निकालपत्र :- (दि.06.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 2 यांना नोटीस पोहोचूनही प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाही. सामनेवाला क्र;1 यांनी म्हणणे दाखल केले आहे. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतकरी आहेत. सामनेवाला क्र.2 कंपनीमार्फत ससे युनिट नर-मादी या स्वरुपात पुरविले जातात. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना भूलथापा देवून सामनेवाला क्र.2 कंपनीकडील 10 ससे, त्यामध्ये 3 नर व 7 मादया असतात. प्रत्येक युनिटसाठी रुपये 15,000/- याप्रमाणे 2 युनिट (20 ससे) रक्कम रुपये 30,000/- सामनेवाला यांना देवून खरेदी केले. तसेच, सदर दोन युनिटला तक्रारदारांने पुरेसे बांधकाम केले असल्याने त्याकरिता त्यांना रुपये 30,000/- खर्च आला आहे. सामनेवाला यांनी सांगितलेप्रमाणे कोणत्याही युनिटमधील मादी ससे गर्भार न राहिल्याने त्यांनी सामनेवाला क्र.1 यांना तसे सांगितले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना थोडी वाट पहा असे सांगितले. त्यानंतरही तक्रारदारांनी सदर सशांना खाद्य, औषधोपचार करुनही त्यांच्यामध्ये पुर्नरुत्पादनाची क्षमता नसल्याची खात्री झाली व सदर ससे मांसासाठी तयार केले असल्याचे तक्रारदारांना कळून आले. याबाबत सामनेवाला क्र.1 यांना सांगितले असता त्यांनी तक्रारदारांना पूर्ण खर्च देत असल्याचे सांगितले. परंतु, सामनेवाला यांनी नुकसान भरपाई न दिल्याने त्यांना नोटीस पाठविली. परंतु, त्यास त्यांनी दाद दिली नाही. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्याकडून ससे युनिटसाठी स्विकारलेली रक्कम रुपये 30,000/-, तसेच सदर ससे पालनाकरीता शेड-वजा बांधलेले घर त्याच्या खर्चाची रक्कम रुपये 30,000/- व सशांना औषधोपचार व खाद्यासाठी झालेला खर्च रुपये 25,000/- अशी एकूण रक्कम रुपये 55,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.29.05.2008 रोजीचा करारनामा, दि25.12.2008 रोजीची सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्दची फिर्याद, सामनेवाला यांना दि.16.02.2009 रोजी दिलेली नोटीस, पोच पावती, श्री महालक्ष्मी ट्रेडर्स यांचेकडून दि.20.05.08, दि.22.05.08 व दि.27.05.08 रोजी खरेदी केलेल्या मटेरियलच्या पावत्या, मारुती माने यांचेकडून वीट खरेदी केलेबाबतची दि.04.05.08 रोजीची पावती इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी ससे पालनाचा व्यवसाय केलेला, तो सामनेवाला क्र.2 मार्फत केलेला आहे. सदर व्यवहाराशी सामनेवाला क्र.1 यांचा काहीही संबंध नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक हे नाते निर्माण होत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे मुद्दे निष्कर्षाकरिता येतात :- 1. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक हे नाते निर्माण होते काय ? व प्रस्तुतचा वाद हा -- होय. ग्राहक वाद होतो काय ? 2. सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे काय ? -- होय. 3. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? -- होय 4. काय आदेश ? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदार हे शेतकरी आहेत. सामनेवाला क्र.2 हे ससे उत्पादन करुन ते शेतक-यांना विक्री करतात व शेतक-यांनी सदर सशांपासून झालेले पुर्नरुत्पादन सामनेवाला क्र.1 मार्फत विक्री करावयाचे आहे. सदरचा ससे पालन व्यवसाय हा शेतीपुरक व्यवसाय असल्याने याबाबतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे दोन युनिट (20 ससे) सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादित केले सामनेवाला क्र.1 या प्रतिनिधीमार्फत खरेदी केले आहेत व त्या अनुषंगाने सामनेवाला क्र.2 व तक्रारदार यांचेमध्ये दि.29.05.2008 रोजी लेखी करार झालेचे दिसून येत आहे. सदर सशांची पुर्नरुत्पादनाची क्षमता नसल्याने सामनेवाला क्र.1 यांनी सदर ससे ताब्यात घेतले आहेत व सामनेवाला क्र.2 यांचेकडे सदर ससे देवून त्याची किंमत रुपये 30,000/- परत करीत आहे याबाबतची दि.10.12.2008 रोजी पोच पावती तक्रारदारांना दिली आहे. त्याची अस्सल प्रत प्रस्तुत कामी दाखल आहे. इत्यादीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 होकारार्थी आहे. मुद्दा क्र.2 व 3 :- तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांचेमध्ये दि.29.05.2008 रोजी झालेल्या कराराचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे 2 युनिट (20 ससे) तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून खरेदी केले आहेत. सदर सशांपासून झालेले पुर्नरुत्पादन सामनेवाला क्र.2 मार्फत विक्री करणेचे आहे. परंतु, तक्रारदारांची तक्रार विचारात घेतली असता सदर सशांची पुर्नरुत्पादनाची क्षमता नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना दि.10.12.2008 रोजी पोच पावती दिली आहे. सदर पावतीमधील मजकूर पुढीलप्रमाणे :- मी, रामदास वि. डोईफोडे, रा.माले, पावती लिहून देतो की, मी आपण-नामदेव धोंडिराम पोवार, रा.केर्ले यांना रुपये 30,000/- घेवून दि.29.05.2008 रोजी 20 ससे दिले होते. त्यांना बरेच दिवस झाले तरी पिल्ली न झाल्याने त्यांनी माझे सांगणेप्रमाणे सदरचे ससे मी कंपनीकडे बेळगांव येथे पाठवतो किंवा मी ससे दिलेप्रमाणे स्वत: मी आपले पैसे थोडे दिवसांत देतो. म्हणून लिहून दिली पोहोच पावती. दि.10.12.2008 सही/- उपरोक्त पावतीतील मजकूर विचारात घेतला असता तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना पुरविलेले ससे युनिटमधील ससे यांच्यामध्ये पुर्नरुत्पादनाची क्षमता नाही असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे हे या मंचास दिसून येत आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या कराराचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी ससे खरेदीपोटी सामनेवाला यांनी रक्कम रुपये 30,000/- दिले आहेत. तसेच, सदर ससे संगोपनासाठी बांधण्यात आलेल्या शेडचा खर्च तक्रारदारांनी श्री महालक्ष्मी ट्रेडर्स यांचेकडून पत्रा सिमेंट वाळू इत्यादी खरेदी केले आहे व त्याची दि.20.05.2008 रोजीची रक्कम रुपये 10,339/- ची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. तसेच, श्री महालक्ष्मी ट्रेडर्स यांचेकडून तक्रारदारांनी वाळू, सिमेंट, फरशी, चौकट, खिडकी इत्यादी खरेदी केले आहे व त्याची रक्कम रुपये 10,800/- ची दि.22.05.2008 रोजीची पावती प्रस्तुत कामी दाखल केलेली आहे. तसेच, सदर श्री महालक्ष्मी ट्रेडर्स यांचेकडील दि.27.05.2008 रोजीची खरेदी पावती पाहिली असता एकूण रुपये 4,160/- ची जाळी खरेदी केलेली आहे. तसेच, दि. 04.05.2008 रोजीची रक्कम रुपये 4,000/- चे वीट खरेदीची पावती दाखल केली आहे. असा एकूण खर्च 29,299/- इतका खर्च तक्रारदारांनी केला असल्याचे दिसून येते. सबब, उपरोक्त रक्कमा सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्याव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेसही पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी सशांसाठी औषधपाणी व खाद्यासाठी केलेल्या खर्चाबाबत कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नसल्याने तक्रारदार सदर खर्चाबाबतची रक्कम मिळणेस पात्र नाहीत. तक्रारदारांना देय रक्कमा देणेची सामनेवाला क्र.1 व 2 यांची जबाबदारी वैयक्तिक व संयुक्तिक आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्याकडून स्विकृत केलेली ससे विक्रीची रक्कम रुपये 30,000/- तसेच, तक्रारदारांना ससे संगोपनासाठी शेड बांधकामाचा आलेला खर्च रुपये 29,299/- अशी एकूण रक्कम रुपये 59,299/- (रुपये एकोणसाठ हजार दोनशे नव्व्याण्णव फक्त) तक्रारदारांना द्यावी. 3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त)
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |