नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दोषयुक्त व बनावट बियाणे विकून सदोष सेवा दिली म्हणून नुकसान भ्रपाई मिळणेकरीता त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रार क्र.७५/१०
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार विजयसिंग यांची शेती मागिल ५ वर्षापासून त्यांचे अत्येभाऊ लक्षमणसिंग गिरासे हे त्यांच्या वतीने करत आहेत व त्यांना अधिकारपत्रही देण्यात आले आहे. तक्रारदार यांनी दि.०२/०६/०९ रोजी दोंडाईचा येथील विरुध्द पक्ष क्र.२ यांचेकडून संकरीत बाजरीचे वाण प्रो.अॅग्रो ९३३३,प्लॉट क्र.जी.२०-९८४०१९ च्या दोन बॅग खरेदी केल्या. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.२ यांनी १ हे.२० आर. जमिनीवर ४० ते ४५ क्विंटल उत्पन्न येईल असे आश्वासन दिले. तक्रारदार यांनी सदर बाजरी दि.२४/०६/०९ रोजी पेरली केली. त्यानंतर पिकाची वाढ होत असतांना अपेक्षित वाढ होत नसल्याचे व पिक पिवळे पडून जळत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.२ यांना सदर माहिती दिली असता त्यांनी विरुध्द पक्ष क्र.१ व ३ यांना विचारा असे सांगितले. परंतूत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारीची दाखल घेतली नाही.
३. तक्रारदार यांनी दि.११/०८/०९ रोजी गटविकास अधिकारी यांना अर्ज देऊन पिकाची पाहणी करणेबाबत विनंती केली. त्यानुसार गट विकास अधिकारी व मोहिम अधिकारी जिल्हा परिष, धुळे यांनी दि.२६/१०/०९ रोजी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली व पंचनामा केला. सदर अहवालात सरासरी बाजरी पिकाची झाडे ३ फुट उंचीची असल्याचे व कणसामध्ये दाणे न भरल्याचे व बाजरी पिवळी पडल्याचे नमुद केले. तसेच पिक ५ फुट उंचीचे असणे आवश्यक असतांना उंची कमी आहे व तक्रारदार यांना बाजरीचे पिकाचे उत्पन्न येणार नाही असे समितीने नमुद केले. यावरुन बियाणे दोषयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.
४. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, त्यांनी अत्यंत मेहनतीने बाजरी पिकाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी पुर्व मशागत व खते, निदणी इ. साठी रु.३१,८६०/- खर्च केले होते. तसेच उत्पन्न न आल्यामुळे४५ क्विंटलचे बजार भाव रु.११५०/- नुसार रु.५१,७५०/- चे उत्पन्न बुडाले असे एकूण रु.८३,६१०/- चे नुकसान विरुध्द पक्ष यांच्यामुळे झाले आहे. त्यासाठी त्यांनी उत्पन्नाचे रु.८३,६१०/-, मानसिक त्रासापोटी रु.६०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.२५,०००/- मिळावा तसेच त्यावर १२ टक्के दाराने व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
५. तक्रारदारयांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.३ वर शपथपत्र, तसेच नि.५ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ६ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.५/१ वर ७/१२ उतारा, नि.५/२ वर खरेदी पावती, नि.५/३ वर बियाण्याचे पाकिट, नि.५/४ वर अधिकार पत्र, नि.२३ वर पुराव्याचे शपथपत्र आणि नि.२५ वर लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
तक्रार क्र.७५/१०
६. विरुध्द पक्ष क्र.१ यांना नोटीसची बजावणी झालेली आहे. त्याची पोहोच नि.८ वर आहे. परंतू ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश करण्यात आले.
७. विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी आपला खुलासा नि.१९ वर दाखल करुन तक्रादार यांनी दाखल केलेली खरेदी पावती ही लक्ष्मण गिरासे यांच्या नावाने आहे व ७/१२ वर विजयसिंह राजपुत असे नाव आहे. त्यामुळे तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
८. विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी पुढे असे म्हटले आहे की, जोपर्यंत संबंधीत बियाणे प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी होत नाही तोपर्यंत बियाण्यामध्ये दोष आहे ही बाब सिध्द होत नाही. समितीने तर्काच्या आधारावर व कोणतेही शास्त्रोक्त कारण न देता आपला अभिप्राय दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हयामध्ये तज्ञ व्यक्तींची सिड समिती स्थापन केलेली आहे व समितीने कारणे देऊन अभिप्राय देणे जरुरी आहे. समितीने तक्रारदार यांच्या शेतावर जाण्यापुर्वी कंपनीस नोटीस दिलेली नाही. सदर अहवालामध्ये बियाणे कमी दर्जाचे आहे किंवा त्यामध्ये दोष आहे असे कोठेही नमुद केलेले नाही. सदर अहवाल मोघम स्वरुपाचा व तक्रारदारास खुष करण्याच्या उद्देशाने दिलेला आहे. त्यामुळे सदर अहवाल ग्राहय धरता येणार नाही.
९. विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी पुढे असेही म्हटले आहे की, पिकाच्या वाढी व उत्पादना करीता पुष्कळशे घटक, जसे की जमिनीचा कस, हवामान, पर्जन्यमान, वेळोवेळी केलेल्या मशागत, किटक नाशकांची फवारणी इ. घटक जबाबदार असतात. तक्रारदार यांनी सदर पिकावर कोणती किटकनाशके फवारली याचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे किटकनाशकांच्या फवारणीमुळे नुकसान झाले असल्यास त्यास उत्पादक जबाबदार असू शकत नाही. समितीने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्र्कानुसार कार्यवाहीकेलेली नाही. पंचनाम्यावरशेताच्या गटाचाही उल्लेख नाही त्यामुळे अहवाल मान्य करता येणार नाही.
१०. विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी पुढे असे म्हटले आहे की, त्यांनी प्रो.अॅग्रो ९३३३ बॅच नं.९८४०१९ चे बियाणे धुळे जिल्हयात पुष्कळ प्रमाणात विक्री केलेले आहे परंतू इतर कोणाचीही तक्रार आलेली नाही. समितीने पंचनाम्याचे वेळेस नुकसानग्रस्त पिकाचे कुठलेही सॅम्पल घेतले नाही व प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली नाही. सदर बियाणे दोषयुक्त होते असा कुठलाही पुरावा दाखल नाही. त्यामुळे तक्रार अर्ज रद्दकरावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
तक्रार क्र.७५/१०
११. विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.२० वर शपथपत्र आणि नि.२१ वरील यादीनुसार ३ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.२१/१ वर लॅब रिपोर्ट, निृ२१/२ वर परिपत्रक आणि नि.२४ वर लेखी युक्तीवाद आणि वरिष्ठ न्यायालयानेअनेक न्यायिक द्ष्टांत दाखल केले आहेत.
१२. तक्रारदार यांची तक्रार विरुध्द पक्ष यांचा खुलासा व दाखल लेखी युक्तीवाद यांचा विचार करता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार ग्राहक आहे काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी सदोष बियाणे
विक्री केल्याचे तक्रारदार यांनी सध्दि केले आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१३.. मुद्दा क्र.१ – तक्रारदार यांनी बियाणे खरेदी केल्याची पावती ही लक्ष्मण नारायण गिरासे यांच्या नावाची आहे व दाखल केलेला ७/१२ उतारा हा विजयसिंह राजपूत यांच्या नावाचा आहे. त्यामुळे तक्रारदार ’ग्राहक’ नाही असा विरुध्द पक्ष यांनी आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांनी त्यांची शेती त्यांच्यातर्फे त्यांचे आतेभाऊ लक्ष्मणसिंह गिरासे हे ब-याच वर्षापासून करतात व प्रस्तुत तक्रारही त्याच्यावतीनेच दाखल केलेली आहे व त्याबाबतचे अधिकारपत्रही नि.५/६ वर दाखल केले आहे. त्यामुळे तक्रारदार ’ग्राहक’ आहेत या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१४. मुद्दा क्र.२ – तक्रारदार यांनी त्यांना विरुध्द पक्ष यांनी दोषयुक्त बियाणे विक्रीकेले होते हे सिध्द करण्यासाठी त्यांचे शपथपत्र, बियाणे खरेदी पावती, बियाण्याचे पाकिट, तक्रार अर्जाची प्रत आणि जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल दाखल केला आहे. सदर समितीने दिलेल्या अहवालात पुढील प्रमाणे अभिप्राय आहे.
“प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आज दि.२६/१०/०९ रोजी तक्रारीत प्रक्षेत्रास भेट दिली असता तक्रारीत बाजरी पिकाची पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करणेत आली असून रॅण्डमपध्दतीने १० x १० फुट प्लॉट मधील दोन ठिकाणी निरक्षणे घेतली असता सरासरी
तक्रार क्र.७५/१०
बाजरी पिकाची झाडे ३ फुट उंचीचे आढळून आली. प्रत्येक झाडास १ ते २ फुटवे दिसून आली. शेतक-यांच्या सांगण्यानुसार पेरणी केल्यापासून सदरचे पिक पिवळी पडून जळत होते. तसेच बियाणेला बिज प्रक्रिया केली नसल्याचे शेतक-यांनी पंचनामा करतेवेळी सांगितले. सदर पिकाच्या पेरणीचा दि.२४/०६/०९ लक्षात घेता सदर बाजरी पिक ५ फुट उंचीचे असणे आवश्यक होते. तसेच कणसामध्ये १०० टक्के दाणे भरणेआवश्यक असतांना प्रत्यक्ष पंचनामा करतेवेळी कणसामध्ये तुरळक स्वरुपात दाणे असल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष पिक पाहणी वरुन तक्रारदार शेतक-यास बाजरी पिकाचे अपेक्षित उत्पन्न येणार नाही असे समितीचे मत आहे. तसेच पिकाची उगवण चांगली, पिकाची वाढ कमी, पिकात अंतरमशागत व्यवस्थित असे नमुद आहे.
