जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 71/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
गोरक्ष पि. गंगाराम आमटे
वय 45 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.खांडे पारगांव पो.अंथरवण पिंपरी ता.जि.बीड
विरुध्द
1. राम टायर्स,
महावीर पेट्रोल पंपाजवळ, जालना रोड,
बीड ता.जि. बीड सामनेवाला
2. अपोलो टायर्स कंपनी लि.
बी-18, एम.आय.डी.सी..एरिया, नांदेड
आदर्श नगर, नांदेड 431 603
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.ए.कदम
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे :- अँड. सयद नासेर पटेल
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे सामनेवाले क्र.2 या टायर कंपनीचे अधिकृत विक्रेते आहे.
तक्रारदाराने ट्रॅक्टर ट्रेलर वाहनासाठी ट्रेलर नोंदणी क्र.एम.एच.-23-8188 व एम.एच.-23-3535 साठी सामनेवाले क्र.1 कडून सामनेवाले क्र.2 ने उत्पादित केलेले तिन टायर्स ज्याचे नंबर P138195-Nov.2010, P138637-Nov.2010, P148909-Nov.2010 व तीन टयूब 9.00-16 Tube-D असा माल दि.31.1.2011 रोजी व दि.2.2.2011 रोजी रक्कम रु.27,600/- मध्ये विकत घेतले. सदरील माल विकत घेतेवेळी सामनेवाले क्र.1 ने तक्रारदारास सहा महिन्याचे गॅरंटी दिली होती. सहा महिन्याचे आंतच टायर टयूब खराब झाले. त्यात काही दोष निघाल्यास बदलून देऊत किंवा त्यांची किंमत परत करुत अशी खात्री व विश्वास दिला होता. टायर टयूब विकत घेतल्याचे दिवशीच कुशल कारागिराकडून त्यांचे ट्रॅक्टर ट्रेलरचे वाहनाचे चांकाना बसविले. त्यानंतर तक्रारदाराने ट्रॅक्टर ट्रेलरचे चाकातील सदरील टायर्स-टयूबस मध्ये पूर्ण हवा ठेवून व ट्रेलरचे वाहनात मर्यादित भार ठेऊन ऊस वाहतूक करीत असताना दि.2.2.2011 रोजी बिड व औरंगाबाद रोडवर आडूळ गावाचे अलीकडे व पलिकडे तिन टायर्सचे रिंगगोट तुटले व ते फूटले. तिन टायर्स व तिन टयूब एकाच दिवशी फुटले व ते दोषपूर्ण निघाल्याने ते खराब झाले. यांची माहीती तक्रारदाराने ताबडतोब सामनेवाला क्र.1 ला दिली. सामनेवाला क्र.1 ने तक्रारदारास टायर टयूब बदलून मिळण्यासाठी सामनेवाला क्र.2 कडे पाठवावी लागेल व पास होऊन आल्यास बदलून मिळेल असे सांगितले. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडे दि.8.2.2011 रोजी सामनेवाला क्र.1 कडे टायर टयूब व त्यांचा खर्च रु.500/- दिला. सामनेवाला क्र.1 ने सामनेवाला क्र.2 कडे टायरटयूब बदलून मिळण्यासाठी पाठविले. तक्रारदाराने 30 दिवसानंतर सामनेवाला क्र.1 कडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सामनेवाला क्र.2 ने तूमचा दावा नाकारला आहे त्यामुळे टायरटयूब बदलून देण्यास स्पष्ट इन्कार केला.सामनेवाला क्र.2ने दावा नाकारल्याचे प्रत पोस्टाने तक्रारदारांना पाठविली. अशा त-हेने सामनेवाला यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे.
दि.24.3.2011 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली व टायरटयूब बदलून मागितले. त्यांनी नोटीस मिळूनही उत्तर दिले नाही, त्यांची किंमतही दिली नाही. त्या बाबत नूकसान भरपाईची खालील प्रमाणे मागणी करीत आहेत.
अ) टायर्स व टयूबस खराब निघाल्यामुळे तक्रारदाराचे
ट्रॅक्टर ट्रेलर वाहन दोन दिवस कामाविना उभे राहिले
त्यांची नूकसान भरपाई. रु.5,000/-
ब) तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासाची नुकसान
भरपाई रु.2,000/-
ब) सदरील खराब टायर्स व टयूबस बदलून
मिळण्यासाठी कंपनीकडे पाठविण्याचा खर्च रु.500/-
ड) खराब टायर्स व टयूबस बदलून न दिल्यास
त्यांची किंमत परत करण्याबाबत मागणी रक्कम रु.27,600/-
इ) तक्रारीचे खर्चाची रक्कम रु.3000/-
एकूण नूकसान भरपाईची रक्कम रु.38,100/-
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नूकसान भरपाई सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक किंवा संयूक्तीकरित्या देण्या बाबत आदेश व्हावेत. मानसिक त्रासाबददल रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/-, कंपनीकडे पाठविण्याकरिता रु.500/-, टायर्सची किंमत रु.27,600/- परत देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1यांनी त्यांचा खुलासा दि.4.10.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सामनेवाला क्र.1 विक्रेता आहे त्यामुळे त्यांची नूकसान भरपाईची जबाबदारी येत नाही. सदर नूकसान भरपाईशी सामनेवाला क्र.1यांचा संबंध नाही. बिलींग बरोबरच्या नियमानुसार सूचना पत्रात सूचना दिलेल्या असतात. त्यात सूचना क्र.1मध्ये नमूद केले आहे की, उत्पादक कंपनीच्या निर्णयानुसार वॉरंटी राहील. विक्रेता कोणत्याही प्रकारची सेवेची जबाबदारी स्विकारु शकत नाहीत. रिंग, गोट, तार व धागा सुटण्याची गॅरंटी राहणार नाही. या सर्व प्रकारची तक्रारदारांना माहीती असताना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी व मानसिक त्रास देण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी तक्रारदाराने सदरची खोटी व काल्पनिक तक्रार सामनेवाले विरुध्द दाखल केली ती खर्चासह खारीज करावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.4.10.2011 रोजी दाखल केला.खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदाराच्या टायरचे लॉक रिंग डॅमेज झालेले आहे. सदरची बाब ही वॉरंटीच्या शर्तीमध्ये नाही. सदरची बाब ही उत्पादित दोष नाही. टायरमध्ये हवा कमी जास्त झाल्यास किंवा जास्त वजन ट्रेलरमध्ये ठेवल्याने रिंग वजनामूळे डॅमेज होऊ शकते. कंपनीने योग्य रितीने तक्रारदाराचा दावा नाकारला आहे. त्यात तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,सामनेवाला क्र.2 चे टेक्नीकल सव्हीस चार्ज श्री.विजयकुमार रामहारी जाधवर यांचे शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.बोडखे व सामनेवाले यांचे विद्वान वकील श्री.कोल्हे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारीत नमूद असलेल्या नंबरचे तिन टायर्स व तिन टयूब दि.2.2.2011 आणि दि.31.1.2011 रोजी घेतले आहे.त्या बाबत सामनेवाला क्र.1 ने तक्रारदारांना दोन पावत्या दिलेल्या आहेत.
सदर टायर्स दि.2.2.2011 रोजी रिंगगोट तुटले व फुटले, तिनही टायर्स व टयूब एकाच दिवशी फुटले ते दोषयुक्त असल्या बददलची तक्रारदाराची तक्रार आहे.
तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाला क्र.1 कडे तक्रार केली. सामनेवाला क्र.1 ने सदरचे टायर्स व टयूब सामनेवाला क्र.2 कडे बदलून मिळण्यासाठी पाठविले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांचा टायरचा दावा नाकारला.
सदर दावा नाकारल्या बाबत सामनेवाला क्र.2 उत्पादक कंपनीने तक्रारदारांना सामनेवाला क्र.1 च्या नांवाने रिजेक्शन लेटर दिलेले आहे. त्यातही रिंगगोट तूटणे हा उत्पादित दोष नाही. तर कौशल्य नसलेल्या मजूराकडून बसवून घेणे, योग्य आकाराचे टायर न घेणे, जास्तीचा माल भरल्याने किंवा चूकीच्या पध्दतीने टयूब टायर बसवल्याने रिंगगोट तूटते अशी कारणे उत्पादक कंपनीने दिलेली आहेत.
या संदर्भात उत्पादक कंपनीच्या खुलाशासोबत दावा पावत्या आणि श्री.विजयकुमार जाधवर नांदेड यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.2 चे वतीने खुलासा श्री.संजय जैन ग्रूप मॅनेजर, लिगल अँन्ड कस्टीटयूटेड अँटोरनी यांनी दाखल केलेली आहे. त्यांचे शपथपत्रही दाखल आहे. रिजेक्शन लेटर पाहता ते नांदेड येथूनच देण्यात आलेले आहे. सदर पत्रावर अँथोराईजड सिंग्नेचर म्हणून त्यांच्या सहया आहेत. त्यांचे नांव नमूद नाही. तसेच सदरचे सामनेवाला क्र.2 चे नोंदणीकृत कार्यालय कोची येथे आहे. तसेच विजयकुमार जाधवर यांचे शपथपत्रज्ञचे अवलोकन करता त्यांचा हूददा शपथपत्रात टेक्नीकल सर्व्हीस इनचार्ज नमूद केलेले आहे व त्यांनी टायर्सची पाहणी केलेली आहे. परंतु सदरचा रिपोर्ट त्यांनी दिल्या बाबतचे त्यांचे शपथपत्रात नाही. सदरचे रिजेक्शन लेटर हे नांदेड वरुनच देण्यात असले तरी सोबत अँथोराईजड सिंग्नेचर यांचे शपथपत्र रिजेक्शन लेटर शाबीतीच्या दृष्टीने व तांत्रिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. विजयकुमार जाधवर यांनी तपासणी केली परंतु त्यांचा रिपोर्टवरती सही असल्याचे म्हणणे नाही. त्यामुळे रिपोर्ट देणारे वेगळे आणि त्याबाबतचे पत्र दाखल करणारे वेगळे. यामूळे सदरचा रिपोर्ट हा पुरावा कायदयातील तरतूदीनुसार शाबीत होऊ शकत नाही. जरी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार पुरावा कायदयाप्रमाणे सिध्दता अपेक्षीत नसले तरी साधारणतः ज्या व्यक्तीने सदरची कागदपत्रे तयार केली त्या व्यक्तीचे शपथपत्र त्या कागदपत्राच्या सत्यते बाबत उत्पादक कंपनीने देणे आवश्यक होते. परंतु तसे शपथपत्र नसल्याकारणाने रिजेक्शन लेटर हे तांत्रिक दृष्टीने योग्य सिध्द न झाल्याने त्यातील उत्पादक दोष नाही ही बाब अनुत्तरीत आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना तिन्ही टायर्स व टयूबची रक्कम देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. सदर टायर्समध्ये उत्पादीत दोष नाही ही बाब शाबीतीची पूर्ण जबाबदारी उत्पादक कंपनीची आहे. ती उत्पादक कंपनीने पार न पाडल्याने त्यांनी तक्रारदारांना नूकसान भरपाई देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे दोषयूक्त उत्पादीत टायर्स सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 मार्फत तक्रारदारांना दिल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून मानसिक त्रासाची रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांचे इतर मागण्या या ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 14 अंतर्गत येत नसलयाने नाकारण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना तिन्ही टायर्सची किंमत
रु.27,600/- (अक्षरी रुपये सत्तावीस हजार सहाशे फक्त) आदेश
मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.02.05.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र.2 जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.2000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.2,000/-(अक्षरी रु. दोन हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड