(मा.अध्यक्ष श्री.आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून अर्ज कलम 2 मध्ये वर्णन केलेल्या रो हाऊस नं.3 मध्ये अपुर्ण कामे पुर्ण करुन व बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेवून रो हाऊसचे खरेदीखत होवून मिळकत अर्जदार यांचे ताब्यात देणेबाबत हुकुम व्हावा,अर्जदार हे उर्वरीत रक्कम रु.16,00,000/- देण्यास तयार होते व आहेत. विकल्पेकरुन अर्जदाराची मागणी मंजूर करता येणे शक्य नाही असे मंचाचे मत पडल्यास अर्जदार यांचे झालेल्या नुकसानीपोटी रुपये 10 लाख व अर्जदार यांनी सामनेवाला नं.1 यांना दिलेली रक्कम रुपये 2 लाख व त्यावर दि.19/4/2010 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती पडेपावेतो द.सा.द.शे.24 टक्के दराने व्याज मिळावे तसेच अर्जदार यांना एप्रील 2010 पासून दरमहा रु.3500/- इतके भाडे भरुन भाडयाच्या घरात राहावे लागले आहे ती रक्कम मिळावी, वित्तीय संस्थेकडे भरावे लागलेले शुल्क रु.15,000/- मिळावेत, मिळकत ताब्यात न दिल्यास त्याच भागात तितक्याच क्षेत्राची मिळकत नव्याने खरेदी घेण्यासाठी अर्जदार यांना जास्तीची रक्कम रु.7 ते 8 लाख लागणार आहे ती सामनेवाला यांचेकडून मिळावेत, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.27 लगत लेखी म्हणणे व पान क्र.28 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचे एकत्रीत म्हणणे पान क्र.22 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.23 लगत दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय. 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय. सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून रो हाऊस क्र.3 बाबत खरेदी पत्रासह ताबा मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 4) अर्जदार हे सामनेवाला नं.1 यांचेकडून आर्थीक नुकसानीपोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 5) अर्जदार हे सामनेवाला नं.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 6) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला नं.1 ते 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. विवेचन अर्जदार यांनी पान क्र.53 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला नं.1 यांचेवतीने अँड.के.एस.शेळके यांनी युक्तीवाद केलेला आहे तसेच सामनेवाला नं.2 व 3 यांचेवतीने अँड.एन.एच.लाहोटी यांनी युक्तीवाद केलेला आहे. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत कमिन्समेंट सर्टिफिकेट, पान क्र.7 लगत रक्कम रु.51,000/- मुळ अस्सल पावती व पान क्र.8 लगत बँक पासबुकची झेरॉक्स प्रत अशी कागदपत्रे हजर केलेली आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाहीत. याउलट अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रो हाऊस क्र.3 बाबत नोंदणी केलेली होती ही बाब सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये मान्य केलेली आहे. पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 लगतचे कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “दि.19/4/2010 पुर्वी अर्जदार यांनी रो हाऊस नं.3 बुक केला होता व त्याकरीता रु.11,000/- दिले होते त्याची पावती दिलेली आहे. परंतु रो हाऊसची किंमत रु.27,51,000/- ठरलेली होती ही रक्कम अर्जदार यांनी आठ दिवसात देवून व्यवहार पुर्ण करावयाचा होता अन्यथा व्यवहार रद्द समजण्यात येईल असे ठरलेले होते. अर्जदार यांनी मुद्दाम रो हाऊसची किंमत कमी दाखवलेली आहे. अर्जदार यांनी मुदतीत व्यवहार पुर्ण केलेला नाही. रो हाऊसची किंमत रु.27,50,000/- असल्यामुळे हा तक्रार अर्ज या मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. रद्द करण्यात यावा. ” असे म्हटलेले आहे. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “नाशिक येथील सर्वे नं.807/2ब/2/9+10 पैकी प्लॉट नं.9 व 10 या मिळकती सामनेवाला क्र.2 व 3 यांच्या मालकीच्या असून त्यांनी सदरच्या मिळकती सामनेवाला क्र.1 यांना विकसन करारनाम्यान्वये विकसित करण्यास दिलेल्या असून त्या कामी सामनेवाला क्र.2 व 3 यांनी सामनेवाला क्र.1 यांची त्यांचे मुखत्यार म्हणून नेमणूक करुन मुखत्यारप्रत देखील लिहून दिलेले आहे हे खरे आहे.” असे म्हटलेले आहे. तसेच रो हाऊसपैकी पश्चिमेकडील रो हाऊस नं.3 हे सुमारे 1200 चौरस फुट क्षेत्रफळाचे रो हाऊस विक्री करण्याचा सौदा सामनेवाला क्र.1 यांनी स्वतःकरीता व सामनेवाला नं.2 व 3 यांचे मुखत्यार म्हणून केला किंवा काय याची माहिती या सामनेवाला यांना नाही.” असेही म्हटलेले आहे. अर्जदार यांनी त्यांचे अर्ज व प्रतिज्ञापत्रमध्ये रो हाऊसची किंमत रु.18,00,001/- अशी ठरलेली होती असे म्हटलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये “रो हाऊसची ही किंमत नाकारलेली असून एकूण किंमत रु.27,51,000/- ठरलेली होती.” असे म्हटलेले आहे. परंतु या कामी सामनेवाला नं.2 व 3 यांनी पान क्र.22 लगत लेखी म्हणणे दिलेले असून या म्हणण्यामध्ये कलम 4 मध्ये रो हाऊसची किंमत रु.18,00,001/- अशी ठरलेली होती असा उल्लेख करण्यात आलेला आहे. रो हाऊसचे किंमतीबाबत सामनेवाला नं.1 यांना वाद उत्पन्न करावयाचा होता तर त्याबाबत सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांचेबरोबर योग्य ते करारपत्र करुन घेवूनच पान क्र.7 चे पावतीनुसार रु.51,000/- स्विकारणे गरजेचे होते परंतु सामनेवाला क्र.1 यांनी किंमतीबाबत कसल्याही प्रकारचे करारपत्र अर्जदार यांचेकडून करुन घेतलेले नाही. सामनेवाला नं.2 व 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 4 मध्ये “रो हाऊसची किंमत सामनेवाला व अर्जदार यांचे दरम्यान रु.18,01,000/- इतकी ठरली. ही रक्कम बाजारभावाने योग्य व बरोबर असल्यामुळे उभयतामध्ये वाद नव्हता. अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना रोख रक्कम रु.1 लाख दिलेले आहेत.” असे म्हटलेले आहे. तसेच “या तक्रार अर्जाचे कामी अर्जदार यांची मागणी रु.20 लाखापेक्षा जास्त होत असल्यामुळे या मंचात तक्रार अर्ज चालत नाही. अर्जदार व सामनेवाला क्र.2 व 3 यांचेमध्ये कोणताही करार झालेला नाही.” यामुळे अर्ज रद्द करण्यात यावा असेही म्हटलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पान क्र.5 कलम 2 मध्ये “त्यामुळे नाईलाजास्तव सामनेवाला क्र.1 यांनी सदरची रो हाऊस मिळकत ही दुस-या ग्राहकाला विक्री करुन टाकलेली आहे.” असा उल्लेख केलेला आहे. परंतु दुस-या म्हणजे कोणत्या ग्राहकास मिळकत विक्री केलेली आहे याबाबतची कोणतीही कागदपत्रे सामनेवाला क्र.1 यांनी या कामी आजपर्यंत दाखल केलेली नाहीत. अर्जदार यांनी या कामी पान क्र.40 लगत मनाई हुकूम मागणीचा अर्ज दि.14/10/2011 रोजी दाखल केलेला आहे. व या अर्जावर दि.21/10/2011 रोजी आदेश होवून रो हाऊस क्र.3 याबाबत तक्रार अर्जाचा अंतीम निकाल होईपावेतो सामनेवाला क्र.1 यांनी अन्य कोणाबरोबरही कसलाही विक्री साठेखत तबदिलीचा व्यवहार करु नये असे आदेश करण्यात आलेले आहेत. सामनेवाला नं.1 यांनी जरी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये मिळकत अन्य व्यक्तीस विक्री केलेली आहे असा उल्लेख केलेला असला तरी सामनेवाला नं.1 यांना वारंवार संधी देवूनही त्यांनी विक्रीबाबतची कोणतीही कागदपत्रे मंचासमोर सादर केलेली नाहीत. रो हाऊस क्र.3 बाबत अर्जदार यांचेकडून रक्कम स्विकारल्यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांना रो हाऊस क्र.3 चे बांधकाम करुन कबजा दिलेला नाही ही गोष्ट अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कादगपत्रावरुन स्पष्ट झालेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.2 व 3 हे मुळ मिळकतीचे मालक असून त्यांनी सामनेवाला क्र.1 बरोबर विकसन करार केलेला आहे व सामनेवाला क्र.1 यांना मुखत्यारपत्रही लिहून दिलेले आहे. अर्जदार व सामनेवाला क्र.2 व 3 यांचेबरोबर पैसे घेणे व देणे असा कोणताही व्यवहार घडलेला नाही यामुळे सामनेवाला क्र.2 व 3 यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रार अर्जातील कथन, सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यामधील कथन व पान क्र.7 व पान क्र.8 लगतची कागदपत्रे यांचा विचार होता रो हाऊसची एकूण किंमत रु.18,00,001/- या किंमतीपैकी रक्कम रु.2,00,001/- इतकी रक्कम अर्जदार यांनी सामनेवाला यांना अदा केलेली आहे असे दिसून येत आहे. राहीलेली रक्कम वित्तीय रक्कम रु.16,00,000/- वित्तीय संस्थेचे कर्ज घेवून अर्जदार हे सामनेवाला यांना देणार होते. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांना रक्कम रु.16,00,000/- देवून रो हाऊस क्र.3 बाबत संपुर्ण बांधकाम पुर्ण करुन त्याचा ताबा मिळण्यास व अंतीम खरेदी पत्र व बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला नं.1 यांनी अर्जदार यांना योग्य त्या मुदतीत वाद मिळकतीचे बांधकाम पुर्ण करुन रो हाऊस क्र.3 चे खरेदीपत्र करुन कबजा दिलेला नाही. कबजा न मिळाल्यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे तसेच अर्जदार यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थीक नुकसान भरपाईपोटी रु.75,000/- व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला नं.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 60 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना तक्रार अर्जात लिहीलेले रो हाऊस क्र.3 चे संपुर्ण बांधकाम पुर्ण करुन कबजा द्यावा. व बांधकाम पुर्णत्वाचा दाखला द्यावा. 3) आजपासून 60 दिवसांचे काळात अर्जदार यांना सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी रो हाऊस क्र.3 चे अंतीम खरेदीपत्र करुन द्यावे. खरेदी पत्राचे वेळी अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना राहीलेली रक्कम रु.16,00,000/- द्यावी. 4) आजपासून 60 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना आर्थीक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.75,000/- द्यावेत. 5) आजपासून 60 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी भरपाईपोटी रक्कम रु.15,000/- द्यावेत. 6) आजपासून 60 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत. |