१५. विरुध्द पक्ष यांनी सदर पंचनामा करणेपुर्वी आवश्यक असलेली नोटीस त्यांना देण्यात आली नाही. अहवालात शासनाचे परिपत्रकानुसार कार्यवाही नाही. तसेच समितीने बियाणे प्रयोग शाळेत पाठवले नाही त्यामुळे अहवाल अमान्य केला आहे. तसेच सदर अहवालात बियाणे दोषयुक्त होते असा उल्लेख नाही. बियाण्यात दोष असल्याबाबत काहीही पुरावा नाही असे म्हटले आहे.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ खालील न्यायिक दृष्टांताचा आधार घेतला आहे.
१. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी III (1998) CPJ 8 मे.महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं.लि. विरुध्द अलवलापती चंद्रा रेड्डी व इतर.
२. मा.राष्ट्रीय आयोग I (2003) CPJ 263 शाम बिज भंडार विरुध्द दरया सिंग.
३. मा.महाराष्ट्र राज्य आयोग IV (2003) CPJ 461 महाराष्ट्र हायब्रिड सिडस् कं. ज्ञानदेव केरबा खाडे व इतर.
४. मा.राष्ट्रीय आयोग I (2003) CPJ 241 नॅशन सिड्स कॉर्पोरेशन विरुध्द नेमिपती नागी रेड्डी.
५. मा.महाराष्ट्र राज्य आयोग I (2004) CPJ 272 महेंद्रा हायब्रिड सिड्स कं.लि. विरुध्द बाबुराव व इतर.
१६. तर विरुध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ खालील न्यायिक दृष्टांताचा आधार घेतला आहे.
१. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी १९८६ – २००५ कन्झुमर ९३९७ हरियाणा सिड्स डेव्हलपेन्ट कॉर्पोरेशन विरुध्द साधू व इतर.
२. तक्रार क्र.७५/१०
३. मा.राष्ट्रीय आयोग यांनी १९८६ – २००६ कन्झुमर १०३५३ सानेकरण ग्लाडीओली ग्रोवर्स विरुध्द बाबूराम.
४. मा.राष्ट्रीय आयोग यांनी II 2007 CPJ 148 इंडो अमेरीकन हॅब्रिड सिड्स व इतर विरुध्द विजय कुमार.
५. मा.महाराष्ट्र राज्य आयोग III (2003) CPJ 628 बिजो शितल सिड्स विरुध्द शिवाजी अनाजी घोले.
६. मा.महाराष्ट्र राज्य आयोग यांनी पहिले अपिल क्र.७१०/०७, पहिले अपिल क्र.२२३४/०५, पहिले अपिल क्र.९७६/०५ इ. न्यायिक दृष्टांत दाखल केले आहेत.
१७. आम्ही तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या वरील सर्व न्यायिक दृष्टांतांचे अवलोकन केले आहे. त्यातील प्रत्येक प्रकरणात वस्तुस्थिती वेगवेगळी दर्शविलेली आहे. काही न्यायिक दृष्टांतामध्ये न्यायालयासमोर मा.सर्वोच्च न्यायालय यांनी III (1998) CPJ 8 मे.महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं.लि. विरुध्द अलवलापती चंद्रा रेड्डी व इतर हा न्यायिक दृष्टांत सादर करण्यात आला नव्हता असे दिसून येते. त्यामुळे सदर न्यायिक दृष्टांत या ठिकाणी लागू होत नाहीत.
१८. तक्रारदार तर्फे अॅड.वेल्हणकर यांनी शेतक-याकडे असलेले सर्व बियाणे पेरले होते व त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नव्हते त्यामुळे सदर बियाणे तपासणीसाठी पाठवता आले नाहीत. त्यांनी सदर जबाबदारी विरुध्द पक्ष यांची होती असे म्हटले आहे. आम्ही वरील न्यायिक दृष्टांताचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात मा.सर्वोच्च न्यायालय यांनी III (1998) CPJ 8 मे.महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं.लि. विरुध्द अलवलापती चंद्रा रेड्डी व इतर असे तत्व विषद केले आहे की, उत्पादकांनी किंवा वितरकांनी त्यांनी विक्री केलेले बियाणे चांगले होते हे सिध्द करावयाचे असे तर त्यांनीच मंचापुढे अर्ज देवून त्याच लॉटचे बियाणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यासाठी विनंती करावयास पाहिजे. परंतू या ठिकाणी विरुध्द पक्ष यांना मंचाची नोटीस मिळाल्यानंतर देखिल त्यांनी बियाणे चांगले होते हे सिध्द करण्यासाठी सदर बियाण्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्याबाबत अर्ज दिलेला नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल कंपनीस मान्य नसेल तर सदर अहवाल चुकीचा आहे, अयोग्य आहे या संदर्भात दुसरा तज्ञांचा अहवाल देणे आवश्यक होते याबाबतही विरुध्द पक्ष यांनी काहीही खुलासा केलेला नाही.
२०. आम्ही बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल पाहिला असता त्यामध्ये बियाणे उगवले होते परंतू त्याची वाढ व्यवस्थित नव्हती व कंसामध्ये दाणे भरले नव्हते असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी पिक आल्यानंतर त्यात दाणे का भरले नाहीत
तक्रार क्र.७५/१०
याबाबत तज्ञांचा अहवाल देवून त्याची कारणे देणे आवश्यक होते. केवळ दाणे न भरण्यास अनेक कारणे आहेत असे म्हणून विरुध्द पक्ष यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे आम्हांस वाटते.
२१. प्रस्तुत तक्रारीमध्ये बायर बायो सायन्स प्रा.लि. यांनी बियाणे चांगले होते हे सिध्द केलेले नाही. त्यामुळे कृषि क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे बायर बायो सायन्स प्रा.लि. यांनी तक्रारदारांना सदोष बियाणे विक्री केले होते या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुद्दा क्र.२ उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
२२. मुद्दा क्र.३ - तक्रारदार यांनी बायर बायो सायन्स प्रा.लि. यांच्याकडून पुर्व मशागत व खते, निदणी इ. साठी केलेला खर्च रु.३१,८६०/-, उत्पन्न न आल्यामुळे ४५ क्विंटलचे बजार भाव रु.११५०/- नुसार रु.५१,७५०/- चे उत्पन्न बुडाले असे एकूण रु.८३,६१०/-, मानसिक त्रासापोटी रु.६०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.२५,०००/- मिळावा तसेच त्यावर १२ टक्के दाराने व्याज मिळावे अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे सदोष बियाणेमुळे नुकसान झाले आहे हे निश्चित. तक्रारदार यांनी त्यांना मागील वर्षी मिळालेल्या उत्पनाबद्दल पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे ४५ क्विंटलचे बजार भाव रु.११५०/- नुसार रु.५१,७५०/- चे उत्पन्न मिळाले असते हे मान्य करता येणार नाही. विरुध्द पक्ष यांनीही उत्पन्न किती येऊ शकते याबद्दल पुरावा दिलेला नाही. आम्ही धुळे जिल्हयातील बाजरीचे सर्वसाधारण उत्पादन व बजारभावाची माहिती घेतली असता एकरी १० क्विंटल उत्पन्न येते असे समजते. तसेच बजारभाव सर्वसाधारणपणे रु.९००/- ते रु.११००/- असा मिळतो. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ७/१२ वर बाजरी क्षेत्र १ हे. २० आर. दर्शविले आहे. परंतू प्रत्यक्ष पंचनामा करतेवेळी तक्रारदार यांनी नि.५/५ – २ वर १ हे. क्षेत्र असल्याचे नमुद केले आहे. सदर पंचनामा प्रत्यक्ष केलेला असल्यामुळे तक्रारदार यांचे क्षेत्र १ हे. होते हे मान्य करणे भाग आहे. त्यामुळे बाजारभाव रु.१०००/- व उत्तपन्न प्रति एकर १० क्विंटल गृहीत धरुन तक्रारदार यांचे रु.२५,०००/- नुकसान झाले आहे. त्यामुळे तक्रारदार पिक नुकसान भरपाईपोटी रु.२५,०००/- मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.१०००/- मिळणेस पात्र आहेत.
२३. मुद्दा क्र.४ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहेत.
तक्रार क्र.७५/१०
२. विरुध्द पक्ष बायर बायो सायन्स प्रा.लि. यांनी तक्रारदारांना रक्कम रु.२५,०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष बायर बायो सायन्स प्रा.लि. यांनी वरील आदेश क्र.२ मधील मुदतीत रक्कम न दिल्यास दोन्ही तक्रारदार सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख दि.१७/०२/२०१० पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र राहतील.
४. विरुध्द पक्ष बायर बायो सायन्स प्रा.लि.यांनी मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.१०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे