::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/11/2017 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात नुकसान भरपाई मिळण्याकरिता, विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे.
सदर प्रकरणात तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तिवाद यांचे अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला. कारण विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होवूनही ते मंचासमोर हजर झाले नाही, म्हणून दिनांक 06/11/2017 रोजी विरुध्द पक्षाविरुध्द ‘‘ एकतर्फीचा आदेश ’’ मा. सदस्य यांनी पारित केला.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त, दैनिक लोकमत या वृत्तपत्रातील कात्रण यावरुन असा बोध होतो की, विरुध्द पक्ष त्यांचा श्रवण यंत्र विकण्याचा व्यवसाय, वाशिम येथे – शहर पोलीस स्टेशनच्या मागे, हॉटेल व्यंकटेश रेस्टॉरंट या ठिकाणी जाहिरातीव्दारे सुचना देवून करतात. तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त पृष्ठ क्र. 10 वरील विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना अदा केलेले बील, यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी दिनांक 19/02/2015 रोजी विरुध्द पक्षाकडून श्रवण यंत्र रुपये 4,000/- या किंमतीत खरेदी केले होते. म्हणून तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक असून, वाशिम मंचाला ही तक्रार तपासण्याचे कार्यक्षेत्र आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सदर श्रवण यंत्राचा हमी कालावधी एक वर्षाचा होता, असा बोध बिलावरुन होतो.
तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, सदर श्रवण यंत्राचा वापर करणे सुरु केल्यावरही त्यांना काहीही अैकायला येत नव्हते. त्यामुळे दिनांक 07/11/2015 रोजी जेंव्हा विरुध्द पक्ष वाशिम येथे आले, त्यावेळेस तक्रारकर्त्याने त्यांना ही बाब सांगितली असता, त्यांनी अजुन रक्कम रुपये 1,000/- दिल्यास दुसरे चांगले श्रवण यंत्र डिलर कडून आणेल, असे सांगीतले. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी अजुन एक हजार रुपये विरुध्द पक्षास दिले. त्याबद्दलची नोंद विरुध्द पक्षाने त्याच बिलावर करुन दिली. मात्र त्याचवेळेस विरुध्द पक्षाने जर अजुन 3,500/- रुपये दिले तर जपान कंपनीचे आधुनिक श्रवण यंत्र आणून देतो असे सांगितले. म्हणून तक्रारकर्ते यांनी पुन्हा विरुध्द पक्षाला रक्कम रुपये 3,500/- दिली, त्याची देखील नोंद विरुध्द पक्षाने मुळ बिलावर करुन दिली. विरुध्द पक्षाने जपान बनावटीचे श्रवण यंत्र एक महिन्यानंतर आणून देण्याचे कबूल केले. मात्र विरुध्द पक्षाने टाळाटाळ केली. म्हणून तक्रारकर्ते यांचा विरुध्द पक्षावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 01/06/2016 रोजी रजिष्टर पोष्टाने नोटीस पाठवून रक्कम रुपये 8,500/- ची मागणी केली. सदर नोटीस विरुध्द पक्षाला प्राप्त झाली, परंतु त्यांनी पुर्तता केली नाही व ऊत्तरही दिले नाही, ही सेवा न्युनता आहे. म्हणून तक्रार प्रार्थनेनुसार मंजूर करावी, अशी विनंती तक्रारकर्त्याने केली आहे.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षाचे बील यावर तक्रारकर्ते यांनी तक्रारीत नमूद तारखेला वेळोवेळी विरुध्द पक्षाला रक्कम देवून एकूण रक्कम रुपये 8,500/- नवीन श्रवण यंत्र आणण्याकरिता दिली होती, असे त्या बिलावरील नोंदी वरुन दिसून येते. म्हणून तक्रारकर्त्याच्या युक्तिवादात मंचाला तथ्य आढळले. शिवाय तक्रारकर्त्याच्या कथनाला विरुध्द पक्षाकडून कोणतेही नकारार्थी कथन उपलब्ध नाही. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार प्रार्थनेनुसार अंशतः मंजूर केली.
सबब अंतिम आदेश, खालीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने सेवा न्युनता दर्शविल्यामुळे त्यांनी तक्रारकर्ते यांना श्रवण यंत्रासाठी स्विकारलेली संपूर्ण रक्कम रुपये 8,500/- ( अक्षरी रुपये आठ हजार पाचशे ) दरसाल, दरशेकडा 8 % व्याजदराने दिनांक 27/11/2017 ( आदेश तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई रक्कम, प्रकरण खर्चासह मिळून रुपये 8,000/- (अक्षरी रुपये आठ हजार फक्त ) द्यावी.
3. विरुध्द पक्ष यांनी ऊपरोक्त आदेशातील क्लॉज नं. 2 ची पुर्तता, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावी.
4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri