निकाल
पारीत दिनांकः- 31/03/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार क्र. 1 ही तक्रारदार क्र. 2 यांची मुलगी आहे, तिने जाबदेणार यांच्या रत्नागिरी शाखेमध्ये जुलै 2010 मध्ये सीएम 12 या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतलेला होता. यासाठी तक्रारदारांनी एकुण रक्कम रु. 58,000/- फी भरली होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, हा कोर्स दोन वर्षांचा होता. तक्रारदार क्र. 2 यांची पुणे येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या मुलीस जाबदेणारांच्या पुणे येथील शाखेमध्ये जाणे भाग पडले. जाबदेणारांच्या पुण्याच्या शाखेतील शिकवणे चांगले नसल्याची तक्रार त्यांनी प्रत्यक्षात केली तरीही शिकविण्याच्या पद्धतीमध्ये काहीही सुधारणा न झाल्यामुळे तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी एप्रिल 2011 पासून क्लास बंद करण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर दि. 15/6/2011 व दि. 18/10/2011 रोजीच्या पत्राद्वारे त्यांनी भरलेली फी परत मागितली, परंतु त्यांना फी परत मिळाली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून, त्यांनी फी पावतीमध्ये सेवा कराची जी रक्कम दाखविली आहे तेवढी सेवा कर भरल्याचे प्रमाणपत्र सेवाकर विभागाकडून देण्यात यावे व प्रमाणपत्र दाखविता आले नाही तर रक्कम रु. 44,000/- द.सा.द.शे. 9% व्याजदराने आणि प्रमाणपत्र सादर केल्यास सेवाकराची रक्कम रु. 44,000/- मधुन वजा करुन उर्वरीत रक्कम व्याजासहित मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते मंचामध्ये गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 2/7/2010 रोजी रक्कम रु. 15,000/- व दि. 4/8/2010 रोजी रक्कम रु. 43,000/- असे एकुण रक्कम रु. 58,000/- भरल्याचे व त्यांना रक्कम रु. 5000/- ची सुट मिळाच्याचे पावत्यांवरुन दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 15/6/2011 रोजे जाबदेणारांना पत्र पाठविल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दोन वर्षाच्या अभ्यासक्रमापैकी फक्त एकाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुणे येथील शिक्षक व्यवस्थित शिकवत नव्हते, वारंवार सांगूनही त्यांच्या शिकविण्यामध्ये सुधारणा होत नव्हती म्हणून तक्रारदार क्र. 1 यांनी क्लास बंद करणे भाग पडले. कुठल्याही इन्स्टीट्युटमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षाची फी ज्या त्या वर्षी घेतात, परंतु जाबदेणारांनी अभ्यासक्रमाच्या दोन्ही वर्षांची फी एकाच वर्षी घेतली, हे संयुक्तीक नाही असे मंचाचे मत आहे. कुठल्याही कारणामुळे विद्यार्थ्याला जर दुसर्या वर्षी क्लासमध्ये जाणे किंवा तो अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नसेल तर त्या वर्षाची फी परत करणे ही जबाबदारी जाबदेणारांची आहे. जाबदेणारांच्या पुणे येथील शाखेमध्ये व्यवस्थित शिकवत नव्हते म्हणून तक्रारदारांना क्लासला जाणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, तसेच अनेकवेळा फीची रक्कम परत मागूनही जाबदेणारांनी ती परत केली नाही. त्यामुळे जाबदेणारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब दिसून येतो. तक्रारदार क्र. 1 यांनी एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे उर्वरीत एका वर्षाच्या फीची रक्कम व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे दोन वर्षांकरीत एकुण 58,000/- फी भरली होती, त्यापैकी एकुण रक्कम रु. 5417/- जाबदेणारांनी सर्व्हिस टॅक्सचे घेतले. त्यामुळे तक्रारदार रक्कम रु. 58,000/- - रु. 5400/- = रु. 52,600 च्या निम्मी रक्कम म्हणजे रु. 26,300/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1000/- मिळण्यास हक्कदार ठरतात.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास एकुण रक्कम रु. 27,300/-
(रु. सत्तावीस हजार तीनशे फक्त) या आदेशाची प्रत
मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावे.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.