबदार यांनी विमाकृत जनावर मयत झाल्यानंतर २४ तासांच्या आत जाबदार कंपनीस कळविणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.२७/८/२००७ रोजी तार केल्याचे नमूद केले आहे व तार केल्याबाबतची पावती दाखल केलेली आहे. सदर तार आपल्याला मिळाली अथवा कसे याबाबत जाबदार यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. जाबदार यांनी नि.२१ सोबत पॉलिसी दाखल करताना त्यासोबत पॉलिसीतील अटी व शर्तीची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीची प्रत जी तक्रारदारांना देण्यात येते त्यामध्ये जनावर मयत झाल्यानंतर तात्काळ विमा कंपनीस कळविणे गरजेचे आहे असे नमूद नाही. सदरची बाब ही जाबदार यांचेकडे असलेल्या पॉलिसीतील अटी व शर्तीमध्ये नमूद आहे. परंतु सदरच्या अटी व शर्ती तक्रारदार यांना ज्ञात आहेत असे म्हणता येणार नाही. याठिकाणी लक्षात घेणेसारखी बाब म्हणजे पॉलिसीवर नमूद असलेल्या डॉ बी.एस.सावंत यांनीच तक्रारदार यांच्या गायीचे पोस्ट मॉर्टेम गाय मयत झाली त्यादिवशी केले आहे त्यामुळे केवळ जाबदार यांना विलंबाने कळविले हे एकच कारण तक्रारदार यांचा विमादावा नाकारण्यास पुरेसे नाही त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा ज्या कारणासाठी नाकारला, ते कारण संयुक्तिक वाटत नाहीत. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी विमा प्रस्ताव पाठविल्याची बाबही नाकारली आहे. जाबदार यांचे या कथनाचा विचार करता तक्रारदार यांनी विमा प्रस्तावच जर पाठविला नसता तर जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा दि.१२/११/२००७ रोजी कशाच्या आधारे नाकारला हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला मृत्यूचा दाखला, शवविच्छेदन अहवाल इ. कागदपत्रे सादर केली आहेत, त्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे त्यामुळे तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम रु.१५,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.१२/११/२००७ पासून व्याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
६. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्य कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना गायीच्या विमा दाव्यापोटी रक्कम रु.१५,०००/-
( अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त ) दि.१२/११/२००७ पासून द.सा.द.शे. ९
टक्के दराने व्याजासह अदा करावेत.
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा
करावेत.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.१८/३/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. ०३/०२/२०१२
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०१२.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०१२.