तक्रारदारास बेंगलोर येथे जाणे अतिशय आवश्यक असल्याने व अचानकरित्या वाहनाची सुविधा नसल्याने तक्रारदाराने खाजगी वाहन स्कॉर्पिओ नं.एम.एच.11-ए-5094 या गाडीने प्रतिकिलोमीटर रु.12 या दराने 1570 कि.मी.प्रवासासाठी रु.18,400/- भाडे देऊन प्रवास करावा लागला. या सर्व गोष्टींना जाबदारच जबाबदार आहेत. जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास बुकींग केलेल्या तिकीटाची रक्कम रु.2,200/- परत केले परंतु नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदारास दिलेली नाही. तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत जाबदार क्र.1 ते 4 यांनी त्रुटी केलेली आहे. सबब जाबदाराकडून नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 4 यांचेकडून प्रवासासाठी आलेला खर्च रक्कम रु.18,800/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.80,000/- तक्रारदाराना मिळावा, सदर रकमेवर जाबदार 1 ते 4 कडून अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याज मिळावे, कोर्ट खर्च म्हणून रक्कम रु.2,200/- तक्रारदाराना जाबदार क्र.1 ते 4 कडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. तक्रारदारानी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 ते 4/8 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराकडे बुक केलेल्या ऑनलाईन तिकीटाची प्रत, तक्रारदारानी जाबदारास तक्रारीच्या पाठवलेल्या ईमेलची प्रत, जाबदारानी तक्रारीस दिलेले उत्तर, जाबदाराने तिकीटाची रक्कम रिफंड केल्याचे पत्र, तक्रारदारानी जाबदाराला पाठवलेली नोटीस, जाबदार 1 ते 3 यांना नोटीस मिळाल्याच्या पोहोचपावत्या नि.12 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे प्रतिज्ञापत्र, नि.14 चे कागदयादीसोबत नि.14/1 व 14/2 कडे स्कॉर्पिओ गाडी मालक यांना दिलेल्या भाडयाची पावती व सदर वाहनाचे आर.सी.बुकची प्रत, नि.17 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि.25 कडे तक्रारदाराचा जादा युक्तीवाद नि.26 कडे नि.26/1 ते 26/4 कडे जाबदार क्र.1 ते 4 यांना तक्रारीची नोटीस पोहोच झालेबाबत पोस्टाचा डिलीव्हरी रिपोर्ट वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केलेली आहेत.
4. सदर कामी जाबदार क्र.1 व 2 हे तक्रारअर्जाची नोटीस मिळूनही मे.मंचात गैरहजर राहिले तसेच सदर तक्रारअर्जास म्हणणेही दाखल केले नाही, सबब जाबदार 1 व 2 विरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित करणेत आले, तर जाबदार क्र.3 व 4 यांनी मे.मंचात हजर होऊन नि.10 कडे म्हणणे दाखल केले आहे. सदर जाबदारानी म्हणण्यामध्ये तक्रारीतील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यात थोडक्यात खालीलप्रमाणे कथन केले आहे-
अ) तक्रारदाराच्या अर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ब) दि.30-11-2013 रोजी प्रवासासाठी तक्रारदाराने जाबदाराकडे बुकींग केल्याचे मान्य आहे.
क) तक्रारदार हे प्रस्तुत जाबदाराने कळविलेप्रमाणे संध्याकाळी 8.30 वा. वेळेवर उपस्थित राहिले नाहीत. रात्री 9.15 पर्यंत तक्रारदार सदर ठिकाणी हजर नव्हते. दुर्देवाने काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची बस रद्द करणेत आली.
ड) तक्रारदाराना जाबदार क्र.3 व 4 यांनी स्वतःचे खर्चाने दुस-या बसमध्ये बसवून दिले आहे त्यामुळे तक्रारदाराची कोणतीही गैरसोय व नुकसान झालेले नाही. सबब तक्रारदार हे नुकसानभरपाई मिळणेस पात्र नाहीत.
इ) तक्रारदाराना जाबदारानी कोणतीही दुषित सेवा दिलेली नाही, सबब तक्रारदारांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.
अशा स्वरुपाचे म्हणणे जाबदार क्र.3 व 4 यांनी दाखल केले आहे. जाबदार क्र.3 व 4 यांनी नि.20 चे कागदयादीसोबत नि.20/1 व नि.20/2 कडे अनुक्रमे जाबदाराने तक्रारदाराचे नावे नवीन बसचे काढून दिलेले तिकीट, व तिकीट बुकमधील कार्बनकॉपी, नि.22 कडे जाबदार क्र.3 व 4 चे अधिकृत प्रतिनिधींचे प्रतिज्ञापत्र, नि.23 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केली आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा देणार
आहेत काय? होय.
2. तक्रारदाराना जाबदाराने दुषित सेवा पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मु्द्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी जाबदारांकडे कराड ते बेंगलोर प्रवासासाठी जाबदाराच्या ट्रॅव्हल्सचे बुकींग केले होते हे नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 कडे दाखल ऑनलाईन बुकींग केलेल्या तिकीटाचे प्रतीवरुन सिध्द होते, तसेच ही बाब जाबदार क्र.3 व 4 यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार क्र.1 ते 4 हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार असल्याचे निर्विवाद सिध्द होते आहे. तसेच तक्रारदार हे जाबदारांनी सांगितलेल्या वेळेत रात्री 8.30 वा.जाबदारांचे कराड येथील ऑफिसमध्ये गेले असता रात्री 9.15 पर्यंत सदर बस आली नाही, त्यावेळी जाबदारांचे ऑफिसमध्ये चौकशी करता प्रस्तुत जाबदारानी फोनवरुन जाबदार क्र.1 व 2 बरोबर संपर्क केला असता तक्रारदाराने बुक केलेली सीट पुण्यात त्रयस्थ व्यक्तीस दिलेने गाडी कराड येथे थांबवली नसल्याचे कळाले. त्यावेळी तक्रारदाराना मानसिक धक्का बसला व अतिशय त्रास झाला. त्यावेळी तक्रारदाराने जाबदाराला मेल पाठवून तक्रार केली. प्रस्तुत मेल व सदर तक्रारीस जाबदाराने दिलेले उत्तर नि.4/2 व 4/3 कडे दाखल आहे. तसेच प्रस्तुत गाडी न आल्याने तक्रारदारानी खाजगी स्कॉर्पिओ गाडीमधून प्रवास केला, त्या गाडीमालकास दर किलोमीटरला रु.12/-प्रमाणे रु.18,840/-भाडे दिलेची पावती नि.14 चे कागदयादीसोबत नि.14/1 कडे तक्रारदाराने दाखल केली आहे. तसेच प्रस्तुत स्कॉर्पिओ गाडीचे आर.सी.बुक झेरॉक्स प्रत दाखल आहे, त्याचप्रमाणे सदरची बाब तक्रारदाराने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, व तक्रारअर्ज, सोबतचे प्रतिज्ञापत्र यामध्ये नमूद केलेली आहे. यावरुन तक्रारदाराला जाबदारानी दुषित सेवा दिलेचे स्पष्ट होते म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण वर नमूद मुद्दयाचे विवेचनामध्ये जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा दिल्याचे सिध्द झालेले आहे. जाबदार क्र.3 व 4 यांनी तक्रारदाराचे तिकीटाची रक्कम तक्रारदाराना रिफंड केलेली असली तरीही तक्रारदारास झालेल्या गैरसोयीचा व मानसिक त्रासाचा विचार करता तक्रारदाराला नुकसानभरपाई मिळणे न्यायोचित होणार आहे. कारण जाबदाराने कथन केले आहे की, तक्रारदारास जाबदाराने स्वतःच्या खर्चाने नॅशनल ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवासासाठी पाठवले, परंतु जाबदाराने नि.20 चे कागदयादीकडे नि.20/1 कडे दाखल तिकीट हे नीता ट्रॅव्हल्सचे बसचे असून त्यांनी नॅशनल ट्रॅव्हल्सचे तिकीट दाखल केलेले नाही, तसेच प्रस्तुत तिकीट हे झेरॉक्स प्रत असून पुराव्यात वाचता येणार नाही, नॅशनल बसचे कंपनीचे दि.30-11-2013 रोजीची कोणतीही बुकींग लिस्ट मंचात दाखल नाही. तसेच प्रस्तुत बाबतीत नॅशनल बस कंपनीचे अधिकृत व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र मे.मंचात दाखल केलेले नाही त्यामुळे जाबदाराने घेतलेल्या बचावाच्या बाबी जाबदाराने कागदोपत्री सिध्द केलेल्या नाहीत. सबब तक्रारदार याना जाबदार क्र.1 ते 4 यांनी रक्कम रु.18,800/- (रु.अठरा हजार आठशे मात्र) तक्रारदारास झालेल्या झालेल्या खर्चापोटी अदा करणे, तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी जाबदार क्र.1 ते 4 यांचेकडून रक्कम रु.2000/- अदा करणे न्यायोचित होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 ते 4 यांनी तक्रारदाराना रक्कम रु.18,500/- अदा करावेत.
3. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासाबाबत जाबदार क्र.1 ते 4 यांनी रक्कम रु.15,000/- तक्रारदारास अदा करावेत.
4. तक्रारदारास तक्रारअर्जाचे खर्चापोटी जाबदार क्र.1 ते 4 यांनी रक्कम रु.2,000/- अदा करावेत.
5. वरील सर्व रकमेवर आदेश पारित तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंतची द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज जाबदार क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारास अदा करावे.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
7. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 4-3-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.