::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य. ) (पारीत दिनांक– 25 मार्च, 2014) 01. तक्रारदार सागर शंकर खंडारे, अज्ञान तर्फे अ.पा.क.वडील शंकर दत्तूजी खंडारे यांनी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत मंचा समक्ष तक्रार दाखल केली.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे - तक्रारकर्ता सागर शंकर खंडारे हा 17 वर्षाचा असून तो नागपूर येथे शिक्षण घेत आहे. त्याने शिक्षणासाठी होंडा एक्टीव्हा वाहन विकत घेतले, ज्याचा नोंदणी क्रं-M.H.-31/B.L.4645 असा आहे तसेच इंजिन क्रं-J.F.-08-E-0401960 असा असून, चेसीस क्रं-.M.E.-4-JF-85-C-48391316 असा आहे. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्याने सदर वाहन बन्सल फॉयनान्स ट्रेडींग कंपनी तर्फे महाराष्ट्र मोटर्स व फायनॉन्स यांचे कडून दि.05.07.2011 रोजी रुपये-25,000/- मध्ये जुने वाहन म्हणून विकत घेतले होते. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं-1 ही एक संस्था असून कोराडी देवी मंदिरात येणा-या भाविकांचे वाहनाचे सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2 ते 4 हे विरुध्दपक्ष क्रं-1 चे अधिकृत कंत्राटदार आहेत. तक्रारकर्ता सागर हा नवरात्री पर्वाचे दरम्यान दि.13 ऑक्टोंबर, 2013 रोजी रात्री 01.00 वाजताचे सुमारास मित्रां सोबत कोराडी येथील देवी मंदिरात दर्शनासाठी गेला व त्याने उपरोक्त वर्णनातीत
वाहन विरुध्दपक्षाचे वाहनतळ असलेल्या जागेत ठेवले, त्या मोबदल्यात रुपये-10/- शुल्क अदा केले असता त्यास पावती क्रं-49754 देण्यात आली. दर्शन आटोपल्या नंतर अंदाजे 05.00 वाजता तक्रारकर्ता सागर परत आला व वाहनतळा वरील वाहन पाहिले असता ते दिसून आले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांचेकडे चौकशी केली परंतु ते सुध्दा वाहन तळावरील वाहना संबधाने योग्य ती माहिती देऊ शकले नाही म्हणून तेथील उपस्थित पोलीसांना कळविले असता त्यांनी प्रथम वाहन शोधा व नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवा असे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने वाहन शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते दिसून आले नाही. म्हणून दि.04 नोव्हेंबर, 2013 रोजी पोलीस स्टेशन कोराडी, नागपूर यथे वाहन चोरीची तक्रार नोंदविली असता पोलीसांनी अपराध क्रं-200/13 नोंदविला. तक्रारकर्ता सागर खंडारे याचे असे म्हणणे आहे की, त्याने विरुध्दपक्षास वाहनतळावर वाहन ठेवण्या बाबत शुल्क अदा केले असल्याने तो विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे व वाहनतळावरील वाहनाची सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची आहे. परंतु विरुध्दपक्षाचे हलगर्जीपणामुळे तक्रारकर्ता सागर याचे वाहन चोरीस गेले. विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे ते नुकसान भरपाईसाठी जबाबदार आहेत. परंतु विरुध्दपक्ष नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे तक्रारकर्ता सागर याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष सादर केली. तक्रारकर्त्याची प्रार्थना- 1) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्यास त्याचे चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत रुपये-25,000/- वाहन चोरीस गेल्याचे तारखे पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावोतो 18% व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. 2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल वि.प.