आदेश
मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये-
- तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-2019 च्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाने निर्मित केलेल्या प्लॅस्टो कंपनीची पाण्याची टाकी पवन सेल्स एजन्सी यांच्याकडून दि.19.01.2015 रोजी रुपये 3200/- मध्ये खरेदी केली होती. याबाबत पवन एजन्सी यांच्याकडून पावती देखील देण्यात आली. तसेच सदरच्या पाण्याच्या टाकीकरिता 25 वर्षाची गॅरंटी असल्याबाबतचे कार्ड देण्यात आले होते.
- दि. 06.06.2022 रोजी या पाण्याच्या टाकीतून गळती होत असल्याने त्याबाबत विरुध्द पक्षाच्या कस्टमर केअर नं. 9325225118 वर संपर्क केला असता त्याच्या तक्रारीचे कोणतेही निराकरण करण्यात आले नाही. विरुध्द पक्षाने केवळ संपर्कासाठी मोबाईल नं. 9325225118 , 932522117, 7767000179, 7767000170 दिलेले आहे. सदरच्या मोबाईल वॉटसअप द्वारे तक्रारकर्त्याने पाण्याची टाकी बदलून देण्याकरिता विरुध्द पक्षाला कळविले असून त्याबाबतचे स्क्रीन शॉर्ट तक्रारी अर्जासोबत जोडले आहे. परंतु त्यानंतर नॅशनल कन्झ्युमर नंबर वर संपर्क करुन देखील तक्रारकर्त्याच्या पाण्याची टाकी बदलून देण्यात आली नाही, ही बाब दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन पाण्याची टाकीची किंमत रुपये 3200/- , तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली आहे.
3. विरुध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने गॅरन्टी कार्डच्या अटी शर्ती हेतूपुरस्स्र दाखल केलेल्या नाही. तसेच गॅरन्टी कार्डवर नमूद हस्ताक्षर तसेच डिलीव्हरी मेमो मधील हस्ताक्षरात तफावत आहे. तक्रारकर्त्याने दि.19.01.2015 रोजी पाण्याची टाकी विकत घेतल्यानंतर दि. 10.08.2022 ही तारीख स्टॅम्पच्या खाली नमूद आहे. याबाबत तक्रारकर्त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तक्रारकर्त्याने पवन सेल्स एजन्सी यांच्याकडून दि. 19.01.2015 रोजी टाकी विकत घेतली असून टाकी संबंधीची तक्रार जुलै 2022 मध्ये दाखल केली आहे. तक्रारकर्ता व विरुध्द पक्षामध्ये कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला नाही. तक्रारकर्त्याने पाण्याची टाकी 7 वर्षे वापरल्यामुळे टाकीच्या किंमतीवर 10 टक्के घसारा ( Deprecation ) अपेक्षित असतांना तक्रारकर्ता अवाजवी रक्कमेची मागणी करीत आहे. विरुध्द पक्षा तर्फे तक्रारकर्त्याला टाकी बदलवून देण्याबाबत नकार दिलेला नाही. तसेच विरुध्द पक्षाने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. उभय पक्षाने दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित
व्यापार प्रथेचा अवलंब केला काय? होय
- ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
5. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत - तक्रारकर्त्याने दि. 19.01.2015 रोजी पवन सेल्स एजन्सी यांच्याकडून प्लॉस्टो कंपनीची पाण्याची टाकी विकत घेतल्याचे तसेच त्या टाकीची 25 वर्षाची गॅरन्टी असल्याचे वॉरन्टी कार्ड नि.क्रं. 2(1) व 2(2) वर दाखल पावतीवरुन दिसून येते. विरुध्द पक्ष हे प्लॉस्टो कंपनीच्या टाकीचे निर्माते आहे ही बाब विरुध्द पक्षाने नाकारलेली नाही. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते.
6. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्यातील वाद हा केवळ रुपये 3200 /- इतक्या शुल्लक रक्कमेबाबत असल्यामुळे सदरचा वाद सामोपचाराने मिटविण्याबाबत उभय पक्षांना सुचना दिली असता तक्रारकर्त्याने विवादित पाण्याची टाकी पवन एजन्सी यांच्याकडे पोहचविण्याकरिता येणारा वाहतूक खर्च वहन करण्याच्या अटीसह दि. 10.04.2024 रोजी पुरसीस दाखल केली. परंतु तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाने सन 2022 पासून पाण्याची टाकी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे विरुध्द पक्षाचा प्रस्ताव तक्रारकर्त्याने नाकारला.
7. विरुध्द पक्षाने उभय पक्षातील वाद संपुष्टात येण्याकरिता दि. 10.04.2024 रोजी पुरसीस दाखल केली असली तरी ही विरुध्द पक्षाच्या वकिलांनी आपसात समझोता न झाल्याने कायदेशीर मुद्दयावर युक्तिवाद केला. त्यानुसार तक्रारकर्त्याने गॅरन्टी कार्ड सोबत अटी शर्ती दाखल केल्या नाहीत. तसेच गॅरन्टी कार्डवरील हस्ताक्षराबाबत तफावत असल्याचे नमूद केले आहे.
8 तक्रारकर्त्याला विक्री केलेल्या पाण्याच्या टाकी मधून दि. 06.06.2022 रोजी पाणी गळत असल्याबाबत विरुध्द पक्षाकडे वेळोवेळी तक्रार केल्याची बाब नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सन 2022 मध्ये प्रथम तक्रार आल्यानंतर वादादित पाण्याची टाकी गॅरन्टी कालावधीत असतांना त्वरित बदलून देणे अपेक्षित असतांना केवळ तांत्रिक मुद्दयांचा आधार घेऊन विरुध्द पक्षाने वादादित पाण्याची टाकी बदलून देण्यास नकार दिल्याचे दाखल दस्तावेजावरुन दिसून येते व त्यासाठी कोणत्याही तांत्रिक पुराव्याची गरज नाही. केवळ रुपये 3200/- इतक्या किरकोळ किंमतीच्या पाण्याच्या टाकीकरिता तक्रारकर्त्यास दोन वर्षे नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, ही बाब अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेतील त्रुटी दर्शविते. उभय पक्षातील वादाचे स्वरुप विचारात घेता विरुध्द पक्षाने स्वखर्चाने नवीन पाण्याची टाकी तक्रारकर्त्याच्या घरी पोहचती करावी व त्याचवेळेस त्वरित तक्रारकर्त्याने विवादित जुनी पाण्याची टाकी विरुध्द पक्षाला सुपूर्द करावी. तसेच तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 7,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर.
- विरुध्द पक्षाने स्वखर्चाने तक्रारकर्त्याच्या घरी नवीन पाण्याची टाकी आणून द्यावी व त्याचवेळी तक्रारकर्त्याने जुनी विवादित पाण्याची टाकी त्वरित विरुध्द पक्षाला सुपूर्द करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रु. 7,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु. 5,000/- अदा करावे.
- विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्क द्यावी.
6. फाइल ब व क ही तक्रारकर्त्याला परत करावी.