( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश (पारित दिनांक : 27, सप्टेंबर 2010) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सदर तक्रार मंचामध्ये दाखल केलेली आहे. तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्यांचे म्हणण्यानुसार, गैरअर्जदार ही नोंदणीकृत संस्था असुन त्यांचे इतर कार्याव्यतिरिक्त ते निश्चित कालावधी करता ठेवी स्विकारुन कालावधी संपल्यानंतर व्याजासह रक्कम परत करणे हे कार्य करते. गैरअर्जदार संस्थेचे पदाधिका-यांच्या सुचनेवरुन तक्रारकर्त्याने दिनांक 9.12.2002 रोजी पावती क्रं.854, रुपये 50,000/-, दिनांक 27.1.2003 रोजी पावती क्रं.865, रुपये 10,000/-, दिनांक 19.08.2003 रोजी पावती क्रं.932, रुपये 15,000/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचे संस्थेमधे ठेव म्हणुन जमा केली व त्याच्या पावत्या गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास दिल्या. गैरअर्जदाराने सदरच्या ठेवी रक्कमा 8 टक्के व्याजासह तीन वर्षानंतर परत देण्याचे आश्वासन देऊनही, गैरअर्जदार संस्थेने तक्रारदारास रक्कमा परत केल्या नाहीत. दिनांक 15.2.2007 रोजी गैरअर्जदार संस्थेचे अधिकरी श्री शंकर गोविंदराव खणगन व श्री केशव बिसने यांचे सहीचा शिक्षक सहकारी बँक,रामटेक शाखेचा रुपये 40,000/- चा धनादेश ठेवी रक्कमा परतावा म्हणुन तक्रारदारास दिला. परंतु तो “ अपुरा निधी ” या कारणास्तव वटला नाही म्हणुन तक्रारकर्त्याने N.I.A. अंतर्गत गैरअर्जदार संस्था व त्यांचे पदाधिका-यांचे नावे खटला दाखल केला. त्यांत आरोपींची सुटका झाली. त्याविरुध्द तक्रारकर्त्याने मा.उच्च न्यायालय, नागपूर बेंच येथे अपिल दाखल केले. दरम्यान संस्थेचे तत्कालीन अधिकारी श्री.शंकर गोविंदराव खंणगन यांचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांचे नाव सदर तक्रारीतुन वगळयात आले. तक्रारकर्त्याने ठेवी म्हणुन ठेवलेल्या रक्कमा गैरअर्जदार संस्थेने परत केल्या नाही ही गैरअर्जदार संस्थेने तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचे विरुध्द सदर तक्रार दाखल करुन तक्रारकर्त्याने वेळोवेळी जमा केलेल्या रक्कमा एकुण रुपये 75,000/-, 18 टक्के व्याजासह परत करावी. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- मिळावा इत्यादी मागण्या केल्या. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं 1 ते 9 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार क्रं. 1 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.2 ची नोटीस “ ऑफीस बंद ” या शे-यासह परत आली म्हणुन त्यांना या प्रकरणातुन वगळण्यात आले. तसेच गैरअर्जदार क्रं.9 यांना नोटीस पाठविली परंतु 30 दिवसाचा कालावधी उलटुन गेला व गैरअर्जदार क्रं. 9 हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 24.6.2010 रोजी पारित करण्यात आला. तर गैरअर्जदार क्रं. 3 ते 8 हजर झाले व यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार कं. 1 यांनी गैरअर्जदार संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य केले आहे मात्र तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांचे कथनानुसार तकारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही. तक्रार कालमर्यादेत नाही. तसेच श्री शंकर गोविंदराव खंगन व श्री केशव बिसने यांचा संस्थेच्या कार्यकारीणी मंडळात समावेश नव्हता. तसेच गैरअर्जदार संस्था ही 2007 सालापासुन बंद आहे. गैरअर्जदार संस्थेचा उद्देश ठेवी निर्धारित वेळेसाठी जमा करणे व त्यावर व्याज देणे हा कधीच नव्हता. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास ठेवी परत करण्याच्या उद्देशाने कधीच धनादेश दिलेला नव्हता. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास पाठविलेली मागणी गैरअर्जदार संस्थेसंबंधी नसल्यामुळे त्याबद्दल उत्तर देण्यात आले नाही. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खोटी आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं.1 यांनी केलेली आहे. गैरअर्जदार कं. 3 ते 8 यांनी आपला लेखी जवाब दाखल केला व गैरअर्जदार क्रं.1 प्रमाणे उत्तर दाखल केले व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार कागदपत्रे दाखल केलीत. तर गैरअर्जदार क्रं 1 व 3 ते 8 यांनी दस्तऐवजयादीनुसार कागदपत्रे दाखल केली. तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल केले. -: कारणमिमांसा :- तक्रारीतील वस्तुसथितीवरुन असे दिसुन येते की गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याकडुन ठेवी स्वरुपात काही रक्कम स्विकारल्या होत्या. (कागदपत्र क्रं.13,14,15) त्यामुळे तक्रारदार गैरअर्जदार यांचा “ ग्राहक आहे ”. तसेच गैरअर्जदार यांनी सदरच्या रक्कमा अद्यापही परत केल्या नाही म्हणुन सदर तक्रार ही कालमर्यादेत आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. तक्रारकदाराने कागदपत्र क्रं.13,14,15 प्रमाणे सादर केलेल्या पावत्यावरुन तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे संस्थेमध्ये दिनांक 9.12.2002 रोजी पावती क्रं.854, रुपये 50,000/-, दिनांक 27.1.2003 रोजी पावती क्रं.865, रुपये 10,000/-, दिनांक 19.08.2003 रोजी पावती क्रं.932, रुपये 15,000/-, असे एकुण 75,000/- एवढी रक्कम ठेवी स्वरुपात ठेवलेली होती असे दिसुन येते. गैरअर्जदार यांचे मते त्यांनी तक्रारदाराकडुन ठेवी स्विकारल्या नव्हत्या. गैरअर्जदार संस्थेच्या नियमावलीनुसार संस्थेचा ठेवी स्विकारणे व त्यावर व्याज देणे हा व्यवसाय नाही. परंतु गैरअर्जदाराने सदर पावत्या खोटया आहे असा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने सदर रक्कमा गैरअर्जदार संस्थेकडे ठेवी स्वरुपात ठेवलेल्या होत्या या निष्कर्षाप्रत हे मंच येते. गैरअर्जदार यांचे म्हणणे श्री शंकर गोविंदराव खंगन व श्री केशव बिसने हे संस्थेचे कधीच पदाधिकारी नव्हते. परंतु तक्रारीतील कागदपत्र क्रं.81 वर सादर केलेला स्टेटमेंन्टवरुन असे निर्देशनास येते की, मा.JMFC, तुमसर यांच्या पुढील तक्रार क्रं.376/07 मधील सीआरपीसी 313 चे स्टेटमेंटमधे श्री केशव बिसने यांनी ते संस्थचे पर्यवेक्षक/सुपरवायझर म्हणुन काम पाहत असल्याचे मान्य केल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारीतील तक्रारदाराच्या शपथपत्रावरुन गैरअर्जदार श्री शंकर गोविंदराव खंणगन व श्री केशव बिसने संस्थचे तत्कालीन पदाधिकारी होते. याशिवाय तक्रारीत सादर केलेल्या पावत्या सुध्दा संस्थेच्या लेटर हेडवर दिलेल्या आहेत. एवढेच नव्हेतर संस्थेचे सध्यांचे सचिव यांचे श्री शंकर गोविंदराव खंणगण हे वडील असल्याचे तक्रारदाराने दाखल केलेल्या शपथपत्रावरुन निर्देशनास येते. (कागदपत्र क्रं.52) गैरअर्जदार यांनी सदरच्या व्यक्ती तत्कालीन पदाधिकारी नसल्याचे व तक्रारीतील पावत्या खोटया असल्याचा कुठलाही सबळ पुरावा सादर केलेला नाही. जरी समजा संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी बदलेले असले किंवा जरी हयात नसतील, तरी गैरअर्जदार संस्था “ कारपोरेट पर्सनालीटी ” या नात्याने तक्रारदाराच्या ठेवी रक्कमा परत करण्यास जबाबदार राहतील असे या न्यायमंचाचे मत आहे. सदर ठेवी कीती मुदतीकरिता व त्यावर किती व्याज ठरलेले होते याबाबत तक्रारदाराने कुठलाही पुरावा सादर केला नाही. त्यामुळे मुदत ठेवीवर बँकेच्या प्रचलित व्याज दराचा विचार करता तक्रारदार 8 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र राहतील असे या न्यायमंचाचे मत आहे. सबब आदेश. // अं ति म आ दे श //- 1. तक्रार अंशतः मंजुर करण्यात येईल. 2. गैरअर्जदार संस्थेने तक्रारदार यांनी दिनांक 9.12.2002 रोजी पावती क्रं.854, रुपये 50,000/-, दिनांक 27.1.2003 रोजी पावती क्रं.865, रुपये 10,000/-, दिनांक 19.08.2003 रोजी पावती क्रं.932, रुपये 15,000/-प्रमाणे जमा केलेल्या ठेवी परत कराव्यात. तसेच सदर ठेवीवर जमा केल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याज, रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो तक्रारदारास द्यावे. 3. गैरअर्जदार संस्थेनी तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- तक्रारदारास द्यावे. 4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार संस्थेने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Mrs.Jayshree Yangal] Member[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs. Jayshree Yende] MEMBER | |