क्रं 1 ते 4 यांनी प्रत्येकी रुपये-5000/- प्रमाणे त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 03. प्रस्तुत न्यायमंचाचे मार्फतीने यामधील विरुध्दपक्ष क्रं-1 ते 4 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं-1 रक्षा संपदा विभाग, मुंबई तर्फे अधिकारी, कोराडी देवी मंदिर वाहन तळ, कोराडी यांना दि.10.01.2014 रोजी नोटीस तामील झाल्याची पोच नि.क्रं-6 वर उपलब्ध आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 श्री विठ्ठल निमोणे (माजी सरपंच) नांदा कोराडी, ग्राम पंचायत तलावा जवळ, कोराडी यांना पाठविलेली नोटीस घेण्यास इन्कार या पोस्टाचे शे-यासह परत आली, ती निशाणी क्रं 7 वर उपलब्ध आहे. विरुध्दपक्ष क्रं-3 श्री हेमराज चौधरी, रा.नांदा कोराडी तलावा जवळ, पोस्ट कोराडी, जिल्हा नागपूर यांना पाठविलेली नोटीस घेण्यास इन्कार या पोस्टाचे शे-यासह परत आली, ती निशाणी क्रं-8 वर उपलब्ध आहे. विरुध्दपक्ष क्रं-4 श्री संजय कडू, रा.नांदा कोराडी तलावा जवळ, पोस्ट कोराडी, जिल्हा नागपूर यांना पाठविलेली नोटीस घेण्यास इन्कार या पोस्टाचे शे-यासह परत आली, ती निशाणी क्रं-9 वर उपलब्ध आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1 यांना नोटीस तामील झाली. तर विरुध्दपक्ष क्रं-2 ते 4 यांनी मंचाची नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस घेण्यास इन्कार केल्याने त्यांना पाठविलेल्या नोटीस परत आल्यात. विरुध्दपक्ष क्रं-2 ते 4 यांना मंचाचे नोटीसची सूचना मिळूनही त्यांनी नोटीस स्विकारल्या नसल्यामुळे त्यांना नोटीस तामील झाल्याचे मंचा तर्फे गृहीत धरण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-1 यांना नोटीस तामील होऊनही तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांना नोटीसची सूचना मिळूनही त्यांनी स्विकारली नसल्यामुळे, विरुध्दपक्ष क्रं-1 ते 4 हे न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी उत्तरही मंचा समक्ष दाखल केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 विरुध्द प्रस्तुत प्रकरणात एकतर्फी आदेश दि.30.01.2014 रोजी पारीत करण्यात आला. 04. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष सादर केली तसेच निशाणी क्रं-03 वरील यादी नुसार दस्तऐवज दाखल केले. ज्यामध्ये प्रामुख्याने वाहनाची डिलेव्हरी नोट, बन्सल फॉयनान्स ट्रेडींग कंपनी यांचे कर्जा संबधीचे ना-हरकत-प्रमाणपत्र, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन चालक परवाना प्रत, तक्रारकर्त्याने त्याचे वाहन रक्षा संपदा विभाग, मुंबई तर्फे कोराडी देवी मंदिर वाहनतळावर वाहन ठेवल्या बाबत दि.13 ऑक्टोंबर, 2013 रोजी निर्गमित केलेली रुपये-10/- शुल्काची पावती, दि.04 नोव्हेंबर, 2013 रोजी पोलीस स्टेशन, कोराडी, नागपूर येथे नोंदविलेल्या एफ.आय.आर. ची प्रत, पोलीस स्टेशन कोराडी येथे दि.13 ऑक्टोंबर, 2013 रोजी दिलेली तक्रार प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. 05. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री एस.गजभिये यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 06. तक्रारकर्त्याची तक्रार आणि उपलब्ध दस्तऐवज यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्या बाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे
अक्रं मुद्दे निष्कर्ष 1) तक्रारदार वि.प.चा ग्राहक आहे काय?................... होय. 2) वि.प.ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय?.............................................. होय. 3) अंतीम आदेश काय?..........................................तक्रार अंशतः मंजूर. -कारणे व निष्कर्ष – मुद्दा क्रं -01 व 02 बाबत - 07. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, उपलब्ध दस्तऐवजाचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता सागर शंकर खंडारे याचे मालकीचे होंडा एक्टीव्हा वाहन असून त्याचा नोंदणी क्रं-M.H.-31/B.L.4645 असा आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहन बन्सल फॉयनान्स ट्रेडींग कंपनी तर्फे महाराष्ट्र मोटर्स व फायनॉन्स यांचे कडून दि.05.07.2011 रोजी रुपये-25,000/- मध्ये जुने वाहन म्हणून विकत घेतले होते. या बद्दल तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल महाराष्ट्र मोटर फायनॉन्स नागपूर यांची वाहन डिलेव्हरी नोटची प्रत दाखल केली. त्यावरुन तक्रारकर्त्याचे वडील श्री शंकर दत्तूजी खंडारे यांचे मालकीचे वाहन असल्याची तसेच सदर वाहन हे जुने असून ते एकूण रुपये-25,000/- किंमती मध्ये विकत घेतल्याची व त्यापैकी रुपये-12,000/- अग्रीम दिल्याची व उर्वरीत रक्कम रुपये-13,000/-चे वित्तीय सहाय्य घेतल्याची बाब सिध्द होते. तसेच बन्सल फॉयनान्स ट्रेडींग कंपनी, नागपूर यांनी तक्रारकर्त्याचे वडील श्री शंकर डी.खंडारे यांचे मालकीचे Hero Honda Activa Reg. No.- M.H.-31/B.L.4645 वाहनाचे हायर पर्चेस एग्रीमेंट रद्द करण्या बाबत आर.टी.ओ.यांना दिलेल्या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केल्यामुळे वाहन हे वित्तीय सहाय्याने विकत घेतले होते ही बाब सिध्द होते.
तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल वाहनाचे आर.टी.ओ.चे नोंदणी दस्तऐवज दाखल केले आहेत. तसेच तक्रारकर्ता सागर शंकर खंडारे याचे वाहन चालक परवान्याची प्रत पुराव्या दाखल सादर केली आहे. 08. तक्रारकर्ता श्री सागर खंडारे याने विरुध्दपक्ष क्रं 1 रक्षा संपदा विभाग, मुंबई कोराडी देवी मंदिर वाहन तळ येथे दि.13 ऑक्टोंबर, 2013 रोजी सदरचे वाहन ठेवल्या बाबत पुराव्या दाखल पावती प्रत अभिलेखावर दाखल केली, त्यावरुन सदर पावतीचा क्रं 49754 व त्यावरील दि.13 ऑक्टोंबर, 2013 असा नमुद आहे तसेच त्यावर दोन चाकी वाहन रुपये-10.00 असे शुल्क नमुद आहे. यावरुन तक्रारकर्त्याने त्याचे वाहन दि.13 ऑक्टोंबर, 2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 रक्षा संपदा विभाग, मुंबई यांचे कोराडी देवी मंदिर वाहन तळ येथे रुपये-10/- शुल्क अदा करुन ठेवले होते ही बाब पूर्णतः सिध्द होते. त्यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याची बाब सिध्द होते. म्हणून मुद्दा क्रं-1 चे उत्तर होकारार्थी नोंदविलेले आहे. तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखा वरील तक्रारी नुसार विरुध्दपक्ष क्रं-1 ही एक संस्था असून कोराडी देवी मंदिरात येणा-या भाविकांचे वाहनाचे सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2 ते 4 हे विरुध्दपक्ष क्रं-1 चे अधिकृत कंत्राटदार आहेत, हे तक्रारदार याचे विधान विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांना मंचाचे नोटीसची सूचना मिळूनही अनुपस्थित राहिल्याने व त्यांनी कोणतेही लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल न केल्यामुळे मंचा तर्फे ग्राहय धरण्यात येते. 09. तक्रारकर्ता सागर याने पुढे असे नमुद केले की, दर्शन आटोपल्या नंतर अंदाजे 05.00 वाजता तो परत आला व वाहनतळावरील वाहन पाहिले असता ते दिसून आले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांचेकडे चौकशी केली परंतु ते सुध्दा वाहन तळावरील वाहना संबधाने योग्य ती माहिती देऊ शकले नाही म्हणून तेथील उपस्थित पोलीसांना कळविले असता त्यांनी प्रथम वाहन शोधा व नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवा असे सांगितले. वरुन तक्रारकर्त्याने वाहन शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते दिसून आले नाही. म्हणून दि.04 नोव्हेंबर, 2013 रोजी पोलीस स्टेशन कोराडी, नागपूर यथे वाहन चोरीची तक्रार नोंदविली असता पोलीसांनी अपराध क्रं-200/13 नोंदविला. तक्रारकर्त्याने आपले म्हणण्याचे पुष्टर्थ पोलीस स्टेशन, कोराडी यांनी नोंदविलेल्या एफ.आय.आर.ची प्रत अभिलेखावर दाखल केली, त्यामध्ये एफ. आय. आर. दि.04.11.2013 रोजी नोंदविल्याचे दिसून येते. अपराधाची
घटना-13.10.2013 तसेच पोलीस ठाण्यावर माहिती मिळाल्याची तारीख (Information received at P.S.Date) 13.10.2013 नोंदविलेली आहे. वाहन चोरीचे ठिकाण-कोराडी देवी मंदिर रोड सेवानंद शाळे समोरील पार्कींग वरुन नोंदविलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन अधिकारी, कोराडी पोलीस स्टेशन, नागपूर यांचेकडे दि.13.10.2013 रोजी वाहन क्रं- M.H.-31/B.L.4645 चोरीस गेल्या बाबत केलेल्या तक्रारीची प्रत पुराव्या दाखल दाखल केली आहे. 10. उपरोक्त नमुद पुराव्या वरुन तक्रारकर्त्याचे नोंदणीकृत वाहन हिरो होंडा एक्टीव्हा नोंदणी क्रं- M.H.-31/B.L.4645 हे दि.13.10.2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1 रक्षा संपदा विभाग, मुंबई कोराडी देवी मंदिर वाहन तळ येथून चोरीस गेल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. विरुध्दपक्ष क्रं-1 आणि त्यांचे अधिकृत कंत्राटदार विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांचे निष्काळजीपणामुळे सदरचे वाहन चोरीस गेले आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून मुद्दा क्रं-2 चे उत्तर होकारार्थी नोंदविले आहे. मुद्दा क्रं-3 बाबत- 11. मुद्दा क्रं-2 चे उत्तर होकारार्थी आल्याने तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1 ते 4 विरुध्द अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. डिलेव्हरी मेमो वरुन सदर वाहनाची किंमत रुपये-25,000/- असल्यामुळे तेवढी रक्कम आदेशाचा दिनांक-25.03.2014 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह विरुध्दपक्षा कडून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/- तक्रारकर्ता विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. ::आदेश:: तक्रारकर्ता सागर शंकर खंडारे अज्ञान तर्फे अ.पा.क.वडील श्री शंकर दत्तुजी खंडारे यांची विरुध्दपक्ष क्रं-1 ते 4 विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते. 1) विरुध्दपक्ष क्रं-1 ते 4 यांनी तक्रारकर्त्यास त्याचे चोरीस गेलेले नोंदणीकृत वाहन M.H.-31/B.L.4645 ची किंमत रुपये-25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार फक्त) निकाल पारीत दि.25 मार्च,2014 पासून द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी. न्यायमंचाचे निर्णया
नुसार विरुध्दपक्षाने त.क.ला वाहनाची किंमत परत केल्या नंतर जर वाहन मिळाले तर त्या वाहनावर त.क.चा कोणताही हक्क राहणार नाही, त्यावर विरुध्दपक्षाचा हक्क राहील. 2) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत. 3) सदर आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्रं-1 ते 4 यांनी निकालपत्राची प्रत मिळाल्या पासून30 दिवसाचे आत करावे. 4) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क देण्यात यावी. |