(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून तक्रार अर्ज कलम 1 मध्ये लिहीलेले रो हाऊस मिळकतीचे खरेदीपत्र करुन मिळावे, रक्कम रु.2,60,000/- या रकमेवर डिसेंबर 2003 पासून 18 टक्के दराने व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी पान क्र.30 लगत लेखी म्हणणे व पान क्र.31 प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार करुन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय 2) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मिळकतीचे खरेदीपत्र होवून मिळणेस पात्र आहेत काय?- होय. 3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांनी पान क्र.38 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.37 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 5 मध्ये, त्यांनी अर्जदार यांचेबरोबर रो हाऊस क्र.2 विक्रीबाबतचा करार केलेला आहे ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत दि.2/12/2003 रोजीचे करारपत्राची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. हे करारपत्र सामनेवाला यांनी स्पष्टपण नाकारलेले नाही. पान क्र.5 चे करारपत्राचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रो हाऊसची किंमत रु.3,50,000/- ठरलेली आहे. अर्जदार यांचेकडून रु.2,60,000/- मिळालेले आहे. रु.90,000/- अर्जदार यांचेकडून येणे आहेत. अर्जदार यांनी दि.6/12/2004 रोजी डॉ.समिरा शेख यांचेसमोर रु.50,000/- दिलेलेच नाहीत. पैसे पुर्णपणे मिळाल्यानंतर सामनेवाला हे व्यवहार पुर्ण करुन देण्यास तयार होते. अर्जदार यांनी जाहीर नोटीस दिल्यानंतर सामनेवाला यांनी वकिलांचे मार्फत नोटीस देवून येणे रक्कम रु.1,00,000/- बाकी आहे असे कळवले आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली नाही अर्ज रद्द करण्यात यावा” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 3 पान क्र.3 व 4 वरती रु.3,10,000/- कोणकोणत्या तारखेस दिले याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. यापैकी दि.6/12/2004 रोजी रक्कम रु.50,000/- डॉ.समिरा शेख यांचे समोर दिलेले आहेत असा उल्लेख केलेला आहे. परंतु ही बाब सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली आहे. अर्जदार यांनी या कामी डॉ.समिरा शेख यांचे किंवा अन्य कोणत्याही साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. पान क्र.5 चे करारपत्रामधील पान क्र.4 व 5 वरती भरणा तपशील दिलेला आहे. या तपशीलामध्ये अ.क्र.7 येथे रु.90,000/- दोन महिन्याच्या आत रोख किंवा चेक स्वरुपात द्यावयाचे आहेत असा उल्लेख केलेला आहे. अर्जदार यांनी पान क्र.6 ते 9 लगत एकूण 3 नोटीसेस दाखल केलेल्या आहेत. यापैकी पान क्र.7 लगत सामनेवाला यांनी अर्जदार यांना दि.27/12/2004 रोजी पाठवलेल्या उत्तरी नोटीशीची प्रत दाखल आहे. या उत्तरी नोटीशीनुसार सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडे रक्कम रुपये एक लाखची मागणी केलेली आहे. यामध्ये व्यवहाराप्रमाणे राहीलेली रक्कम रु.90,000/- व लाईटमिटर कनेक्शनपोटी रु.10,000/- असा उल्लेख आहे. पान क्र.7 चे सामनेवाला यांचे उत्तरी नोटीशीचा विचार करता अर्जदार हे व्यवहारापोटी सामनेवाला यांना रक्कम रु.90,000/- देणे लागत आहेत असे स्पष्ट दिसून येत आहे. पान क्र.5 चे करारामध्ये लाईट मिटर कनेक्शन करीता रु.10,000/- जादा द्यावे लागतील असा उल्लेख नाही. वर उल्लेख केल्यानुसार अर्जदार यांनी डॉ.समिरा शेख यांचे प्रतिज्ञापत्र किंवा अन्य साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचेकडून रक्कम रु.90,000/- मिळालेनंतर सामनेवाला यांनी अर्जदार यांना रो हाऊस क्र.2 चे खरेदीपत्र करुन द्यावे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये मानसिक त्रासाची रक्कम मिळावी किंवा तक्रार अर्जाचे खर्चाची रक्कम मिळावी अशी मागणीच केलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना रो हाऊस क्र.2 चे खरेदीपत्र नोंदवून व लिहून द्यावे. 3) खरेदीपत्राचे दिवशी व वेळी अर्जदार यांनी सामनेवाला यांना रक्कम रु.90,000/- द्यावेत. 4) खरेदीपत्राचा संपुर्ण खर्च अर्जदार यांनी करणेचा आहे. 5) अर्जदार यांच्या अन्य मागण्या नामंजूर करण्यात येत आहेत. |