निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (यापुढे “एमआयडीसी” असा उल्लेख करण्यात येईल) यांनी दिनांक 8/12/2008 रोजी एमआयडीसी वाळूज येथील औद्योगिक भुखंड विक्री करण्यासंदर्भात निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार त्याने भुखंड खरेदीसाठी एमआयडीसी कडे निविदा भरली. ज्या दिवशी निविदा खुलया करण्यात आल्या त्यावेळी त्याची एकटयाचीच निविदा आली होती. म्हणून त्याने गैरअर्जदार एमआयडीसीकडे आगावू रक्कम रु 120000/- भरले. परंतु दिनांक 25/7/2009 रोजी गैरअर्जदार एमआयडीसी अचानक त्यास देऊ केलेला भुखंड फक्त एकच निविदा आल्याच्या कारणावरुन रद्द केल्याचे कळविले . अशाप्रकारे गैरअर्जदार एमआयडीसीने त्यास देऊ केलेला भुखंड त्यास देण्यास नकार देऊन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने त्यास गैरअर्जदाराकडून रु 1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार एमआयडीसीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, एमआयडीसीकडे असलेले भुखंड विक्री करण्याबाबत निविदा मागविल्यानंतर खरेदीसाठी स्पर्धा नसेल तर प्राप्त झालेल्या निविदेच्या अनुषंगाने निविदाधारकास भुखंड द्यायचा किंवा नाही हयाचे अधिकार एमआयडीसीला आहेत. तक्रारदाराने भुखंड खरेदीचा प्रस्ताव दिल्यानंतर तो स्विकारावा किंवा नाही ही बाब पूर्णत: एमआयडीसीच्या अधिकारातील आहे. तक्रारदाराने एमआयडीसीकडून कोणतीही सेवा घेतलेली नाही. तक्रारदाराने व्यापारी कारणासाठी भुखंड घेण्याचे ठरविले होते म्हणून तो ग्राहक ठरत नाही. त्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार एमआयडीसीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदार एमआयडीसीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही. 2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदाराच्या वतीने अड ए.एम.मामीडवार आणि गैरअर्जदार एमआयडीसीच्या वतीने अड एस.एस.दंडे यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदार एमआयडीसीचा भुखंड भाडेतत्वावर खरेदी करण्यासाठी निविदा भरली होती. निविदा म्हणजे प्रस्ताव असतो. सदर प्रस्ताव स्विकारायचा किंवा नाही हा अधिकार पूर्णत: प्रस्ताव मागविणा-याचा किंवा वस्तु विक्री करणाराचा असतो. तक्रारदाराने गैरअर्जदार एमआयडीसीचा भुखंड खरेदी करण्याबाबत निविदा भरली म्हणजे एमआयडीसीने त्याला भुखंड विक्री केलाच पाहिजे असे बंधन एमआयडीसीवर असु शकत नाही किंवा तक्रारदाराने ज्या दरात भुखंड खरेदी करणे किंवा भाडे तत्वावर घेण्याबाबत निविदा सादर केली त्याच दरात त्यास भुखंड देण्याची सक्ती गैरअर्जदार एमआयडीसी वर करता येणार नाही. तक्रारदाराने भुखंड खरेदी बाबत दिलेली निविदा किंवा प्रस्ताव एमआयडीसीला स्विकारण्यायोग्य वाटला नाही म्हणून त्यांनी त्यास भुखंड विक्री करण्यास नकार दिला. सदर बाब कोणत्याही परिस्थितीत चुकीची आहे असे म्हणता येणार नाही आणि गैरअर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. 3. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |