द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 31 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी वर्ल्डकॉम टेलिकॉम – डिलर यांच्याकडून सॅमसंग मोबाईल मॉडेल क्र.सी 3010, दिनांक 11/9/2009 रोजी रुपये 4100/- देऊन खरेदी केला. त्यास एक वर्षाची वॉरंटी होती. दिनांक 16/8/2010 रोजी मोबाईल बंद पडला. डिलर यांनी सॅमसंग मोबाईलचे जाबदेणार हे अधिकृत सर्व्हिस सेंन्टर असल्याचे सांगितले व मोबाईल दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे देण्यास सांगितले. दिनांक 16/8/2010 रोजी तक्रारदारांनी मोबाईल जाबदेणार यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला, जाबदेणार यांनी पावती दिली व 18/8/2010 रोजी मोबाईल नेण्यास सांगितले. नंतर तक्रारदारांनी प्रत्यक्ष जाऊन, दुरध्वनी द्वारे मोबाईल संदर्भात चौकशी करुनही जाबदेणार यांनी मोबाईल दुरुस्त करुन परत दिला नाही. तक्रारदारांनी नोटीस पाठवूनही उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून मोबाईल दुरुस्त करुन अथवा दुसरा मोबाईल बदलून मिळणेबाबत अथवा मोबाईल खरेदीची रक्कम रुपये 4100/- 18 टक्के व्याजासह परत मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या वर्ल्ड टेलिकॉम यांच्या पावती क्र.6230 दिनांक 11/9/2009 चे मंचाने अवलोकन केले असता तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून मॉडेल क्र. सॅमसंग सी 3010 रुपये 4100/-देऊन खरेदी केला होता, त्यास एक वर्षाची कंपनी वॉरंटी असल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार हे सॅमसंग मोबाईचे अधिकृत सर्व्हिस सेंन्टर असल्याचे, तक्रारदारांनी त्यांचा मोबाईल दुरुस्तीसाठी जाबदेणार यांना दिल्याचे वर्क ऑर्डर नं 19990 दिनांक 16/8/2010 वरुन दिसून येते. त्यामध्ये तक्रारीचे स्वरुप या शिर्षकाखाली जाबदेणार यांनी नो डिस्प्ले, डेड, वॉटर लॉग, स्क्रू रस्टेड असे नमूद केलेले आहे. यावरुन वॉरंटी कालावधीतच मोबाईल मध्ये समस्या निर्माण झाली होती, जाबदेणार हे सॅमसंग मोबाईलचे अधिकृत सर्व्हिस सेन्टर असून देखील त्यांनी वॉरंटी कालावधीत मोबाईल मध्ये निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण केलेले नसल्याचे स्पट होते, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यासंदर्भात तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे दिनांक 25/8/2010 च्या नोटीसद्वारे पाठपुरावा करुनही उपयोग झालेला नसल्याचे, जाबदेणार यांनी मोबाईल दुरुस्त करुन तक्रारदारांना परत केलेला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांचा सॅमसंग सी 3010 मोबाईल ची किंमत रुपये 4100/- परत करणे असे आदेशित करणे न्याय होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- ची मागणी केलेली आहे, परंतू ही मागणी अवास्तव आहे, मंचाने मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा 2000 DGLS 1448 चरणसिंह विरुध्द हिलींग टच हॉस्पिटल चा आधार घेतला. सदरहू निवाडयात नमूद केल्याप्रमाणे “It is for the Consumer Forum to grant compensation to the extent it finds it reasonable, fair and proper in the facts and circumstances of a given case according to established judicial standards where the claimant is able to establish his charge.” तक्रारदार नुकसान भरपाई पोटी व तक्रारीचा खर्च मिळून जाबदेणार यांच्याकडून एकत्रित रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 4100/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.