::: आ दे श ::
( पारित दिनांक : 30/11/2016 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्त्याकडे वाहन क्र. एम.एच. 37-जी-4446 आहे. सदर वाहनाचा अपघात विमा विरुध्द पक्षाकडे उतरविलेला आहे. विमा पॉलिसी दिनांक 12/07/2013 ते 11/07/2014 पर्यंत वैध होती. परंतु सदरहु गाडीचा दिनांक 02/06/2014 ला अपघात झाला. सदरहू अपघाताची नोंद पोलीस स्टेशन, मालेगाव यांनी सा.ना.नं. 22/2014 प्रमाणे नोंदविली व सदर प्रकरणाची चौकशी केली.
सदरहू अपघाताबाबत विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याने कळविले. त्यावरुन सर्व्हेअर यांनी गाडीची पाहणी केली व गाडी दुरुस्तीकरिता गद्रे अॅटोकॉंन प्रा.लि.अकोला यांच्याकडे टाकण्यात आली. गाडी दुरुस्तीकरिता एकूण रुपये 1,94,244/- एवढा खर्च आला तसेच ती गाडी मालेगांव वरुन अकोला येथे नेण्याकरिता रुपये 5,000/- खर्च आला. त्याबाबतचा दावा आवश्यक कागदपत्रांसह विरुध्द पक्षाकडे दाखल करण्यांत आला. परंतु सदरहू दावाअर्ज विरुध्द पक्षाने दिनांक 2/08/2014 रोजीचे पत्राने नामंजूर केला. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली, व विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास वाहनाचे दुरुस्तीचा खर्च रुपये 1,94,244/- व गाडी मालेगांव वरुन अकोला येथे नेण्याकरिता आलेला खर्च रुपये 5,000/- व्याजासह देण्यात यावेत तसेच मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा, योग्य व न्याय दाद तक्रारकर्त्याच्या हितावह देण्यात यावी, अशी प्रार्थना केली. सदर तक्रारीसोबत निशाणी-3 प्रमाणे एकंदर 6 दस्त पुरावा म्हणून दाखल केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जबाब - विरुध्द पक्षाने निशाणी 10 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 1 मधील मजकूराबाबत वाद नाही. परंतु त्यानंतर दिनांक 02/06/2014 ला नमूद केलेल्या गाडीचा अपघात झाला यावरुन पोलीस स्टेशन अधिकारी, मालेगांव यांनी साना क्र. 22/2014 दिनांक 02/06/2014 रोजी नोंदविला, याबाबत वाद नाही. दिनांक 02/08/2014 रोजी विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रजिष्टर पोष्टाने पत्र पाठविले, त्यातील मजकूर हा प्रत्यक्ष घटनेशी संबंधीत असल्यामुळे तो बरोबर आहे. त्या पत्रानुसार तक्रारकर्ता हे सदरहू विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत, हे सदरहू पत्राने कळविल्यामुळे, सदरहू नुकसान भरपाई देण्यास विरुध्द पक्ष बंधनकारक नाहीत. तक्रारकर्त्याचे उर्वरीत म्हणणे फेटाळले.
विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, दिनांक 02/06/2014 रोजी म्हणजे घटनेच्या दिवशी सदरहू अपघातावेळी ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून प्रफुल्ल नामदेवराव पारसकर हे गाडी चालवित होते व अपघात झाल्यानंतर त्यांनी स्वतः सदरहू घटनेची माहिती पोलीस स्टेशन मालेगांव येथे साना क्र. 22/2014 प्रमाणे देऊन घटनेची नोंद केली. त्यावेळी सदरहू गाडी तेच चालवित होते, असे त्यांनी त्यांच्या जबानीमध्ये सांगीतले. तेंव्हा वाहन कायद्याप्रमाणे वाहन चालविण्याकरिता वैध परवाना असणे कायदयाने बंधनकारक आहे. तेंव्हा घटनेचे दिवशी प्रफुल्ल नामदेव पारसकर यांचा वाहन चालकाचा परवाना हा वैध नव्हता त्यामुळे जर एखादी गाडी कोणी स्वतःहून चालवित असेल किंवा मालवाहू गाडी कोणाला चालविण्यास दिली असेल तर, मोटर वाहन कायद्याचे कलम क्र. 75 (2) नुसार मोटर वाहन चालविणे हा गुन्हा आहे. तसेच जर अपघातानंतर विमा क्लेम करावयाचा असल्यास रुल 3 सेंट्रल मोटर व्हेईकल्स रुल 1989 नुसार जर मोटर चालविण्याचा परवाना नसेल तर संबंधीत विमाधारक हा विम्याप्रमाणे नुकसान भरपाई मागण्यास अपात्र ठरतो. तक्रारकर्ता यांनी सदरहू गाडी चालक, ड्रायव्हरची ड्रायव्हींग लायसन्सची प्रत, तक्रारीसोबत जोडलेली नाही.
अशाप्रकारे, तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षाविरुध्द खोटी, निराधार, बिनबुडाची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्षास त्रास दिल्याबद्दल कॉंम्पेन्सेटरी कॉस्ट देण्याचा आदेश व्हावा व तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व उभय पक्षाने दाखल केलेल्या पुरसिस, विरुध्द पक्षाने दाखल केलेला न्यायनिवाडा यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला.
उभय पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या मालकीच्या वाहनाचा विमा विरुध्द पक्षाकडून काढलेला होता. उभय पक्षात सदर पॉलिसीच्या कालावधीबद्दल व प्रिमीयम राशी बद्दल वाद नाही, यावरुन तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
उभय पक्षात याबद्दलही वाद नाही की, तक्रारकर्त्याच्या सदर विमाकृत वाहनाचा दिनांक 02/06/2014 ला अपघात झाला होता. ज्याबद्दलचा पोलीस स्टेशन अधिकारी, मालेगांव ता. मालेगांव जि. वाशिम येथे साना नं. 22/14 नोंदविला गेला आहे.
उभय पक्षात हा वाद नाही की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या वाहनाच्या नुकसान भरपाई बाबत विमा दावा विरुध्द पक्षाकडे सादर केला असता, विरुध्द पक्षाने दिनांक 02/08/2014 रोजी तक्रारकर्त्यास पत्र देवून, असे कळविले होते की, सदर अपघातावेळी गाडीचे ड्रायव्हर म्हणून प्रफुल्ल नामदेवराव पारसकर हे गाडी चालवत होते व अपघात झाल्यानंतर त्यांनी स्वतः सदरहू घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली. वाहन चालवितांना त्यांचेजवळ वाहन कायदयाप्रमाणे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, त्यामुळे तक्रारकर्ते विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. विरुध्द पक्षाने त्यांची भिस्त खालील न्याय निवाडयावर ठेवली.
Revision Petition No. 4166 of 2011 (NC)
ICICI Lombard General Insurance Co. Ltd.
Sh. Pawan Kumar निकाल ता. 29/05/2014
यावर तक्रारकर्ते यांनी संधी देवूनही विरुध्द पक्षाचे कथन, योग्य न्याय निवाडा दाखल करुन खोडले नाही, तसेच दाखल दस्त घटनास्थळ पंचनामा यावरुन, विरुध्द पक्षाच्या कथनात मंचाला तथ्य आढळले. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर देखील वाहन चालकाचा वैध परवाना दाखल केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाचे कथन मंचाने स्विकारले आहे व विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या न्याय निवाडयातील तथ्ये हातातील प्रकरणात जसेच्या तसे लागू पडतात. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार नामंजूर करणे क्रमप्राप्त आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार नामंजूर करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यांत येत नाही.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
( श्री.ए.सी.उकळकर ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri