निकालपत्र :- (दि.10/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य पशुविमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) तक्रारदार हे रुई येथील रहिवाशी असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीबरोबरच दुभती जनावरे पाळून त्यातून येणारे उत्पन्न हे त्यांचे उपजिवीकेचे साधन आहे. तक्रारदाराने काळया पांढ-या रंगाची कपाळावर पांढरा ठिपका, शेपूट गोंडा पांढरा वय वर्षे 8 या वर्णनाची गाय घेतलेली होती व सदर गायीचा रुई दुध उत्पादक सोसायटी लि.रुई यांचेमार्फत दि.07/03/2007 रोजी रक्कम रु.25,000/-चा नमुद गायीचा विमा उतरविला होता.सदर पॉलीसीचा नंबर17060301012501/43/75असून विमा कालावधी दि.06/03/2010 अखेर आहे. सदर सोसायटीस तक्रारदार नेहमी दुधपुरवठा करीत होते. ब) नमुद गायीच्या कानात सुरुवातीस टॅग नं.519991 होता. मात्र तो तुटल्याने पुन्हा दुसरा टॅग नं.46223 लावला. नमुद गाय दि.01/10/2009 रोजी सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान मयत झाली. सदर गाय आजारी पडून तिला ट्रॅमॅक्टीक रेटिक्यलोपेरिटोनिटीस च्या आजाराने मयत झाली. गाय आजारी पडल्यावर योग्य ते औषधोपचार करुनही ती वाचू शकली नाही. त्याची वर्दी सरपंच यांना दिली तदनंतर पंचासमक्ष डॉक्टरांमार्फत गायीचे शवविच्छेदन करुन पंचनामा करुन दफन केले. क) दि.11/11/2009 रोजी क्लेम अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवून क्लेमची मागणी सामनेवाला यांचेकडे केली असता दि.07/12/2009 रोजी पॉलीसीच्या नियम 6 प्रमाणे मुदतीत क्लेम दाखल केला नसलेचे कारणास्तव दावा नामंजूर करणेत आला. आजअखेर सामनेवालांनी नमुद अटी तक्रारदारास दिलेल्या नाहीत. सामनेवाला हे चुकीच्या कारणास्तव क्लेम नाकारला असून तक्रारदाराने गाय मयत होताच तातडीने कोल्हापूर रिजनल ऑफिसमध्ये येऊन गाय मयत झालेची तोंडी माहिती तेथील अधिका-यांना दिली. मात्र सर्व कागदपत्र मिळवण्यास 30 ते 40 दिवस लागले. कारण अफझलखान वधाचे पोस्टर लावलेने इचलकरंजी व आजुबाजूच्या भागात कर्फ्य जाहीर करणेत आला होता. तक्रारदार हा वृध्द ग्रहस्थ असून त्याला पाठदुखीचा त्रास आहे. कर्फ्यमुळे रस्त्यावर फिरणे अथवा परगावी जाणेस बंदी असलेने प्रस्तुतचा विलंब झालेला आहे. सामनेवालांनी जाणूनबुजून हेतुपुरस्सर क्लेम नाकारुन अनुचित व्यापारी प्रथेचा वापर करुन सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर व्हावी. तक्रारदारास विमा रक्कम रु.25,000/-सदर रक्कमेवर दि.01/10/2009 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.15 टक्के प्रमाणे व्याज व मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-,तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला कंपनीने क्लेम नाकारलेचे पत्र, सदर पत्रास तक्रारदाराने दिलेले उत्तर, क्लेम फॉर्म, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, पंचनामा, गाय दफन केलेचा दाखला, ट्रिटमेंट सर्टिफिकेट, क्लेम नोट, टॅक्स सर्टीफिकेट, इन्शुरन्स सर्टीफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ रिजॉइन्डर दाखल करुन घेणेबाबतचा अर्ज नामंजूर करणेत आला. प्रस्तुतचा अर्ज सामनेवालांचा युक्तीवाद ऐकूण घेऊन प्रकरण निकालावर घेतलेनंतर उशिरा दाखल करणेत आलेने नामंजूर करणेत आला. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार परिच्छेद निहाय तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारीतील मजकूर चुकीचा व वस्तुस्थितीस सोडून असल्याने सामनेवाला यांना तो मान्य नाही. सामनेवाला यांनी विमा उतरविलेची बाब मान्य केली आहे. गायीच्या आजाराबाबत केलेल्या औषधोपचाराची माहिती लपवून ठेवलेली आहे. सबब प्रस्तुतचा अर्ज रद्द होणेस पात्र आहे. पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे ताबडतोब क्लेम दाखल केलेला नाही. दि.11/11/2009 रोजी विलंबाने क्लेम दाखल केला असून त्यास कायदेशीर व पुरेसे कारण नाही. गाय मयत होताच ताबडतोब माहिती सामनेवालांच्या अधिका-यांना दिलेली नाही. विलंबाचे कारण अफजलखानाचे वधाचे पोस्टरमुळे कर्फ्यु होता हे अमान्य केलेले आहे. सामनेवालांचे क्लेम देणेबाबतची जबाबदारी ही पॉलीसीच्या अटीस बांधील राहून असेल सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने तक्रारदारांचा सदरचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती सदर मंचास सामनेवाला यांनी केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत.
(6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांचे वकीलांचे युंक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. तक्रारदार विमा रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहेत काय? --- होय. 3. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1:- तक्रारदाराच्या गायीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेचा सामनेवाला विमा कंपनीने मान्य केलेले आहे.दि.07/03/2007रोजी रक्कम रु.25,000/-चा नमुद गायीचा विमा उतरविला होता. सदर पॉलीसीचा नंबर17060301012501/43/ 75 असून विमा कालावधी दि.06/03/2010अखेर आहे.नमुद विमा उतरविलेली गाय दि.01/10/2009रोजी ट्रॅमॅक्टीक रेटिक्यलोपेरिटोनिटीस च्या आजाराने उपचारांती मयत झालेली आहे हे दाखल असलेल्या उपचार प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र,पंचनामा, दफन केलेचा दाखला, दाखल पावती यावरुन निर्विवाद आहे.
प्रस्तुत विमा उतरविलेल्या गायीच्या कानात प्रथम टॅग नं.51991 लावलेला होता. मात्र सदर टॅग तुटल्याने टॅग नं.46223 लावलेला आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र व क्लेम नोटमध्ये नमुद केलेले आहे व सदर कागद प्रस्तुत प्रकरणात दाखल आहे. क्लेमनोटनुसार दि.01/10/2009 रोजी गाय मयत झालेचे कळवलेबाबत नमुद केले आहे. पॉलीसीनुसार क्लेम फॉर्मसोबत पी.एम.रिपोर्ट, ईअर टॅग, फोटो, मयत जनावराचा विल्व्हेवाट दाखला, उपचारप्रमाणपत्र असे एकूण 6 कागदपत्रे जोडणेची होती त्याप्रमाणे प्रस्तुत कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. तसेच क्लेमफॉर्मसोबत तक्रारदाराने पाठवलेचे सामनेवालांनी मान्य केलेले आहे. मात्र नमुद क्लेम ना मुदतीत न आलेने पॉलीसीच्या नियम 6 प्रमाणे क्लेम नाकारलेला आहे.याचा विचार करता प्रस्तुतचा विलंब हा योग्य कारणास्तव होता का ? हा वादाचा मुद्दा आहे. नमुद जनावर आजारी असताना उपचार घेतलेले आहेत तसेच जनावर दि.01/10/2009 रोजी मयत झालेबरोबर त्याचदिवशी शवविच्छेदन केलेले आहे. पंचनामा आहे. दफनाचा दाखला आहे. पावती आहे.फक्त क्लेम फॉर्म हा दि.30/10/2009 रोजी घेतलेला असून तदनंतर तो पाठवून दिलेला आहे. सदरचे कागदपत्रे दि.11/11/2009 रोजी सामनेवाला यांना मिळालेली आहेत. प्रस्तुतचा विलंब हा साधारण महिन्याभराचा आहे. सबब झालेला विलंब हा माफ करण्यायोग्य आहे. तसेच क्लेम फॉर्म मुदतीत दाखल करणेबाबतची अट ही अनिवार्य नसून मार्गदर्शक स्वरुपाची आहे. सबब सामनेवालांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता तांत्रिक कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- तक्रारदार पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.25,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.3 :- सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास वेळेत क्लेम रक्कम मिळू शकली नसलेने तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. सबब त्यापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.25,000/-(रु.पंचवीस हजार फक्त) मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमेवर दि.11/11/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |