तक्रारदार : प्रतिनिधी वकीलासोबत हजर. सामनेवाले : प्रतिनिधी मार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाली ही विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. तक्रारदार हे इकबाल रस्टॉरंट या नावाने हॉटेलचा व्यवसाय करतात. त्याकामी सा.वाले यांनी वाणीज्य व्यवसायाकामी वापर करावयाच्या विद्युत पुरवठयाबद्दलचे मिटर तक्रारदारांचे हॉटेलमध्ये बसविले. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे जुलै,2008 मध्ये सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदारांच्या हॉटेलला भेट दिली व असा अहवाल तंयार केला की, तक्रारदारांनी विद्युत मिटरमध्ये फेरफार करुन विजेची चोरी केली आहे. त्या अहवालाच्या आधारे सा.वाले यांनी तक्रारदारांना दि.25.11.2008 रोजीची विद्युत पुरवठा खंडीत करणारी नोटीस दिली व तक्रारदारांकडून विद्युत बिलापोटी रु.2,30,000/- ची मागणी केली. त्यानंतर सा.वाले यांनी दुसरे मिटर बसविले. व त्या मिटरमधील नोंदीच्या आधारे दिनांक 5.12.2008 रोजी तक्रारदारांकडून रु.2,34,310/- रक्कम वसुली होणेकामी देयक पाठविले. 3. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे विद्युत तपासणी अहवाल हा खोटा असून त्याआधारे सा.वाले यांनी दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे. सा.वाले यांनी विद्युत देयकाचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांकडून दि.5.12.2008 चे विद्युत देयकाप्रमाणे मागणी करु नये व तक्रारदारांचे विद्युत मिटरचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये अशी मागणी केली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व असे निवेदन केले की, तक्रारदार हे रेस्टॉरंट चालवित आहेत व वाणीज्य व्यवसायाकामी विजेचा वापर होत असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे तक्रारदार ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नाही. सा.वाले यांनी असेही कथन केले की, तक्रारदारांनी विद्युत मिटरमध्ये फेरफार केल्याचे दिसून आल्याने तपासणी अहवालात तशी नोंद करण्यात आली व त्या आधारे आकारणी आदेश पारीत करण्यात येवून विद्युत देयक दि.5.12.2008 पाठविण्यात आले. 4. तक्रारदारांनी व सा.वाले यांनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार हे आपल्या विद्युत मिटरचा वापर वाणीज्य व्यवसायाकामी करीत असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे तक्रारदार ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नाही व प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालु शकत नाही या सा.वाले यांचे आक्षेपात तथ्य आहे काय ? | होय. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 5. तक्रारदार हे आपल्या विद्युत मिटरचा वापर वाणीज्य व्यवसायाकामी करीत होते याबद्दल उभय पक्षामध्ये वाद नाही. कारण तक्रारदारांनी आपल्या तक्रारी मध्येच ही बाब मान्य केली आहे. याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना विद्युत पुरवठयाची उपलब्ध करुन दिलेली सेवा सुविधा ही तक्रारदार हे वाणीज्य व्यवसायाकामी वापरीत होते. 6. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तु किंवा एखादी सेवा सुविधा वाणीज्य व्यवसायाकामी स्विकारली असेल तर ती वस्तु खरेदी करणारी व्यक्ती किंवा ती सेवा सुविधा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे तक्रारदार ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नाही. तथापी वस्तु खरेदी करणारी व्यक्ती अथवा सेवा सुविधा स्विकारणारी व्यक्ती ही त्या वस्तुचा किंवा सेवा सुविधेचा वापर आपले उपजिविकेचे साधन व स्वयंरोजगार म्हणून वापरत असेल तर ती व्यक्ती ग्राहक ठरते. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कुठेही कथन नाही की, तक्रारदार आपले हॉटेल उपजिविकेचे साधन म्हणून व स्ययंरोजगार म्हणून चालवित होते. तसे असणेही शक्य नाही. कारण हॉटेल व्यवसाय करणेकामी काही मनुष्यबळाची आवश्यकता असते. व एकच व्यक्ती हॉटेलचा व्यवसाय करु शकत नाही. त्यातही हॉटेलचा व्यवसाय हा नफा कमविणेकामी केला जातो. मा.राष्ट्रीय अयोगाने हॉटेल कार्पोरेशन ऑफ इंडीया लिमिटेड विरुध्द दिल्ली विद्युत बोर्ड व इतर या प्रकरणामध्ये असा अभिप्राय नोंदविला की, हॉटेल चालविणेकामी विद्युत पुरवठा घेतला असल्यास ती वाणीज्य व्यवसायकामी स्विकारलेली सुविधा होते. व ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे या स्वरुपाची तक्रार चालु शकणार नाही. 7. वरील परिस्थितीत पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 752/2008 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |