नि. २२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३१४/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २६/११/२००८
तक्रार दाखल तारीख : २८/०१/२००९
निकाल तारीख : ०६/०३/२०१२
----------------------------------------------------------------
१. श्रीमती सुनिता नामदेवराव ठाकूर
वय वर्षे – ५७, धंदा – घरकाम
२. श्री सुनिल नामदेवराव ठाकूर
वय वर्षे – ३८, धंदा – व्यापार
३. श्री समीर नामदेवराव ठाकूर
वय वर्षे – ३४, व्यवसाय– व्यापार
सर्व रा. सारंग अपार्टमेंट, एस-२,
गव्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली-४१६ ४१५ ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. श्री रमाकांत बापूसो घोडके
वय वर्षे – ४०, धंदा – व्यापार
रा.लक्ष्मीनगर, मालती बंगला, लक्ष्मी देवळाजवळ,
कुपवाड रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.वाय.ताम्हणकर
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री आर.एस.जमादार
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज शेतजमीनीचा मालकीहक्काने कब्जा मिळावा या मागणीसाठी दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
अर्जदार हे एकाच कुटुंबातील रहिवासी असून अर्जदार नं.२ व ३ हे एकमेकांचे सख्खे भाऊ असून अर्जदार क्र.१ या त्यांच्या मातोश्री आहेत. जाबदार हे जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. अर्जदार नं.१ यांचे पती नामदेवराव ठाकूर हे मयत झाले असून जाबदार यांनी दि.२३ मे १९९० रोजी नामदेवराव ठाकूर यांना मौजे कुपवाड येथील शेतजमीन मिळकत गट नं.१०४ मधील हिस्सा क्र. ३ब, ४, ५, ६ याचे एकूण क्षेत्रापैकी ३ गुंठे प्लॉट खूषखरेदी देण्याचे ठरवून करार करुन दिला आहे. करारपत्रापासून दोन महिन्यांचे आत योग्य त्या सर्व कायदेशीर पूर्तता झालेनंतर जाबदार यांनी उर्वरीत रक्कम स्वीकारुन खरेदीपत्र करुन देण्याचे लेखी कराराप्रमाणे ठरले होते. जाबदार यांना अर्जदार यांचे पूर्वहक्कदार यांनी रक्कम रु.६,०००/- पोहोच केले आहेत व उर्वरीत रक्कम रु.१८,०००/- अर्जदार हे जाबदार यांना देण्यास कायम तयार होते व आहेत. जाबदार यांनी कराराप्रमाणे कोणतीही कायदेशीर पूर्तता केली नाही. अर्जदार व त्यांचे मयत वडील यांनी जाबदार यांना वारंवार शेतजमीनीची पूर्ण कायदेशीर पूर्तता करावी व उर्वरीत रक्कम रु.१८,०००/- स्वीकारुन मालकीहक्काने प्रत्यक्ष कब्जा द्यावा अशी मागणी केली. तथापि, जाबदार यांनी कोणतीही पूर्तता केली नाही व तक्रारदार यांना दूषित सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज शेतजमीनीचा रक्कम रु.१८,०००/- स्वीकारुन मालकीहक्काने कब्जा मिळविणेसाठी तसेच प्रत्यक्षात कब्जा देणे तांत्रिकदृष्टया शक्य नसेल तर रक्कम रु.६,०००/- व्याजासह परत मिळावेत या मागणीसाठी तसेच इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.१४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये अर्जदार व जाबदार यांचेमध्ये कसल्याही प्रकारचे करारपत्र अगर कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच जाबदार व कै.नामदेव ठाकूर यांचेमध्येही मिळकतीबाबत कोणताही करार झालेला नाही. अर्जदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये तथाकथित व्यवहार १९९० मध्ये झाला असल्याचे कथन केले आहे. त्यानंतर १९ वर्षापर्यंत अर्जदार यांनी कोणतीही कार्यवाही का केली नाही याचे कोणतेही स्पष्ट कारण नमूद केलेले नाही. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालण्यास पात्र नाही. सदर तक्रारअर्जास मुदतीची बाधा येते. तक्रारदार हे करारावरुन मालकीहक्क, कब्जा व खरेदीखत करुन घेणेची दाद मागत आहेत. अशी दाद या मे.कोर्टाकडे मागता येणार नाही. अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाहीत तसेच प्रस्तुतचा वाद हा ग्राहकवाद होत नाही. अर्जदार अगर त्यांचे पूर्वहक्कदार यांनी केव्हाही तक्रारदार यांना रक्कम रु.६,०००/- अदा केलेली नाही. तक्रारदारांची मागणी दिवाणी स्वरुपाची असल्याने सदरचा वाद या न्यायालयात चालणेस पात्र नाही. या जाबदार यांनी जमीनीचे मूळ मालक गणपती चुडाप्पा कांबळे वगैरे लोकांशी मिळकत खरेदी करण्याबाबत दि.५/९/१९८९ रोजी करार केला आहे. सदर मूळ मालकांनी खरेदीखत करुन दिले नाही त्यामुळे जाबदार यांनी मूळ मालकांचेविरुध्द सांगली येथील दिवाणी न्यायालयात करारावरुन खरेदीपत्र करुन मिळण्यासाठी स्पे.दि.मु. ३७/९२ चा दाखल केला असून सदरचा दावा अद्याप न्यायप्रविष्ट आहे. सदर जाबदार यांनाच अद्याप सदर शेतजमीनीची मालकीहक्क प्राप्त झाला नाही. या सर्व बाबींचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१५ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. प्रतिउत्तराचे पुष्ठयर्थ नि.१६ ला शपथपत्र दाखल केले आहे व नि.१७ चे यादीने १ कागद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२० ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रादार यांनी नि.२१ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. दोन्ही विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी अनुपस्थित राहिलेमुळे प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे, प्रतिउत्तर, व दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सदरच्या तक्रारअर्जामध्ये झालेल्या करारपत्रावरुन उर्वरीत रक्कम रु.१८,०००/- स्वीकारुन मालकीहक्काने कब्जा मिळावा अथवा वैकल्पिकरित्या कब्जा देणे शक्य नसल्यास रक्कम रु.६,०००/- व्याजासह परत मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या करारपत्राची झेरॉक्सप्रत याकामी तक्रारदार यांनी नि.५/१ वर दाखल केली आहे. तक्रारदार यांनी मूळ करारपत्र याकामी दाखल केलेले नाही. जाबदार यांनी सदरचे करारपत्र व झालेला व्यवहार अमान्य केला आहे. तसेच सदरचा वाद हा ग्राहकवाद होत नाही असेही नमूद केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जात केलेली मागणी विचारात घेता झालेल्या करारपत्रावरुन तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरणी मालकीहक्काने कब्जा देणेबाबत आदेश करण्याची बाब या न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात येईल का ? ही बाब प्रस्तुत प्रकरणी ठरविणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहक या शब्दाची व्याख्या दिली असून मोबदला देवून एखादी वस्तू अगर सेवा विकत घेतली असेल व सदरची वस्तू दोषपूर्ण असेल किंवा सेवेमध्ये त्रुटी असेल तर त्याबाबत ग्राहक न्यायालयामध्ये निश्चितच दाद मागता येईल. जमीन ही बाब वस्तू या प्रकारात येत नाही. सदरची बाब सेवा या प्रकारात येईल का हे पहात असताना सेवा या शब्दाची व्याख्या ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २(१)(ओ) मध्ये दिली असून त्यामध्ये Housing construction नमूद केले आहे. तक्रारदार व जाबदार यांचेतील वाद हा Housing construction बाबत नसून शेतजमीनीच्या खरेदी-विक्रीबाबतचा आहे त्यामुळे सदरची बाब सेवा या प्रकारातही येणार नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी आपल्या युक्तिवादासोबत सन्मा.राज्य आयोग, मध्य प्रदेश यांचा 2005 (1) CPR 280 हा दिनेशचंद्र विरुध्द विजयकुमार हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयाचे कामी सन्मा.राज्य आयोगाने Agreement to Sale a piece of land between two persons will not raise a consumer dispute if seller failing to execute a sale deed. असा निष्कर्ष काढला आहे. सदर निवाडयाच्या कामी सन्मा.राज्य आयोग यांनी परिच्छेद १२ मध्ये सन्मा.राज्य आयोग तामिळनाडू यांनी दिलेल्या निवाडयाचाही ऊहापोह केला असून सदर राज्य आयोग तामिळनाडू यांनी G.Krishnamurthy, Vs. P.Balaraman या निवाडयाचे कामी In case of Agreement of Sale of immovable property, no question of service arises and the remedy of the complainant is to only a suit for specific performance or for recovery of the amount in Civil Court. असा निष्कर्ष नोंदविला आहे.
वरील सर्व विवेचन विचारात घेता तक्रारदार व जाबदार यांचेतील वाद हा ग्राहकवाद होत नसल्याने तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ०६/०३/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.