जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 19/2011 तक्रार दाखल तारीख –31/01/2011
सर्जेराव पि.नामदेव खटाने
वय 51 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.कर्झणी ता.जि.बीड
विरुध्द
1. रविंद्र गणपतराव पाठक
रा.साईबाबा टायर्स, श्रीराम कॉम्प्लेक्स, संत अँन्स
शाळेजवळ, जालना रोड, बीड ता.जि.बीड. सामनेवाला
2. जिल्हा वितरण अधिकारी,
अपोलो टायर्स, बी-18,
रा.एम.आय.डी.सी.आदर्श नगर, नांदेड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.पी.लघाने
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे ः- अँड.एन.बी.जोशी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार कर्झणी येथील रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहेत. शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे.
तक्रारदाराने दि.25.8.2008 रोजी त्यांच्या ट्रॅक्टर साठी दोन अपोलो कंपनीचे टायर्स सामनेवाला क्र.1 कडून खरेदी कले होते. त्याबाबतचे बिल सोबत जोडले आहे. त्यांची किंमत रु.5800/- दराने दोन टायर्सचे रु.11,600/- चे खरेदी केले व ते टायर तक्रारदाराने घरी नेऊन फिटर कडून व्यवस्थित बसवून घेतले.
तक्रारदाराला ट्रॅक्टर व ट्रॉलीसाठी पून्हा टायरची गरज वाटू लागली म्हणून त्यांने सामनेवाला क्र.1 कडून दि.19.6.2009 रोजी रु.6100/- चे आणखी एक अपोलो कंपनीचे टायर खरेदी केले, त्याची पावती सोबत जोडली आहे. तसेच तक्रारदाराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे एक चाक बदलायला आले म्हणून तक्रारदाराने पून्हा दि.15.11.2009 रोजी आणखी एक टायर सामनेवाला क्र.1 कडून खरेदी केले आहे. त्याची पावती रु.6300/- जोडली आहे.
सामनेवाला यांनी वरील प्रमाणे चारही टायर्सची गॅरंटी दिली होती. त्या कालावधीत टायर खराब झाले तर टायर बदलून देणार होते किंवा तेवढी रक्कम परत करणार होते असे टायर खरेदी करताना विक्रेत्याने सांगितले होते. चारही टायर मूदत संपण्यापूर्वी खराब झाले.टायर फुगा धरु लागले व त्यांचे ट्रॅक्टर मध्ये केव्हाही फुगा फुटण्याची शक्यता निर्माण होती. म्हणून तक्रारदाराने चारही टायर सामनेवाला क्र.1 कडे बदलून मिळण्यासाठी दि.6.10.2010 रोजी आणून दिले. सामनेवाला क्र.1 ने सामनेवाला क्र.2 कडे चारही टायर्स ची तक्रार डॉकेटसह पाठविले त्या चारही तक्रारीच्या क्लेम नंबर अनुक्रमे 1. 0870700347 2. 0870700348 3. 0870700349 4. 0870700350 असा असून सामनेवाला क्र.2 यांने उपरोक्त चारही तक्रारीतील परत बदली करण्यासाठी पाठविलेले टायर्स त्याचे कडील नेमलेल्या तज्ञाकडून तपासून बघीतले तर त्यापैकी तक्रार क्र. 1 ची टायरमध्ये मॅन्युफॅक्चर डिफेक्ट (उत्पादित दोष) आढळून आला म्हणून उपरोक्त चारही पैकी क्लेम क्रमांक 0870700347 हे टायर सामनेवाला क्र.2 ने बदलून देण्यास संमती दर्शवली व तसे सामनेवाला क्र.1 यांस कळविले व सामनेवाला क्र.1 याने ते टायर बदलून दुसरे नवीन टायर दिले. उर्वरित तिन टायरमध्ये सुध्दा निर्माणधिन दोष नसल्यामुळे बदलून देणे आवश्यक होते परंतु सामनेवाला क्र.2 ने यांने उर्वरित तिनही टायर्स मध्ये कंपनीचा दोष नाही असे कारण दाखवून टायर बदलून देण्यास नकार दिला. चारही टायर खराब झाल्याने ताबडतोब तक्रारदारांना दूसरे नवीन टायर खर्च करुन घ्यावे लागले. त्यामुळे तक्रारदाराची आर्थिक पिळवणूक झाली. चारही टायर पून्हा डिलरकडे परत दिले, फिटर कडून खोलून घेतले या खर्चामध्ये तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला.
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु.55,000/- नूकसानीबददल द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह सामनेवाला यांनी तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावेत. मानसिक त्रासाचे वेगळे रु.10,000/-, दाव्याचा खर्च रु.2,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.28.6.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारीतील सामनेवाला क्र.1 चे नांव तक्रारदाराने चूकीचे दर्शविले असून त्यांचे खरे नांव प्रविण गणपतराव पाठक आहे. सामनेवाला क्र.1 हा टायर विक्री करतो परंतु मूदतीत टायरमध्ये काही निर्माणधीन दोष आढळल्यास टायर कंपनीकडून बदलून मिळते इतर कोणतेही उदा.टायर्स व्यवस्थित न बसवल्यामुळे किंवा व्यवस्थित टायर्सची फिटींग न केल्यामुळे जर टायर्स खराब झाले तर त्यांची जबाबदारी सामनेवालांवर येत नाही.
सामनेवाला क्र.1 कडून खरेदी केलेले चारही टायर बदलीची तक्रार सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना पाठविली होती. त्यापैकी एका टायरमध्ये निर्माणधीन दोष आढळला त्यामुळे सदरचे टायर तक्रारदारांना बदलून देण्यात आले. यात सामनेवाला यांनी कूठलाही सेवेत कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी. चूकीची तक्रार दाखल केल्याने तक्रारदाराकडून सामनेवाला यांनी रक्कम रु.5,000/- देणे बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.5.6.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी चार टायर्स सदर कंपनीचे खरेदी केले होते ही बाब मान्य आहे. सदर चार टायर्स सामनेवाला क्र.1 मार्फत सामनेवाला क्र.2 कडे खराब झाल्यामुळे पाठविण्यात आल्याची बाब सामनेवाला यांना मान्य आहे परंतु त्या बाबत टायर्सची तपासणी केली असता एक टायरमध्ये दोष आढळल्यावरुन सदरचे टायर सामनेवाला क्र.2 यांनी बदलून देण्या बाबत सामनेवाला क्र.1 यांना कळविले आहे. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी त्यांना टायर बदलून दिले आहे परंतु उर्वरित तिन टायरमध्ये निर्माणधीन दोष आढळला नाही त्यामुळे त्या बाबतची कारण दर्शवून तिन्हीही प्रस्ताव कंपनीने रदद करुन सामनेवाला क्र.1 यांना कळविले आहे. यात सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. तक्रारदाराच्या चूकीमुळे जास्तीचा भार किंवा टायर व्यवस्थित न बसवले या व अशा अनेक कारणाने टायरमध्ये दोष निर्माण झाला तर तो निर्माणधीन दोष म्हणता येणार नाही. उर्वरित तिन टायरमध्ये निर्माणधीन दोष असल्या बाबतचा कोणत्याही तज्ञाचा पुरावा तक्रारदारानी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रार खर्चासह खारीज करणे योग्य आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांचा लेखी जवाब, सामनेवाला क्र.1 चे संजय जैन यांचे शपथपत्र, सामनेवाला क्र.2 चे टेक्नीकल सर्व्हीस इनचार्ज श्री.विजयकुमार जाधवर साक्षीदार यांचे शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.लघाने व सामनेवाले क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.एम.बी.जोशी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून सामनेवाला यांनी उत्पादित केलले ट्रॅक्टर व ट्रॉली साठी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे चार टायर्स विकत घेतल्याची बाब सामनेवाला क्र.1 व 2 यांना मान्य आहे. सदर टायर गॅरंटीचे काळात खराब झालेले आहे व त्या बाबतची तक्रार तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडे केलेली आहे. सामनेवाला क्र.1 ने चारही टायरच्या तक्रारीत टायर्स सह सामनेवाला क्र.2 कडे पाठविले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादित कंपनीने त्यांचेकडील उपलब्ध साधनानुसार टायरची तपासणी करुन चार टायर पैकी एक टायरमध्ये उत्पादित दोष दिसून आल्यामुळे सदरचे टायर बदलून देण्या बाबतचे पत्र सामनेवाला क्र.1 यांना देण्यात आलेले आहे व त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी टायर बदलून दिलेले आहे व उर्वरित तिन टायरमध्ये उत्पादित दोष तपासणीत आढळून न आल्याने सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 कंपनीने नाकारला आहे. तसेच स्वतंत्र पत्र सामनेवाला क्र.1 यांनी दिलेले आहे. त्यांचा प्रस्ताव तक्रारदारांना दिलेला आहे.
तसेच सदर प्रकरणात सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे खुलाशासोबत त्याचे टेक्नीकल सर्व्हीस इनचार्ज श्री. जाधवर यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
टायर खराब झाल्यानंतर गॅरंटीचे कालावधीत तक्रारदाराने सर्व कारवाई केलेली आहे. परंतु सामनेवाला क्र.2 यांचे टेक्नीकल सर्व्हीस इनचार्ज यांचे मते एक टायरमध्ये उत्पादित दोष असल्याचे आढळून आले व उर्वरित तिन टायरमध्ये उत्पादित दोष नाही असे आढळून आला. या संदर्भात ( श्री. जाधवर, साक्षीदार ) तक्रारदारांनी सदरचे शपथपत्र नाकारलेले नाही.तसेच तक्रारदारानी टायरमधील दोष हा उत्पादित दोष असल्या बाबतचा कोणत्याही तज्ञाचा पुरावा दाखल केलेला नाही. ही वस्तूस्थिती लक्षात घेता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही. तसेच तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार टायरमध्ये निर्माणाधीन दोष असल्याचे तक्रारदाराचे विधान स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड